डॉक्टरांच्या एका संघटनेने
नुकतेच प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहून आम्हाला तुमच्या टाळ्या नकोत पण आमचे
म्हणणे , आमच्या
अडचणी मांडता येतील व समजून घेतल्या जातील हे बघा
अशी विनंती केली आहे.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
कोरोना
संकट देशभर पसरू लागल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९ मार्चला
पहिल्यांदा देशाला संबोधित केले. यात त्यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी
देशभरातील डॉक्टर्स , नर्सेस , वार्डबॉय , सफाई कर्मचारी आपला जीव
धोक्यात घालून करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या
प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशवासीयांनी ५ मिनिटे उभे राहून टाळ्या
वाजविण्याचे आवाहन केले. टाळ्या सोबत त्यांनी थाळ्या पण जोडल्याने माकडाच्या हातात
कोलीत मिळाल्या सारखे झाले. घरात राहून टाळ्या वाजविण्याच्या प्रधानमंत्र्याच्या
आवाहनाला केराची टोपली दाखवत अनेकानी हातात येईल ते वाजवत रस्त्यावर धुमाकूळ
घातला. यातून त्यांनी कृतज्ञता नाही तर उन्माद तेवढा प्रकट केला. सर्वसामान्य
जनतेने मात्र टाळ्या वाजवून मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. अशा कार्यक्रमातून
ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवितो त्यांचे मनोबल वाढणे अपेक्षित असते. पण दुसरा एक
धोका असतो. टाळ्या वाजविण्या व्यतिरिक्त काहीही न करता खूप काही केल्याचा भ्रम
तयार होतो. टाळ्या कार्यक्रमानंतर वैद्यकीय बिरादरी संबंधी अनेक ठिकाणाहून आलेल्या
बातम्या वाचल्यानंतर या बिरादरीचे मनोबल वाढले आहे आणि सरकार व जनता खरोखरीच या
बिरादरी बद्दल कृतज्ञ आहे असे चित्र समोर येत नाही. डॉक्टरांच्या एका संघटनेने
नुकतेच प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहून आम्हाला तुमच्या टाळ्या नकोत पण आमचे
म्हणणे , आमच्या
अडचणी मांडता येतील व समजून घेतल्या जाईल हे बघा अशी विनंती केली आहे. डॉक्टरांचे
निवेदन आमच्या कथनी आणि करणीतील अंतर अधोरेखित करते. डॉक्टरांच्या तक्रारीतून
सरकारच्या कथनी आणि करणीतील अंतरावर प्रकाश पडतोच पण कथनी आणि करणी मधील अंतराच्या
बाबतीत तुम्ही - आम्ही कमी नाहीत हे देखील या निमित्ताने पुढे आले आहे.
कोरोना
रुग्णांच्या सेवेत असलेले वैद्यकीय कर्मचारी ज्या इमारतीत राहतात त्यांच्याशी व
त्यांच्या कुटुंबियांशी इमारतीतील इतर रहिवाशी फटकून वागतात , उपेक्षा करतात अशा अनेक
तक्रारी टाळ्या कार्यक्रमानंतर पुढे आल्या आहेत. कोरोना वार्डात काम करणारे
वैद्यकीय कर्मचारी एखाद्या इमारतीत भाड्याने राहात असतील तर त्यांच्यावर घर
सोडण्यासाठी दबाव येत असल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत. यांच्यामुळे आपल्याला
संसर्ग होईल ही भीती शेजाऱ्याना वाटणे स्वाभाविक आहे. कोरोना दहशतीमुळे लोक असे
वागतात हेही मान्य. त्यासाठी संसर्ग कशामुळे होतो, कशामुळे होत नाही याची नीट माहिती करून घेण्याची
गरज आहे. ती माहिती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि अशा बहुमजली इमारतीत राहणाऱ्या
लोकांजवळ बोटाच्या टिचकी सरसी ती माहिती मिळविण्याची विपुल साधनेही आहेत. त्यामुळे
अशा संकटाच्या वेळी अशा लोकांकडून जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. वैद्यकीय
कर्मचाऱ्यांची कुटुंबे तुमच्या आमच्या पेक्षा जास्त दबावाखाली आणि तणावात आहेत.
सुरक्षा साधनांचा अभाव असतांना कोरोना वार्डात काम करणे म्हणजे मृत्युच्या दाढेत
जावून काम करण्यासारखे आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती अशा ठिकाणी काम करतो याच्या
प्रचंड तणावात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कुटुंबे जगत आहेत. अशा वेळी दूर राहून देखील
नजरेतून त्या कुटुंबाला धीर देणे शक्य आहे. पण आमच्या नजरेत धीरा ऐवजी अशा
कुटुंबाविषयी संशय,उपेक्षा
आणि ही ब्याद इथून गेलेली बरी अशा भावना या कुटुंबियांना दिसत असतील तर अशा कुटुंबियांचे
मनोबल खच्ची करणारे आहे. कुटुंबियांचे मनोधैर्य खचलेले असेल तर काम करणाऱ्या
कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होणारच. टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त
करायला सांगणाऱ्या सरकारची कृती देखील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल अशी
नाही ही जास्त चिंतेची बाब आहे.
सर्व
सोयींनी युक्त अशा देशातील सर्वोत्तम इस्पितळा पैकी एक इस्पितळ म्हणून दिल्लीच्या
एम्सची गणना होते. या एम्स मधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने एम्सच्या प्रमुखांना
आठवडाभरापूर्वी एक निवेदन दिले होते. डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विश्वासात
न घेता त्यांच्या पगारातील रक्कम परस्पर कापून ती पीएम केअर्स फंडात जमा करण्यावर
त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे पैसा कापलाच आहे तर तो पैसा कोरोना
विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक साधनांसाठी तातडीने खर्च करायला पाहिजे. कारण
दिल्लीच्या सर्वोत्तम एम्स मध्ये कोरोना वार्डात काम करण्यासाठी आवश्यक अशा
व्यक्तिगत सुरक्षा कवचाचा - ज्याला पीपीई किट्स म्हंटले जाते - तुटवडा आहे. जर
दिल्लीच्या एम्स मध्ये ही स्थिती असेल तर देशभरच्या इस्पितळात काय अवस्था असेल
याची कल्पना केलेली बरी. कल्पना कशाला त्याचीही उदाहरणे आपल्या समोर आहेत. सुरक्षा
कवचा अभावी मुंबईतील वोकार्ट इस्पितळातील ३ डॉक्टर व २६ नर्सेसना कोरोनाची बाधा
झाल्याचे समोर आल्याने ते इस्पितळच सील करण्याची पाळी आली. एक आठवड्या पूर्वीचा
कोरोना बाधा संशयित डॉक्टरांची देशभरातील संख्या १०० च्या वर होती त्यातील ५०
कोरोना पॉजिटिव्ह निघाले. बाकी निगराणी खाली आहेत. आठवडाभरात हा आकडा वाढलेला
असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांनी
सुरक्षा कवचाची मागणी केली आणि त्याशिवाय कोरोना वार्डात जायला नकार दिला तर
त्यांचे चुकले असे कसे म्हणता येईल. पण उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात अशी
मागणी करणाऱ्या २६ कर्मचाऱ्यांना तिथल्या सरकारने निलंबित केले आहे. महाराष्ट्रात
औरंगाबाद येथील डॉक्टरांनी अशाच मागणीसाठी निदर्शने केल्याची घटना नुकतीच घडली.
सुदैवाने महाराष्ट्र सरकारने निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा
उगारण्याचा निर्बुद्धपणा दाखविला नाही. सुरक्षा कवच पुरवीत नसल्याने काही ठिकाणी
डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे राजीनामे न स्वीकारता
त्यांचेवर कारवाईची धमकी त्या त्या इस्पितळातील प्रशासनाकडून दिल्या गेली. ही परिस्थिती
ओढवण्याचे कारण केंद्र सरकारला करावयाच्या उपाययोजनांचे आकलन उशिरा होण्यात
सापडते. आता कीट्स पुरवण्यासाठी केंद्राची धावपळ सुरु आहे. पण तहान लागल्यावर
विहीर खोदण्यासारखा हा प्रकार आहे.
(अपूर्ण)
-------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८
मोबाईल - ९४२२१६८१५८
महत्वाचे
ReplyDelete