Thursday, April 16, 2020

कोरोना विरुद्धच्या लढाईतील आघाडीच्या फौजेच्या व्यथा -- २


डॉक्टरांच्या तक्रारीतून सरकारच्या तयारीची पोलखोल होते म्हणून मुस्कटदाबी केली जात असेल तर आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत.
----------------------------------------------------------------------


कोरोना संकट किती मोठे आहे हे समजून घेण्यास केंद्र सरकारला बराच उशीर लागल्याने कोरोना विरुद्धच्या लढाईत उपयोगी पडणारी वैद्यकीय सामुग्रीची निर्यात भारताकडून होत राहिली. उजेडात आलेली शेवटची निर्यात खेप मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सर्बियाला झाली. जागतिक आरोग्य संघटनेने फेब्रुवारीतच सगळ्या देशांना कोरोना विरुद्धच्या लढाईत उपयुक्त सामुग्रीची निर्यात करतांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता. आधी आपल्या गरजा लक्षात घ्या आणि गरजेपेक्षा जास्त असेल तेवढीच सामुग्री निर्यात करा या सुचनेकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. कोरोनावर आपल्याकडे उपलब्ध असलेली औषधी जास्त प्रमाणात आहे आणि त्या औषधीचे कच्चा माल उपलब्ध झाला तर केव्हाही उत्पादन वाढविण्याच्या स्थितीत असल्याने त्या औषधीची मागणी अमेरिकेने केल्यावर पुरवठा करण्यात काहीच गैर नाही. शेजारच्या राष्ट्रांना आपण ही औषधी पुरवतोच. पण वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या सुरक्षा किट्स , दस्ताने आदि सामुग्रीची मोठ्या प्रमाणावर गरज लागणार असतांना निर्यात होणे अपायकारक ठरले. आघाडीच्या फौजेला पुरवण्यासाठी रसदच नाही अशी आपली अवस्था झाली. त्यामुळे आघाडीच्या वैद्यकीय फौजेतच भीती, चिंता, नाराजी निर्माण झाली ती गैर म्हणता येणार नाही. ही भीती, चिंता, नाराजी व्यक्त केली म्हणून त्यांचा अपमान,अवहेलना होणे चुकीचे आहे. डॉक्टरांच्या संघटनेने याबद्दलच प्रधानमंत्री मोदी यांचेकडे पत्र लिहून तक्रार केली आहे.


या देशामध्ये असा एक वर्ग आहे जो मोदी सरकारच्या उणिवांकडे लक्ष वेधवेल त्याच्यावर लांडग्या सारखा तुटून पडतो. डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईतील सरकारच्या त्रुटीवर , साधनांच्या कमतरतेवर बोट ठेवताच विविध ठिकाणच्या इस्पितळातील प्रशासना सोबतच या वर्गाकडूनही त्यांचा आवाज दाबण्याचा, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला आहे.  या विरुद्ध दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांच्या संघटनेने थेट प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी वैद्यकीय बिरादरी ही कोरोना विरुद्ध लढणारी आघाडीची फौज आहे आणि आघाडीची फौज आपल्या समस्या ,अडचणी मांडत असतील तर त्या समजून घेण्या ऐवजी त्यांचे तोंड बंद करण्याचा , त्यांना अपमानीत करण्याचा चालू असलेला उद्योग बंद करण्याची त्यांनी कळकळीची विनंती केली आहे. आमच्यासाठी टाळ्या वाजवू नका . आम्हाला बोलू द्या असे थेट प्रधानमंत्र्यांना सांगण्याची वेळ कोरोना लढाईतील आघाडीच्या फौजेवर येणे याचा अर्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्या ऐवजी खच्चीकरणाचे प्रयत्न जास्त होत असल्याचे द्योतक आहे. डॉक्टर आणि त्यांचा सहयोगी कर्मचारी वर्ग काहीही चुकीचे बोलत किंवा मागत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गेल्याच आठवड्यात दिलेल्या आदेशावरून स्पष्ट होते. सुप्रीम कोर्टाच्या ८ एप्रिलच्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे कि डॉक्टर आणि त्यांचा सहयोगी स्टाफ ही कोरोना विरुद्धच्या लढाईतील पहिली संरक्षण फळी आहे आणि ही फळी मजबूत राहण्यासाठी योग्य ती रसद पुरविली गेली पाहिजे. यात जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषावर उतरणाऱ्या पीपीई कीट्स,निर्जंतुक दस्ताने, मेडिकल मास्क, गॉगल्स, फेस शिल्ड आणि रेस्पिरेटर कोरोना उपचारात सामील सर्वाना पुरविण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या सामुग्रीचे उत्पादन देशात वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.  भारतात ३० जानेवारीला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला  आणि ८ एप्रिलला सामुग्री पुरविण्याचे व उत्पादन वाढविण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात हे कोरोना विरुद्धच्या लढाईत आमच्या तयारीवर पुरेसा प्रकाश टाकणारे आहे. डॉक्टरच्या तक्रारीतून सरकारच्या तयारीची पोलखोल होते म्हणून मुस्कटदाबी केली जात असेल तर आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून लगेच सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळतील असे नाही. आडात असेल तरच पोहऱ्यात येईल. पण केंद्र सरकार उशिरा का होईना जागे झाले आहे आणि त्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याने आघाडीच्या फौजांना रसद पुरविण्याच्या कामाला गती येण्याची आशा करता येईल.
                                                           

पीपीई किट्स आणि अनुषंगिक वैद्यकीय साहित्य मिळाले म्हणजे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या संपतात असे नाही. त्यानंतर नव्या समस्या निर्माण होतात ज्याला त्यांना तोंड द्यावे लागते. पीपीई किट्स परिधान केलेल्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची छायाचित्रे सर्वानीच पाहिली असतील. डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्या पर्यंत सगळे बंद. त्यात रोगाचा प्रसार होवू नये म्हणून कोरोना कक्षात पंखे आणि एसी बंद असतात. अशा स्थितीत घामाच्या धारा वाहून काय अवस्था होत असेल याची कल्पना करता येईल. या पेहरावामुळे  त्वचेला खाज सुटणे , चक्कर येणे अशा अनेक तक्रारी येत आहे. एकदा का पीपीई किट्स चढविली की लघवीला जाणे सुद्धा कठीण होवून बसते. या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी अनेकांनी पाणी कमी पिणे , डायपर वापरणे सुरु केले आहे. कोरोना रुग्णावर उपचार करायचे तर पीपीई किट्स वापरणे अपरिहार्य आहे आणि ती वापरली की वापरणाराना वेगळ्याच आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढे सगळे करून संसर्गाचा धोका टळतोच असे नाही. कारण ही कीट संसर्गापासून वाचविण्यास जास्तीतजास्त ७ तास समर्थ असते. आपल्याकडे डॉक्टरांची असलेली कमतरता लक्षात घेता कीट चढविल्या नंतर ७ तासात त्या डॉक्टरला सुट्टी दिली जात असेल हे खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे संसर्गाची टांगती तलवार डोक्यावर असताना वैद्यकीय बिरादारीला काम करावे लागते. कोरोना विरुद्धच्या लढाईत ही बिरादरी साधनांच्या कमतरतेचा सामना करीत असतानाच त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकारही घडत आहे. त्याचा कठोरपणे बिमोड केला पाहिजे. अनेक बेजबाबदार , अज्ञानी , अंधश्रध्द आणि धर्मांध व्यक्ती व समूहाकडून कोरोना प्रसार होत असल्याने कोरोना पासून वाचविणाऱ्या वैद्यकीय बिरादरी वरील कामाचा ताण आणखीच वाढला आहे. अशा वेळी आपण वैद्यकीय बिरादरीच्या अडचणी समजून घेवून या बिरादरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. 
-------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment