राष्ट्रांना एकमेकांची गरज नेहमीच लागते आणि त्या गरजेच्या प्रमाणात गैरसमज दूर
होतीलही पण भारतात घराघरा पर्यंत पसरत चाललेला मुस्लीमफोबिया त्यामुळे दूर होईल का
हा खरा प्रश्न आहे.
-------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
२०१४ ला सत्ता प्राप्त
केल्यानंतर संघ-भाजप एकाच दिशेने कार्यरत होता. ती दिशा होती देशात हिंदू-मुस्लीम
ध्रुवीकरण घडवून आणण्याची. त्यांच्या या कार्याला मोदी सरकारचे अभय होते.
कार्यकर्तेच नव्हे तर मोदी मंत्रिमंडळातील मंत्री आणि पक्षाचे नेते सुद्धा मुस्लीम
विरोधी वक्तव्य करत वातावरण तापवत राहिले. सरकारने आणि पक्षाने एकावरही कारवाई
केली नाही. मोदी सरकार आल्यानंतर अनेक न्यूज चैनेलची मालकी बदलली आणि काही अपवाद
सोडले तर सर्व चैनेल्सनी या काळात संघ-भाजपाचा हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा अजेंडा
नेटाने राबविला. सोशल मेडीयावर आधीपासूनच भाजपचा वरचष्मा होताच. या सगळ्याच्या
परिणामी देशभर वाढत्या क्रमाने मुस्लीम विरोधी वातावरण तापत गेले. कोरोना संकट
काळात तर मुस्लीम विरोधी विखाराने टोक गाठले.
इस्लामी आतंकवाद्यांमुळे साऱ्या
जगातच मुसलमानांबद्दल दुरावा निर्माण झाला हे खरे आहे. पण कोणत्याच देशात
मुस्लिमांविरुद्ध भारता इतका विखार निर्माण झाला नाही. कोरोना संकट सुरु झाल्यावर
तबलिगी जमातीवरून जे काही रणकंदन झाले त्यावरून भारतात इस्लामोफोबिया मोठ्या
प्रमाणात पसरल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय माध्यमांनी काढला आणि इस्लामी राष्ट्रे
तर भारतातील इस्लामोफोबिया विरुद्ध जाहीर तक्रार आणि इशारा देवू लागले आहेत. ५७
राष्ट्राच्या इस्लामिक सहकार्य परिषदेने अधिकृतपणे ठराव करून भारतातील मुसलमानांना
कोरोनासाठी जबाबदार धरून त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या प्रयत्नांबद्दल तीव्र
नापसंती भारत सरकारकडे नोंदविली.
या इस्लामिक परिषदेत भारताशी चांगले संबंध असलेली अनेक राष्ट्र आहेत. जाहीर नाराजी नंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव मोदी सरकारला झाली आणि सध्यातरी इस्लामोफोबियाला आवर घालण्याची निकड केंद्र सरकारला वाटू लागली. तबलिगी जमाती विरुद्ध आणि त्यानिमित्ताने एकूणच मुस्लीम समाजा विरुद्ध मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून वातावरण तापत होते. तेव्हापासून मोदीजीनी तीन वेळा राष्ट्राला संबोधित केले होते. या वातावरणाला आवर घालण्याच्या दृष्टीने त्यांनी चकार शब्द काढला नव्हता. इस्लामी राष्ट्रात व्यक्त होत असलेला संताप पाहून १९ मार्चला त्यांनी पहिल्यांदा कोरोना प्रसाराचा धर्माशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे आणि सर्वांनी एकदिलाने कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केले. अनेक इस्लामी राष्ट्राच्या प्रमुखाशी ते व्यक्तिश: बोलले. एवढेच नाही तर परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र मंत्रालय आणि इस्लामी राष्ट्रातील वकिलातीना ‘गैरसमज’ दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर सक्रीय केले.
राष्ट्रांना एकमेकांची गरज नेहमीच
लागते आणि त्या गरजेच्या प्रमाणात गैरसमज दूर होतीलही पण भारतात घराघरा पर्यंत
पसरत चाललेला मुस्लीमफोबिया त्यामुळे दूर होईल का हा खरा प्रश्न आहे. साध्या
शब्दात सांगायचे तर फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची वाटणारी
अनाकलनीय भीती किंवा वाटणारा तिरस्कार. तबलिगी घटना आपल्यासमोर ज्या पद्धतीने
मांडल्या गेली त्यातून मुस्लीम समुदाया बद्दलचा तिरस्कार सर्वदूर पसरला. हा
तिरस्कार तबलिगी जमातीच्या कृतीतून निर्माण झाला हे मानणे भोळेपणाचे ठरेल. तबलिगी
जमातीकडून चुका झाल्यात आणि या चुकांना निमित्त बनवून तिरस्कार निर्माण करण्यासाठी
एक यंत्रणाच पद्धतशीर कार्यरत होती. आमच्या मनात मुस्लीमफोबिया असल्यानेच या
यंत्रणेला टोकाचा तिरस्कार निर्माण करण्यात यश मिळाले हे विसरून चालणार नाही.
एखादेवेळी
आपला गैरसमज होवू शकतो. पण गैरसमजाचा पुरावा समोर आला तर गैरसमज दूर व्हायला हवा.
या प्रकरणात अनेक प्रचारित अनेक व्हिडिओ जुने किंवा बनावट असल्याचे सिद्ध होवूनही
आपले मत बदलले का ? याचे उत्तर नाही असे आहे. हे असेच वागणार हे इथे आपण गृहीत
धरून असतो. हीच कृती अन्य समुदायांकडून घडली तर त्याबद्दल आपणास फारसे काही वाटत
नाही. चीड येत नाही. तिरस्कार तर अजिबात वाटत नाही. मुस्लिमांबद्दल मात्र वाटतो.
हाच मुस्लीमोफोबिया आहे. काही उदाहरणे समोर मांडली तर समजायला मदत होईल. एवढे
कोरोनाचे संकट आ वासून उभे असतांना या तबलिगी जमातीला एवढ्या मोठ्या संख्येने
जमायचे कारणच काय हा आपल्यापैकी प्रत्येकाला पडलेला स्वाभाविक प्रश्न असतो. पण कोरोनाचा
प्रसार सुरु असताना तीर्थयात्रेला गेलेल्या आणि लॉकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या
यात्रेकरू बद्दल मात्र असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होत नाही.
ज्यावेळेस मरकज निजामुद्दीन मध्ये हजार-दोन हजार तबलिगी अडकून पडले होते त्याच वेळेस देशातील अनेक तीर्थक्षेत्री हजारो यात्रेकरू अडकून पडले होते. पण कोरोनाचा प्रकोप सुरु असताना हे यात्रेला गेलेच कसे असा प्रश्न आपल्या समोर पडत नाही. यात यात्रेकरुंची काही चूक आहे का ? तर अजिबात नाही. सरकारला तेव्हा कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले नव्हते त्यामुळे यात्रा करण्यावर बंदी नव्हती. म्हणून यात्रेकरू यात्रेवर गेले. परदेशी नागरिक तबलिगी जमातीच्या संमेलनासाठी आलेत ते केंद्र सरकारने व्हिसा मंजूर केला म्हणून येवू शकले. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य आणि भविष्यात काय होवू शकते याचा अंदाज येण्याआधी तो सरकारला येणे गरजेचे आणि महत्वाचे असते. जिथे केंद्र सरकारला गांभीर्य कळले नाही तिथे तबलिगी जमातीला कळायला पाहिजे होते अशी आमची अपेक्षा आहे !
सामान्य नागरिक एखाद्या
गोष्टीबद्दल अज्ञानी किंवा अनभिद्न्य असणे ही सामान्य गोष्ट आहे. पण केंद्र सरकारचे
अज्ञान हे निष्काळजीपणात मोडणारे आहे. कोरोना संबंधीची माहिती मिळवून आवश्यक ती
दक्षता घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला
तो परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे ही बाब सूर्यप्रकाशा एवढी स्पष्ट असताना
केंद्राने परदेशी नागरिकांबद्दल किंवा परदेशातून येणाऱ्या नागरिकांबद्दल
निष्काळजीपणा कसा दाखविला हा प्रश्न आपल्याला पडायला हवा होता. पण मुस्लीम
फोबियाच्या परिणामी आपल्याला सगळे प्रश्न पडले ते तबलिगी जमाती बद्दल.
(अपूर्ण)
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
(अपूर्ण)
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
No comments:
Post a Comment