Thursday, April 2, 2020

गांधी घराण्याने नेतृत्व सोडून सारथी बनण्याची वेळ !


सोनिया पर्व संपले आहे. प्रियांका यांना सर्वत्र संचार करण्याची गांधी कुटुंबाकडून मोकळीक मिळत नाही आणि राहुल गांधींचे वर्तन एखाद्या सन्याशा सारखे आहे. अशा परिस्थितीत भाजपला आणि मोदीशाह जोडगोळीला शिंगावर घेण्याची धमक आणि हिम्मत असणाऱ्या व्यक्तीला कॉंग्रेसचा नेता म्हणून पुढे आणणे हा एकमेव पर्याय कॉंग्रेसपुढे आणि गांधी घराण्यापुढे आहे.
----------------------------------------------------------------

भाजपच्या प्रचार यंत्रणेने ठसविलेली घराणेशाही आणि राहुल गांधी ही कॉंग्रेस पतनाची कारणे खरी मानून कॉंग्रेसने उपाय योजना केली तर कॉंग्रेसचे आणखी वाईट दिवस येवू शकतात. घराणेशाहीने बट्ट्याबोळ होत असेल तर भाजपात कमी दिवसात राजकारणात उगवलेली अनेक घराणे असतांना भाजपला अच्छे दिन कसे याचे काय उत्तर आहे ? कॉंग्रेस मधील घराणेशाहीवर कोरडे ओढत असतांना कॉंग्रेस मधील घराणे भाजप मध्ये ओढण्यासाठी एवढी धडपड कशासाठी चाललेली असते याचे उत्तर मिळत नाही. जनसमर्थन असल्या शिवाय लोकशाही राज्यव्यवस्थेत घराणेशाही मूळ धरू शकत नाही आणि टिकूही शकत नाही. जनसमर्थन मिळवायचे असेल तर तुम्हाला जनतेत जायला हवे, त्यांच्याशी संवाद साधायला हवा. नेमके हेच सध्याच्या कॉंग्रेस नेतृत्वाकडून होत नाही. भाजपचा कॉंग्रेस विषयीचा प्रचार - अपप्रचार २४ तास जनतेच्या कानावर आदळत असतो. कॉंग्रेसकडून त्याचे खंडन-मंडन काहीही होत नसल्याने लोक भाजपचा प्रचार खरा मानून राहुलला पप्पू आणि कॉंग्रेसला घराणेशाहीने ग्रस्त मानू लागली आहे. याचा अर्थ राहुल गांधींचे नेतृत्व आलबेल आहे असे नाही. त्यात दोष आहेच.


राहुल गांधी मधील सर्वात मोठा दोष म्हणजे सत्ताकांक्षाने येणारे झापाटलेपण त्यांच्यात अजिबात नाही. तसे असते तर मनमोहनसिंग यांच्या पडत्या काळात जबाबदारी घेवून ते प्रधानमंत्री बनले असते. काही झाले तरी आपल्याला ती खुर्ची मिळवायची आहे आणि मग रात्रंदिवस त्याचे नियोजन , त्यासाठीच्या कार्यक्रमाची आखणी, लोकांच्या गाठीभेटी हे सगळे करावे लागते ते राहुल गांधीनी केले नाही. कॉंग्रेस सगळीकडेच मरगळलेल्या अवस्थेत असताना ज्या प्रांतात निवडणूक आहे त्या प्रांतात संघटनेला संजीवनी देण्याचे काम गरजेचे असतांना त्यांनी केले नाही. अर्धा निवडणूक प्रचार आटोपल्यावर कुठेतरी २-४ निवडणूक सभा घेवून घरी बसायचे ही राजकारणाची राहुल शैली कॉंग्रेसला सत्तेत परत आणण्यास समर्थ नाही. २०१९ च्या पराभवा नंतर राहुल गांधीनी देशभर फिरून आमच्या भूमिकेत काय चूक होती हे विचारायला हवे होते. त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. त्या ऐवजी ते परदेशी गेले !


जनतेशी स्वत:ला जोडून घेण्याचे फार मोठे आव्हान कॉंग्रेस नेतृत्वापुढे आहे. कॉंग्रेस मध्ये ही क्षमता फक्त गांधी घराण्यात आहे. ती सोनिया गांधीत आहे,राहुल गांधी मध्ये आहे आणि प्रियांका मध्ये सुद्धा आहे. सर्वसामान्य लोकांशी जोडून घेण्याची क्षमता खूप प्रगल्भ नेतृत्व क्षमता वाटते अशा शशी थरूर मध्ये किंवा पी.चिदंबरम किंवा गुलाम नबी आझाद यांच्यात नाही. यांच्यातील कोणाला नेता म्हणून समोर आणायचे असेल तर ते काम गांधी घराणेच करू शकते. कॉंग्रेसला सत्तेत परत आणण्यासाठी तसे करण्याची वेळ आली आहे. सोनिया पर्व संपले आहे. प्रियांका यांना सर्वत्र संचार करण्याची गांधी कुटुंबाकडून मोकळीक मिळत नाही आणि राहुल गांधींचे वर्तन एखाद्या सन्याशा सारखे आहे. तेव्हा अशा परिस्थितीत भाजपला आणि मोदीशाह जोडगोळीला शिंगावर घेण्याची धमक आणि हिम्मत असणाऱ्या व्यक्तीला कॉंग्रेसचा नेता म्हणून पुढे आणणे हा एकमेव पर्याय कॉंग्रेसपुढे आणि गांधी घराण्यापुढे आहे. संघाने मोदींना असेच पुढे आणून भाजपच्या डोक्यावर बसविले हा इतिहास ताजा आहे. सत्ता मिळवायची असेल तर या इतिहासाची पुनरावृत्ती कॉंग्रेसला करावी लागणार आहे.                              
  
आज देशाचे तारणहार आणि ज्यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही असे मोदीजी तेच आहेत ज्यांना त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाजपेयी सरकारच्या व भाजपच्या  झालेल्या पराभवास जाहीरपणे जबाबदार ठरविले होते ! एवढेच नाही तर गडकरी भाजपाध्यक्ष होते त्या काळापर्यंत म्हणजे २०१३ पर्यंत मोदीजीना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात स्थान नव्हते. पण केवळ मुख्यमंत्री असल्याचा उपयोग करून घेत कुशल आणि योजनाबद्ध प्रचाराने गुजरात राज्याने मोदींच्या नेतृत्वाखाली अद्भुत विकास साधल्याच्या अद्भुतरम्य कथा प्रचारित करून तसा सगळ्या देशाचा विकास साधण्यासाठी एकदा संधी द्या अशा प्रचाराच्या बळावर २००४ साली भाजप पराभवास जबाबदार असलेले मोदी भाजपसाठी अभूतपूर्व विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे नेते ठरले. ही सगळी प्रचाराची किमया आहे !


मला आठवते २०१२ साली मला संघाच्या एका समूहाकडून मोदींचा गुजरात बघण्याचे आग्रहाचे आमंत्रण आले होते! म्हणजे मोदींनी दिल्लीत येण्यासाठी ‘गुजरात मॉडेल’ लोकांच्या गळी उतरविण्याचे काम खूप दिवस आधी पासून पद्धतशीरपणे सुरु केले होते. राज ठाकरे नव्हते का जावून आले आणि प्रभावित होवून भाजपने न मागता मोदींना पाठींबा दिला होता. माझ्या छोट्या गांवातील दोन कार्यकर्ते त्या काळात मोदींना जावून भेटून आले होते ! कोणीही मोदींना किती सहज भेटू शकतो याने ते खूप प्रभावित झाले होते. मुख्यमंत्री माणूस साध्या लाकडी खुर्चीवर पाय पसरून बसतो आणि आत्मीयतेने बोलतो याचे वाटणारे अप्रूप त्यांनी किती लोकांकडे बोलून दाखविले . आज मोदींना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री देखील भेटू शकत नाही ही गोष्ट वेगळी. तर अशा प्रकारे नेतृत्व देखील प्रमोट करावं लागते. त्याच्या सुरस कथा प्रचारित कराव्या लागतात. अशा प्रचारात मोदी आणि भाजपने राहुल गांधी व कॉंग्रेसला खूप मागे सोडले आहे. घराणेशाही आणि राहुल गांधी कॉंग्रेसच्या आजच्या अवस्थेस सकृतदर्शनी जबाबदार दिसत असले तरी खरे  कारण भाजपच्या प्रचारयंत्रणेला कॉंग्रेसकडे तोड नाही हेच आहे. कॉंग्रेसला प्रचाराचे महाभारत युद्ध लढावे लागणार आहे. या महाभारतातील कॉंग्रेसचा अर्जुन निवडण्याचे काम कॉंग्रेस आणि कॉंग्रेस नेतृत्वाला करायचे आहे. राहुल गांधी अर्जुन बनू शकत नाही पण त्याचे सारथी बनून ते कॉंग्रेसला सत्तेपर्यंत पोचवू शकतील.
----------------------------------------------
सुधाकर जाधव 
मोबाईल ९४२२१६८१५८  

No comments:

Post a Comment