प्रधानमंत्र्या पाठोपाठ संघप्रमुख मोह्नजी
भागवत समोर आले आणि त्यांनी मुठभर लोकांच्या गैरवर्तनुकीसाठी पूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे
सांगितले. त्याही पुढे जावून भाजपा अध्यक्ष जे.पी.नद्दा यांनी धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या
भाजप कार्यकर्ते व नेते यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
इस्लाम
फोबियाचा एक परिणाम तर असा झाला कि मुस्लिमांची काही बाजू असू शकते हा विचारच
होईनासा झाला. तबलिगी मेळाव्यामुळे विखार टोकाला पोचला त्याबद्दल बरीच चुकीची
माहिती आपल्यापर्यंत पोचली आणि आपण ती खरी मानली. वास्तविक या घटनेबद्दल दोन भागात
विचार करण्याची गरज आहे. ११,१२ व १३ मार्चला संमेलन आटोपल्यावर बरेच तबलिगी १५
मार्च पर्यंत आपापल्या गांवी परतले होते. या परतलेल्या लोकांमुळे संसर्ग वाढला हे
खरे पण यात चूक कोणाची हे तपासण्याची गरज आपल्याला भासली नाही. संमेलन आटोपल्यावर
तिथे जे थांबले आणि नवे लोक तिथे आले त्यांच्या तपासण्या झाल्या व त्यांच्यातील मुठभर
लोकांकडून सभ्यतेचे आणि कायद्याचे उल्लंघन झाले हव त्यांच्यावर कारवाई झाली हा
झाला दुसरा भाग. हे दोन भाग वेगवेगळे बघितले तर नेमके कोण कुठे चुकले हे लक्षात येईल
मरकझ
निजामुद्दीन हे तबलिगी विचारधारेला मानणाऱ्या जगभरातील मुसलमानांसाठी
तीर्थक्षेत्रा सारखेच आहे. इंग्रज काळापासून जमातीचे हे मुख्यालय आहे. देशभरातून
आणि विदेशातूनही येणाऱ्या मुस्लिमांची येथे वर्षभर वर्दळ असते. संमेलनादी
कार्यक्रम होत राहतात. असेच एक संमेलन ११,१२ व १३ मार्च रोजी बिनबोभाट पार पडले. या संमेलनासाठी
देशभरातून आलेले अधिकांश लोक संमेलन आटोपल्यावर परतले देखील. या संमेलनासाठी आलेले
लोक मुळातच अज्ञानी आणि अंधश्रध्द. संमेलनावरून परत जातांना आपण कोरोना घेवून जात
आहोत याची पुसटशीही जाणीव यांना असण्याचे कारण नाही. सरकारला देखील त्यावेळी ती
नव्हती. ज्या दिवशी तबलिगी जमातीचे संमेलन संपले त्या दिवशी कोरोना संदर्भात
आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक ट्वीट केले.. त्यात सांगण्यात आले की कोरोना
म्हणजे महामारी नाही. देशात सगळे ठीक आहे. घाबरण्याचे कारण नाही. याचा अर्थ
मार्चच्या मध्यापर्यंत कोरोनाचे संकट किती गंभीर आहे याचे आकलन केंद्र सरकारलाही
नव्हते. ते आकलन असते तर सरकारने एक तर संमेलन होवू दिले नसते किंवा तपासणी
केल्याशिवाय तबलिगीना जावू दिले नसते.
आपल्याला कोरोनाची लागण
झाली असेल किंवा आपल्यामुळे संसर्ग पसरू शकतो याची जाणीव त्यांना नव्हती आणि तशी
जाणीव त्यांना त्यावेळी करून देण्यात आली नव्हती. मग अशा तबलीगिना कोरोना
प्रसारासाठी आणि तेही मुद्दाम प्रसार केला असे म्हणत जबाबदार धरणे कितपत संयुक्तिक
आहे असा विचार कोणी करत नाही. अधिकांश तबलिगी गांवी परतल्या नंतर एक आठवड्याने
दिल्ली पोलीसांना आणि प्रशासनाला जाग आली. आपण त्यांना दोष देत नाही कारण सगळ्या
गोष्टीसाठी मुस्लिमांना जबाबदार धरण्याची मानसिकता पद्धतशीरपणे तयार करण्यात आली
आहे. तबलिगी मधील काही मुर्खांनी या मानसिकतेला आपल्या अभद्र वर्तनाने आणि
गुंडगिरीने खतपाणीच घातले. सर्वसामन्यांची मते कलुषित करण्यासाठी मुठभर तबलिगीचे
वर्तन पुरेसे ठरले कारण या आधीच मुस्लीम समुदायाबद्दल तिटकारा निर्माण करण्यात
म्हणजेच मुस्लीम फोबिया निर्माण करण्यात सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांना यश आले
होते.
उशीरा
जाग आल्यानंतर तबलीगीची तपासणी करण्यात आली आणि त्यावरून कोरोना संसर्ग झाल्याची
आणि संसर्ग पसरला असण्याची जाणीव झाली. आणि मग कोरोनासाठी यांनाच जबाबदार धरण्याची
लाट तयार झाली. या लाटेत दुसरीकडे काय झाले इकडे कोणी लक्ष दिले नाही. ठिकठिकाणी
अडकून पडलेल्यांनी आहे त्या ठिकाणीच
थांबावे असा केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश काढला. पण लॉकडाऊन सुरु असताना हरिद्वार
येथे अडकून पडलेल्या हजारो यात्रेकरू पैकी अमित शाह यांचे कृपेने जवळपास २०००
गुजराती यात्रेकरूना अहमदाबादला पोचविण्यात आले. पोचाविण्यापुर्वी किंवा पोचल्या
नंतर यांची तपासणी करण्यात आली का ? बस मध्ये सुरक्षित अंतर ठेवून यात्रेकरू बसले होते का ? यांना १४ दिवस वेगळे ठेवण्यात आले का ? या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असे आहे. हरिद्वार मध्ये विदेशी प्रवासी मोठ्या संख्येने
येत असल्याने तिथे कोरोना संसर्गाचा धोका मोठा असताना गुजराती यात्रेकरू विना
अटकाव आणि विना तपासणी गांवी परतले. यांचेमुळे गुजरातेत कोरोनाचा फैलाव झाला नसेल
का हा विचार आमच्या डोक्यात येत नाही कारण गुजराती यात्रेकरू मुस्लीम नव्हते!
गुजराती
यात्रेकरूमुळे कोरोनाचा फैलाव होवू शकतो याला आधार आहे शीख यात्रेकरूंचा. लॉकडाऊन
सुरु असतांना जसे गुजराती यात्रेकरू बसने हरिद्वारहून अहमदाबादला गेले तसेच
नांदेडहून शीख यात्रेकरूंचा मोठा जत्था बसने पंजाबात गेला. या यात्रेकरूंची तपासणी
केली तर ३०० च्यावर लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आले. त्यांना पोचवायला
गेलेल्या २० च्या आसपास महाराष्ट्रीयन लोकांना लागण झाल्याचे लक्षात आले. या
यात्रेकरूमुळे पंजाब-महाराष्ट्रातील आणि वाटेत जिथे थांबले असतील तिथे कोरोना
संसर्ग वाढला असेल हे खरे असले तरी शिखांमुळे कोरोना संसर्ग वाढला, शीख समुदाय याला जबाबदार आहे असे आपण म्हणतो का
? नाही
म्हणत. आणि ते बरोबरही आहे. लागण होणे किंवा लागण झाल्याची माहिती नसणे यात या
यात्रेकरूंचा काहीच दोष नाही. दोष असेल तर शासनाचा प्रशासनाचा आहे. पण असा विचार
आपण मुस्लिमांच्या बाबतीत करीत नाही ! निर्माण करण्यात आलेला मुस्लीम फोबिया हे
त्यामागचे खरे कारण.
इथल्या सोशल मिडिया वर जसे मुसलमानांविरुद्ध वातावरण तापविल्या गेले त्याची प्रतिक्रिया म्हणून आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या लाखो भारतीयांविरुद्ध तिथल्या सोशल मेडीयावर वातावरण तापू लागले ते भारताला परवडण्यासारखे नाही. म्हणून तर प्रधानमंत्र्या पाठोपाठ संघप्रमुख मोह्नजी भागवत समोर आले आणि त्यांनी मुठभर लोकांच्या गैरवर्तनुकीसाठी पूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्याही पुढे जावून भाजपा अध्यक्ष जे.पी.नद्दा यांनी धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या भाजप कार्यकर्ते व नेते यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कोणत्या का कारणाने होईना व तात्पुरते का होईना केंद्र सरकारला देशातील मुस्लीम फोबियाला आवर घालण्याची निकड जाणवू लागली हे यावरून स्पष्ट होते.
-----------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
ssudhakarjadhav@gmail.com
लेख छान आहे. या संदर्भातच अरब राष्ट्रांच्या प्रतिक्रिया, हिंदी चॅनेल्सवर चा त्यांचा राग व सरकारची माफी मागण्याची आणि सूर्याचे ट्विट डिलिट करण्याची नामुष्की यावर पुढील लेख असावा ही विनंती.
ReplyDelete