Thursday, January 22, 2015

अतिरेक्यांकडून धर्माचे अपहरण

  मध्ययुगीन मूल्यव्यवस्थेशी चिकटून बसण्याची मानसिकता दूर करणारी धर्म सुधारणा चळवळ  मुस्लीम समाजात मूळ धरून बाळसे न पकडू शकल्याने आकडे काहीही सांगत असले तरी जगभरात मुस्लिमधर्मियाप्रती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.     -------------------------------------------------------------


पेशावर येथील शालेय विद्यार्थ्यावर झालेला क्रूर हल्ल्यात निरपराध विद्यार्थ्यांची
  करण्यात आलेली हत्या  आणि आणि फ्रांस मधील 'शार्ली एब्दो' या कार्टून पत्रिकेच्या नियतकालिकावर हल्ला करून संपादकासह पत्रकारांची आणि इतरांची झालेली हत्या यामुळे सारे जग ढवळून निघाले आहे. या दोन्ही घटनांसाठी मुस्लीम आतंकवादी जबाबदार असल्याच्या  परिणामी एकीकडे गैरमुस्लिमात मुस्लीम समाजाबद्दल आणि इस्लाम बद्दल रोष व्यक्त होताना दिसतो आहे , तर दुसरीकडे मुस्लीम समाजात आतंकवादाचा विरोध आणि इस्लाम धर्माची आधुनिक व्याख्या झाली पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे. मुस्लीम समाज आधुनिक दृष्टीकोन आणि आधुनिकता या पासून दूर असल्यामुळे पहिल्या प्रकारच्या प्रतिक्रियेला बळ मिळाले आहे. मुस्लीम समाजाचे आतंकवादाला समर्थन आहे आणि सारे आतंकवादी मुस्लीमच असतात अशा प्रकारची बिनबुडाची धारणा पसरू लागल्याने जग मुस्लीम आणि गैरमुस्लीम अशा धृविकरणाच्या जवळ येण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या मोघम धारणेमुळे मुस्लीम समाजात आतंकवादा विरुद्ध आणि इस्लाम धर्मात सुधारणा याविषयी जे जनमत तयार होवू लागले आहे त्याला अपाय होण्याचा धोका आहे . म्हणूनच सारासार विचार करून विवेकाने प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज आहे.
 



आतंकवादी घटना संबंधी जगभरची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरून असे कोठेही दिसून येत नाही कि सर्वाधिक घटनामध्ये मुस्लीमधर्मीय आतंकवाद्यांचा आहे. हे विधान भारतीयांच्या पचनी पडणे अवघड आहे. याचे कारण भारताच्या मुख्य भूमीवर पाकिस्तान प्रेरित आतंकवादाच्या गंभीर घटना घडल्या आहेत. काश्मीरमध्ये आतंकवादी आणि लष्कर यांचा संघर्ष रोजचाच आहे. त्यामुळे मुस्लीम आतंकवाद भारतासाठी संवेदनशील आणि काळजीचा विषय बनला आहे. भारताच्या मुख्यभूमीवर हिंदू आतंकवादाच्या काही घटना घडल्या आहेत. पण हा आतंकवाद फारच प्राथमिक स्वरूपाचा आणि बराचसा कातडीबचाऊ असल्याने मुस्लीमधर्मीय आतंकवाद्यांनी साधलेली अचूकता, तीव्रता आणि परिणामकारकता त्यांना साधता आली नाही. शिवाय धार्मिक दंगलीकडे कोणी आतंकवादी घटना म्हणून पाहात नसल्याने त्यात हिंदू दोषी आढळले तरी त्यांना आतंकवादी समजले जात नाही. नक्षलवादी हल्ल्यांना देखील आम्ही आतंकवादी हल्ला कधी समजत नाही. हिंदू आतंकवाद्याचा सारा भर आपली कृती मुस्लीम आतंकवाद्याच्या नावावर खपविण्याकडे असल्याने स्वाभाविकच आपल्याकडे सतत मुस्लीम आतंकवादाची चर्चा होते. ईशान्येकडील आणि पूर्वेकडील प्रदेशात काय चालले आहे हे भारताच्या मुख्यभूमीत राहणाऱ्या आमच्यासाठी कधीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय नसतो. तसे असते तर मुस्लिमांपेक्षा वेगळे अनेक आतंकवादी गट आणि संघटना त्या भागात कार्यरत असल्याचे आपल्या लक्षात आले असते. जगभरचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. २०१३ साली युरोपात १५२ आतंकवादी हल्ले झालेत त्यातील धार्मिक कारणांच्या आडून  मुस्लीम अतिरेक्यांनी केलेले हल्ले फक्त दोन आहेत ! बाकी हल्ले हे विभाजनवादी आणि वंशवादी अतिरेक्यांचे होते. अमेरिकेच्या एफ बी आयने त्या देशातील १९८०  ते २००५ या काळातील आतंकवादी हल्ल्यांचा जो अहवाल सादर केला त्यातील ९४ टक्के हल्ले हे मुस्लिमेतर अतिरेक्यांचे होते ! जसे मुस्लीम अतिरेकी आहेत तसेच ख्रिश्चन , यहुदी अतिरेकीही आहेत आणि या अतिरेक्यांनी केलेले हल्ले मुस्लीम अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्या इतकेच क्रूर आहेत. दोन वर्षापूर्वी एका ख्रिस्ती अतिरेक्याने नॉर्वेत केलेला अतिरेकी हल्ला आठवा  या हल्ल्यात ७७ लोकांचे जीव गेले होते. म्यानमार , श्रीलंका यासारख्या देशात बौद्धधर्मीय आतंकवादी आणि त्यांच्या संघटना आहेत आणि त्यांच्याकडून मुस्लिमांवर हल्ले होत राहतात. तेव्हा मुस्लीमांसारखेच इतर धर्मीय आतंकवादी आणि त्यांच्या संघटना जगभर कार्यरत आहेत हे मुस्लीम आतंकवादाकडे बोट दाखविताना लक्षात घेतले पाहिजे.


२०१३ मध्ये किती मुस्लिमांचा आतंकवादी हल्ल्यांना पाठींबा आहे या संबंधीचे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार जवळपास १२ टक्के मुस्लिमांचा मुस्लीम आतंकवादाला पाठींबा असल्याचे आढळून आले. जगभरातील १.६ बिलियन मुस्लीम जनसंख्या लक्षात घेतली तर १२ टक्के मुस्लिमांचे आतंकवादाला समर्थन असणे ही संख्या नक्कीच मोठी आहे. पण ८८ टक्के मुस्लीम विरोधात आहेत हे लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर असेच त्या हल्ल्याला किती मुस्लिमांचे समर्थन आहे याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातही ९० टक्क्याच्यावर मुस्लिमांनी त्या हल्ल्याला विरोध दर्शविला होता. १० टक्क्याच्या आतच समर्थकांची संख्या होती. लक्षात घेण्यासारखी बाब  म्हणजे ९० टक्के मुस्लिमांनी विरोधाचे जे कारण दिले ते धार्मिक होते. आपल्या धर्मात अशा हल्ल्यांना स्थान असू शकत नाही असे त्यांचे म्हणणे होते. ज्या मुस्लिमांनी ९/११ च्या हल्ल्याचे समर्थन केले त्यांची हल्ल्याच्या समर्थनाची कारणे राजकीय होती ! अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतरची आपल्या देशातील गैरमुस्लिमांची 'बरे झाले अमेरिकेचे नाक कापले गेले ते !' अशी व्यापक प्रतिक्रिया होती. मुस्लीम धर्मवादाच्या काठीने साप मारण्याचा म्हणजे विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न पश्चिमी देशांकडून आणि मुस्लीम धर्मराष्ट्राकडून झाल्यानेच जगभरात मुस्लीम आतंकवाद चिंतेचे कारण बनले आहे. मुस्लीम आतंकवादाचे कारण प्रामुख्याने राजकीय आहे आणि इस्लामचे जे स्वरूप आहे त्यामुळे या आतंकवादाला धर्माची ढाल मिळाली आहे. राजकीय सत्तेचे पाठबळ आणि धर्माची ढाल यामुळे मुस्लीम आतंकवाद समस्या बनत चालला आहे. दुसरे जे आतंकवादी आहेत त्यांना राज्यसत्तेचे आणि धर्माचे मुस्लीम आतंकवादाला आहे तसे समर्थन नाही . याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे राज्यसत्ता आणि धर्म याची जी फारकत इतर धर्मियांनी केली , ती मुस्लीम धर्मियांनी केलीच नाही. पूर्वी मुस्लीमांसारखेच ख्रिस्ती , बौद्ध , हिंदू राजे होते . पण नंतर राजा , राज्य सत्ता आणि चर्च वेगळे झाले. हे वेगळेपण आधुनिक समाजात आवश्यक आणि अपरिहार्य होते. म्हणून इतर धर्मियांनी ते स्विकारले. मुस्लीम धर्मियांनी मध्ययुगीन व्यवस्था आजही कायम ठेवली आहे. इतर धर्मानी सुधारणांचा स्विकार केला तसा मुस्लीम धर्मियांनी केला नाही. ७ व्या शतकातील संकल्पना २१ व्या शतकात चालू शकत नाहीत , आजच्या परिस्थिती प्रमाणे इस्लामचा नव्याने अर्थ लावण्याची आणि तो धर्म नव्याने समजून घेण्याच्या गरजेकडे मुस्लीम समाजाने डोळेझाक केली. किंबहुना मुस्लीम राज्यसत्तेने उलेमांच्या मुस्लीम धर्मसत्तेशी संगनमत करून मुस्लीम समाजाचे डोळे उघडणार नाहीत असेच प्रयत्न चालू ठेवले होते. आधुनिक मूल्य , वैज्ञानिक दृष्टीकोन नाकारून मध्ययुगीन मूल्यव्यवस्थेशी चिकटून बसण्याची मानसिकता दूर करणारी धर्म सुधारणा चळवळीने मुस्लीम समाजात मूळ धरून बाळसे न पकडल्याने आकडे काहीही सांगत असले तरी जगभरात मुस्लिमधर्मियाप्रती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लिमात सुधारणावादी चळवळ नसल्याने आज आतंकवादी सांगतात तेच इस्लामिक मूल्य समजल्या जात आहे. मुस्लीम आतंकवाद्यांनी इस्लामचे अपहरण केले आहे.

आम्ही आतंकवादी नाही , आमचा आतंकवादाला पाठींबा नाही असे सांगूनही जगाचा विश्वास बसत नाही याचे कारण इतर धर्माचे बदललेले स्वरूप आणि ७ व्या शतकातील संकल्पनांचे ओझे उराशी बाळगून असलेला इस्लाम यात अंतर पडले आहे. हे अंतर दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधुनिक जगात इस्लाम कसा असेल याचा अर्थ लावण्याचा मुस्लीम जगतातून संघटीत प्रयत्न होण्याची गरज आहे. बदलण्याचा प्रारंभ ७ व्या शतकातील इस्लामी संकल्पना आणि इस्लामी कायदे बदलण्यापासून करावा लागणार आहे. इतर धर्मियांनी हे आधीच केले आहे. भारतात मनुस्मृतीचा 'ईश्वरीय' कायदा हिंदुनी कधीच झुगारून दिला आहे. तसाच विचार शरियत कायद्याबद्दल करावा लागणार आहे. ज्या गोष्टी आता आधुनिक जगात शक्यच नाही त्या स्पष्टपणे नाकारण्यात मुस्लीमजगताचे हित आहे. इस्लाम धर्मात चार बायका करण्याची अनुमती आहे अशी नेहमी चर्चा होत राहते. मुस्लीम धर्मीय चार बायका करतात असा मुस्लिमेतर समाजात मोठा गैरसमज आहे. वास्तविक मुस्लीम समाजातील स्त्री आणि पुरुषाचे प्रमाण, जे इतर धर्मीया प्रमाणेच आहे , व्यवहारात चार बायकासाठी अनुकूल नाही. हजार मुस्लीम पुरुषामागे ९५० मुस्लीम स्त्रिया असतील तर चार बायका येतीलच कुठून ? पण असे समज आहेत आणि ७ व्या शतकातील इस्लामिक संकल्पना नाकारण्याची तयारी आणि हिम्मत मुस्लीम समुदाय दाखवीत नाही तो पर्यंत असे गैरसमज राहणार आहेत. मुलींच्या आणि आधुनिक शिक्षणाच्या विरोधात आतंकवादी कार्यरत आहेत ते धर्मग्रंथाच्या आधारेच ना ? मुलीना आणि एकूणच मुस्लीम समुदायाला आधुनिक शिक्षणा पासून दूर ठेवणे मुस्लीम जगताला परवडणारे आहे का ? मग आधुनिक जगाच्या आवश्यकतेनुसार धर्मग्रंथाचा अर्थ लावायला नको ?  कुराणच काय इतर कोणत्याही धर्मग्रंथांचे सोयीनुसार अर्थ लावल्या जावू शकतात आणि लोक आपल्या कृतीच्या समर्थनार्थ ते लावतात देखील. आता इस्लामात प्रतिमा वर्ज्य आहेत आणि म्हणून अशा प्रतिमा कोणी काढत असेल तर ते इस्लाम विरोधी आहे असे सांगणारे आहेत तसेच महम्मद पैगंबराच्या प्रतिमा असलेली अनेक चित्रे जगभरच्या लायब्ररी आणि म्युझियममध्ये असल्याचे दाखविणारे देखील आहेत. पैगंबराचा अपमान करणाऱ्याला ठार मारणे हा धर्म असल्याचे जसे कुरणाच्या आधारे सांगता येते तसेच कुराणाच्या आधारे हे देखील सांगता येते कि पैगंबराचा आणि ईश्वराचा अपमान करणाऱ्याला ईश्वर पाहून घेईल , माणसाने त्यात पडण्याचे कारण नाही ! प्रत्येक काळात त्या काळानुसार धर्माचा अर्थ लावण्याची एक व्यवस्था प्रत्येक धर्मासाठी आवश्यक आहे. काही प्रमाणात तशी व्यवस्था ख्रिश्चन आणि बौद्धधर्मियांनी निर्माण केली आहे. अशा व्यवस्थेची इस्लामला खूप गरज आहे. अशी व्यवस्था लवकर निर्माण झाली नाही तर आतंकवादी सांगतील ती व्याख्या मान्य करण्याची पाळी पापभिरू मुस्लिमांवर येईल. म्हणूनच इस्लाम धर्मातील सुधारणांसाठी उठू लागलेल्या आवाजात प्रत्येक मुस्लिमाने आपला आवाज मिसळून इस्लामिक सुधारणांसाठी आवाज बुलंद करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लाम धर्मियांसाठी जशी ही गरज आहे , तशीच गरज भारताच्या पातळीवर हिंदूंसाठी निर्माण झाली आहे. हिंदू धर्मात झालेल्या सुधारणा हाणून पाडून हिंदूधर्माला मध्ययुगीन स्वरूप देण्याचा प्रयत्न हिंदू धर्माचे म्हणवून घेणाऱ्या अतिरेक्यांनी चालविला आहे. त्याविरुद्ध हिंदूधर्मियांनी देखील आपला आवाज बुलंद करण्याची गरज आहे. मुस्लीम अतिरेकी जसा इस्लामचा अर्थ लावून मुस्लीम समाजाला आधुनिक बनण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत तसाच प्रयत्न हिंदूमधील अतिरेकी शक्ती देखील करीत आहेत. नव्याने धर्मयुद्धाची परिस्थिती निर्माण होवू द्यायची नसेल तर अतिरेक्यांच्या हाती धर्मसूत्रे जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक धर्मियांनी घेतली पाहिजे.

--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------

2 comments:

  1. उत्तम वैचारिक लेख! मुस्लिमेतर आतंकवादही इतका व्यापक आहे ही गोष्ट या लेखातून प्रथमच ध्यानात आली! एकच वाटते, धर्माचा अर्थ नव्याने लावावा, कालानुरूप धर्माचे स्वरूप बदलावे असे म्हणताना धर्म ही जणू जीवनावश्यक बाब आहे असे मानल्यासारखे वाटते. हा वैचारिकतेचा पराभव नव्हे काय? आपण अश्या समाजाचे स्वप्नही पाहू शकत नाही का की ज्यात धर्मयंत्रणा पूर्णपणे कालबाह्य, नव्हे समाज विरोधी समजली जाईल? जेव्हा न्याय आणि राज्य व्यवस्था अपरिपक्व होत्या अशा काळात कदाचित धर्म हे काम करीत असेल, आज धर्मयंत्रणा एकूण समाजाच्या विचार धारेत आणि प्रगतीत अडसर निर्माण करते, हे कधी लक्षात येईल?

    ReplyDelete
  2. Advocate Raj Kulkarni , osmanabad यांची प्रतिक्रिया (फेसबुक वरून ):
    प्रत्येक नवीन धर्मविचार हा तत्कालीन समाजातील शोषण , अव्यवस्था , अशांतता याच्या विरोधातून येतो . साहजिकच तो प्रतिक्रिया म्हणून आलेला असतो, म्हणूनच तो पीडितांचा उसासा असतो . इस्लाम पूर्व अरब समाजातील हिंसा आणि शोषणाची प्रतिक्रिया म्हणून इस्लामचा उदय झाल्यामुळे ,इस्लाम म्हणजे शांतता , इस्लाम म्हणजे प्रेम , इस्लाम म्हणजे समता , असे इस्लामचे स्वरूप सातव्या शतकात प्रसृत होणे स्वाभाविक आहे . मात्र या सातव्या शतकातील अरबस्तानातील समाजाने मान्य केलेल्या शांततेच्या,सहजीवनाच्या,समतेच्या कल्पना एक विसाव्या शतकातही जगातील सर्व समाजात जशाच्या तशा मान्य व्हाव्या हा मौला मौलवींचा आग्रह समाजशास्त्राला अजिबात धरून नाही.
    इस्लामी राज्यसत्तेची धर्मसत्तेशी फारकत न झाल्यामुळे धर्माचा प्रसार आणि इस्लामी साम्राज्य विस्तार एकत्रित झाल्यामुळे धर्माच्या शिकवणीला लष्करी शिस्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे . त्यामुळे मुस्लिम अनुयायी लष्करी शिस्तीप्रमाणे धर्मविचार अंगिकारताना दिसतात ,हीच बाब गैर इस्लामिक समाजासमोर मुस्लिमांची कट्टरता म्हणून ठळकपणे समोर येते. धर्म विचारांची जडण घडण हे लष्करी असल्यामुळे तिच्यात धार्मिक प्रतीकासाठी कमालीचा अभिमान आहे . धार्मिक प्रतीके , आणि नियम यास विरोध करणे , टीका करणे या बाबत इस्लाम कमालीचा असहनशील आहे. कारण प्रेषित ,कुराण, शरियत ,हदीस यावर टीका करण्याचा अधिकार अनुयायांना किंवा इतरांना असू शकतो ,ही बाब त्याच्या कल्पनेतही नाही.
    या लष्करी शिस्तीमुळे धार्मिक नियमात बदल करणे नाही ,त्यामुळे आज जगात एखाद्या धर्माच्या अनुयायांसाठी व्यावहारिक पातळीवर अजिबात लवचिक नसलेला धर्मविचार कोणता ? असा विषय समोर आला कि इस्लामचे नाव समोर येते. हे पूर्ण सत्य आहे ,असे नव्हे पण जगभर हा समज विकसित झालेला आहे.
    आज सुशिक्षित ख्रिस्ती धर्मियामधून किंवा हिंदू धर्मियामधून ईश्वर संकल्पना नाकारणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. हिंदू आणि ख्रिस्ती समाजात धार्मिकता किंवा कट्टरता नाही असे नाही ,पण त्याला विरोध करणारी सुधारणावादी फळी या समाजात आहे. 'पीके' चित्रपटाच्या विरोधात बोलणारे जेवढे होते त्यापेक्ष्याही जास्त लोक या चित्रपटाला समर्थन देणारे होते. आपल्या धार्मिक मुल्यावरील टीका सहन करण्याची प्रवृत्ती जो पर्यंत समाजात तयार होत नाही ,तोपर्यंत सुधारणांना समाजात वाव मिळणे शक्य नाही. सुधारणा घडविण्यासाठी प्रतीमाभंजन खूप गरजेचे असते , इस्लामपूर्व कालखंडातील धर्मविचार हा मूर्तिपूजक होता ,सुधारणा म्हणून येणाऱ्या धर्म विचारांची पायाभरणी ही मूर्तीभंजन करूनच झाली ,हा इस्लामचा इतिहास मात्र ,पुढे हेच तत्वज्ञान स्वतः मूर्ती होवून बसले ! म्हणून प्रबोधनाबरोबर नव्याने प्रतीमाभंजन होणे देखील आवश्यक असते . तसे असेल तरच इस्लामचे अपहरण अनुयानाना थांबवता येईल .नेहमीप्रमाणेच अतिशय मार्मिक आणि चिंतनपर असा लेख आहे .

    ReplyDelete