Friday, April 24, 2020

कोरोना विरुद्धच्या लढाईला राजकीय बाधा !



उद्धव ठाकरेंना सरकार चालविता येणार नाही व तिघाडीची बिघाडी लवकर होईल अशी आशा बाळगून असलेले राज्य भाजप नेतृत्व उद्धवच्या स्थिरावण्याने आणि दमदार कामगिरीने बेचैन झाले असून कोरोना विरुद्धच्या लढाईत साथ देण्या ऐवजी राज्य सरकार अस्थिर करण्याचे राजकारण खेळत आहे.
----------------------------------------------------------
राज्य, राष्ट्र आणि जग कोरोना महामारी पासून कशी सुटका होईल या विवंचनेत असतांना आपल्या देशात काही समूह या कोरोना संकटाची चिंता न करता संकटात देखील आपले सुप्त हेतू साध्य करण्याचे हिडीस राजकारण खेळण्यात गुंतले आहेत. गेल्या आठवडयात पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गांवात जमावाने केलेल्या भीषण मारहाणीत दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा मृत्यू झाला. घटनेचे दृश्यचित्रे मन व्यथित आणि विचलित करणारी होती. घटनेची माहिती बाहेर आल्या बरोबर नेमके काय आणि कसे घडले याची संपूर्ण माहिती करून घेण्या ऐवजी धडाधड प्रतिक्रिया देण्याचा तोफखाना सुरु झाला. महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होण्या आधीच उत्तर प्रदेशातून प्रतिक्रिया येवू लागल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि साधू संताचे काही आखाडे यात पुढे होते. मारल्या गेलेल्यात दोन साधू होते या एकाच तथ्याच्या आधारे घटनेला हिंदू – मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न झाला. कोरोनाच्या महामारीत हिंदू-मुस्लीम खेळ खेळण्याच्या विकृतीचे विश्वरूप दर्शन घडत आहे. आधी तबलिगी जमातीच्या अज्ञान, अंधश्रद्धा आणि धर्मांधता यातून मिळालेल्या कोलीताच्या आधारे सरसकट साऱ्या मुस्लीम समुदायाला कोरोनासाठी जबाबदार धरले गेले. यातही या जमातीच्या मुठभर तरुणांनी दाखविलेल्या गुंडगिरी आणि विकृत चाळ्यांनी संतापाची लाट निर्माण करण्यात मदत झाली. यामुळे मुस्लीम समुदायाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या समूहांना एका झटक्यात यश मिळाले आणि त्याचा फटका सर्वदूर गरीब मुसलमानांना बसू लागला आहे. कोरोनाचा उपयोग धार्मिक दुही वाढविण्यासाठी करणे हे राजकारण आहे आणि कोरोनाचे संकट वाढत असतांना या राजकारणाला लगाम बसण्याची कोणतीही चिन्हे नाहीत हे गडचिंचले गावांतील मॉब लिन्चींग घटनेवरून सुरु असलेल्या राजकारणाने दाखवून दिले. 

कोरोनाच्या महामारीत फक्त धार्मिक दुहीचे राजकारण खेळले जात आहे असे नाही. याचा उपयोग केंद्राकडून विरोधी पक्षाची राज्यातील सरकारे अस्थिर करण्यासाठी देखील केला जात आहे. मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी विरोधकांच्या ताब्यात आहे हे वास्तव स्वीकारणे केंद्र सरकारातील दबंग नेत्यांना जड जात आहे. राज्यातील त्यांच्या अनुयायांचे आपण सत्तेत नसल्याचे शल्य आणि दु:ख दिवसागणिक वाढत चालले आहे. केंद्रीय नेते आणि राज्यातील त्यांचे समर्थक कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य सरकारला मदत करण्या ऐवजी अडचणीत आणण्याचे राजकारण करीत असल्याचे गडचिंचले गावातील घटनेनेच नव्हे तर अनेक घटनांच्या मालिकेतून स्पष्ट झाले आहे. कोरोना संकट सुरु झाल्यापासून देशाचे दबंग गृहमंत्री पडद्याआड गेले होते. ते कुठे आहेत याची चर्चा देशभर सुरु होती. पण विरोधी राज्यांवर हल्ला करण्यासाठी ते दबा धरून बसल्याचे लवकरच उघड झाले. बांद्रे रेल्वे स्टेशनवर उत्तर भारतीयांची गर्दी जमा झाली तेव्हा अमित शाह प्रकट झालेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी बोलले. घटनेचा अहवालही मागविला. त्याच दिवशी अशीच गर्दी सुरत मध्ये गोळा झाली होती आणि या गर्दीने आठवडाभरापूर्वी सुरतेत जाळपोळ, लुटालूट केल्याची वार्ता होती. पण गुजरातच्या मुख्यमंत्र्याशी अमित शाह बोलले किंवा घटनेचा अहवाल मागविल्याची मात्र कोणतीही वार्ता नव्हती. उत्तर प्रदेशातील लीन्चींगच्या अनेक घटनांवर अनेक महिने मौन बाळगणारे अमित शाह गडचिंचले गांवातील घटनेत मात्र तत्काळ मुखर आणि सक्रीय झालेत. याला राजकारण नाही तर आणखी काय म्हणायचे ?

राज्याचे माजी मुख्यमंत्री तर अमित शाहच्याही वरचढ आहेत. राज्य सरकारला कोरोना विरुद्धच्या लढाईत कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा त्यांचा निर्धार त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो. सत्तेत नसलो तरी भाजपा राज्यातील कोणालाही लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू देणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती. पाठोपाठ त्यांनी ३५ लाख लोकांना अन्नधान्य पुरविल्याची माहितीही दिली. कुठे, कोणाला, कधी असा प्रश्न विचारणे निरर्थक आहे. पण वांद्रे येथे जमलेली गर्दी उपासमारीमुळे जमल्याचे सांगून त्यांनी राज्य सरकार पोचले नाही तिथे आम्ही पोचल्याचा व उपासमारी टाळल्याचा दावा किती फोल होता हे वांद्रे उपासमारीची कथा सांगून स्वत:च दाखवून दिले. फडणवीसांनी सतत कोरोना साठी मुख्यमंत्री निधी ऐवजी पीएम केअर्स मध्येच लोकांनी पैसे द्यावेत असे जाहीर आवाहने केलीत. यातून त्यांचा राज्य सरकारशी कोरोना लढाईत असहकार असल्याचे दाखवून दिले. महाराष्ट्रात अन्य राज्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण संख्या व मृत्यू संख्या जास्त आहे आणि यात दिवसेंदिवस वाढ होत असली तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी प्रामाणिकपणे, निष्ठेने कोरोना विरुद्ध लढत आहेत , लोकांना धीर देत आहेत हे राज्यातील लोकच नाही तर परप्रांतीय नेते उघडपणे बोलत आहेत, कौतुक करत आहेत. नेमके हेच  राज्यातील भाजपा नेत्यांना अजिबात सहन होत नाही हे त्यांच्या कृतीतून आणि वाणीतून स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरेंना सरकार चालविता येणार नाही व तिघाडीची बिघाडी लवकर होईल अशी आशा बाळगून असलेल्या राज्य भाजप नेतृत्व उद्धवचे स्थिरावणे आणि दमदार कामगिरीने बेचैन झाले असून कोरोना विरुद्धच्या लढाईत साथ देण्या ऐवजी राज्य सरकार अस्थिर करण्याचे राजकारण खेळत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेवर भाजपचा विशेष रोख आणि राग असण्यामागे तबलिगी जमातीच्या निजामुद्दीन संमेलना बाबत देशमुखांचे केंद्राला अडचणीत आणणारे प्रश्न आहेत ! अमित शाह यांना महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याची एकाएकी तीव्र चिंता वाटण्या मागेही देशमुखांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत हे उघड गुपित आहे. कोरोना प्रसार चिंताजनक स्थितीत असतांना राजकीय कारवाया थांबण्या ऐवजी वाढत आहेत ही चिंतेत भर टाकणारी बाब आहे.
-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment