Wednesday, July 4, 2012

मिट्टी बोले , माटी बोले - '(अ) सत्यमेव जयते '!

---------------------------------------------------------------------------------
हरित क्रांती पूर्वी  सेंद्रीय शेती करीत असताना शेतकरी सुखी नव्हता आणि हरित क्रांती आणण्यासाठी  तो शेतीत रसायने वापरू लागला तरी सुखी नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सेंद्रीय शेती कि रासायनिक शेती हा वाद निरर्थक आहे. कोणत्याही पद्धतीने शेती केली तरी शेतकऱ्याचे मरण अटळ आहे. कारण शेतकऱ्याच्या मरणाची बिजे सरकारच्या धोरणात आणि सुखी समाजघटकाच्या मनोवृत्तीत दडले आहे. ही गोष्ट समजणे अर्थातच आमिरखान आणि त्याच्या टीमच्या कुवती बाहेरचे आहे.
---------------------------------------------------------------------------------


चित्रपट अभिनेते आमिरखान यांची  दूरदर्शन आणि इतर वाहिन्यावरून प्रसारीत होणारी  'सत्यमेव जयते' ही मालिका  बरीच  लोकप्रिय झाली  असून  चर्चेचा विषय देखील बनली  आहे. महत्वाच्या सामाजिक समस्यांची दखल घेवून त्या संबंधी जन जागरण करण्याचा स्तुत्य प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे. मालिकेतून नवे प्रश्न किंवा नवे उत्तर मांडण्याचा प्रयत्न झाला अशातला भाग नाही. ज्या प्रश्नांवर सरकारी व सामाजिक संघटनाच्या पातळीवर भरपूर प्रयत्न झालेत तेच प्रश्न समोर ठेवण्यात आले आहेत. पण कसलेला कलाकार असलेल्या आमिरखानची प्रश्न मांडण्याची हातोटी पूर्वीच्या प्रयत्नावर मात करून गेली आहे. सरकारी व सामाजिक संघटनांनी वर्षानुवर्षे प्रयत्न करून अशा प्रश्नावर जागरण करण्यात जितके यश मिळविले त्या पेक्षा अधिक यश आमिरखानच्या दिड तासाच्या कार्यक्रमाने मिळविले. आमिरखानचे कलाकार म्हणून असलेले आकर्षण आणि त्याने घेतलेली मेहनत कार्यक्रमाच्या यशाला जितकी कारणीभूत आहे तितकीच 'सांस-बहु'च्या अतिरेकी मालिकांच्या माऱ्याने कंटाळलेल्या प्रेक्षकांना सामाजिक समस्यांची मांडणी करणारी मालिका त्यातील नाविन्या मुळे आवडली तर नवल वाटायला नको.  समाजात सामाजिक प्रश्नांबाबत फारसे दुमत नसते व त्या सोडविण्याच्या आवश्यकतेवर तोंड देखले एकमत  देखील असते. म्हणूनच कार्यक्रमात स्वत:च्या सुनांना छळणाऱ्या सासवा  दुसऱ्यांच्या सुनांचा छळ पाहून हेलावून जातात आणि त्यांचा पदर आपसूक डोळ्याला लागतो. आपल्या दांभिकतेचे सद्गुनात रुपांतर करण्याची  संधी अशा कार्यक्रमातून मिळण्याची सोय हे देखील ही मालिका लोकप्रिय होण्यामागचे कारण आहे. डॉक्टर मंडळीवर बेतलेल्या भागाने निर्माण झालेला वाद आणि खळबळ ही मालिका अधिक लोकप्रिय बनवून गेली. असंवेदनशील बनत चाललेल्या डॉक्टर मंडळीवरच्या लोकांच्या रागाला आमिरखानने वाट मोकळी करून दिल्याने तर हिरो असलेला आमिरखान सुपर हिरो बनला आणि त्याची मालिकाही सुपरहिट बनली. वाद निर्माण करून चित्रपट सुपरहिट करण्याचा नुस्खा मालिकेलाही लागू होतो हे लक्षात आल्यावर आमिरखान सारखा मुरलेला कलाकार मालिकेच्या पुढच्या भागात नव्या वादांची पेरणी करणार हे ठरल्या सारखेच होते. नंतरच्या एका भागात शेती संबंधीचे जे चित्रीकरण व सादरीकरण झाले त्यातून लगेच याची पुष्ठी झाली. मालिकेच्या या भागात सेंद्रीय शेती विरुद्ध रासायनिक शेती या वादाला खमंग फोडणी देवून हा वाद रंगविण्यात आला. रासायनिक शेतीच्या परिणामाचे भीषण व भीतीदायक चित्र प्रेक्षकांसमोर मांडून सेंद्रीय शेतीच्या बाजूने कौल दिला गेला. रासायनिक शेतीबद्दलचे रंगविलेले अति अतिरंजित चित्रण सोडले तर या बाबत तक्रार करावे असे काही नाही. रसायनाचे मानवी शरीरावर परिणाम होतच असतात. आपण आजारी पडलो कि जी आधुनिक औषधी घेतो त्याचे जसे मानवी शरीरावर परिणाम होतात , तसेच परिणाम शेतीत वापरल्या जाणाऱ्या रसायनाचेही संभवतात. आजारी पडले तरी औषध घेवू नका अशी सांगणारी आणि औषधाविना उपचार करून बरे करण्याचा दावा करणारी हकीम मंडळी जशी वैद्यकीय क्षेत्रात असतात तशीच शेतीक्षेत्रातही रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेती कडे वळा अशी सांगणारी मंडळी आहे. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. याच पद्धतीने आमिरखानला सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करायचा असेल तर त्यावरही आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण आज जी शेती समस्या आहे त्याच्या मुळाशी शेती करण्याची पद्धत आहे किंवा शेतकरी आत्महत्ये साठी शेती करण्याची पद्धत कारणीभूत आहे असा दावा आमिरखानने केला तो मात्र अत्यंत आक्षेपार्ह आहे. शेती समस्या काय आहे आणि शेतकरी आत्महत्या का करतात याबद्दलचे संपुर्ण अज्ञानच यातून प्रकट होते. शेती समस्ये बाबतची आमिरखानने केलेली मांडणी नुसतीच सवंग आणि  वरवरचीच नाही तर चुकीची देखील आहे. शेतकऱ्याला अडाणी आणि अज्ञानी समजून त्याने शेती कशी केली पाहिजे , काय करावे आणि काय करू नये असा त्याला उपदेश करणाऱ्या मंडळीची    आपल्याकडे कमी नाही. अगदी क्षुल्लक कारणासाठी समारंभपूर्वक मेजवान्या देणारी मंडळी शेतकऱ्यांनी लग्न समारंभावर खर्च करता काम नये असा हितोपदेश करीत असतात. तेच त्यांच्या कर्जबाजारी पणाचे कारण असल्याचे ते ठाम प्रतिपादन करीत असतात. पण ही मंडळी समारंभपूर्वक ज्या मेजवान्या देतात त्यातून त्यांची भरभराट होते आणि आवश्यक अशा समारंभावरचा अल्प खर्च देखील शेतकऱ्याला का कर्जबाजारी बनवितो हा प्रश्न या मंडळीना कधीच पडत नाही. शेती परवडत नाही म्हणून जोड धंदे करा असा सल्ला देणाऱ्याची देखील कमी नाही. पण हा सल्ला मानून गाई-म्हशी किंवा कोंबडी-बकरी पालन करायचे शेतकऱ्यांनी ठरविले तर त्याच्यावर कर्जाचा बोजा तेवढा वाढतो हे या सल्लागारांना कधीच दिसत नाही. दिसत नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी डोळ्यावर सोयीस्कर झापडे लावलेले असते. कारण शेतकऱ्यांनी असे जोड धंदे केले कि यांना स्वस्तात दुध-दुभत्यावर आणि मांसावर ताव मारता येतो ! आता रासायनिक शेती सोडून सेंद्रीय शेती केली कि शेतकरी कर्जमुक्त आणि सुखी होईल असा संदेश शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकरी जेव्हा शेतीत रासायनिक खताचा वापर करीत नव्हता किंवा पिकांवर कीटक नाशकाची फवारणी करीत नव्हता तेव्हा सुखी होता का याचा कोणी विचार करीत नाही. तेव्हा शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज नसल्याचा खोटा गवगवा केला जात आहे. शेतकऱ्याला तेव्हा कर्ज घेण्याची गरज नव्हती तर गावोगावी सावकार कसे निर्माण झाले आणि कशाच्या बळावर त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या या प्रश्नांचे उत्तर या मंडळीनी दिले पाहिजे. हरित क्रांती पूर्वीच्या सेंद्रीय शेतीने शेतकऱ्याच्या दारिद्र्यात वाढच होत होती. तो केवळ कर्जबाजारीच नव्हता तर त्याच्या कुटुंबाची उपासमारही होत होती. हरित क्रांती नंतर तो पूर्वीच्या तुलनेत अधिक कर्जबाजारी झाला असला तरी त्याची व त्याच्या कुटुंबीयाची उपासमार आता होत नाही हे सत्य नाकारता येत नाही. दरवर्षी शेतीतल्या तोट्यात भर पडत असल्याने त्याचा कर्जबाजारीपणा वाढत जाणे अपरिहार्य आहे. त्याचा रासायनिक खत किंवा कीटकनाशकाच्या फावारनिशी फारसा संबंध नाही. रासायनिक खत किंवा कीटकनाशकाच्या फवारनीतून निर्माण झालेल्या अन्न-धान्याने सुखासीन लोकांचे आरोग्य धोक्यात येत असेलही पण रासायनिक खते किंवा कीटकनाशक औषधी मुळे शेतकऱ्याचे आर्थिक आरोग्य बिघडले असे म्हणणे शेती प्रश्ना बद्दलचे अज्ञानच दर्शविते. सेंद्रीय शेती करीत असताना शेतकरी सुखी नव्हता आणि आज तो शेतीत रसायने वापरू लागला तरी सुखी नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सेंद्रीय शेती कि रासायनिक शेती हा वाद निरर्थक आहे. कोणत्याही पद्धतीने शेती केली तरी शेतकऱ्याचे मरण अटळ आहे. कारण शेतकऱ्याच्या मरणाची बिजे सरकारच्या धोरणात आणि सुखी समाजघटकाच्या मनोवृत्तीत दडले आहे. ही गोष्ट समजणे अर्थातच आमिरखान आणि त्याच्या टीमच्या कुवती बाहेरचे आहे. त्याने चुकीच्या पद्धतीने शेती प्रश्न मांडण्या ऐवजी त्या प्रश्नाला हातच घातला नसता तर ते जास्त शेतकरी हिताचे ठरले असते असेच आता म्हणावे लागेल. पण सत्यमेव जयतेच्या या भागात नुसतेच अज्ञान नव्हते तर अतिरंजित आणि अशास्त्रीय थाटाचा प्रचार असल्याने शेतकरी समुदाया बद्दलच्या सुखी सदरा घालणाऱ्या समाजाच्या गैरसमजात अधिक भर पडणार आहे. 

                                                    अतिरंजित आणि प्रचारकी

कीटक नाशकाचे दुष्परिणाम हे औषधी सेवनाच्या दुष्परिणामांसारखेच असतात. पण सत्यमेव जयते मध्ये रंगविण्यात आलेले चित्रण टोकाचे अतिरंजित असून शेतकरी आपल्या स्वार्थासाठी इतरांना विष खाऊ घालतात असा गैरसमज यामुळे पसरणार आहे.  अन्ना मधील विषाची ही कथा म्हणूनच विषारी आणि विखारी बनली आहे. यात केरळ मधील एका जिल्ह्याचे, राजस्थान मधील एका जिल्ह्याचे आणि पंजाब प्रांताचे उदाहरण देण्यात आले. एन्डोसल्फान मुळे केरळ च्या त्या जिल्ह्यात किती वाईट परिणाम झाले आहेत हे दाखविण्यात आले. या कथेतील पक्की कडी एवढीच आहे कि रोगग्रस्त मुले आणि व्यक्ती खऱ्या आहेत. या एका कडीत अनेक कमजोर कड्या गुंफून कथा तयार झाली आहे. यातील पहिली कमजोर कडी ही आहे कि ज्या रोगाचे वर्णन करण्यात आले आहे तो रोग एन्डोसल्फानचा वापर या भागात सुरु होण्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे वैद्यकीय दाखले उपलब्ध आहेत.  तो रोग ज्या कारणाने झाला असेल त्यात एन्डोसल्फानची भर पडून किंवा एन्डोसल्फानचा संयोग होवून अधिक फोफावला असणे शक्य आहे. जसे एखादे औषध एखाद्या व्यक्तीवर विपरीत प्रतिक्रिया करते तसेच एन्डोसल्फानची त्या भागात विपरीत परिणाम झाले असतील हे नाकारता येत नाही. जेथे एन्डोसल्फान विपुल प्रमाणात वापरले जाते त्या भागातील परिणामाचा अभ्यास न करता केरळच्या या भूभागाचा अभ्यास करण्यामागे हे विशेष कारण असू शकते. पण ज्याची प्रतिक्रिया होते असे औषध एखाद्या व्यक्तीला देणे टाळतात , तशीच त्या भागातील फवारणी टाळायला हवी होती. तेच औषध दुसऱ्या रोग्याला दिलेले चालते तसेच या कीटक नाशकाची फवारणी दुसऱ्या भागात केली जावू शकते. एन्डोसल्फानचा सर्वात कमी वापर केरळ राज्यात होत होता. पण या कीटक नाशकाच्या वापरात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,उ.प्र. या सारख्या राज्यात असे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत हे इथे लक्षात घेतले पाहिजे. परवडणारे आणि बहुविध पिकासाठी उपयुक्त असल्याने एन्डोसल्फान शेतकऱ्यात अधिक प्रिय होते. पण या कीटकनाशका विरुद्ध आघाडी उघडण्या मागची  सुद्धा एक कथा सांगितली जाते. आणि ती कथा अधिक तर्कसंगत असल्याने इथे सांगितली पाहिजे. इ.स्.२००० च्या आसपास एन्डोसल्फानचे पेटंट संपुष्टात आल्याने इतर ठिकाणी याचे उत्पादन सुरु झाल्याने मूळ उत्पादक असलेल्या  युरोपियन  कंपनीच्या उत्पादनाची मागणी घटून त्या कंपनीला एन्डोसल्फानचे उत्पादन परवडेना. त्यामुळे कंपनीने ते उत्पादन बंद करून पर्यायी उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. पण नवे उत्पादन विकायचे असेल तर एन्डोसल्फान चे उत्पादन जगभरातून बंद होणे गरजेचे होते. म्हणून युरोपीय राष्ट्रात आणि भारतासारख्या देशात एन्डोसल्फानच्या दुष्परिणामांचे अहवाल तयार
झालेत. सुनिता राव यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या पर्यावरणावर काम करणाऱ्या ज्या संस्थेने केरळ मधील परिणामाचा अभ्यास केला त्या संस्थेला या अभ्यासासाठी कोट्यावधी डॉलर्स युरोपियन राष्ट्रांनी पुरविल्याचे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने मान्य केले आहे. स्वयंसेवी संस्था खोटा अहवाल कशाला तयार करतील या आमिरखानने विचारलेल्या भाबड्या प्रश्नाचे उत्तर यात दडलेले असू शकते. एन्डोसल्फान वापरलेला कोणताही शेतकरी दाखविण्यात आलेल्या दुष्परिणामांवर विश्वास ठेवणार नाही , पण ज्यांचा शेतीशी आणि या किटकनाशकाच्या फवारनिशी संबंध आला नसेल त्यांचा मात्र चटकन विश्वास बसेल. तसा विश्वास बसल्यानेच एन्डोसल्फान वर बंदी आली आहे . पंजाब मधून रोज रेल्वेने भर भरून कॅन्सरचे रोगी राजस्थानातील एका रुग्णालयात जातात हा ही असाच अतिरंजकतेचा रंजक नमुना आहे. बारा डब्याची कॅन्सर ट्रेन गृहित धरली आणि बसण्यासाठी जेवढ्या जागा आहेत तेवढेच रुग्ण त्यातून जातात असे गृहित धरले तर रोज हजार रुग्ण पंजाबातून राजस्थानात उपचारासाठी जातात असा त्याचा अर्थ होतो. हे सत्य असेल तर सारा पंजाबच कॅन्सरग्रस्त असला पाहिजे. पण तशी वस्तुस्थिती नाही.उलट भारतातील सर्वात राकट आणि धडधाकट माणसे पंजाबातच आढळतात. पर्यावरणाचा बाऊ करून पैसे लाटणाऱ्या संस्थांच्या जाळ्यात आमिरखानच्या सत्यमेव जयतेचा हा भाग अडकल्याने शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भातील चुकीचे चित्र आणि शेती समस्येचे चुकीचे निदान समोर आले आहे . एकीकडे रसायनिक खते आणि कीटक नाशकामुळे शेतकरी कर्ज बाजारी होवून आत्महत्या करीत असल्याचे सांगत असतानाच ज्या २-३ शेतकऱ्याच्या मुलाखती कार्यक्रमात दाखविण्यात आल्या ते स्वत:साठी सेंद्रीय धान्य पिकवितात पण बाजारातील फायद्यासाठी रासायनिक शेती करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे! यावरून आमिरखान , त्याची टीम आणि आपल्याला पाहिजे तसे आमिरखानच्या तोंडून वदवून घेणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांचा गोंधळ लक्षात येईल.

                                    सुखी समाजाचा प्रश्न
आज काम केले नाही तर उद्या खायचे काय असा प्रश्न पडणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य सेंद्रीय शेतीतील आहे कि रासायनिक शेतीतले हा प्रश्न कधीच पडत नाही. सुखी माणसाला पडणारा हा प्रश्नच आमिरखानला हाताळायचा होता. शेतकरी आत्महत्या हा त्याच्यासाठी तोंडी लावण्याचा विषय होता. त्याची चिंता सर्व सूख संपन्न लोकांचे दररोज विष असलेले अन्न खाऊन त्यांना कोणत्या व्याधी होवू नयेत हीच होती. त्याला शेतकरी आत्महत्येची चिंता असती तर त्या प्रश्नावर खोटे अश्रू ढाळनाऱ्या त्याच्या समोरील आणि दूरचित्रवाणीसमोर बसून कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना शेतकरी आत्महत्ये साठी ते सुद्धा जबाबदार आहेत हे दाखवून देता आले असते. कांद्याच्या भावात थोडीशी वाढ झाली कि मोठा कांगावा करून , निर्यात बंद करायला लावून भाव पाडल्या जातात आणि आपले उत्पादन मातीमोल भावाने विकावे लागल्याने त्याला आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय उरत नाही हे सोपे गणित प्रेक्षकांना सांगता आले असते. सरकारची शेती विरोधी मनमानी धोरणे  आणि मध्यमवर्गीय व उच्चभ्रू समाजाची फक्त अन्नधान्याच्या बाबतीतील स्वस्ताईची  हाव शेतकऱ्याला फासावर चढवीत आहे हे सत्य दडवून शेती आणि शेतकऱ्याच्या दुरावस्थेची भलतीच कारणे लोकांच्या गळी उतरविण्यात आमिरखानचा 'सत्यमेव जयते' यशस्वी झाल्याने प्रत्यक्षात  असत्याचा विजय झाला आहे ! 
                                                                             (संपुर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि- यवतमाळ 

5 comments:

  1. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आपण का मान्य करत नाहीत? जमिनीचा पोत खालावतो आहे.जमिनीतला सेंदीय कर्ब(सुपिकता) रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे कमी होत आहे.रसायनी शेती करणारा शेतकरी अधिकं हावरट झाला आहे.जास्त उत्पादन काढण्यासाठी काहीही करायचे? आणि ह्याला त्याच्या भोवतीची व्यवस्था कारणीभूत आहे . रासायनिक शेतीने शेतकऱ्यांना अन्न धान्य पिकाकडून नगदी पिकाकडे (कापूस,उस,केली,द्राक्षे भाजीपाला)वळवले ज्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी व्यापाऱ्याकडून किंवा ब्यांका,सावकाराकडून कर्जे काढावी लागली आणि पर्यायाने नापिकी आणि कर्जबाजारीपणा ह्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ ह्यांनी विदर्भात ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचे रिपोर्ट्स उपलब्ध आहेत...........कशावरून कीटकनाशके,तणनाशके,रासायनिक खाते बनवणाऱ्या कंपन्या एजंटना पैसे देवून रासायनिक शेतीचा प्रचार करत नसणार? सर्व रसायन विक्रेत्यांना अनेक आकर्षक विक्रीची आमिषे दाखवली जातातच कि.परदेशी दौरा,बियाणे आणि कीटकनाशके विक्रीवर लाभ..........बाकी आमिरखान ह्यांनी सत्यमेव जयते तून सेंद्रीय शेतीचा विषय राष्ट्रीय स्थरावर मांडल्यामुळे चर्चा चालू झाली आहे.आणि हि चागली बाब आहे.आणि हा विषय राष्टीय स्थरावर जाने बऱ्याच जणांना आवडले नाही.

    ReplyDelete
  2. शेतकऱ्यांच्या आत्महत्या,त्यांचा कर्जबाजारीपणा हे रासायनिक खतांच्या वापरातून होतात असं ठाम दावा अमीर खान याने केला आहे असे तो भाग बघताना मला तरी वाटले नाही. संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू हा रासायनिक खतांच्या वापरातून होऊ शकणाऱ्या संभाव्य शारीरिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकणे हा होता. यात काहीसा अतिरंजितपणा होता हे मान्य केले तरी बऱ्याच वेळा अतिरंजितपणा केल्याने विषयाचे आकलन अधिक चांगले होण्यास मदत होते हे मान्यच करावे लागेल, असा अतिरंजितपणा त्या मागील हेतूचा विचार करता क्षम्यच म्हणावा लागेल. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवते, शेतकऱ्यांच्या समस्यांची अधिक मुलभूत जाण असल्यने आपल्याला हा कार्यक्रम जसा सदोष वाटला, तसा माझ्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे मला डॉक्टरांच्या संदर्भातला कार्यक्रम सदोष आणि अपरिपक्व वाटला. यात डॉक्टरांचे समर्थन करण्याचा माझा हेतू नाही, उलट डॉक्टर खरा गैरव्यवहार कुठे आणि कसा करतात याचा अंदाज घेण्यात आमिरखान अयशस्वी झाला असे मला वाटते. असो, हाही एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. आमिरखान करीत असलेल्याला प्रयत्नांमागचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. त्यात्या विषयातील तज्ज्ञ लोक त्याला त्या विषयासंदर्भात किती खरी, प्रामाणिक माहिती देतात यावरच त्याचे यश अवलंबून असेल, नाही तरी एक व्यक्ती थोडीच सर्व विषयातील तज्ज्ञ असू शकते?

    ReplyDelete
  3. आज बाजारात विकली जाणारी केळी,आंबे हे औषधे लावून पिकवली जातात.नागरिकांच्या आरोग्याविषयी कोणती यंत्रणा प्रभावीपणे काम करते ? बराच भाजीपाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशके,बुरशीनाशके फवारली जातात.नागरिकांसाठी सुरक्षित अन्न ह्याची खात्री काय आहे ? ह्या बाबतीत फारशी जागृती नाही.आणि सत्यमेव जयते च्या माध्यमातून हा विषय घेतला आहे.हे कार्य अभिनंदनीय मानावेच लागेल.आणि आमिरखान चि तारीफ करावी लागेल.

    ReplyDelete
  4. शेतकऱ्यांनी असे विषारी अन्न पिकवावे व त्यांनी व त्याच्या कुटुंबांनी ते खावे व समाजाला खावू घालावे फक्त पैसे मिळतात म्हणून ....हा विचार कितपत योग्य आहे ? आज समाजात अनेक दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत आहे.Cancer सारखा आजार ज्यात अनेक प्रकार आहेत.ह्यात लाखो रु.खर्च येतो आणि एवढा खर्च करून सुद्धा इलाज होत नही.हा खर्च सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे.मग अशा लोकांसाठी आरोग्याच्या सुरक्षेसाठी काय यंत्रणा आहेत ?

    ReplyDelete
  5. http://www.youtube.com/watch?v=crVO6frE2Rs&feature=related
    mahesh bhatt's documentary film 'poison on the platter' on Gm foods

    ReplyDelete