Thursday, January 8, 2015

विज्ञान कॉंग्रेसमध्ये चावडीवरील गप्पा !

विज्ञान कॉंग्रेसमध्ये कधीच न उडालेल्या विमानाचे काल्पनिक चित्तथरारक प्रात्याक्षिके दाखवून आयोजकांनी आणि स्वत:ला वैज्ञानिक म्हणवून घेणाऱ्यानी भारतीय संविधानाचे आणि पंडित जवाहरलाल नेहृरुचे वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे सगळे प्रयत्न वाया गेलेत हेच दाखवून दिले.
----------------------------------------------------------

जगात विज्ञानाला चालना मिळायला आणि त्याच्या विकासाला हजारो वर्षे का लागली याचे उत्तर शोधायला फार संशोधनाची गरज नाही. मुंबई विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या कामकाजावर आणि कार्यपद्धतीवर नजर टाकली तरी याचे उत्तर मिळते. विज्ञानाचा उशिरा का होईना विकास झाला असला तरी वैज्ञानिक दृष्टीकोनापासून आम्ही लाखो वर्षे मागे आहोत हे या विज्ञान परिषदेने सिद्ध केले आहे. घरबसल्या मनोरंजन होईल अशी साधने अस्तित्वात नसल्याने पूर्वी लोक आपले कामधाम आटोपून मनोरंजनात्मक गप्पा मारण्यासाठी चावडीवर जमायचे. या चावडीवरील गप्पात महाभारतापासून ते आधुनिक भारतापर्यंत अनेक विषयावर गप्पांचे फड रंगायचे. आपल्या प्रतीपादनासाठी पुरावे देण्याची गरज नसल्याने कल्पनेची भरारी मारणारा असा गप्पांचा फड जिंकून जायचा. विज्ञानाच्या विकासासोबत मनोरंजनाच्या विविध साधनांचा विकास झाला आणि चावडी वरील गप्पांचे प्रस्थ कमी झाले. हळूहळू विस्मरणात चाललेल्या चावडीला नुकताच उजाळा मिळाला तो या विज्ञान कॉंग्रेसने ! विज्ञान म्हणजे प्रयोगाने आणि पुराव्याने सिद्ध करण्याची गोष्ट आहे हे विसरून या विज्ञान कॉंग्रेसच्या आयोजकांनी विज्ञानाच्या 'अभ्यासका'ना बोलावून भारतीय विज्ञान जगात चर्चेचा विषय बनेल याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आलेही. भारतीय विज्ञानाचे उघडे नागडे दर्शन घडविणारी विज्ञान कॉंग्रेस जगभर चर्चेचा विषय बनली पण हास्यास्पद चर्चेचा ! तथाकथित विज्ञानाच्या अभ्यासकांनी या परिषदेत कल्पनेची जी विमाने उडविली त्यामुळे असे होणे क्रमप्राप्त होते. विज्ञानात कल्पनेला स्थान आहेच. किंबहुना कल्पनेतच विज्ञानाचा उगम आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मात्र ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धी वापरावी लागते. प्रयोगशीलता आणि प्रयोगातून निघणारे निष्कर्ष मान्य करण्याचा विवेक असावा लागतो आणि प्रयोगातून जे सिद्ध झाले ते ठामपणे मांडण्याचे धाडस आणि आत्मविश्वास असावा लागतो. सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करणारे आणि सत्ताधारी जे बोलतात ते खरे आहे हे दाखविण्यासाठी बुद्धी गहाण ठेवून प्रयोग करणारे वैज्ञानिक भ्रम तयार करू शकतात , विज्ञानाचा विकास करू शकत नाहीत. चर्चच्या सत्तेला आणि संकल्पनांना न जुमानता आणि परिणामाची पर्वा न करता आपल्या अभ्यासातून आणि प्रयोगातून सिद्ध झालेले सत्य जगापुढे मांडणारे कोपर्निकस आणि गैलिलिओ सारखे वैज्ञानिकच विज्ञानाला पुढे नेवू शकतात. त्यांनी धर्मग्रंथ प्रामाण्य मानले असते किंवा चर्चचे लांगुलचालन केले असते तर अजूनही पृथ्वी स्थिर असती आणि सूर्य पृथ्वी भोवती फिरत राहिला असता ! जग अनेक शोधांना मुकले असते. मुख्य म्हणजे परग्रहावर खरेखुरे यान पाठविता आले नसते. प्राचीन काळी आमच्याकडे विमाने होती आणि ती फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीच जात नव्हती तर एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जात होती या कल्पनाविश्वात आम्हाला समाधान मानावे लागले असते. हे कल्पना विश्व कोणी चावडीवर रंगविले असते तर त्याला कोणाचा आक्षेप नसता. विज्ञानाच्या व्यासपीठावर या कल्पनेच्या भराऱ्या मारण्यात आल्याने विज्ञानाची अप्रतिष्ठा झाली आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली होती. रामाने ज्या पुष्पक विमानात प्रवास केला ते जगातील पहिले विमान होते असा दावा त्यांनी मागे आपल्या भाषणात केला होता. त्यांचे लांगुलचालन करून त्यांच्या या सिद्ध न होणाऱ्या दाव्याला वैज्ञानिक मुलामा  देण्यासाठीच  या विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन केले असावे असे त्यात पार पडलेल्या कामकाजावरून निघतो. या विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीसारखे कोणतेच वादग्रस्त विधान केले नाही. उलट भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोण रुजविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करून सर्वांनाच धक्का दिला. या परिषदेत मात्र कधीच न उडालेल्या विमानाचे काल्पनिक चित्तथरारक प्रात्याक्षिके दाखवून आयोजकांनी आणि स्वत:ला वैज्ञानिक म्हणवून घेणाऱ्यानी पंडित जवाहरलाल नेहृरुचे वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे सगळे प्रयत्न वाया गेलेत हेच दाखवून दिले.


याच विज्ञान कॉंग्रेसने तथ्यहीन आणि निरर्थक म्हणून प्राचीन विमान शास्त्राचा प्रश्न निकालात काढला होता तोच विषय नव्या सत्ताधाऱ्यांचा विश्वास असल्याने या परिषदेत मांडण्यात आला. कोण्या कॅप्टन बोडस नामक गृहस्थाने विज्ञानाचे सगळे नियम आणि निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला धाब्यावर बसवून प्राचीन काळी भारतात विमानांचे प्रचलन होते आणि ती विमाने आजच्या पेक्षाही अधिक प्रगत होते असा दावा या परिषदेत केला. त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून प्राचीन ग्रंथातील उल्लेख एवढेच काय ते प्रमाण देण्यात आले. या उल्लेखावर आधारित कॅप्टन बोडस सारख्या विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून बेंगरूळ येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी प्राचीन काळी विमान अस्तित्वात होते हा दावा फार पूर्वीच निकालात काढला होता. या ग्रंथातून जे विमान विज्ञान सांगितले आहे त्यात यत्किंचीतही विज्ञान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. विमानाची वजन मापे शास्त्रीय नाहीत. कसे उडेल , कसे संचालित होईल , त्याचे इंधन यावर कोणताच प्रकाश या ग्रंथातील उल्लेखावरून पडत नसल्याचा निष्कर्ष याचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकाच्या पथकांनी काढला होता. प्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी आपल्या लिखाणात प्राचीन विमानावर लिहिताना या केवळ कल्पना होत्या आणि या कल्पना साकारण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक संकल्पनांचे पाठबळ त्यामागे नव्हते हे स्पष्ट केले आहे. या परिषदेत उपस्थित कथित शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी पुरातन ज्ञानाचा या आधीच अभ्यास व्हायला हवा होता असे जे प्रतिपादन केले ते चुकीचे होते. कारण असा अभ्यास आधीच झाला आणि विमानोड्डाणाचे प्रकरण आधीच निकालात काढण्यात आले होते. या विज्ञान कॉंग्रेसमध्ये नव्याने कोणतेही पुरावे न देता शिळ्या कढीला पुन्हा उकळी देण्यात आली इतकेच. जिथपर्यंत विमानोड्डानाची कल्पना आहे ती जशी आपल्याकडील पुराणात आहे तशीच अन्य देशाच्या पुरातन ग्रंथात देखील आहे. कल्पनेचा तीर मारण्यात देखील आम्ही आघाडीवर नव्हतो. जगातील प्रत्येक जुन्या संस्कृतीत अशी कल्पनेची विमाने उडविण्यात आली आहेत. अरेबियन कथांमध्ये चटईवर बसून उड्डाण केल्याच्या कल्पना अनेकांनी आपल्या लहानपणी ऐकल्या आहेत. अगदी आपल्या शेजारच्या चीन मध्ये इसवीस सणाच्या किती तरी शतके आधी विमान बनविल्याचा व ते उडविल्याचे उल्लेख आहेत. पण सगळीकडे सापडणाऱ्या विमानांच्या या कथांना मानवाची उडण्याची आकांक्षा आणि त्यातून त्याने उडण्याची केलेली कल्पना या पलीकडे महत्व देण्यात आले नाही. आपल्याकडे मात्र या कल्पना म्हणजे सत्य असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अगदी प्राचीन काळाचे सोडा , पुरातन ग्रंथातील ज्ञानाच्या आधारे १८९५ साली मुंबईत ज्या तळपदे नावाच्या गृहस्थाने पहिले विमान उडविल्याचा दावा केला जातो त्याचे देखील कोणतेच पुरावे सापडत नाहीत. १९०३ साली राईट बंधूनी यशस्वीरित्या उडविलेल्या पहिल्या शास्त्रीय विमानोड्डाला शह म्हणून तळपदेची कथा रचण्यात आली हे उघड आहे
.

कोणतेही पुरावे नसताना आणि जगात सर्वमान्य अशा पद्धतीने सिद्ध होणे शक्य नसताना पुरातन काळी आमच्या संस्कृत ग्रंथात सगळे ज्ञान खचून भरले होते हा दावा का करण्यात येतो याचे अनेकांना कोडे पडले असेल. या कोड्याचे उत्तर दोन प्रकारे देता येते. जो समाज स्वत:च्या ज्ञानावर आणि विश्वासावर पुढे जाण्यास असमर्थ असतो तो न्युनगंडाने पछाडल्या जातो. वर्तमानात कसलाच पराक्रम दाखविण्याच्या स्थितीत नसलेला समाज मग पुर्वजाचे गोडवे गाण्यात समाधान मानतो. जग आज जे साध्य करीत आहे ते तर आम्ही हजारो वर्षे आधीच साध्य केले होते. आमच्यासाठी त्यात नवीन काहीच नाही असे मानूनआपल्या  अकर्मन्यतेचे उदात्तीकरण करून नसलेले श्रेष्ठत्व मिरविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या श्रेष्ठ संस्कृतीचे गोडवे गाणारे आज असेच भूतकाळात रममाण होवून देशाला भूतकाळात नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला भूतकाळात नेण्याने यांना कोणते सुख लाभणार याच्या उत्तराने मात्र अंगावर काटा उभा राहील असे हे उत्तर आहे. आमच्या संस्कृत ग्रंथात एवढे ज्ञान होते , आम्ही जगापुढे होतो असा दावा करताना अप्रत्यक्षपणे ब्राम्हणी वर्चस्वाचे आणि वर्णव्यवस्थेचे संस्कृत ग्रंथात केलेल्या उदात्तीकरणाचा पुरस्कार करीत असतो. संस्कृतचे महत्व बिंबवून ती सर्वसामान्यावर लादण्याचेही हे षड्यंत्र असू शकते. कदाचित त्याकाळी तशी व्यवस्था होती म्हणून आम्ही ज्ञान विज्ञानात एवढी प्रगती केली हे बिम्बवायचा आणि अन्यायी व्यवस्थेचे ढोल वाजविण्याचा प्रयत्न विज्ञानाच्या भाषेत आणि विज्ञानाच्या व्यासपीठावर होत असल्याने सर्वसामान्यांच्या मनातील गोंधळ वाढणार आहे. म्हणूनच पुरातन संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या या नकली वैज्ञानिकापासून सावधान राहिले पाहिजे.

------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment