Thursday, March 17, 2022

विरोधकांच्या मनोधैर्यावर भाजपा विजयाचा बुलडोझर !

उत्तरप्रदेश वगळता अन्य चार राज्याच्या निवडणूक निकालावर परिणाम करणारा मुख्य कोणता घटक असेल तर तो घटक म्हणजे कॉंग्रेसचा नाकर्तेपणा ! कॉंग्रेसचा नाकर्तेपणा हेच या राज्यांमध्ये बीजेपी आणि आप पक्षाच्या विजयाचे कारण राहिले आहे. 
----------------------------------------------------------------------------


पाच राज्याचे निवडणूक निकाल भारतीय जनता पक्षाला कितपत अपेक्षित होते हे सांगता येणे कठीण असले तरी हे निकाल विरोधीपाक्षांसाठी संपूर्णत: अनपेक्षित असे होते. जेव्हा एखाद्या विजयावर तो का झाला यावर खल करावा लागतो , त्याच्या मागची कारणे शोधावी लागतात याचा अर्थच विजय संभ्रमात टाकणारा आहे.  कारण निवडणुकीपूर्वी भाजपसाठी परिस्थिती फारसी अनुकूल आहे असे दिसत नव्हते. उत्तर प्रदेशात काट्याची टक्कर होईल आणि पंजाब,गोवा व उत्तराखंड ही राज्ये बिजेपीसाठी प्रतिकूल ठरतील असा आधी अंदाज व्यक्त केला जात होता. यात फक्त पंजाबने बीजेपी विरोधात कौल दिला. हा कौल बीजेपी विरोधात आहे असे म्हणण्या पेक्षा कॉंग्रेस विरोधी आहे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. कारण पंजाबमध्ये बीजेपीचे स्थान नगण्य आहे. अकाली दलाच्या मदतीने तिथे बीजेपीला थोड्याफार जागा मिळायच्या. त्यामुळे पंजाब बीजेपीकडे जाणार नव्हताच. तिथे कॉंग्रेस की आप एवढाच प्रश्न होता. तिथे आप ने अभूतपूर्व विजय मिळविला.  या पाच राज्यांपैकी गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड ही छोटी राज्ये आहेत.आणि पंजाब सुद्धा फार मोठे राज्य आहे असे म्हणता येत नाही. लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती म्हणून या निवडणुकीकडे भाजप नेतृत्व पाहत आले आहे. त्यामुळे ही राज्ये छोटी असली आणि लोकसभेच्या जागा या राज्यात कमी असल्या तरी छोट्या राज्यातील विजय बिजेपीसाठी मोठी वातावरण निर्मिती करणारा ठरला आहे.                                                                                                     


उत्तर प्रदेशाची निवडणूक बिजेपीसाठी प्रतिष्ठेची व लोकसभा निवडणूक निकालावर प्रभाव पडेल अशी होती. तिथेही अपेक्षेप्रमाणे काट्याची टक्कर पाहायला मिळाली नाही पण निवडणूक एकतर्फीही झाली नाही. जागांच्या बाबतीत बिजेपिची पीछेहाटच झाली.तरीही हा विजय बिजेपीसाठी समाधानकारक ठरला. जागा कमी होवूनही विजयाचे समाधान मिळत असेल तर याचा अर्थ अशा विजयाबद्दल बीजेपीला मनातून विश्वास वाटत नव्हता असा होतो. पण बीजेपीच्या जागा कमी होवूनही विरोधी पक्षांना त्याचा आनंद झाला नाही याचा अर्थच उत्तर प्रदेशाची सत्ता बीजेपीच्या हाती गेल्याने विरोधकांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. योगीच्या  बुलडोझरखाली विरोधी पक्षांचे मनोधैर्य चिरडले गेले आहे. मनोधैर्य खच्ची झाले असे म्हणतो तेव्हा हा या निवडणुक निकालाचा मानसिक परिणाम आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती तेवढी वाईट असेलच असे नाही. खोलात जावून निवडणूक निकालाचे विश्लेषण केले तर बीजेपी प्रदर्शित करते तेवढा मोठा हा विजय नाही हे लक्षात येईल. पण विरोधकांच्या मनोधैर्यावर परिणाम करण्या इतपत मोठा असल्याने बीजेपीचे नेतृत्व या विजयाचा उपयोग विरोधकांना मानसिकदृष्ट्या अधिक खच्ची करण्यासाठी करत आहे. या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीची झलक दिसते हे प्रधानमंत्री मोदींचे प्रतिपादन त्याच साठी आहे. प्रचारासाठी असे बोलणे ठीक आहे पण प्रत्यक्षात या निवडणूक निकालाचा अर्थ आणि परिणाम काय असू शकतात याच्या वेगळ्या विश्लेषणाची गरज आहे. 



या निवडणूक निकालाचा पहिला अर्थ असा आहे की जेथे मुख्य विरोधक कॉंग्रेस आहे तेथे प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळविणे बीजेपीसाठी कठीण जात नाही. मागच्या निवडणुकीत गोवा आणि मणिपूर राज्याने कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. असा कौल मिळूनही या दोन्ही राज्यात कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आले नव्हते. या मागे केंद्रात असलेल्या सत्तेचा दुरुपयोग हे जेवढे कारण आहे तेवढीच कॉंग्रेस पक्षाची सुस्ती याला कारणीभूत होती. निवडणुकीचा कौल अनुकूल येवूनही सत्ता स्थापन करण्यात कॉंग्रेस अपयशी ठरत असेल आणि भाजपने आपली सत्ता स्थापन करण्यात केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग केला त्याविरुद्धही कॉंग्रेसजनात आक्रोश नसेल किंवा तसा आक्रोश प्रकट करण्याची तयारी नसेल तर अशा पक्षाला पुन्हा का निवडून द्यायचे हा तिथल्या मतदारांपुढे प्रश्न पडला असेल तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. उत्तरप्रदेश वगळता अन्य चार राज्याच्या निवडणूक निकालावर परिणाम करणारा मुख्य कोणता घटक असेल तर तो घटक म्हणजे कॉंग्रेसचा नाकर्तेपणा ! कॉंग्रेसचा नाकर्तेपणा हेच या राज्यांमध्ये बीजेपी आणि आप पक्षाच्या विजयाचे कारण राहिले आहे. उत्तर प्रदेशची स्थिती वेगळी आहे. तिथे बीजेपी विरोधात लढणारा मुख्य पक्ष कॉंग्रेस नव्हता. तिथे बीजेपीला संघर्ष करून यश मिळवावे लागते. मात्र हे यश बीजेपीच्या,योगीच्या आणि मोदीजीच्या निव्वळ कर्तृत्वावर व उपलब्धींवर मिळाले असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. नेतृत्वाच्या उपलब्धी व कर्तृत्वापेक्षा साधनसंपन्न पक्षाच्या सूक्ष्म आणि कुशल  नियोजनाचा हा विजय आहे हे लक्षात घेतले तर येणारी लोकसभा निवडणूक अशीच होईल हे समजण्याचे कारण नाही.                 


मोदींच्या लोकप्रियतेवर विरोधकांना मात करता आली नाही व नजीकच्या भविष्यात मात करता येईल की नाही याबाबत साशंकता असली तरी भाजपच्या सूक्ष्म आणि कुशल नियोजनावर मात करणे अशक्य कोटीतील गोष्ट नाही. ज्या उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालाने विरोधकांना नैराश्यात लोटले तेच निकाल विरोधकांना भाजपवर मात करणे शक्य असल्याचा संदेश देत आहेत. हा संदेश समजून घेण्यासाठी निकालाशी संबंधित सर्व आकडेवारीचे विश्लेषण करावे लागेल. पण तसे विश्लेषण करण्याआधीही निवडणूक इतिहासाकडे पाहून सांगता येते की पुढच्या निवडणूक विजयासाठी मागचा निवडणूक विजय फारसा उपयोगी पडत नसतो. कारण परिस्थिती बदलत असते आणि बदलत्या परिस्थितीचा परिणाम निवडणूक निकालावर होत असतो. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षफुटी नंतरही इंदिरा गांधीनी दणदणीत विजय मिळविला. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळवून इंदिराजी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान होत्या. पण दोन वर्षात परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आणि नंतरच्या निवडणुकीत इंदिराजींचे पानिपत झाले. नेहरू व इंदिराजीपेक्षा जास्त जागा मिळवून राजीव गांधीनी इतिहास रचला पण पुढच्याच निवडणुकीत पक्ष पराभूत झाला. २००४ पेक्षा २००९ साली मोठा विजय मिळवून मनमोहनसिंग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बनले. पण एक वर्षातच त्यांच्या विरोधात वातावरण बनायला सुरुवात झाली आणि पुढच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही फक्त बदलत्या परिस्थितीचा उपयोग सत्ताबदल करण्यासाठी करता आला पाहिजे. पराभवाचे दु:ख विसरून उत्तर प्रदेश निवडणूक निकालाचे बारकाईने अवलोकन केले तर विरोधीपक्षांना आशेचा किरण नक्की दिसेल.
-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment