Thursday, November 13, 2014

अस्थिर महाराष्ट्र !

शरद पवारांचा उपयोग करून घेवून विरोधकांना विशेषत: शिवसेनेला धडा शिकविण्याची जी मग्रुरी आणि अपरिपक्वता भारतीय जनता पक्षाने दाखविली यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. २५ वर्षात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दुय्यम वागणूक दिली, अनेकदा अपमान केला त्याचा सूड घेण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला आणि महाराष्ट्राला अस्थिरतेच्या टोकावर नेवून ठेवले आहे.
---------------------------------------------
महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक निकाल पूर्णपणे बाहेर येण्याच्या आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थिर सरकार बनविण्यासाठी सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एकतर्फी बाहेरून समर्थन जाहीर करून सर्वाना चकित केले. सरळ विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे १२२ आमदार आणि भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठींबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४१ आमदार अशी संख्या लक्षात घेतली तर स्थिर सरकार बनण्यास कसलीच आडकाठी नव्हती. पण राजकारण एवढे सरळमार्गी नसते याचा प्रत्यय महाराष्ट्राला निवडणूक निकालापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या सरकारवर विश्वासमत व्यक्त होई पर्यंतच्या कालावधीत आला. स्थिर सरकारसाठी पाठींबा देण्याची शरद पवारांची खेळी राजकीय भूकंप निर्माण करणारी ठरली आणि या खेळीने महाराष्ट्रातील राजकारणाने जे वळण घेतले त्याने सिद्धहस्त राजकारण्यांची नाही तर राजकीय पंडीत आणि पत्र पंडितांची मती गुंग झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील गटनेते आर.आर.उर्फ आबा पाटील यांनी विश्वासमत व्यक्त करणाऱ्या ठरावावर भाषण करताना आपल्या नेत्याची खेळी आपल्याला किंवा आपल्या पक्षाला देखील पुरतेपणी कळली नाही हे सांगून या खेळीमागे केवळ स्थिर सरकार देण्याच्या विचारापेक्षा आणखी बरेच काही आहे याची एकप्रकारे कबुलीच दिली आहे. पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधकाच्या मते पक्षाच्या भूतपूर्व मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत त्याची चौकशी होवू नये यासाठीच ही खेळी केली आहे. माध्यमातील विद्वानांचे यापेक्षा वेगळे मत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस वरील हे आरोप नवीन नाहीत. निवडणूक प्रचार काळात हे आरोप होत होतेच. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीचा प्रचार काळात कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीवर हल्ला होत होता. एन सी पी म्हणजे नैसर्गिक भ्रष्टाचारी पक्ष अशी व्याख्याच त्यांनी केली होती. गाजत असलेल्या सिंचन घोटाळया प्रकरणी चितळे समितीच्या अहवालानंतर देखील सिंचन घोटाळ्याच्या पूर्वी होत असलेल्या चर्चेत काही फरक पडला नाही हे लक्षात घेता भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य किती आणि राजकारण किती हे सांगणे कठीण आहे. माहितीचा अधिकार आणि न्यायालयाची वाढती सक्रियता, माध्यमांची जागरुकता  लक्षात घेतली तर कोणताही घोटाळा दाबणे कोणत्याही सरकारसाठी सोपे राहिलेले नाही. मनमोहन सरकारने स्वत:हून काहीच कारवाई केली नाही तरी २ जी किंवा कोळसा खाण वाटपाच्या कथित घोटाळ्याच्या प्रकरणी चौकशी आणि खटले थांबविता आले नाहीत. बाकी कोणाला नाही तरी आता राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या आणि विरोधी बाकावर असलेल्या कॉंग्रेसला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी गैर काही केले असेल तर त्याची इत्यंभूत माहिती असणार आणि फडणवीस सरकारने लपवायचा प्रयत्न केला तरी कॉंग्रेसला ती माहिती उघड करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तेव्हा पाठींबा देण्यामागे भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा हेतू आहे यात फारसे तथ्य वाटत नाही. सगळे विश्लेषक झापडबंद पद्धतीने हाच आरोप करीत असल्याने पवारांची खेळी रहस्यमय बनली आहे. त्यामागच्या इतर कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही.

आजवर पवारांवर ते जे सांगतात नेमके त्याच्या उलट करतात असा आरोप होत आला आहे. यावेळी मात्र  पहिल्यांदाच त्यांनी आधी आपले पत्ते उघड केले आणि त्याप्रमाणेच त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे वर्तन राहिले आहे हे मान्य करावे लागेल. राजकीय विश्लेषकांनी आणि माध्यमांनी पवारांच्या खेळीकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले नसते तर या खेळी मागची कारणे नीट समोर आली असती. इतर पक्षांना राजकीय परिस्थितीचे आकलन होण्यास आणि आपल्यावर आलेले गंडांतर लक्षात येण्यास उशीर लागला , पण मुत्सद्दी शरद पवारांच्या ते चटकन लक्षात आले ! निकालाचे संभाव्य आकडे आणि केंद्रातील भाजप सरकार लक्षात घेता कोणी पाठींबा दिला नाही तरी भाजप अल्पमताचे सरकार बनविणार आणि कोणाचा पाठींबा मिळाला नाही तर फोडाफोडी करून बहुमत सिद्ध करणार हे शरद पवारांच्या लक्षात आले असावे . आपल्या सहकाऱ्यांची सत्तालालसा शरद पवारांपेक्षा दुसऱ्या कोणाला माहित असणार ! पक्षफुटीचा आणि पर्यायाने पक्षाच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी घाईघाईने पवारांनी पाठींबा जाहीर केला आणि पक्ष सुरक्षित केला ! हा धोका आपल्यालाही आहे हे शिवसेना आणि कॉंग्रेसला उशिरा उमगले . मतविभागणीची उशिरा मागणी करण्यामागचे या पक्षांचे हे खरे कारण आहे ! स्थिर सरकार देण्याच्या नावावर शरद पवारांनी जी खेळी केली त्याने एकूणच राजकारण अस्थिर बनले हे खरे असले तरी याचा दोष शरद पवारांना देता येणार नाही. आपला पक्ष स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या खेळीचा जसा राजकीय विश्लेषकांना अर्थ कळला नाही , तसाच तो सत्ताधारी भाजपला आणि शिवसेनेला कळला नाही. त्यांचे भांडण वाढविण्यात आणि सरकारला आपल्यावर अवलंबून ठेवण्यात पवार यशस्वी झाले ते त्यामुळेच. पवारांनी जे काही केले ते आपल्या अस्तित्वासाठी केले. पवारांचा उपयोग करून घेवून विरोधकांना विशेषत: शिवसेनेला धडा शिकविण्याची जी मग्रुरी आणि अपरिपक्वता भारतीय जनता पक्षाने दाखविली यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या २५ वर्षात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दुय्यम वागणूक दिली, अनेकदा अपमान केला त्याचा सूड घेण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला आणि महाराष्ट्राला अस्थिरतेच्या टोकावर नेवून ठेवले आहे

आपली मजबुरी शरद पवार सारख्या मुरलेल्या राजकारण्याच्या लक्षात वेळीच आली आणि त्या मजबुरीचे शक्तीत रुपांतर करण्यासाठी त्यांना पाउले उचलता आली. शिवसेना नेतृत्वाला मात्र आपली मजबुरी लक्षात यायला आणि मान्य करायला खूप वेळ लागला. निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप मैत्री असली तरी शिवसेनेचा कायम वरचढपणा राहात आला होता. मोदींमुळे भारतीय राजकारणात झालेले बदल लक्षात न घेता शिवसेना मग्रुरीत वागत राहिली. उठता बसता छत्रपतींच्या नावाचा जप करणाऱ्या शिवसेनेला छत्रपतींच्या गनिमीकाव्याचा विसर पडला आणि बलदंड झालेल्या भाजपला गंजलेल्या तलवारीने आव्हान देवू लागला. राजकारणात ताठरपणा नाही तर लवचिकता फायद्याची असते हे उद्धव ठाकरेंना कळायच्या आत त्यांचा ताठरपणा जे नुकसान करायचे ते करून गेला होता. तुटे पर्यंत ताणू नये याचे भान उद्धव ठाकरेंना ना जागा वाटपाच्या वाटाघाटीत होते ना निवडणूक निकालानंतर आले. शरद पवारांची बिनशर्त पाठिंब्याची खेळी देखील त्यांची झोप उडवू शकली नाही. या राजकीय असमंजसतेने शिवसेनेचा सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग अवरुद्ध झाला तर दुसरीकडे विरोधात बसण्याची मानसिकता तयार झाली नाही.शेवटी मजबुरीने विरोधी बाकावर बसण्याची घाई शिवसेनेला करावी लागली. राजकीय अपरिपक्वतेसाठी शिवसेनेलाच दोष देण्यात अर्थ नाही. आपण आता सत्तेत येणार हे लक्षात घेवून भाजपा नेतृत्वाने ज्या प्रगल्भतेचे आणि समावेशकतेचे दर्शन घडवायला पाहिजे होते ते न घडवून आपण शिवसेनेपेक्षा कमी अपरिपक्व नाही हे दाखवून दिले आहे. शिवसेने सोबतची नैसर्गिक मैत्री लक्षात घेवून स्थिर सरकारसाठी शिवसेनेला सोबत घेणे राजकीय दूरदर्शीपणाचे ठरले असते. पण कधी नव्हे ते शिवसेने पेक्षा दुप्पट जागा आल्याने यश भाजप नेतृत्वाच्या डोक्यात गेले. शिवसेनेला त्यांची जागा आणि लायकी दाखवून देवूनच त्यांना सोबत घ्यायचे याने भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व झपाटले होते. हा विजयाचा उन्माद आणि सत्तेची गुर्मी याचा परिणाम होता. विजय केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात गेला कि आधीच बालिश म्हणून राज्याच्या भाजप नेतृत्वाची ओळख आहे त्या नेतृत्वाच्या डोक्यात गेला हे यथावकाश बाहेर येईलच. दोष कोणाचा का असेना भाजपकडून शिवसेनेच्या वाघाला मांजर बनविण्याचा प्रयत्न झाला हे नाकारता येत नाही. सत्तेच्या धुंदीत भाजप एक गोष्ट विसरला. मांजर देखील तिला पळायला जागा सोडली नाही तर वाघासारखाच हल्ला करते आणि असा हल्ला भाजपने आपल्यावर ओढवून स्वत:च स्वत:चे सरकार अस्थिर बनविले आहे.
भाजपला शिवसेने बरोबर संसार करायचा नव्हता तर सरळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुढे केलेला हात आपल्या हातात घेवून महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायला हवे होते. पण इथेही भाजपचा दुटप्पीपणा आडवा आला. राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर राजकारण करायचे आणि आम्ही त्यांचा पाठींबा मागितलाच नाही असे सांगत सुटायचा सपाटा भाजप नेतृत्वाने लावला. राष्ट्रवादीचा पाठींबा एवढा अडचणीचा होता तर पवारांनी पाठींबा जाहीर करताच आम्हाला तुमचा पाठींबा नको अशी जाहीर भूमिका भाजपने घ्यायला हवी होती. अशी भूमिका घेतली असती तर राष्ट्रवादी तोंडावर आपटली असती आणि शिवसेनेला भाजप बद्दल वाटणारा अविश्वास कमी होवून दोघांचे जुळायला मदत झाली असती. केंद्रातील सत्तेच्या पाठबळामुळे महाराष्ट्रातील भाजप नेतृत्व एवढे हुरळून गेले आहे कि त्यांना कोणाशीच घरोबा करायचा नाही. अनैतिक संबंध ठेवून सत्ता टिकवायची आहे. राष्ट्रवादीशी संबंध नाही हे दाखविण्यासाठी आवाजी मतदानाचा जो बनाव भारतीय जनता पक्षाने केला त्यामुळे पहिल्याच दिवशी विधानसभेत सरकारप्रती अविश्वासाचे आणि कटुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पक्षफोडीची सतत टांगती तलवार राजकीय वातावरण गढूळ आणि संशयी बनणार आहे. यातून निर्माण होणारी अस्थिरता महाराष्ट्राच्या विकासाचा घास तर घेणार नाही ना अशी शंका पहिल्याच दिवशी नागरिकाच्या मनात येणे याला नवनिर्वाचित सरकारची अपयशी सुरुवात असेच म्हणावे लागेल . मात्र दारूण पराभव झालेल्या कॉंग्रेसला पहिल्याच दिवशी विरोधाचा सूर गवसला ही त्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी बाब आहे.
-------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------

No comments:

Post a Comment