Thursday, December 4, 2014

पुराणातील वांग्यांना पंतप्रधानांची फोडणी !

चमत्काराला जेव्हा विज्ञानाचा मुलामा चढविला जातो किंवा विज्ञान आणि चमत्कार याची सरमिसळ केली जाते तेव्हा  वैज्ञानिक दृष्टी अधू बनण्याचा धोका असतो. देशाचा किंवा सरकारचा प्रमुख जेव्हा अशी सरमिसळ करतो तेव्हा तर हा धोका अधिकच वाढतो.
--------------------------------------------------
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या अभूतपूर्व विजयानंतर भारतीय राजकारण आणि प्रामुख्याने अर्थकारण बदलेल आणि भाजपने निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे देशातील जनतेला 'चांगले दिवस' अनुभवायला मिळतील अशी आशा निर्माण झाली होती. मोदींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर म्हणजे पुढे जाईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. सत्तेत आल्यानंतर प्रगतीपथ हा पुढे जाणारा असतो हा समज दूर करण्याचा सपाटा दस्तुरखुद्द पंतप्रधानांसह संघपरिवाराने लावला आहे. नवे भविष्य घडविण्यात प्रगती नसून या देशाने पुराणकाळात(?) जे वैभव अनुभवले तितके मागे जाण्यात खरी प्रगती असल्याचे धडे जनतेला देण्याचा सपाटाच सरकारच्या व संघपरिवाराच्या धुरिणांनी लावला आहे. कॉंग्रेसच्या भ्रष्ट आणि कुशासना विरुद्ध जनतेने मोदीच्या बाजूने कौल दिला असे सर्व राजकीय विश्लेषकांचे एकमत असले तरी संघपरिवार तसे मानत नाही. आपले तत्वज्ञान आणि आपल्या समजुतीनुसार देश चालविण्याचा परवाना जनतेने दिला असल्याच्या अविर्भावात संघपरिवारातील संस्था वावरत आहेत. त्यामुळे बालजनाना संघ शाखेवर जी बौद्धिके ऐकायला मिळायची ती बौद्धिके आता संघपरिवार साऱ्या देशाला ऐकवू लागला आहे. संघपरिवाराचे आवडते गृहितक म्हणजे जुन्याकाळीच देशाने प्रगतीची सर्व शिखरे पार केलीत आणि आज लोक ज्याला प्रगती म्हणतात ते केवळ आमच्या पूर्वजांनी साध्य केलेल्या प्रगतीचे अवशेष मात्र आहे. लहानपणा पासून अशा प्रकारची बौद्धिके ऐकण्याचा काय परिणाम होतो हे देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्या नंतर नरेंद्र मोदी जे विचार प्रकट करीत आहेत त्यावरून कल्पना करता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी इस्पितळाचे उद्घाटन (देशाच्या पंतप्रधानांनी धर्मादाय नसलेल्या खाजगी इस्पितळाचे उद्घाटन करावे कि नाही हा वेगळा वादाचा विषय आहे.) करताना पुराणकथातील दोन उदाहरणे देवून त्याकाळी देशातील वैद्यकशास्त्र आजच्या पेक्षा अधिक प्रगत असल्याचा खळबळजनक आणि धाडसी दावा केला आहे. महाभारतातील कर्णाची उत्पत्ती त्याकाळी जेनेटिक सायन्स किती प्रगत होते हे दाखविते असा त्यांनी दावा केला . तसेच देशात सर्वत्र पुजला जात असलेल्या श्रीगणेशाच्या देहावर हत्तीचे मुंडके यशस्वीपणे जोडल्या गेले त्या अर्थी आजच्या पेक्षा प्रगत अशी प्लास्टिक सर्जरीची कला त्याकाळी अवगत होती असाही दावा त्या भाषणात पंतप्रधानांनी केला . त्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दिनानाथ बात्रा नावाच्या पात्राच्या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत प्राचीन उपलब्धतेचा त्यांनी गौरव केला होता. त्या पुस्तकात सर्वप्रथम विमानातून प्रवास करण्याचा बहुमान श्रीरामांना मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. याचा दुसरा अर्थ प्राचीन काळी विमान बनविण्याची आणि उडविण्याची कला भारताला अवगत होती असा निष्कर्ष पुराणकथांच्या आधारे त्या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रस्तावना लिहून ते पुस्तक वाचण्याची शिफारस श्री नरेंद्र मोदी करतात आणि आपल्या राज्यातील शाळेत ते पुस्तक अभ्यासक्रमात ठेवतात तेव्हा त्यातील गोष्टी श्री मोदी यांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ होतो. जुन्याकाळी सर्व काही चांगले होते असा मानणारा मोठा वर्ग समाजात प्रत्येककाळी राहात आला आहे. इतिहासात रमणारा आणि त्या इतिहासात शक्य झाले तर मागे जाण्याचा विचार करणारा वर्गही प्रत्येक काळी अस्तित्वात होता. असे चित्र आपल्या देशातच नाही तर जगभरात आढळून येते. हिंदूधर्मीय असा दावा करतात अशातील भाग नाही. बायबल देखील अशा कथांनी भरलेले आहे. जोवर चमत्कार म्हणून अशा कथा सांगितल्या जातात आणि ऐकल्या जातात तोवर समाज जीवनावर त्याचा फारसा विपरीत परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून त्या कथांकडे बघीतले जाते.  चमत्काराला जेव्हा विज्ञानाचा मुलामा चढविला जातो किंवा विज्ञान आणि चमत्कार याची सरमिसळ केली जाते तेव्हा मात्र वैज्ञानिक दृष्टी अधू बनण्याचा धोका असतो. देशाचा किंवा सरकारचा प्रमुख जेव्हा अशी सरमिसळ करतो तेव्हा तर हा धोका अधिकच वाढतो.

 
अर्थात पंतप्रधानांनी केलेली विधाने चमत्कार म्हणून केलेली नाहीत. त्यात विज्ञानाचे कौतुकच आहे. पण नुसते कौतुक करून विज्ञान विकसित करता येत नाही. वैज्ञानिक दृष्टी आणि वृत्तीचा विकास झाला तरच नवनवीन शोध लावता येतात , विज्ञानात प्रगती साधता येते. आपल्याकडे मुलभूत संशोधन होत नाही , नवे शोध लागत नाही याचे कारणच आमची वृत्ती आणि दृष्टी विज्ञाननिष्ठ नाही. तसे नसल्यामुळेच पौराणिक भाकडकथा आम्हाला खऱ्या वाटू लागतात. आमचे तथाकथित वैज्ञानिक अतर्कसंगत वागतात ते विज्ञाननिष्ठा अंगी न भिनल्यामुळे. अन्यथा अग्निबाणाच्या परीक्षणा आधी आमच्या संशोधन केंद्रात पूजाअर्चाचा घाट घातला गेला नसता. ज्या मंगळमोहिमेचे जगभर कौतुक होत आहे त्या मंगळयानाच्या उड्डाणा आधी त्याची प्रतिकृती बालाजी मंदिरात नेवून वैज्ञानिकांनी बालाजीचे आशीर्वाद मागितले नसते . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानांमुळे आमच्यातील अतार्किक व असंगत विचारांना बळ मिळण्याचा धोका असल्याने त्याचे परिणाम घातक होवू शकतात. आज मानवी अवयवाचे प्रत्यारोपण करण्यासाठी किती तरी प्रकारच्या चाचण्या घेवून सर्व गोष्ठी तंतोतंत जुळतील हे पाहावे लागते. मग मानवी शरीरावर जनावराच्या अवयवाचे प्रत्यारोपण दोन्हीत सारखेपणा असल्याशिवाय शक्य नाही हे आमच्या पंतप्रधानांना कळत नाही का ? मानवाच्या मानेचा आकार आणि हत्तीच्या मानेचा आकार यात प्रचंड तफावत असताना प्रत्यारोपण कसे शक्य आहे हा झाला वैज्ञानिक विचार. केवळ चमत्कारातून असे प्रत्यारोपण शक्य आहे. श्रीरामाने प्रवास केलेल्या विमानाचेही असेच आहे. सीतेच्या सुटकेसाठी श्रीलंकेत जाताना रामा जवळ विमान नव्हते. बंदरानी समुद्रावर सेतू बांधला आणि त्यावरून श्रीलंकेत जाता आल्याची कथा आहे . त्या पुलाचे दगड आजही अस्तित्वात असल्याचा संघपरिवाराचा दावा असल्याने श्रीलंकेशी जोडणारा सर्वात जवळचा सागरीमार्ग विकसित करण्यास त्या दगडांना धक्का लागणार असल्याने संघपरिवार विरोध करीत आहे. मग पुलावरून गेलेल्या रामाकडे परत येताना विमान आले कोठून ? याचा अर्थ ते रावणाच्या राज्यात विकसित झाले असले पाहिजे आणि याचा दुसरा अर्थ असा होतो कि रामा पेक्षा रावण अधिक प्रगत होता ! संघपरिवाराला हे मान्य आहे का ? श्रीलंकेतून सीतेसह रामाला घेवून येणारे विमान दुसऱ्यांदा दिसते ते आधुनिक काळात संत तुकारामांना वैकुंठात पोचवितानाच ! मग मधल्या काळात हे विमान कोणत्या धावपट्टीवर होते ? तुकोबा सोबत हे विमानही वैकुंठवासी झाले असे मानायचे का असे अनेक प्रश्न आहेत ज्याची तर्कसंगत आणि सिद्ध होवू शकणारी उत्तरे प्राचीन काळात विमान होते असे मानणाऱ्यानी दिले तर वैज्ञानिक प्रगतीसाठी त्याचा मोलाचा उपयोग होईल. आपल्याकडील विमान खरे मानले तर अरबी कथांमध्ये उडणाऱ्या चटयावर बसून प्रवास करता येत होता हे देखील खरे मानावे लागेल . कमी अधिक प्रमाणात अशा कथा सर्वच देशात प्रचलित आहेत. त्यामुळे त्यात फक्त भारतच आघाडीवर होता असा दावाही करता येत नाही.

 
पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तींनी अशी अवैज्ञानिक विधाने केली तर देशातील वैज्ञानिक त्याचा प्रतिवाद करायला पुढे येत नाहीत हे वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ते याच मुळे! म्हणून सत्तेनेच शहाणपणाने वागणे गरजेचे असते.  वैज्ञानिक याचा प्रतिवाद करणार नसतील तर विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होवून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यात बाधा निर्माण होणार आहे. असे होणे ही आम्ही स्विकारलेल्या राज्यघटनेची प्रतारणा ठरेल. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याची गरज आमच्या राज्यघटनेत प्रतिपादित केली आहे. पंतप्रधानांची अशी विधाने हा घटनाभंग ठरतो. भाकडकथा सांगण्याऐवजी पंतप्रधानांनी आपल्या पूर्वजांनी साध्य केलेल्या खऱ्याखुऱ्या उपलब्धीना न्याय द्यायला हवा होता. शून्याचा शोध भारतात लागला याचा गौरव करता आला असता. आर्यभटाचे खगोलशास्त्रातील योगदान प्रेरक म्हणून लोकांपुढे मांडता आले असते. रोगनिदान आणि शल्यचिकित्सा या संदर्भात चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या पुरातन ग्रंथाचा गौरव पंतप्रधानांना करता आला असता. हे जास्त समयोचित आणि वैज्ञानिक वृत्तीचा गौरव करणारे ठरले असते. पुराणातील वांगे पुराणात ठेवून आधुनिक दृष्टीकोनातून देशाला प्रगतीपथावर कसे नेता येईल इकडे पंतप्रधानांनी लक्ष देण्याची जास्त गरज आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विश्वास असण्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानाकडून देशाची हीच अपेक्षा आहे. या संदर्भात तरी सध्याच्या पंतप्रधानांनी देशाच्या पहिल्या पंतप्रधानाकडून -पंडीत जवाहरलाल नेहरू कडून- प्रेरणा घेवून वाटचाल करण्याची गरज आहे .

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------- 

1 comment:

  1. Modinni, tyancha hindutvacha agenda amlaat ananyache tharvalele disate. don trutiyansh bahumat milale tar rajya ghatana badalnyacha karykram karun taktil. vaidnyanik, tatvadny, samajsevak, lekhak, sahityik, patrakar sagle mug gilun gapp basatil. tase honar nasel tar tumchya vidhanavar comments kelya asatya.

    ReplyDelete