Thursday, August 4, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १९

पाकिस्तानात शेख अब्दुल्लांचे स्वागत करताना उतू गेलेला उत्साह लगेच ओसरू लागला. कारण शेख अब्दुल्लांनी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक केले. भारताकडून काश्मीरवर अन्याय झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी अशा अर्थाचे बोलणे अपेक्षित असतांना शेख अब्दुल्लानी भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक करणे पाकिस्तानला मानवण्यासारखे नव्हते.
--------------------------------------------------------------------------------------------


शेख अब्दुल्ला पाकिस्तानची राजधानी रावळपिंडीत पोचले तेव्हा तेथील जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नेहरूंशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोचले तेव्हा त्यांचे स्वागत झाले नव्हते. उलट त्यांच्या आगमनाने दिल्लीत राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या आधीही शेख घटना समितीच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले तेव्हा आणि काश्मीर संदर्भात १९५२ साली झालेल्या 'दिल्ली करारा'ला अंतिम रूप देण्यासाठी शेख दिल्लीत आले तेव्हाही जनतेकडून त्यांचे स्वागत झाल्याची नोंद नाही. शेख अब्दुल्लांच्या इच्छेने आणि प्रयत्नाने फाळणीच्या वेळी काश्मीर भारताशी जोडल्या गेला या संदर्भात भारतीय जनतेकडून कधीही कृतज्ञता प्रकट झाली नाही.  काश्मीर भारता अंतर्गत पण स्वायत्त राज्य असले पाहिजे या त्यांच्या आग्रही भूमिकेला सामीलीकरणाच्या कराराचा संदर्भ आहे हे भारतीय जनतेने कधी समजून घेतले नाही. या पार्श्वभूमीवर आरेसेस,जनसंघ यासारख्या हिंदुत्ववादी समूहांना काश्मीरची स्वायत्तता मान्यच नाही याच्या प्रतिक्रियेतून  स्वायत्तता ते स्वयंनिर्णयाचा काश्मिरी जनतेचा अधिकार अशी शेख अब्दुल्लांची झालेली वाटचाल सर्वसामान्य भारतीय जनतेच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. जनतेला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटण्या ऐवजी ते देशद्रोही आहेत असेच वाटत आले. काश्मीरची गुंतागुंत माहित असलेल्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाला दिलेल्या वचनाचे ज्ञान असूनही त्यांच्याकडून कधी शेख अब्दुल्लांचे मनापासून कौतुक झाले नाही. स्वतंत्र भारतात जम्मू-काश्मीर वगळता शेख अब्दुल्लांचे पाकिस्तानात झाले तसे उत्स्फूर्त स्वागत कधीच झाले नाही.

पाकिस्तान व काश्मीर यांच्यामध्ये शेख अब्दुल्ला खडकासारखे उभे राहिल्याने फाळणीच्या वेळी काश्मीर पाकिस्तानच्या वाट्याला आले नव्हते. याची सल पाकिस्तानची जनता आणि सरकार यांच्या मनात कायम असतांना पाकिस्तानची राजधानी रावळपिंडीत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून तेथील जनतेने त्यांचे स्वागत केले. शत्रूराष्ट्राच्या तुरुंगात १० वर्षे राहिल्या नंतर शेख अब्दुल्लांचा भारताप्रती मोह्भंग झाला असेल व फाळणीच्या वेळी त्यांचे असलेले विचार आता बदलले असतील ही भावना कदाचित अशा स्वागतामागे असेल. बदललेल्या परिस्थितीत शेख अब्दुल्ला काय बोलतात या उत्सुकतेपोटी रावळपिंडीत झालेल्या शेख अब्दुल्लांच्या जाहीरसभेला पाकिस्तानी नागरिकांनी गर्दी केली होती. भारतातील मुसलमानांच्या आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या सुरक्षा आणि प्रगतीसाठी भारत-पाक संबंध सुधारण्यावर त्यांनी जोर दिला. हे संबंध सुधारले तरच काश्मिरात शांतता नांदेल आणि काश्मीरची प्रगती होईल हेही त्यांनी मांडले. पण या मांडणीत कुठेही भारत विरोधी सूर नसल्याने पाकिस्तानची निराशाच झाली. अब्दुल्लांचे स्वागत करताना उतू गेलेला उत्साह लगेच ओसरू लागला. कारण शेख अब्दुल्लांनी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक केले.                                                                           

भारताकडून काश्मीरवर अन्याय झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी अशा अर्थाचे बोलणे अपेक्षित असतांना शेख अब्दुल्लानी भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक करणे पाकिस्तानला मानवण्यासारखे नव्हते. त्यामुळे दोनच दिवसात पाकिस्तानी वर्तमानपत्रातून शेख अब्दुल्लांवर टीका सुरु झाली. आपण काश्मीरचे प्रतिनिधी आहोत व सार्वमत न घेवून भारत काश्मीरवर करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्या ऐवजी शेख अब्दुल्ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल पाकिस्तानी वृत्तपत्रांचा आक्षेप होता. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुबखान यांनी मात्र चर्चेसाठी भरपूर वेळ दिला. भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी जूनच्या मध्यात दिल्लीला येण्याची अयुबखान यांनी तयारी दर्शविली. पाकिस्तान दौऱ्याचे मुख्य प्रयोजन साध्य झाले होते. मात्र शेख अब्दुल्लांना पाकव्याप्त काश्मीर मधील जनतेच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. त्यासाठी ते २७ मे च्या सकाळीच रावळपिंडीहून मुजफ्फराबादला रवाना झाले. पण वाटेतच त्यांना पंडीत नेहरूंच्या निधनाची वार्ता कळली. ही वार्ता त्यांच्यासाठी धक्कादायक होती. भारत-पाकिस्तान यांच्या बोलण्यातून काश्मीर प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा मावळली होती. ते पुढे मुजफ्फराबादला न जाता रावळपिंडीला परत आले व तेथून नेहरूंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नवी दिल्लीला परतले.

आपल्या हयातीत नेहरू हे कायम शेख अब्दुल्ला व काश्मिरी जनतेची आकांक्षा आणि आरेसेस-जनसंघ व त्यांना सुप्तपणे साथ देणाऱ्या कॉंग्रेससहित अन्य पक्षातील नेत्यांच्या स्वायत्तता विरोधी भूमिकेच्या कात्रीतच राहिले. भारतात राहू पण भारताच्या अधीन राहणार नाही ही शेख अब्दुल्लांची सुरुवाती पासूनची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका होती.  सामीलनाम्यात नमूद करण्यात आलेल्या गोष्टींव्यतिरिक्त भारताचा अतिरिक्त हस्तक्षेप नको ही शेख अब्दुल्लांची भूमिका आणि काश्मीरची सामीलनाम्यावर सही झाली म्हणजे तो इतर राज्यासारखा भारताचा भागच बनला किंवा बनायला हवा हे भारतातील सर्वसाधारण जनमत ही ती कात्री होती. . या कात्रीची धार कलम ३७० ला कॉंग्रेसची व संविधान सभेची मंजुरी मिळवून सरदार पटेलांनी बोथट केली. पण पुढे नेहरू सरकारच्या काश्मीर भुमिके विरुद्ध जनमताला चिथावणी देण्यासाठी संघ-जनसंघा सारख्या हिंदुत्ववादी शक्तींनी कायम कलम ३७० चा उपयोग केला तर दुसरीकडे नेहरूंनी काश्मीरच्या सर्वमान्य व सर्वोच्च नेते शेख अब्दुल्लांच्या आकांक्षा आणि स्वप्न चिरडण्यासाठी कलम ३७० चा वापर केला. यातून तयार झालेला गुंता सोडविला नाही तर परिस्थिती अधिकच बिघडेल ही जाणीव नेहरुंना झाली पण त्याला बराच उशीर झाला होता. पंडीत नेहरूंनी काश्मीर प्रश्नाचा अंत करण्याचा निर्धार केला तेव्हा परिस्थिती आणि प्रकृतीने साथ दिली नाही. त्यांचाच अंत झाला.

                                     (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment