Thursday, May 16, 2024

राज्यकर्ते राजधर्म पाळणारे हवेत, ब्लॅकमेलर नकोत ! (पूर्वार्ध)

 विरोधी पक्षातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना भाजप आघाडीच्या तंबूत आणण्यासाठी हकाऱ्याचे काम किरीट सोमय्याने केले आहे. पण त्यांचे काम फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करणे, काही कागदपत्र जमा करून ते माध्यमांसमोर फडकाविणे एवढेच. त्याच्या पुढचे ब्लॅकमेलिंगचे काम करणारे दुसरेच आहेत. 
---------------------------------------------------------------------------------------------------


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म शब्द लोकप्रिय केला. योगायोगाने त्यांनी हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून वापरला होता. राज्यकर्त्याने राज्यघटनेचे पालन केले पाहिजे, राज्यघटनेच्या चौकटीत काम केले पाहिजे हा राजधर्म या शब्दाचा ढोबळमानाने अर्थ सांगता येईल. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारातील पंतप्रधानांची काही भाषणे त्यांना पुन्हा राजधर्माची आठवण करून देण्याची गरज असल्याचे दर्शविणारी आहेत. धर्माच्या नावावर नागरिकात भेदाभेद करता येणार नाही हे आपल्या राज्यघटनेचे मुलतत्व असल्याचा विसर त्यांना पडला की काय असे वाटण्यासारखी त्यांची प्रचार भाषणे आहेत. वाजपेयी यांचेमुळे हा शब्द लोकापर्यंत पोचला आणि नरेंद्र मोदींमुळे त्या शब्दाचा अर्थही कळला. त्यावर अधिक लिहिण्याची गरज नाही. या लेखाच्या शीर्षकात वापरलेल्या ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ आणि आशय मांडणारा नेमका शब्द मराठीत सापडत नाही. या शब्दाची एक छटा खंडणी या शब्दात येते, खंडणीत इजा करण्याची धमकी देवून पैसे उकळणे अभिप्रेत आहे. या व्यतिरिक्त ब्लॅकमेल शब्दात दुसरेही अर्थ आहेत. हिंदीत ब्लॅकमेलिंगला पर्यायवाची  भयादोहन शब्द आहे. त्यावरून मराठीत भयदोहन हा शब्द वापरता येईल. भीती दाखवून आपले इप्सित साध्य करणे हा साधा सरळ अर्थ आपल्याला घेता येईल. लोकांना अडचणीत आणून, भीती दाखवून त्याच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडणे हे ब्लॅकमेलिंग आहे. कायद्याने हा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्यापासून जनतेचे संरक्षण करणे राज्यकर्त्याचे कर्तव्य ठरते. पण राज्यकर्तेच ब्लॅकमेल करीत असतील तर ? हा प्रश्न काल्पनिक नाही. डोळे उघडे ठेवून घडत असलेल्या घटना बघितल्या आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर सध्याचे सत्ताधारी राजकारणी भयदोहन करून आपले इप्सित साध्य करीत असल्याचे आढळून येईल. ब्लॅकमेलच्या जशा अनेक छटा आणि पद्धती आहेत त्यानुसार अनेक व्याख्याही आहेत. इथे राजकारणातील ब्लॅकमेलिंग वर लिहित असल्याने त्याच्याशी जुळणारी एक व्याख्या पाहू. "ब्लॅकमेलच्या कृत्यामध्ये पीडित व्यक्ती किंवा पीडित व्यक्तीच्या जवळच्या व्यक्ती विरुद्ध मानसिक व भावनिक हानी पोहोचविण्याच्या किंवा फौजदारी खटला चालविण्याच्या धमक्यांचा समावेश असू शकतो.हे सामान्यत: पद,पैसा किंवा मालमत्ता मिळविण्याच्या उद्देश्याने केले जाते ," अशी एक व्याख्या आहे. पद मिळविण्यासाठी किंवा पद टिकविण्यासाठी अशा दोन्ही अर्थाने या व्याख्येतील पद या शब्दाकडे पाहता येते. या व्याख्येशी तंतोतंत जुळणारी अनेक उदाहरणे समकालीन राजकारणात पाहायला मिळतात. 


रवींद्र वायकर हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते,नेते. शिवसेनेत फुट पडल्यानंतरही काही काळ ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्च महिन्यात त्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांना उत्तर पश्चिम मुंबईची लोकसभा उमेदवारी देण्यात आली. प्रचार सुरु झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाईम्स या दैनिकाला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ते म्हणतात , " मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. त्या प्रकरणात तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे शिल्लक होते.या प्रकरणात माझ्यावर दबाव होताच , पण माझ्या पत्नीलाही गोवल्यानंतर मला पक्ष बदलाचा अनिच्छेने निर्णय घ्यावा लागला." आता ब्लॅकमेलिंगच्या वर दिलेल्या व्याख्येशी वायकरांचे निवेदन पडताळून पाहा आणि पडद्यामागे काय घडले असेल याची कल्पना करा. तुमचे असे असे प्रकरण आहे. यात तुम्हालाच नाही तर तुमच्या पत्नीलाही तुरुंगात जावे लागेल. तसे होवू नये असे वाटत असेल तर उद्धव ठाकरेंची साथ सोडा आणि आमच्याकडे या असा उच्चपदस्थाकडून त्यांना संदेश गेला असणार. आमच्याकडे या किंवा तुरुंगात जा अशी सरळ सरळ धमकी देवून, कुटुंबियांना गोवण्याची भीती दाखवून म्हणजेच त्यांचे भयदोहन (ब्लॅकमेल) करून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडण्यात आले. यात धमकी देणारी अदृश्य शक्ती कोणती हे शेंबडे पोरही सांगू शकेल. वायकर दोषी असतील तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी होती. पण कायदेशीर कारवाईची तलवार डोक्यावर ठेवून तुरुंगात पाठविण्याची धमकी देवून त्यांचा वापर भविष्यात आपले पद टिकविण्यासाठी करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाचे पद पणाला लागले आहे हे काही लपून राहिलेले नाही. त्यामुळे या धमकीमागे कोण आहे याचे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. वायकर यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या आहेत. विरोधी पक्षातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना भाजप आघाडीच्या तंबूत आणण्यासाठी हकाऱ्याचे काम किरीट सोमय्याने केले आहे. पण त्यांचे काम फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करणे, काही कागदपत्र जमा करून ते माध्यमांसमोर फडकाविणे एवढेच. त्याच्या पुढचे ब्लॅकमेलिंगचे काम करणारे दुसरेच आहेत. किरीट सोमय्यांवर अनेक आरोप आहेत पण ब्लॅकमेलिंगचा आरोप नाही. 


एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांनीही माध्यमांना आपल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमे बद्दल माहिती दिली आहे. 'मुंबई तक' ला मुलाखत देतांना किरीट सोमय्या यांनी पक्षाचे वरचे नेतृत्व आणि फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांचेशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकी आधी उकरून काढायला सांगितली. असे करण्यास आधी आपण नकार दिला होता. फडणवीस यांनी हा पक्ष आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचे सांगितल्याने आपण हे काम करण्यास तयार झालो. आता २०१७ सालची परिस्थिती लक्षात घ्या. ज्यावेळी सोमय्यांना महानगरपालिकेतील ठाकरेशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यास सांगितली त्यावेळी महापालिकेच्या सत्तेत शिवसेना-भाजपची संयुक्त सत्ता होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. राज्याचे गृहमंत्री तेच होते. पोलीसदल त्यांच्या मुठीत होते. केंद्रात भाजपचे सरकार होते आणि विरोधकांच्या मागे सीबीआय,ईडी सारख्या तपास यंत्रणा मागे लावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. जे काम त्यांनी सोमय्याला करायला सांगितले ते काम या संस्था सहज करू शकल्या असत्या. पण तसे केले असते तर त्यावेळची एकीकृत शिवसेना व उद्धव ठाकरे तेव्हाच भाजपच्या विरोधात गेले असते. तसे झाले असते तर  महापालिकेच्या व राज्याच्या सत्तेतील भागीदारी संपुष्टात आली असती. एकीकडे सोमय्याला मागे लावून द्यायचे आणि दुसरीकडे सोमय्याची काळजी करू नका. आम्ही बघतो त्याच्याकडे असे म्हणायचे. म्हंटल्या प्रमाणे सोमय्यांना वेसन घालण्याचे काम देखील भाजप नेतृत्वाने केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाला उद्धव ठाकरे यांच्या मदतीची गरज होती तेव्हा भाजपा नेतृत्वाने सोमय्याला उद्धव विरुद्ध काही करायला आणि बोलायला मनाई केली होती अशी कबुलीच सोमय्याने या मुलाखतीत दिली. भाजप नेतृत्वाने सोमय्याला आपल्या मागे लावून दिल्याची उद्धव ठाकरे यांना कल्पना नसल्याने त्यांचा भाजपवर नव्हे तर सोमय्यावर रोष होता. २०१९ साली भाजप-शिवसेना यांच्या लोकसभा निवडणुकीतील युतीची घोषणा करायची होती तिथे सोमय्या हजर असल्याने उद्धवने येण्यास नकार दिला होता. तसेच सोमय्याला लोकसभेची उमेदवारी देण्यास ठाकरेंनी विरोध केला आणि भाजप नेतृत्वाने सोमय्याचे तिकीटही कापले. बऱ्या बोलाने उद्धव सोबत यायला तयार झाले नाहीत तर सोमय्या करवी आरोप करून त्यांना सोबत येण्यास भाग पाडण्याची भाजप पक्ष व भाजप नेतृत्व यांची कृती ही ब्लॅकमेलिंगच्या व्याखेतच नव्हे तर कायदेशीर परिभाषेत सिद्ध होणारी आहे. हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीतच नाही तर देशात आणि महाराष्ट्रात अनेक नेत्यांच्या बाबतीत घडले आहे आणि ब्लॅकमेलिंगच्या या खेळात दस्तुरखुद्द प्रधानमंत्री मोदी यांचीही भूमिका राहिली आहे. या विषयी लेखाच्या उत्तरार्धात.

------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाइल - ९४२२१६८१५८ 

 

No comments:

Post a Comment