निवडणुकीत सत्ता मिळवून देण्याची क्षमता असणे या एकमेव कसोटीवर राजकीय नेतृत्व मान्यता पावत असते. नेमके याच कसोटीवर राहुल गांधी सातत्याने अपयशी ठरत आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकण्या बाबतची साशंकता दर निवडणूक निकाला नंतर वाढीस लागते. नुकत्याच पाच राज्याच्या पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालाने साशंकतेने बेचैनीचे रूप घेतले आहे. पण राहुलचे नेतृत्व नाकारण्याची हिम्मतही कॉंग्रेसजनात नाही आणि कॉंग्रेसचे हेच खरे संकट आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे निकाल केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना बाहेर आले आहेत. अशा स्थितीत या निकालाकडे मोदी सरकारकडे लोक कसे बघत आहेत किंवा मोदी सरकारच्या बाबतीत जनतेचा कौल या अर्थाने निकालाकडे बघणे स्वाभाविक ठरले असते. पण तसे ते बघितले जात नाही. याचे एक कारण तर कॉंग्रेस राजवटी पासून पाहत आलो तेच आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाची राज्य निवडणुकीत सरशी झाली तरच तो केंद्र सरकारवरील जनतेचा कौल ठरत असतो ! पराभव झाला तर त्याची कारणे राज्याशी संबंधित असतात. या निवडणूक निकालाचा संबंध केंद्राच्या कामगिरीशी जोडणे आसाम मधील भाजपच्या विजयाने विरोधकांसाठी अवघड होते तसेच उर्वरित चार राज्यात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने आसाम मधील भाजप विजयाचा संबंध केंद्रातील कामगिरीशी जोडणे केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्याही सोयीचे नव्हते. आसाम वगळता भाजपची कामगिरी निवडणूक झालेल्या इतर राज्यात चांगली होईल हे मोदी आणि शाह या जोडगोळी शिवाय कोणालाच वाटत नव्हते. या दोघांनीही या सर्व राज्यात धूमधडाक्यात प्रचार करून भाजप नवा राजकीय इतिहास आणि भूगोल घडविणार अशी वातावरण निर्मिती केली होती. आसाम मधील विजय ऐतिहासिक ठरल्याने अन्य प्रांतातील भाजपचा भूगोल बिघडला याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. आसामचा विजय मोदी आणि शाह यांच्यासाठी तात्पुरती संजीवनी देणारा ठरला आहे. हा ऐतिहासिक विजय मिळाला नसता तर एकूण पाच राज्यात पुढे आलेल्या निवडणूक निकालावरून मोदी-शाह यांचे मूल्यमापन झाले असते आणि भाजपात या जोडगोळी विरुद्ध मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असती . केरळ , प.बंगाल आणि तामिळनाडू या राज्याबाबत मोदी-शाह यांनी केलेले दावे आणि पक्ष म्हणून भाजपला असलेली अपेक्षा हा निव्वळ निवडणूक जुमला मानला आणि या दाव्यांच्या किंवा अपेक्षेच्या प्रकाशात निवडणूक निकालाकडे पाहिले नाही तरी मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना निवडणूक निकाल बाहेर आले असल्याने लोकसभा निवडणुकीत या राज्यात मोदी आणि भाजपला मिळालेले समर्थन या निवडणुकीत वाढले कि घटले हे पाहणे नक्कीच अनाठायी ठरणार नाही.लोकसभे प्रमाणेच या राज्यांच्या निवडणुकीची प्रचारधुरा प्रधानमंत्री मोदी यांच्याच खांद्यावर असल्याने साहजिकच अशी तुलना करण्याचा मोह कोणालाही होईल.
असा तुलनात्मक विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल कि , २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नुकत्याच निवडणूक झालेल्या राज्यात भाजपला जे समर्थन लाभले होते तेवढे देखील टिकवून ठेवण्यात भाजपला अपयश आले आहे. आसामच्या विजयाला ऐतिहासिक संबोधित जात असले तरी त्या राज्यात देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत प्राप्त समर्थन टिकवून ठेवता आले नाही. आसाम मध्ये ऐतिहासिक विजय मिळवीत असताना भाजपला लोकसभा निवडणुकीत पडलेल्या मतांपेक्षा ६ ते ७ टक्के मते कमी पडली आहेत. प.बंगाल मध्ये डाव्यांची वाताहत झाल्याने त्यांची जागा घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत जितकी टक्के मते मिळाली होती त्यापेक्षा या निवडणुकीत ८ टक्के मते कमी मिळाली आहेत. प.बंगाल मध्ये भाजपला लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या आहेत. तेवढेच यश विधानसभा निवडणुकीत टिकवून ठेवण्यासाठी किमान २४ विधानसभा जागा मिळणे अपेक्षित होते. पण भाजपच्या पदरी बंगाल मध्ये अवघ्या चार जागा पडल्या आहेत. केरळ मध्ये कधी नव्हे ती एक जागा मिळाली आहे पण तिथेही लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपला १ टक्का मते कमी मिळाली आहेत. एकूण निवडणूक झालेल्या ८२२ विधानसभा जागापैकी भाजपच्या पदरी अवघ्या ६५ जागा पडल्या आहेत आणि त्यातील ६० जागा एकट्या आसाम मधील आहेत हे लक्षात घेतले तर भाजपच्या कामगिरीचा अंदाज येतो . या तुलनेत कॉंग्रेसने भाजप पेक्षा दुपटीहून अधिक म्हणजे १३९ जागा मिळविल्या आहेत. तरी देखील या निवडणूक निकालाकडे भाजपचा विजय आणि कॉंग्रेसचा पराभव म्हणून पाहिले जात आहे. कारण उघड आहे. आपल्याकडे राजकीय पक्षाची कामगिरी चांगली की वाईट हे त्याला किती टक्के मते मिळतात यावर ठरत नाही. किती जागा मिळतात आणि त्याहीपेक्षा सत्ता हाती येते की नाही यावर कामगिरी जोखली जाते. आता आसामचेच उदाहरण घ्या ना. जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार मताच्या टक्केवारीत कॉंग्रेसने भाजप वर आघाडी घेतली आहे. तरीही कॉंग्रेसला भाजपच्या जागांच्या तुलनेत फक्त १/३ जागा मिळाल्या आहेत. हा निवडणूक पद्धतीचा दोष आहे आणि याचा बारा-वाईट परिणाम साऱ्याच पक्षांना कधीनाकधी भोगावा लागत असल्याने कॉंग्रेसवर अन्याय झाला असे समजण्याचे कारण नाही. आपल्याकडे निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीला कधीच महत्व नव्हते. त्यामुळे ३१ टक्के मते मिळवून मोदीजी आमच्यावर राज्य करतात अशी खंत बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी ३१ टक्के मते मिळविली असली तरी लोकसभेत जागांचा विचार करता पूर्ण बहुमत मिळविले आहे. तीच गोष्ट आसाम मध्ये घडली आहे. कॉंग्रेस पेक्षा एखादा टक्का कमी मते मिळवूनही कॉंग्रेस पेक्षा २/३ जागा अधिक मिळवून भाजपने सत्ता काबीज केली आहे. तेव्हा निवडणुकीतील पक्षाचा जय-विजय हा त्याला सत्ता मिळते की नाही याच एकमेव निकषावर अवलंबून असतो हे ध्यानी घेतले पाहिजे. आमच्या मताची इतकी टक्केवारी आहे किंवा एकूण ८०० जागांपैकी आम्ही एवढ्या जागा मिळविल्या आहेत या गोष्टी नेतृत्वाला आपली लाज वाचविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सांत्वना देण्यासाठी बोलायच्या असतात. पडले तरी नाक वर एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा असतो. या निवडणुकीत कॉंग्रेसला किती टक्के मते आणि किती जागा मिळाल्या हे महत्वाचे नाही. महत्वाचे आहे ते कॉंग्रेसने दोन राज्यातील आपली सत्ता गमावली आहे आणि भाजपने एका राज्यात सत्ता मिळविली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची हार निर्विवाद आहे आणि भाजपचा विजय स्पष्ट आहे. जुनी सत्ता हातची चालली आणि नव्याने सत्ता मिळविता येत नाही यामुळे कॉंग्रेसजन भांबावले आहेत. राहुल गांधी पक्षाला सत्ता आणि वैभव मिळवून देवू शकतील हा कॉंग्रेसजनांचा विश्वास प्रत्येक निवडणुकीतून क्षीण होत चालला आहे. प्रियंका गांधी कडे सूत्रे देण्याची मागणी दबक्या आवाजात होवू लागली आहे.
आपल्याकडे राजकीय नेतृत्वाची योग्यता तपासण्याची फार सुटसुटीत कसोटी आहे. जनतेप्रती निष्ठा , समपर्ण , जन संघर्षात सहभाग वगैरे कसोट्या नसतात. निवडणुकीत मते आणि पर्यायाने सत्ता मिळवून देण्याच्या क्षमतेवर नेतृत्वाची योग्यता ठरत असते. या कसोटीवर राहुल गांधी खरे उतरलेले नाहीत. त्यामुळे राहुल कसा विचार करतात , कसे काम करतात याच्या खोलात जावून उपयोग नाही. विचारधारेच्या विश्वसनीयते पेक्षा व्यक्तीची विश्वसनीयता राजकारणात महत्वाची ठरत आली आहे. आसामातील विजयावर भाष्य करतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेने भाजपची विचारधारा स्वीकारल्याचे विधान केले आहे. ते विधान खरे मानले तर इतर ४ राज्यात भाजपची विचारधारा लोकांनी नाकारली असा अर्थ होईल. नुकत्याच झालेल्या ५ राज्याच्या निवडणुकीने कोणती गोष्ट ठळकपणे पुढे आली असेल तर ती ही आहे की मत देताना लोक विचारधारेचा नाही तर नेतृत्वाच्या विश्वसनीयतेचा विचार करतात. जयललिता किंवा ममता यांची अशी कोणती विचारधारा आहे की त्यांना एवढी भरभरून मते मिळवीत. आसामचा भाजप विजय बऱ्याच अंशी त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलेल्या उमेदवाराचा विजय मानला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकीतील विजय हा भाजपचा नाही तर मोदींचा मानला गेला. त्यामुळे भारतात निवडणुकीच्या राजकारणात नेतृत्वाची विश्वसनीयता हीच महत्वाची ठरत आली आहे. या विश्वसनीयतेच्या कसोटीवर राहुल गांधी आजवर अपयशी ठरत आले आहेत. राहुलच्या अवगुणांची चर्चा होते याला कारण निवडणुकीतील राजकीय अपयश आहे. नेतृत्वाचे गुण-अवगुण देखील राजकीय यशापयशावर अवलंबून असते ! राहुल गांधी गुणी ठरायचे असतील तर त्यांना एखाद्या राज्याची तरी निवडणूक जिंकून दाखवावी लागेल. तसे व्हायचे असेल तर त्यांना कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करता आले पाहिजे. पण ती क्षमता त्यांच्यात नसून प्रियंका गांधीत आहे असे सर्वसाधारण कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. मात्र राहुल नको , प्रियंका हवी असे म्हणण्याची कॉंग्रेस मध्ये कोणाची हिम्मत नाही. हाच खरा पेच आणि हेच खरे कॉंग्रेसचे संकट आहे. प्रियंकाला मदतीला बोलावून राहुल गांधीच कॉंग्रेसची आणि स्वत:ची या संकटातून सुटका करू शकतात.
--------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment