Thursday, March 26, 2020

भाजप प्रचाराच्या सापळ्यात अडकलेली कॉंग्रेस !


भाजपच्या प्रचारयंत्रणेला खरोखर तोड नाही. ही प्रचार यंत्रणा एवढी अद्भुत आहे कि कॉंग्रेसचा देखील त्यावर विश्वास बसतो ! कॉंग्रेसच्या पतनाचे मूळ घराणेशाही आहे हे काही प्रमाणात राहुल गांधीच्या गळी उतरविण्यात भाजपची प्रचारयंत्रणा यशस्वी झाली आहे ! निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेवून राजीनामा देतांना गांधी घराण्यातील इतर कोणीही कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही हे त्यांचे सांगणे ते स्वत:च भाजपच्या प्रचाराला बळी पडल्याचे दर्शविते.
----------------------------------------------------------------

मध्यप्रदेशात कॉंग्रेसच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला या घटनेसाठी कॉंग्रेस नेतृत्वाचे कट्टर भक्त सोडले तर कॉंग्रेसचे नेतृत्वच प्रामुख्याने जबाबदार आहे यावर सर्वांचे एकमत आहे. स्वत:च्या डोक्याने विचार करू शकणारा काँग्रेसी कार्यकर्ता सरकार घालविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया किंवा भाजप पेक्षा आपल्या नेतृत्वाला अधिक जबाबदार मानतो. ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी दूर केली नाही तर काय होवू शकते याचा अंदाजच कॉंग्रेस नेतृत्वाला आला नाही आणि अंदाज असेल तर सिंधीयाची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात कमलनाथ-दिग्विजयसिंग जोडगोळी नाराज होण्याची भीती कॉंग्रेस नेतृत्वाला असली पाहिजे. या परिस्थितीत कॉंग्रेस नेतृत्व सापडण्याचे कारण त्यांचा खालपर्यंत कॉंग्रेस संघटना व कार्यकर्ता यांच्याशी तुटलेला संपर्क आणि संबंध. मुळात असा संपर्क आणि संबंध इंदिरा गांधी नंतरच्या कॉंग्रेस नेतृत्वाने ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही. मध्यप्रदेशात जे घडले त्याला नेतृत्वाची निष्क्रियता आणि मरगळ हे कारण असले तरी ही निष्क्रियता आजची नाही. हे लक्षात आणून देण्यासाठीच मागच्या लेखात अनेक वर्षापासूनच्या कॉंग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचा आलेख मांडला.केंद्रातील सत्ता हाती असताना नेतृत्वाची निष्क्रियता कधी डोळ्यात भरली नाही. सत्तेचे कवच दूर होताच नेतृत्व उघडे पडले. हा फरक सोडला तर कॉंग्रेस नेतृत्व काल होते तसेच आज आहे. या नेतृत्वाने सलग १० वर्षे कॉंग्रेसला सत्ता मिळवून दिली आणि याच नेतृत्वामुळे दोन सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला. राजकारणामध्ये कोणता नेता थोर मानला जातो जो निवडणूक जिंकून देईल. आज कॉंग्रेसला गरज आहे ते अशा नेतृत्वाची. कॉंग्रेसमध्ये आज जी कोणती नेतेमंडळी आहेत त्यांच्यात मत मिळवून देण्याची क्षमता फक्त गांधी घराण्यात आहे. हे घराणे आज ती क्षमता हरवून बसल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. पण कॉंग्रेस कार्यकर्त्यांना हेही माहित आहे कि परत पुन्हा सत्ता गांधी घराण्यातील व्यक्तीच मिळवून देवू शकते. कॉंग्रेसमधून नेतृत्व बदलाची मागणी न होण्याचे हे कारण आहे.                                                      


ज्यांचा कॉंग्रेस पक्ष किंवा संघटनेशी संबंध नाही त्या कॉंग्रेसच्या चाहत्यांना आणि विरोधकानाही कॉंग्रेस समस्येचे मूळ घराणेशाहीत आहे असे वाटते. हा परिणाम कशाचा असेल तर भाजपच्या पद्धतशीर प्रचाराचा आहे. भाजपची घराणेशाही बद्दलची टीका जुनीच आहे. कॉंग्रेसची सत्तेची कवचकुंडले गांधी घराणे आहे हे ओळखून भाजपने फार आधीपासून ही कवचकुंडले भेदण्याचा प्रयत्न सुरु केला होता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्याला यशही मिळाले. तरीही भाजपच्या मनातील कॉंग्रेसच्या नेतृत्वस्थानी  असलेल्या गांधी परिवाराची भीती जात नाही. कॉंग्रेस एवढी गलितगात्र झाली आहे की तिच्यात लढायचे सोडा उभे राहायचे देखील त्राण नाही पण गेल्या सहा वर्षातील प्रत्येक निवडणूक सभेत नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर गांधी-नेहरू परिवार राहिला आहे. आजही कॉंग्रेसच्या  घराणेशाही बद्दल देशात जे काही बोलले जाते त्यामागे प्रभावी यंत्रणा भाजपचीच आहे. भाजपच्या प्रचारयंत्रणेला खरोखर तोड नाही. ही प्रचार यंत्रणा एवढी अद्भुत आहे कि कॉंग्रेसचा देखील त्यावर विश्वास बसतो ! कॉंग्रेसच्या पतनाचे मूळ घराणेशाही आहे हे काही प्रमाणात राहुल गांधीच्या गळी उतरविण्यात भाजपची प्रचारयंत्रणा यशस्वी झाली आहे. राहुल गांधीनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे आणि त्यावर ठाम राहणे हा राहुल गांधीनी घेतलेला विचारांती निर्णय नसून भाजपच्या प्रचाराअंती म्हणजे प्रचाराच्या परिणामी घेतलेला निर्णय आहे ! निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेवून राजीनामा देणे समजण्यासारखे आहे. पण मग असा राजीनामा देतांना गांधी घराण्यातील इतर कोणीही कॉंग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी घेणार नाही असे बोलण्याची काहीच गरज नव्हती. ते बोलले याचा अर्थच भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचाराचा त्यांच्यावरही परिणाम झाला आहे !             

राहुल गांधी कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यास वारंवार असमर्थ ठरत असल्याने राहुल गांधी बद्दलच्या भाजपा प्रचाराला मोठे यश मिळत आहे. भाजप विचाराच्या विरोधी असलेले रामचंद्र गुहा सारखे इतिहासकार आणि विचारवंत देखील भाजपने घराणेशाहीचा जो बागुलबुवा उभा केला आहे त्याला बळी पडत आहेत. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ता देखील विचलित आणि दोलायमान होत आहे. निवडणुकीत पराजय झाला की कॉंग्रेस मध्ये दबक्या आवाजात प्रियंका गांधीनी कॉंग्रेसचे नेतृत्व करावे अशी मागणी होत असते. राहुल गांधीना ‘पप्पू’ ठरवणाऱ्या भाजप प्रचारयंत्रणेचे हे यश आहे. भाजपच्या या प्रचाराला स्वत: कॉंग्रेस कार्यकर्ते आणि भाजप विचारसरणीला विरोध असणारे विचारवंत बळी पडत असतील तर सर्वसामान्य मतदारांवर या प्रचाराचा किती परिणाम झाला असेल हे सहज लक्षात येईल. मोदींना तोड नाही, पर्याय नाही कारण राहुल पप्पू आहे आणि भाजपला आव्हान देण्यात इतर बिगर काँग्रेसी पक्ष कॉंग्रेसपेक्षाही कमजोर आहेत. या पक्षांची भाजपला भीती नाहीच. भीती आहे ती मरगळलेल्या कॉंग्रेसची आणि कॉंग्रेसच्या मरगळलेल्या नेतृत्वाची ! सगळी भाजप प्रचार यंत्रणा राहुलला ‘पप्पू’ ठरवण्यासाठी आणि मोदींना महान ठरविण्यासाठी दिवसरात्र का राबते याचे उत्तर यात आहे. भाजपची घराघरात पोचलेल्या आक्राळविक्राळ आणि आक्रमक प्रचार यंत्रणेच्या तडाख्यातून वाचविणारे नेतृत्व कॉंग्रेसकडे आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.
                                                                       --------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल – ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment