Wednesday, March 23, 2022

'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन : मोदीजींचे सेल्फ गोल !

प्रधानमंत्र्याने एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन करावे काय हा वादाचा आणि वेगळा विषय आहे. पण 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे प्रमोशन करून मोदीजीनी अनेक सेल्फ गोल केलेत हा या लेखाचा विषय आहे. आजपर्यंत लपविलेली माहिती या चित्रपटाने बाहेर आणली असे म्हणणे म्हणजे आठ वर्षे सत्तेत राहूनही आम्हाला बाहेर काढता आले नाही ते एका चित्रपटाने काढले म्हणण्यासारखे आहे !
------------------------------------------------------------------------------------------

 
'द कश्मीर फाईल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटावर एवढा वाद आणि चर्चा सुरु आहे की चित्रपटात काय दाखविले आहे हे सिनेमागृहात जावून चित्रपट न बघताही कळू शकेल. 'हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून रचनेचे स्वातंत्र्य घेतले आहे' हे  चित्रपट निर्मात्या तर्फे पडद्यावरच स्पष्ट करण्यात आले आहे. एवढे स्पष्ट केल्यानंतर चित्रपटातील दृश्ये आणि संवाद यावर वाद होणे, चित्रपट ऐतिहासिक की अनैतिहासिक अशी चर्चा निरर्थक ठरते. चित्रपट पाहून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया मात्र आश्चर्यकारक आहेत आणि त्याचेच विश्लेषण करण्यासाठी हा लेखन प्रपंच. १९९० साली काश्मिरी पंडितांना आपले घर , आपले गांव, आपली संपत्ती सोडून रातोरात काश्मीर घाटी सोडून पलायन करावे लागले आणि तेव्हापासून आतापर्यंत विस्थापितांचे जीवन जगण्याची पाळी त्यांच्यावर आली ही घटना तर शंभर टक्के सत्य आहे. केवळ पंडितच नाही तर इतर हिंदू, शीख आणि मुसलमानही बाहेर पडलेल्यांमध्ये होते हे सत्य असले तरी त्यामुळे काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची तीव्रता कमी होत नाही किंवा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट निर्मात्याचा दावा असत्य ठरत नाही. चित्रपटात रचनेचे जे स्वातंत्र्य घेतले आहे त्यातून काही प्रश्न आणि प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून न पाहण्याचा हा परिणाम आहे !                                                                                 
चित्रपटाकडे चित्रपट म्हणून न पाहता इतिहास म्हणून पाहावा असा विशिष्ट वर्गाचा आग्रह आहे आणि स्पष्टच सांगायचे तर केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा आणि त्या पक्षाच्या नेत्यांचा तसा आग्रह आहे. स्वत: प्रधानमंत्री मोदी यांनी इतिहासात काय घडले हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहिला पाहिजे असे सांगून या चित्रपटाचा प्रचार केला आहे. एवढेच नाही तर आजवर आमच्या पासून लपविण्यात आलेल्या घटना या चित्रपटामुळे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. मोदीजीनीच चित्रपटाचे असे प्रमोशन केल्याने चित्रपटावर प्रेक्षकांची उडी पडली नसती तरच नवल. आणि प्रतिक्रियाही मोदीजीच्या सुरात सूर मिळविणाऱ्या उठल्या असतील तर नवल नाही. मोदीजी सारखी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे पण मोदीजींची प्रतिक्रिया अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरते. सर्वसामान्यांची सार्वजनिक घटनांबाबतची  स्मरणशक्ती अल्प असते आणि घटना घडून गेल्यावर काळाच्या ओघात ते विसरूनही जातात. शिवाय घटनेचे सर्व पैलू त्यावेळी जाणून घ्यायची सामान्यांची इच्छा असली तरी त्यांची तेवढी पोच नसते. त्यामुळे चित्रपट पाहून सामान्य माणूस म्हणत असेल की 'अरे हे तर आम्हाला माहितच नव्हते किंवा या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवण्यात आल्या तर ते बोलणे वावगे ठरत नाही.                                                                                                         

 पंतप्रधानपदी बसलेली व्यक्तीही सर्वसामान्यांसारखे अज्ञान दाखवीत असेल तर ते आश्चर्यकारकच नाही तर गंभीरही ठरते. या चित्रपटाचे प्रमोशन करताना मोदीजी जे काही बोलले त्यावर अनेकजण टीका करत आहेत.टीका करण्या ऐवजी खरे तर त्यांनी मोदीजींचे आभार मानायला पाहिजे होते. काश्मीर प्रश्नावर तोंड बंद करून बसलेल्या विरोधकांना तोंड उघडण्याची संधी मिळाली आहे. त्या दृष्टीने विचार करता कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वादात उडी घेवून आणि त्या चित्रपटाचा पुरस्कार करून मोदींनी सेल्फ गोल केला असेच म्हणावे लागेल. बोलण्याच्या भरात त्यांनी एकच नाही तर एकापेक्षा अधिक गोल आपल्या टीमवरच म्हणजे आरेसेस, बीजेपी आणि स्वत:च्या सरकारवर केले आहेत. फुटबॉल किंवा हॉकीच्या खेळात असे सेल्फ गोल होत असतात. आता राजकारणातही असे सेल्फ गोल होतात आणि ते करणारे मोदीजी काही पहिले राजकारणी नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर कॉंग्रेसच्या मणीशंकर अय्यरचे देता येईल. लोकसभा निवडणूक प्रचार भरात असतांना अय्यर यांनी मोदींना "चायवाला"म्हणून हिणवले होते आणि या विशेषणाचा कॉंग्रेस विरोधात मोदींनी भरपूर वापर करून घेतला. काहीसा असाच सेल्फ गोल "कश्मीर फाईल्स"बद्दल मोदीजीनी केला आहे. 

मोदींच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांच्या काश्मीर धोरणावर टीका होत होती. पीडीपी सोबत सरकार बनविणे हाही टीकेचा विषय बनला होता. मात्र दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी कलम ३७० रद्द करून आपल्या विरोधकांची बोलतीच बंद केली होती. त्यानंतर काश्मीरवर कोणीच तोंड उघडायला तयार नव्हते. कोणी काश्मीरवर बोलायला लागला किंवा प्रश्न विचारायला लागला की त्याला देशद्रोही ठरवून त्याचे तोंड बंद करणे फारच सोपे झाले होते. कश्मीर मध्ये काय घडतय हे कलम ३७० रद्द झाल्या नंतर फारसे कळत नव्हते तरी कोणाची विचारायची हिम्मत होत नव्हती. सुरक्षा दलांनी इतके आतंकवादी मारले अशा बातम्या येत होत्या म्हणजे आतंकवादी कारवाया सुरूच आहेत असा त्याचा अर्थ होत असला तरी त्या बद्दल मोदी सरकारला जाब विचारण्याची हिम्मत कोणी करत नव्हते. काश्मीरवासियांचा आवाज सरकार ऐकत नव्हतेच पण इतर पक्षांच्या नेत्यांच्या कानावर पडूनही ते न ऐकल्यासारखे करत होते. ही सगळी परिस्थिती एका चित्रपटाने बदलली ! कश्मीर मध्ये काय घडले आणि काय घडतय या चर्चेला मोदीजीनी या चित्रपटाचा पुरस्कार करून तोंड फोडले आहे. मोदींचे विरोधक नाही तर आपल्याच देशात निर्वासित म्हणून जीवन जगत असलेले काश्मिरी पंडितच ३७० कलम रद्द झाल्याने आमच्या स्थितीत काय फरक पडला असा प्रश्न विचारू लागले आहेत. हा मोदीजींचा पहिला सेल्फ गोल आहे. 


चित्रपटात जे दाखविले ते आजवर लपवून ठेवले होते आणि चित्रपटाच्या निमित्ताने ते आता कळत आहे असे मोदीजी आणि त्यांच्या पक्षाचे नेते सांगत सुटले आहेत. यावर दोन प्रश्न उपस्थित होतात. एक कोणी कोणापासून काय लपविले आणि या घटने बद्दल भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे अज्ञान होते तर १९९० नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पंडितांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून भाजपने मते कशी मागितली. या घटनेचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणी उठवला असेल तर तो भाजपनेच. मग भाजप आजवर काश्मिरी पंडिताच्या प्रश्नाचे भांडवल करत होता ते चुकीच्या माहितीच्या आधारे करत होता की अंदाजे तीर मारून लोकांच्या भावनांना हात घालत होता असा प्रश्न पडतो. काश्मीरमध्ये असे काय घडले की जे आधी संघ भाजपला व त्यांच्या नेत्यांना माहित नव्हते आणि हा चित्रपट बघूनच कळले हे त्या नेत्यांनी स्पष्ट केले पाहिजे. यापेक्षाही मोठा आणि महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे गेली आठ वर्षे देशाची आणि काश्मीरची सत्ता हाती असताना काश्मीरचे 'सत्य' भाजप आणि त्याच्या सरकारला समोर आणता आले नाही. ही गोष्ट या सरकारची अक्षमता , निष्क्रियता आणि उदासीनता दर्शविते. सरकारने लोकसभेत काश्मीरचे सत्य मांडण्या ऐवजी चित्रपटातून सत्य कळले असे म्हणणे हे दिवाळखोरी जाहीर करण्यासारखे आहे आणि तशी ती करून मोदीजीनी दुसरा सेल्फ गोल केला आहे ! मोदीजींचा तिसरा सेल्फ गोल तर भाजपला बेनकाब करणारा ठरला. संघ-भाजपच्या प्रचाराने आणि कॉंग्रेसच्या मुख दुर्बलतेने व कोणी काहीही बोलू द्या त्याने आम्हाला फरक पडत नाही या कॉंग्रेसच्या गुर्मीने पंडितांच्या पलायनाचे पातक कॉंग्रेसच्या माथी असल्याचे जनता समजून चालली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने झडत असलेल्या चर्चेत  पंडितांच्या निर्वासनात भाजपचा हात  पहिल्यांदाच ठळकपणे समोर आला आहे. मोदीजीनी संधी दिलीच आहे तर आपणही काश्मीर आणि पंडितांच्या प्रश्नाचा शोध आणि वेध क्रमश: घेवू. 
-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८   


No comments:

Post a Comment