चुंबन , प्रेम , लैंगिकता हे विषय उघडपणे बोलायचे नसतात , आपल्या मुलामुलींना त्यातले काही कळू द्यायचे नसते आणि करू द्यायचे नसते ही आपली संस्कृती असती तर खजुराहोचे सुंदर आणि आकर्षक शिल्प निर्माणच झाले नसते. 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाने हा मुद्दा चर्चेत आला असला तरी समाजाच्या मानसिकतेला न पेलणारे हे आंदोलन आहे.
--------------------------------------------------
समाजातील नीतीमत्तेचे स्वयंघोषित रक्षक आणि प्रेम करायला मोकळीक असली पाहिजे असे मानणारा वर्ग यांच्यात केरळ राज्यात सुरु झालेल्या संघर्षाचीच चर्चा देशभर होत आहे. एवढेच नाही तर हा संघर्ष केरळच्या सीमा ओलांडून देशाच्या इतर भागात देखील पोचला आहे. समाजातील स्वयंघोषित मॉरल पोलीस यांच्या कारवाया विरुद्ध ज्यांनी संघर्ष पुकारला आहे त्यांनी आपल्या आंदोलनाला 'कीस ऑफ लव्ह' असे नाव दिले आहे. मॉरल पोलीस आणि कीस ऑफ लव्ह हे दोन्ही शब्दप्रयोग चुकीचे आहेत. चुंबन हे सदैव अनादीकाला पासून प्रेमाचे प्रतिकच मानले गेले आहे. ते प्रेम प्रियकर - प्रेयसीचे असेल किंवा आई आणि मुलाचे असेल त्याची सर्वोत्तम अभिव्यक्ती चुम्बानातून होत आली आहे. प्रेमा शिवाय चुंबनाला वेगळा अर्थ नाही. म्हणूनच 'कीस ऑफ लव्ह' शब्दप्रयोग बरोबर नाही. प्रेमाची अभिव्यक्ती- 'एक्स्प्रेशन ऑफ लव्ह' हे नाव त्या आंदोलनासाठी अधिक सार्थक राहिले असते. तसेच मॉरल पोलीस हा शब्दप्रयोग वापरण्यातच काही मॉरल नाही. कारण ज्यांना मॉरल पोलीस संबोधण्यात येते ते पूर्णत: बेकायदेशीर आणि अनैतिक समजले जाणारे काम करीत असतात. मॉरल पोलीस कोणाला म्हणतात हे चांगले समजून घ्यायचे असेल तर त्याची दोन उदाहरणे डोळ्यासमोर आणावीत. येथे देत असलेली दोन्ही प्रकरणे गाजलेली असल्याने मुद्दा चटकन लक्षात येईल. आसाम मधील गोहाटीच्या रस्त्यावर पब मधून बाहेर पडलेल्या मुलीना अडवून त्यांची वस्त्रे फाडणारे , त्यांच्याशी भर रस्त्यावर अश्लील व्यवहार करणारे जे टोळके होते त्या टोळक्याला आणि तत्सम कारवाया करणाऱ्या लोकांना आपल्याकडे मॉरल पोलीस म्हणतात. दुसरे उदाहरण दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचे. धावत्या बस मध्ये निर्भयावर अत्याचार करणारे आणि निर्भयाच्या मित्राला बेदम मारहाण करणारे अत्याचारी रात्री त्या दोघांनी सिनेमा पाहायला जाण्यामुळे संतप्त झाले होते . अशा प्रकारे मुला-मुलीने सिनेमा बघणे हे संस्कृतीला बुडविणारे असल्याचे त्यांचे मत होते आणि ते मत मांडीत ते अत्याचार करीत होते. अशा अत्याचारीना आपल्याकडे संस्कृतीरक्षक मॉरल पोलीस म्हणण्याचा प्रघात आहे ! दोन प्रेमी जीव एकांतात बसलेले दिसले कि त्यांना बदडणारे हे नैतिकतेचे रक्षक जेव्हा भर रस्त्यात मुलींची किंवा महिलांची छेड काढली जाते तेव्हा त्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी कधी पुढे येत नाहीत .

केरळात सुरु झालेले 'कीस ऑफ लव्ह' आंदोलन अशाच मॉरल पोलिसांच्या संस्कृती रक्षणाच्या नावावर झालेल्या उत्पाती कारवाइ विरुद्ध उभे राहिले आहे. केरळ मधील एका रेस्टॉरंट मध्ये एका जोडप्याने घेतलेले चुंबन कथित संस्कृती रक्षकाच्या नजरेला खुपले आणि संस्कृती रक्षकांनी त्या रेस्टॉरंटवर हल्ला करून प्रचंड नासधूस केली. त्याआधी केरळात समुद्र किनारी फिरणारे जोडपे किंवा अन्यत्र एकांतात आढळणारे जोडपे हे संस्कृती रक्षकांच्या निशाण्यावर सतत होतेच. रेस्टॉरंट वरील हल्ला उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली आणि अशा प्रकारा विरुद्ध 'कीस ऑफ लव्ह'च्या रूपाने संघटीत आंदोलन उभे राहिले. रेस्टॉरंट वरील हल्ल्यात संघपरिवारातील संस्थांचा हात असल्याचा आरोप आहे आणि हाच परिवार 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाचा सर्वशक्तीनिशी विरोध करीत आहे. त्यांच्या मते अशाप्रकारे रस्त्यावर चुंबन घेणे हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. अशाप्रकारे चुंबन घेणे हे परकीय संस्कृतीचे अतिक्रमण आहे. तर आंदोलकांच्या मते प्रेम करणाऱ्यावर हल्ला होण्याच्या विरोधातील हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे हे अश्लीलतेत मोडत नसल्याचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार देत आंदोलक आपल्या आंदोलनाचे समर्थन करीत आहेत. इथे आणखी एक वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. रेस्टॉरंट वरील हल्यात आणि 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाच्या विरोधात संघपरिवाराचा पुढाकार असला तरी अशा प्रकाराला एकटा संघपरिवार दोषी नाही. नरेंद्र मोदींच्या विजयाने संघपरिवाराची ताकद आणि उन्माद वाढल्याने ते ठळकपणे नजरेत भरतात, पण इतर गट आणि घटक फार मागे नाहीत. गोहाटी आणि दिल्लीची मॉरल पोलिसिंगची जी दोन उदाहरणे दिलीत त्यात संघपरिवाराचा सहभाग नाही. मुलीनी पब मध्ये जावू नये , मित्रा बरोबर फिरू नये , सिनेमा पाहू नये ही संघाची विचारधारा असल्याने कथित मॉरल पोलिसांच्या कारवाया त्यांना नेहमीच समर्थनीय वाटतात . केरळ मध्ये मॉरल पोलिसांचा राडा नवीन नाही. संघपरीवाराच्या आधी मार्क्सवादी तरुणांनी पूर्वी अशा कारवायात भाग घेतला आहे. आज मार्क्सवादी 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाच्या सोबत आहेत. मात्र केरळ मधील युवक कॉंग्रेसचा संघपरिवारासारखाच 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाला विरोध आहे. मुस्लीम संघटनांनी देखील विरोध केला आहे. आणखी एक आश्चर्य घडले आहे. या प्रकरणात केरळ भाजपने संघ परिवारातील इतर संस्थाना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जुनाट आणि कालबाह्य विचारसरणीचा म्हणून फक्त संघपरिवाराला झोडपणे बरोबर नाही. कमी अधिक प्रमाणात आपल्या समाजाचीच अशी मानसिकता आहे हे मान्य करायला हवे.
समाजाच्या याच मानसिकतेला 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाने जोरदार धक्का दिला आहे . पण अशा धक्क्याने लोकांची मानसिकता बदलण्यात या आंदोलनाला यश येईल का हा खरा प्रश्न आहे. आज जे चित्र दिसते आहे त्यानुसार या विषयावर समाजात मंथन घडत असले तरी लोक आंदोलनाच्या बाजूने संघटीत होण्या ऐवजी परंपरावादी मंडळी मात्र एकत्र येवून आंदोलनाला विरोध करीत आहेत. संघपरिवार , मुस्लीम संघटना आणि युवक कॉंग्रेस सारख्या संघटना एकत्रितपणे या आंदोलनाचा विरोध करीत आहेत. चुंबना सारख्या विषयाची , प्रेमाची ,लैंगिकतेची आपल्या समाजात कधीच मोकळ्यापणाने चर्चा होत नाही. या विषयाचे कुतूहल लहान्या पासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच असते. रस्त्यावर असे पूर्वनियोजित चुंबन घेणे हा प्रकार नवीन असल्याने कुतुहालपोटी बघ्यांची आंदोलन स्थळी प्रचंड गर्दी राहात आली आहे. एकीकडे आंदोलनाला शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे मोबाईल मध्ये चुंबन घेतानाचे फोटो घेवून ते आवडीने पहात बसायचे अशी आमच्या समाजाची मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा उघडी पडली आहे. दिवसा नैतिकतेचा जप करायचा आणि रात्री अश्लील वेबसाईट बघत राहायचे ही आमची संकृती बनत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयात अश्लील वेबसाईटच्या विरोधात जी सुनावणी चालू आहे त्या निमित्ताने जी माहिती बाहेर आली आहे ती धक्कादायक आहे. स्मार्टफोन आणि संगणक ज्यांचेकडे आहे किंवा ज्यांना सहज उपलब्ध होवू शकतात त्यांच्यापैकी मोठा वर्ग नित्यनेमाने अश्लील वेबसाईट मिटक्या मारीत पाहात असल्याची माहिती न्यायालयात उघड झाली आहे. समाजात अशा विषयाचे कुतूहल शमविण्याचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने संस्कृतीच्या गप्पा मारणारा आमचा समाज अश्लील वेबसाईट बघून कुतूहल शमवू लागला आहे. यात तरुणांची संख्या लक्षणीय असणार हे ओघाने आलेच. त्यामुळे 'कीस ऑफ लव्ह' आंदोलनाने चुंबन ,प्रेम ,लैंगिकता अशा विषयाला सार्वजनिक चर्चेचा विषय बनवून मोठी आणि महत्वाची कामगिरी बजावली आहे. तरी पण चर्चा घडणे आणि मानसिकता बदलणे या वेगळ्या गोष्टी आहेत. या आंदोलनामुळे तरुणांना बळ मिळेल , चोरून लपून प्रेम करून संकट ओढवून घेण्यापेक्षा प्रेमाची खुलेआम अभिव्यक्ती करायला संकोच वाटणार नाही . पण त्याच सोबत या आंदोलनामुळे कुटुंबाची मानसिकता बदलणार नाही हे आंदोलकांनी लक्षात घेतले नाही. आपल्या समाजाची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला आज तरी सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्याचा प्रकार मानवणारा नाही. अशा मानसिकतेच्या आई-बापाना एक प्रकारे परंपरावाद्यांच्या तंबूत ढकलण्या सारखे होईल. प्रेमाला घरातून संमती मिळणे फार गरजेचे आहे. म्हणून प्रेमाच्या मुक्त अभिव्यक्तीसाठी दुसऱ्या मार्गाचा लोकांना रुचेल ,मानवेल अशा मार्गाचा आंदोलनात अवलंब करता आला असता. स्त्री-पुरुषांना , मुला -मुलींना हातात घालून रस्त्यावर उतरता आले असते. आज त्यांनी केले त्यात अनैतिक काहीच नाही , पण ध्येयपूर्तीत अडथळा नक्कीच आहे.
ज्या तथाकथित संस्कृतीवाद्यांना 'कीस ऑफ लव्ह' आपल्या संस्कृतीच्या विरोधात वाटते त्यांना आपली संस्कृती कळलीच नाही असे म्हणावे लागेल. चुंबन , प्रेम , लैंगिकता हे विषय उघडपणे बोलायचे नसतात , आपल्या मुलामुलींना त्यातले काही कळू द्यायचे नसते आणि करू द्यायचे नसते ही आपली संस्कृती असती तर खजुराहोचे सुंदर आणि आकर्षक शिल्प निर्माणच झाले नसते. लैंगिकतेचे उघड आणि उदात्त दर्शन घडविणारे शिल्प केवळ खजुराहोत नाही तर देशात अनेक ठिकाणी सापडते. आज जगभर वाचला आणि चर्चिला जात असलेला वात्सायनाचा 'कामसूत्र' ग्रंथ भारतात लिहिला गेला नसता. चुंबनाचे खरे धडे तर या पुस्तकाने भारतीयांनाच नाही तर जगाला दिले. कालीदासाकडून प्रेमकाव्य लिहिल्या गेले नसते आणि त्याची भुरळ आम्हाला पडली नसती. महाभारतासारख्या महाकाव्यातील कर्णाच्या उत्पत्तीला आम्ही विज्ञानाचा मुलामा देवून ते खरे असल्याचा दावा करीत असू तर मग याचाच भाग असलेल्या कृष्णलीला खऱ्याच होत्या ना ? या लीला तर दिवसा ढवळ्या उघड्यावर चालायच्या ! मग संस्कृती रक्षक कोणत्या संस्कृतीच्या रक्षणाच्या गोष्टी करीत आहेत ? समाजात या बाबातीतला मोकळेपणा होता याचाच हा पुरावा आहे. भारतीय संस्कृतीतील जे चांगले ते जगाने आत्मसात केले. आणि आज त्याला आम्ही पाश्च्यात्य संस्कृती म्हणून हिणवतो आहोत ! संस्कृती रक्षणाच्या नावावर विकृतीचे रक्षण होत आहे आणि अशा विकृतीमुळे तरुणांचे भवितव्य अंध:कारमय होत चालले आहे हे संस्कृती रक्षकांनी ध्यानात घेवून आपली दंडेली थांबविली पाहिजे. तरुणांना मोकळेपणाने प्रेमाची अभिव्यक्ती शक्य झाली पाहिजे आणि त्यासाठी गावात शहरात सुरक्षित जागा देखील असल्या पाहिजेत. ज्यांना मागासलेले समजतो त्या आदिवासी समाजात 'गोटूल' सारखी व्यवस्था हजारो वर्षापासून आहे. पुढारलेल्या समाजात मात्र प्रेम करणाऱ्यावर लाठ्याकाठ्यानी हल्ला होतो. हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नसून रानटीपणाचे लक्षण आहे. या रानटीपणाला आवर घालण्याची सरकारची कायदेशीर तर समाजाची नैतिक जबाबदारी आहे.
---------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment