Thursday, November 6, 2014

कॉंग्रेसचे काय होणार ?

परिस्थिती बदलली तरी जे बदलत नाहीत ते संपतात या निसर्ग नियमानुसारच कॉंग्रेसची वाताहत झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस बदलत नाही तोपर्यंत कॉंग्रेस पुनरागमनाच्या मार्गावर देखील येवू शकत नाही हे आजचे वास्तव आहे.
----------------------------------------------

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेतृत्व वगळता सर्वांनाच कॉंग्रेसचा पराभव अटळ वाटत होता. अर्थात कॉंग्रेसचा एवढा दारूण पराभव होईल हे मात्र कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. या पराभवापासून धडा घेवून कॉंग्रेस नेतृत्व खडबडून जागे होईल आणि पक्षाच्या पुनर्बांधणीचा , सर्व स्तरावर नेतृत्व बदलाचा प्रयोग होईल आणि दारूण पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न होईल असे वाटले होते. पराभवाच्या दारूण स्वरूपामुळे पक्ष नेतृत्व खडबडून जागा होण्या ऐवजी कोमात गेले. लोकसभा निवडणूक ते महाराष्ट्र आणि हरियाना राज्याच्या विधानसभा निवडणुका या सहा महिन्याच्या काळात पक्षाला उभारी देण्याचे कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी या दोन राज्यात लोकसभा निवडणुकी सारखाच पराभव कॉंग्रेसने ओढवून घेतला. ज्या प्रकारचा हा पराभव आहे त्यामुळे अशक्य वाटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न साकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्यात चिंताजनक कोणती गोष्ट असेल तर कॉंग्रेस नेतृत्वाला याची काही चिंता आहे असे प्रथमदर्शनी दिसत नाही. आज राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करू शकेल असा कॉंग्रेस व्यतिरिक्त दुसरा कोणताच पक्ष नसल्याने कॉंग्रेसची वाताहत भारतीय राजकारणासाठी आणि लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. मोदी सरकार बद्दल लोकांचा लवकरच भ्रमनिरास होईल आणि लोक परत कॉंग्रेसकडे वळतील असे मुंगेरीलालचे हसीन स्वप्न बघत काँग्रेसजन मस्तपैकी झोपून आहेत. यासाठी ते पूर्वीच्या पराभवातून सावरत कॉंग्रेस कशी सत्तेवर आली याची उदाहरणे चघळून स्वत:ची समजूत काढत आहेत. कॉंग्रेसचा १९७७ चा पहिला पराभव फार मोठा होता यात शंकाच नाही. त्या पराभवापेक्षा आजचा पराभव सर्वार्थाने मोठा आहे. तो पराभव झाला तेव्हा कॉंग्रेसचे नेतृत्व इंदिरा गांधी यांचेकडे होते. आणीबाणीच्या चुकी बद्दल जनतेने त्यांना शिक्षा दिली होती तरी त्यांच्या क्षमतेबद्दल विरोधकांना देखील भीती वाटत होती. त्या पराभवाच्या वेळी कोट्यावधी लोकांना हळहळ वाटली होती. पराभवातही इंदिराजींच्या पाठीमागे व्यापक जनसमर्थन होते. उत्तरेत कॉंग्रेसचा सुफडासाफ झाला होता तरी दक्षिणेत कॉंग्रेस मजबूत होती. केंद्रातील सत्ता गेली असली तरी बहुतांश राज्यात कॉंग्रेसच सत्तेवर होती. त्यामुळे कॉंग्रेसला त्यावेळी इंदिराजीच्या रूपाने जनमनावर प्रभाव असलेले नेतृत्व तर होतेच पण राज्या राज्यातील सत्तेचे बळ आणि सत्तेची छाया कॉंग्रेसजनावर होती. शिवाय जनता पक्षाच्या रूपाने सत्तेत आलेल्या विविध पक्षांच्या कडबोळ्यातील लाथाळ्या आणि पंतप्रधान पदासाठीचा संघर्ष यामुळे त्यावेळी कॉंग्रेसचे अडीच वर्षातच पुनरागमन शक्य झाले होते. त्यावेळ सारखी आत्ताची परिस्थिती नाही. सध्याच्या कॉंग्रेस नेतृत्वाच्या क्षमतेवर भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. या नेतृत्वाबद्दल सर्वसामान्य जनतेत आस्था आणि प्रेम आढळत नाही. दक्षिणेत पक्ष आधीच कमजोर झाला आहे. आज हाती असलेली राज्ये पक्षाच्या हातून निसटत आहेत. दुसरीकडे मोदींचा एकहाती कारभार सुखनैव सुरु आहे. मोदींना भारतीय जनता पक्षात कोणी आव्हान देईल अशी परिस्थिती नाही आणि त्यामुळे या पक्षात लाथाळ्या होण्याची शक्यता कमी आहे. उलट मोदींमुळे जिथे पक्षाचे अस्तित्व नव्हते तिथे पक्ष शक्तिशाली स्पर्धक बनत चालला आहे. भाजप मजबूत होत आहे आणि कॉंग्रेस कमजोर होत चालली असा हा विषम संघर्ष आहे . मुख्य म्हणजे १९७७च्या राजकीय ,सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची तुलना आजच्या परिस्थितीशी होवू शकत नाही. १९७७ ते आज यामध्ये जे काही बदल झालेत ते काँग्रेसमुळे झालेले असले तरी तेच बदल कॉंग्रेसच्या विरोधात गेले आहेत . त्यामुळे कोणत्याही अंगाने विचार केला तरी १९७७च्या मोठ्या पराभवानंतर कॉंग्रेसचे जसे पुनरागमन झाले तेवढ्या सहजपणे पुनरागमन आता शक्य नाही हाच निष्कर्ष निघतो.

कॉंग्रेसचे दुसरे पुनरागमन झाले ते २००४मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली. कॉंग्रेस पक्षाने सुरु केलेल्या आणि अटलबिहारी सरकारने पुढे रेटलेल्या आर्थिक सुधारणांच्या विरोधी मानसिकतेचा आधार घेत हे पुनरागमन झाले. अतिविश्वासातून भाजप नेतृत्वात आलेला गाफीलपणा आणि शेतकऱ्यांचा असंतोष यामुळे भाजपपेक्षा कॉंग्रेस किंचित वरचढ ठरली आणि सत्तेत कॉंग्रेसचे पुनरागमन झाले. परंपरागत राजकीय नेतृत्वाच्या तुलनेत मनमोहनसिंग यांचे बिगर राजकीय व स्वच्छ नेतृत्व लोकांना भावले. आर्थिक सुधारणा राबविण्याचा मनमोहनसिंग यांचा प्रामाणिक प्रयत्न आणि आर्थिक सुधारणांच्या वृक्षाला आलेली फळे याने पुढच्या निवडणुकीत कॉंग्रेसला अधिक मोठा विजय मिळवून दिला असला तरी या विजयाचा अर्थ लावण्यात आणि मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाचे मूल्यमापन करण्यात कॉंग्रेसने मोठी चूक केली. मनमोहनसिंग सत्तेत आल्यापासून कॉंग्रेसची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ तुटत गेली , सर्वसामान्य जनतेशी असलेला संवाद संपला हे कॉंग्रेसच्या ध्यानात आले नाही. मनमोहनसिंगांनी राबविलेल्या आर्थिक सुधारणामुळे राजकीय उलथापालथ घडवून आणण्याची ताकद आणि क्षमता असलेला मध्यमवर्ग निर्णायक भूमिकेत आल्याचे कॉंग्रेसने लक्षात घेतले नाही. तरुण मतदार निर्णायक संख्येत वाढला हे कॉंग्रेसने लक्षात घेतले नाही. कॉंग्रेसने राबविलेल्या आर्थिक सुधारणांमुळे बोचणारी आणि टोचणारी गरिबी केव्हाच दूर झाली होती तरी याच पक्षाने  आपली 'गरिबी हटाव'ची जुनी पठडी सोडली नाही. निर्णायक भूमिकेत आलेल्या मध्यमवर्गाला ही पठडी मानवणारी नव्हतीच पण गरिबी रेषेच्या वर आलेल्या गरिबांना सुद्धा ती नकोशी झाली होती. परिस्थिती बदलली तरी जे बदलत नाही ते संपतात या निसर्ग नियमानुसारच कॉंग्रेसची वाताहत झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस बदलत नाही तोपर्यंत कॉंग्रेस पुनरागमनाच्या मार्गावर देखील येवू शकत नाही हे आजचे वास्तव आहे.

स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घकाळ संघर्ष केलेल्या कॉंग्रेसला सतत सत्तेची शीतल छाया मिळाल्याने कॉंग्रेस मध्ये संघर्ष करण्याची वृत्ती आणि क्षमता झोपी गेली आहे. कॉंग्रेसच्या पुनरागमनाच्या मार्गातील हाच मोठा अडथळा आहे. कार्यकर्त्याला संघर्षासाठी प्रेरित करू शकणाऱ्या आणि जनसामन्याशी संवाद साधण्याची हातोटी असणाऱ्या नेतृत्वाची कॉंग्रेसला गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या यशात सर्वात मोठा वाटा त्यांच्या जनतेशी संवाद साधण्याच्या हातोटीचा आणि प्रतिस्पर्धी नेतृत्व ही कलाच विसरले याचा आहे. याचमुळे देशाचा चेहरामोहरा बदलूनही कॉंग्रेसने ६० वर्षात काहीच केले नाही हा प्रचार प्रभावी ठरला. नरेंद्र मोदी यांचे समोर कॉंग्रेसचे नेतृत्व अगदीच खुजे ठरले आहे. कॉंग्रेसजनांना याची चांगलीच कल्पना आहे. असे असूनही ते बोलत नाहीत. नेतृत्वाला प्रश्न विचारणारे कार्यकर्ते जावून होयबाची कॉंग्रेस मध्ये भरती झाली आणि कॉंग्रेसला आजचा दिवस पाहावा लागला. म्हणजे कॉंग्रेस मध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता म्हणण्या पेक्षा दृष्टी असणारे नेतृत्व नाही आणि बदलासाठी रेटा लावणारे कार्यकर्तेही नाहीत अशा दुहेरी संकटात कॉंग्रेस सापडली आहे. ज्यांच्या हाती कॉंग्रेसचे नेतृत्व आहे त्या राहुल गांधी यांच्यातील सर्वात मोठा दोष कोणता असेल तर त्यांच्यात सत्तेची आकांक्षाच नाही ! त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी जी धडपड आणि गतीशीलता हवी ती राहुल गांधी यांचे मध्ये नाही. महत्वाकांक्षा नसेल तर राजकारणात दिशा सापडत नाही . राहुल गांधींचे तेच झाले आहे. सत्ताकांक्षा नसणे हा गुण आहे पण राजकारणात मात्र तो मोठा दोष ठरतो हेच राहुल गांधीने सिद्ध केले आहे. कालांतराने मोदींवर नाराज होवून पर्याय नाही म्हणून राहुल गांधी आणि कॉंग्रेसकडे मतदार वळतीलही. पण आपल्या नेतृत्वाच्या बळावर सत्ता खेचून आणण्याची क्षमता राहुल गांधी यांना दाखविता आली नाही. त्या तुलनेत प्रियांका गांधी यांचेकडे लोकांशी संवाद साधण्याची , लोकांना आंदोलित करण्याची आणि कॉंग्रेसजनांना प्रेरित करण्याची क्षमता आहे हे त्यांच्या मर्यादित राजकीय हालचालीतून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच तर वडेरा यांच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणाला हवा देवून प्रियांका गांधी यांच्या हाती कॉंग्रेसचे नेतृत्व येणार नाही याची काळजी घेतल्या जात आहे. होयबा आणि स्वामी निष्ठ काँग्रेसजन वडेरा यांची बाजू घेवून प्रतिस्पर्धी पक्षांच्या सापळ्यात अडकत आहेत. आपल्याकडे सत्तेचे पाठबळ आणि आशिर्वाद असल्याशिवाय कोणताच धंदा वारेमाप लाभ देत नाही. अंबानी , अदानी आणि वडेरा हे असेच लाभार्थी आहेत. वडेरा यांना त्यांचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामासाठी तेच जबाबदार असतील ही सरळ भूमिका कॉंग्रेसजनांनी घेतली असती तर ते प्रियांका आणि कॉंग्रेसच्या मार्गातील अडथळा बनले नसते. निर्बुद्ध कॉंग्रेसजनांनी या प्रकरणात आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे आणि आपली अस्तित्वाची लढाई बिकट केली आहे. ही लढाई बिकट यासाठी झाली आहे कि गांधी परिवार हाच कॉंग्रेसला एकत्र ठेवणारा दुवा आहे. सामुहिक नेतृत्वाच्या आधारे पक्ष चालवावा आणि सत्ता मिळवावी अशी आपल्याकडे परिस्थिती नाही हे भाजपाच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. सामुहिक नेतृत्व विकसित करण्याचा भाजपने प्रामाणिक प्रयत्न केला. पण असे सामुहिक नेतृत्व सत्ता मिळविण्याच्या बाबतीत कुचकामी ठरले. नरेंद्र मोदी यांना अवताराचे रूप देवून समोर आणले तेव्हाच भाजपला सत्तासुख लाभले. नव्या आणि अगदी सामान्य माणसाच्या हाती निर्णय प्रक्रिया सोपविण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला देखील अरविंद केजरीवाल यांना अवताराच्या रुपात जनते समोर आणावे लागले. तेव्हा काँग्रेसजनांना असा अवतार समोर करावा लागणार आहे.  प्रियांकाला समोर आणण्यात काँग्रेसजन यशस्वी झाले तर कॉंग्रेसला पुनरागमनाची आशा करता येईल. त्यासाठी आजच्या नेतृत्वाला चार खडे बोल सुनावण्याची ताकद लकवा मारलेल्या कॉंग्रेसजनाच्या जिभेत आली तरच हे शक्य होणार आहे. कॉंग्रेसची जागा घेणारा दुसरा कोणताच पक्ष दृष्टीपथात नसल्याने लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि सक्षमीकरणासाठी कॉंग्रेसने पुन्हा उभे राहणे ही काळाची आणि देशाची गरज आहे .

--------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------

No comments:

Post a Comment