Thursday, July 13, 2017

काश्मिरीयत वर हल्ला

 आतापर्यंतच्या संघर्षात काश्मिरी मुसलमानांची सर्वात मोठी घोडचूक कोणती केली असेल तर ती काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्यापासून न रोखण्याची होती . यात मधे पडलो तर आतंकवादी आपल्याला मारतील ही जशी भीती होती तशीच काश्मिरी पंडित इथे सुरक्षित नसल्याने त्यांनी सध्यातरी इथून जाणे इष्ट अशी भावनाही होती. पण काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडावे लागणे हा काश्मिरियतचा पराभव होता.  काश्मिरियतचा प्रभाव ओसरण्याचा प्रारंभ इथून झाला.
---------------------------------------------------------------------------



अमरनाथ यात्रेतील तीर्थयात्रीवर झालेला आतंकवादी हल्ला हा काश्मिरियतवर झालेला हल्ला असल्याचे प्रधानमंत्री मोदी , गृहमंत्री राजनाथसिंग , जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि जम्मू-काश्मिरातील विरोधीपक्ष नेते ओमर अब्दुल्ला यांनी एकमुखाने व्यक्त केलेल्या मतावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रत्येक गोष्ट हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी बघण्यास चटावलेल्या लोकांना - विशेषत: संघ परिवारातील कट्टरपंथीयांना - ही प्रतिक्रिया मानवणारी नव्हतीच. प्रधानमंत्र्या विरुद्ध उघडपणे बोलण्याची हिम्मत नसल्याने यापैकी अनेकांनी आपली मळमळ गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या 'काश्मिरीयत' संबंधी वक्तव्यावर व्यक्त केली आणि राजनाथसिंह यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहात स्वपक्षीय टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले . गेल्या तीन वर्षात मोदी सरकारातील एखाद्या मंत्र्याने एखाद्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावी किंवा ठाम मत व्यक्त करावे हा पहिलाच प्रसंग आहे. गेल्या तीन वर्षातील मोदी सरकारची काश्मीरमधील वाटचाल 'काश्मिरीयत' संपविण्याकडे असल्याने यात्रेकरूवर झालेल्या हल्ल्याच्या दुर्दैवी आणि धिक्कारार्ह प्रसंगी अशी प्रतिक्रिया व्यक्त होणे याला विशेष महत्व आहे. ही प्रतिक्रिया फक्त सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त झाली असती तर याकडे राजकीय प्रतिक्रिया म्हणून फारसी कोणी दखल घेतली नसती. पण समस्त काश्मीरवासियांनी आपल्या कृतीतून आणि वक्तव्यातून या दुर्दैवी हल्ल्याची निंदा करून झाल्या प्रकाराबद्दल आपली असहमती आणि नाराजी व्यक्त केल्याने राजकीय नेत्यांच्या वक्तव्याला बळ मिळाले आहे. गेल्या दोन वर्षातील घटनाक्रमाने 'काश्मिरीयत' काळाच्या पडद्याआड तर गेली नाही ना अशी शंका वाटण्यासारखी परिस्थिती होती. पाप-पुण्याच्या भाषेत बोलायचे तर यात्रेकरूंवरील आतंकवाद्याच्या क्रूर हल्ल्याने 'काश्मिरीयत'चे पुन्हा दर्शन होणे हा यात्रेकरूंच्या पुण्याचा प्रताप मानता येईल . निधर्मी भाषेत बोलायचे तर यात्रेकरूंचे बलिदान ज्या दिशेने काश्मीर चालला आहे ती दिशा बदलण्यास प्रेरक ठरू शकते.


काश्मिरी जनतेने पाकिस्तान ऐवजी भारता सोबत राहण्याचा करार केला तेव्हापासूनच त्या कराराच्या अंमलबजावणीसाठी काश्मिरी जनतेचा संघर्ष सुरु झाला होता. ज्या शेख अब्दुल्लाच्या पुढाकाराने काश्मीर संबंधी करार झाला त्या अब्दुल्लांना नेहरूंनी लगेच तुरुंगात टाकले होते हे लक्षात घेतले तर हा संघर्ष किती जुना आहे याची कल्पना येईल. नेहरूंपासून सर्वच प्रधानमंत्र्यांनी काश्मीर सोबत झालेला करार म्हणजे काश्मीरचे भारता सोबतचे विलीनीकरण आहे अशी भ्रामक समजूत देशातील जनतेची करून दिली आणि एवढेच नाही तर  विलीनीकरण व्हावे यासाठी त्या कराराची पायमल्ली नेहरूंपासूनच सुरु झाली होती आणि त्यातून तेव्हापासूनच काश्मीरचा संघर्ष सुरु झाला होता. आज काश्मीर मधील नागरिक आणि उर्वरित भारतामधील नागरिक यांच्यातील टोकाच्या अंतराला राज्यकर्त्यांनी काश्मीर करारा बाबत देशाची केलेली दिशाभूल कारणीभूत आहे. नेहरू काळापासून सुरु असलेला काश्मिरी जनतेचा संघर्ष आपल्या हक्कासाठी आहे हे सर्वसामान्य भारतीयांच्या लक्षात न येण्याचे कारण ही दिशाभूल होती . त्यामुळे या संघर्षाकडे जनतेने नेहमीच फुटीरतावादी संघर्ष म्हणून पाहिले आणि प्रारंभापासूनच काश्मीरवर डोळा असलेल्या पाकिस्तानने या परिस्थितीचा पुरेपूर फायदा करून घेतला. भारतीय जनतेला काश्मीर कराराचे सत्य उलगडून सांगितले असते तर काश्मीरी जनतेच्या संघर्षाबाबत आणि मागण्यांबाबत निश्चितच भारतीय जनतेला सहानुभूती वाटली असती आणि या संघर्षाने फुटीरतावादाचे वळण घेतले नसते. कारण त्या परिस्थितीत पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला फारसा वाव राहिला नसता. काश्मिरी जनतेला पाकिस्तान बद्दल प्रेम आणि आकर्षण असते तर १९४७ साली काश्मीरला पाकिस्तानात सामील होण्यापासून रोखताच आले नसते. देशांतर्गत असलेल्या विविध राज्यांच्या भारत किंवा पाकिस्तान सोबत जाण्यासाठी नियमांची जी चौकट तयार करण्यात आली होती त्यात काश्मीर पाकिस्तानात असणे अपेक्षित होते. पण ज्या धर्मांधतेच्या आधारे पाकिस्तान निर्माण झाला त्या धर्मांधतेत पाकिस्तान सोबत वाहून जाणे काश्मिरी जनतेला मान्य नव्हते. भारताला वाटले म्हणून आपल्या बळावर भारताने काश्मीर आपल्याकडे ठेवले नाही. धार्मिक पाकिस्तानपेक्षा धर्मनिरपेक्ष , सर्व धर्माचा आदर करणारा भारत चांगला असे वाटल्याने काश्मिरी जनता आपले वेगळेपण टिकविण्याच्या अटीवर भारता सोबत राहण्यास तयार झाली तेव्हाच भारताने सैनिकी हस्तक्षेप करून काश्मीरला पाकिस्तानपासून वाचविले. वर ज्या काश्मिरीयतचा उल्लेख केला ती नेमकी काय हा प्रश्न अनेकांना - विशेषत: नव्या पिढीला पडला असेल त्या प्रश्नाचे उत्तर इथे सापडेल. पाकिस्तानात गेलो तर काश्मिरी म्हणून आपले वेगळेपण राहणार नाही असे वाटणे ही काश्मिरीयत. हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकत नाहीत म्हणत जीनांनी वेगळा पाकिस्तान घेतला हेच बहुसंख्य काश्मिरी जनतेला मान्य नव्हते. कारण काश्मीरवर सुफी संस्कृतीचा अधिक प्रभाव होता आणि हिंदूंसोबत राहण्यात त्यांना काहीच अडचण नव्हती. काश्मिरी जनतेला पाकिस्तानात जाण्यात रस नव्हता तसे भारतात पूर्णपणे विलीनही व्हायचे नव्हते. विलीन न होता समानतेच्या आधारे भारतासोबत राहून काश्मिरीयत जोपासण्याचा तेथील जनतेचा इरादा होता. हिंदू-मुस्लीम सौहार्द आणि सहयोग ही काश्मिरीयत आणि या काश्मिरीयतचे प्रतिक म्हणूनच काश्मिरी जनता अमरनाथ यात्रेकडे पाहते. त्याचमुळे या यात्रेतील यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा तिथल्या जनतेला काश्मिरीयत वर झालेला हल्ला वाटला आणि या हल्ल्याचा जितका निषेध उर्वरित देशात झाला तितकाच काश्मीर मध्येही झाला. विसरत चाललेल्या काश्मिरीयतची काश्मिरी जनतेला आठवण होणे ही सकारात्मक आणि आश्वासक घटना आहे.


काश्मिरीयत वरचा झालेला हल्ला हा पहिला हल्ला नाही. साधारणपणे १९९० पर्यंत काश्मीरचा संघर्ष सुरु असला तरी काश्मिरीयत मरणपंथाला लागली नव्हती. ती मरणपंथाला लावण्याचे श्रेय जाते पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाला. काश्मीर पाकिस्तानात सामील न होण्यामागे काश्मिरीयत हाच मोठा अडथळा ठरला होता आणि त्यामुळे काश्मिरीयत वरील पाकिस्तानचा हल्ला समजण्यासारखा होता. १९८९-९० मध्ये भाजप समर्थित प्रधानमंत्री व्हि.पी. सिंग यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाच्या आग्रहाखातर पुनर्नियुक्त करण्यात आलेले राज्यपाल जगमोहन सिंग यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्याच्या प्रतिक्रियेतून काश्मिरी मुसलमानांनी पहिल्यांदाच हिंदू पंडितांची साथ सोडली आणि हा काश्मिरीयत वरचा सर्वात मोठा हल्ला ठरला. त्यावेळी काश्मिरी मुसलमानांनी पाक आतंकवाद्यांची साथ दिली नाही हे खरे पण पाक आतंकवादी काश्मिरी पंडितांना हुसकावून लावण्याचा , ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा त्यांनी काश्मिरी पंडितांची साथ दिली नाही. आतंकवादी आणि काश्मिरी पंडित यांच्यामध्ये ते उभे राहिले नाहीत. आतापर्यंतच्या संघर्षात काश्मिरी मुसलमानांनी सर्वात मोठी घोडचूक कोणती केली असेल तर ती काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्यापासून न रोखण्याची केली. यात मधे पडलो तर आतंकवादी आपल्याला मारतील ही जशी भीती होती तशीच काश्मिरी पंडित इथे सुरक्षित नसल्याने त्यांनी सध्यातरी इथून जाणे इष्ट अशी भावनाही होती. पण काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडावे लागणे हा काश्मिरियतचा पराभव होता.  काश्मिरियतचा प्रभाव ओसरण्याचा प्रारंभ इथून झाला. काश्मिरी लोकांचा संघर्ष काश्मिरी राहण्या ऐवजी उर्वरित देशवासीयांच्या नजरेत  मुसलमानांचा संघर्ष बनला. मात्र काश्मिरीयत नष्ट झाली असे समजण्याची चूक कोणी करू नये. कारण काश्मिरीयतचा जीव अमरनाथ यात्रेत अडकला आहे. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मुख्य उद्देश्य हिंदू यात्रेकरूंचा जीव घेणे हा नसून अमरनाथ यात्रेत अडकलेल्या काश्मिरीयतचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच हा हल्ला उर्वरित भारतीया इतकाच काश्मिरी भारतीयांना जीवघेणा वाटला. १९९० नंतर काश्मिरीयत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न अमरनाथ यात्रेच्या माध्यमातून होत आला आहे. १९९३ मध्ये पाकिस्तानातील एका दहशतवादि गटाने बाबरी मशीद पाडली म्हणून अमरनाथ यात्रा न होवू देण्याची धमकी दिली होती. तेव्हाही काश्मिरी जनतेने या धमकीचा विरोध करून अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडण्यास मदत केली होती. १९९० नंतर अमरनाथ यात्रा सतत आतंकवाद्यांच्या निशाण्यावर राहात आली आहे. वाजपेयी काळात यात्रेकरूंवर हल्ला करण्यात त्यांना यश आले होते आणि या हल्ल्यापेक्षा तो हल्ला मोठा होता. २००० साली यात्रेकरूंच्या तळावर झालेल्या हल्ल्यात एकूण २५ लोक ठार झाले होते ज्यात स्थानिक नागरिक आणि १७ यात्रेकरू यांचा समावेश होता. आजच्या सारखाच त्यावेळीही स्थानिकांकडून या हल्याचा विरोध झाला होता. या घटनेचा काश्मिरी लोकांवर राग काढण्याचा कोणताही प्रयत्न प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी केला नाही. आपल्या इतकेच काश्मिरी जनतेला या घटनेचे दु:ख झाल्याचे त्यांना मनोमन पटले होते. नंतरच्या काश्मीर दौऱ्यात अटलबिहारींनी काश्मिरीयतचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. काश्मिरी जनतेवर अन्याय झाला याची जाहीर कबुली देणारे पहिले प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी हेच आहेत. त्यांच्या या कबुलीने काश्मीरमधील वातावरण बरेच निवळले होते. वाजपेयींनी केलेला काश्मिरीयतचा गौरव काश्मिरीयत जिवंत ठेवण्यात आणि २००० ते २०१७ या दरम्यान अमरनाथ यात्रा सुरळीत चालू राहण्यात सहाय्यभूत ठरली हे नाकारता येणार  नाही. निवडून आल्या नंतर सध्याचे प्रधानमंत्री मोदी पहिल्यांदा जेव्हा काश्मीर दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी तेथील जनतेला वाजपेयींनी केलेल्या काश्मिरीयतच्या गौरवाचे स्मरण करून देत वाजपेयींची काश्मीर नीती पुढे चालवत काश्मीर प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली होती.


दिल्लीत परतल्या नंतर मात्र मोदींचे काश्मीर विषयक धोरण वाजपेयींच्या धोरणाशी सुसंगत न राहता संघ परिवाराची काश्मीर नीती अंमलात आणण्याचे राहिले आहे. आणि संघ परिवाराचे काश्मीर धोरण काय आहे हे समजण्यासाठी कुठली पुस्तके , वर्तमानपत्रे वाचण्याची गरज नाही की संघ नेत्यांची भाषणे ऐकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आसपासच्या कोणत्याही संघ-बीजेपीच्या कट्टर कार्यकर्त्याला विचारा तुम्हाला संघाच्या काश्मीर नीतीचा खुलासा होईल. .xxxxx ना गोळ्या घालून मारले पाहिजे असेच ते सांगतील. जे वाजपेयी प्रमाणे काश्मीरी जनतेवर अन्याय झाला असे म्हणत असतील , काश्मिरीयतचा गौरव करीत असतील त्यांनाही गोळ्या घाला किंवा पाकिस्तानात पाठवून द्या असे सांगतील. खालचे कार्यकर्ते तोंडाने बोलतात आणि वरचे नेते तोंडाने न बोलता सत्ता वापरून कृती करतात. काश्मीर प्रश्न आजच चिघळला असे नाही. अगदी मनमोहन काळात अनेकदा टोकाचे तणाव निर्माण झालेत. पण हे तणाव वाढत न राहता काही महिन्यात निवळले. निवळण्यासाठी सरकारने पुढाकार घेवून प्रयत्न केलेत. आता मात्र सरकार तसा कोणताच प्रयत्न करताना दिसत नाही . याचे एक कारण वर सांगितलेली संघ कार्यकर्त्यांची मनोभूमिका तीच राज्यकर्त्यांची मनोभूमिका असणे हे आहे. पण राज्यकर्त्यांसाठी याही पेक्षा दुसरे कारण महत्वाचे आहे. हे कारण जनतेने समजून घेतले पाहिजे. कारण ते त्यांच्याशी संबंधित आहे. काश्मीर मध्ये बळ वापरण्याचा पहिल्यांदाच प्रयोग होतो असे नाही. काश्मिरात जितके लोक मोदी काळात बळ वापरल्याने मेलेत त्यापेक्षा कमी लोक मनमोहन काळात मेले नाहीत. पण एक महत्वाचा फरक या दोन राजवटीत आहे. काश्मिरात बळ वापरण्याचा राजकीय फायदा यापूर्वी कधीच कोणत्या सरकारांना झाला नाही किंवा तसा फायदा घेण्याचा प्रयत्न वाजपेयी सहित दुसऱ्या कोणत्याही सरकारने केला नाही. तेव्हाही काश्मिरातून जवानांचे मृतदेह गावी यायचे. असे मृतदेह येणे ही त्यावेळी त्या त्या सरकारची कमजोरी वाटायची . त्याचा राजकीय तोटा त्या त्या सरकारांना झाला. वाजपेयींना जास्त झाला. पण आज काश्मिरातून आपल्या जवानांचे असे मृतदेह येणे ही कमजोर नाही तर खंबीर सरकारची निशाणी समजल्या जात आहे. आपले जवान मारल्या जात आहे याचा लोकांना राग येतो पण सरकारचा नाही येत. उलट जवानांचे असे मृतदेह सरकारचा पाठींबा वाढवीत आहेत. असे होणार असेल तर कोणत्याही सरकारला काश्मिरातील संघर्ष संपावा असे वाटणारच नाही. काश्मीर प्रश्न वाढत्या क्रमाने चिघळत आहे त्याचे कारण काश्मीरच्या चिघळलेल्या परिस्थितीचा राजकीय फायदा देशात सर्वत्र सत्ताधारी भाजपला मिळत आहे. काश्मिरीयतवर विश्वास ठेवणारी काश्मीरमधील पिढी आज हतबल आहे. कारण पूर्वी देशातील जनतेचे जे नैतिक समर्थन व सहानुभूती त्यांच्या संघर्षात देशातील जनतेकडून मिळायचे ते मिळणे मोदी काळात बंद झाले आहे. कारण काश्मिरी जनता या देशाची नागरिक आहे असे जो कोणी म्हणेल तो देशद्रोही ठरविला जात आहे. १९९० नंतर जन्मलेली काश्मिरातील पिढीला काश्मिरीयतची जुन्या पिढी इतकी आस राहिली नाही. हातात दगड घेणारी हीच पिढी आहे. त्यामुळे काश्मिरीयत जास्त धोक्यात आली आहे. काश्मिरीयतची जागा आतंकवादाने घ्यावी हा पाकिस्तानचा अनेक वर्षाचा प्रयत्न आज यशस्वी होताना दिसतो याचे कारण तसेच व्हावे ही मोदी सरकारची इच्छा आहे. लष्कर प्रमुख मुत्सद्दी किंवा राजकारणी नसतात. त्यामुळे लष्कर प्रमुखाच्या तोंडून मोदी सरकारची ती इच्छा प्रकट झाली. काश्मिरी युवकांच्या हातून दगड काढून पुस्तके देण्या ऐवजी त्यांनी बंदुका हातात घेवून आपल्याशी लढावे असे कोणत्याही लष्कराला वाटणार नाही. दैदिप्यमान परंपरा असलेल्या भारतीय लष्कराला तर अजिबातच नाही. काश्मीर संबंधी वरच्या पातळीवर जी चर्चा होत असेल ती लष्कर प्रमुखाकडून अनवधानाने उघड झाली इतकेच. दुसऱ्या मुलाखतीत लष्कर प्रमुखांनी सारवासारव करून आपल्याला असे काही म्हणायचे नव्हते हे स्पष्ट करून ती लष्कराची नाही तर मोदी सरकारची इच्छा असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. काश्मीर धगधगता ठेवण्यात आज मोदी सरकारला राजकीय फायदा मिळत असला तरी पुढे इसीस सारख्या खतरनाक संघटनांचा अड्डा बनण्याचा धोका आहे. म्हणूनच काश्मिरी युवकांना हाती बंदूक घेण्यासाठी उकसावण्यापेक्षा काश्मिरियतला बढावा देणे देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतता नांदण्यासाठी आवश्यक आहे. अमरनाथ यात्रे वरील हल्ल्याच्या निमित्ताने सुप्तावस्थेतील काश्मिरीयत जागी होत आहे त्याचा उपयोग सरकार आणि काश्मिरीयतचे महत्व जाणणारे काश्मिरी लोकांनी करून घेतला पाहिजे. काश्मिरी पंडित काश्मीरच्या बाहेर पडण्याच्या प्रसंगापासून धोक्यात आलेली काश्मिरीयत पुन्हा प्रभावी करण्याची आणि तेथील तरुणांना ते ज्या रस्त्यावर चालत आहेत त्यापासून परावृत्त करण्याची ही संधी तेथील जनतेने वाया जावू देता कामा नये. तिथल्या भरकटलेल्या तरुण पिढीला योग्य मार्गावर आणण्याची हीच वेळ आणि संधी आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. सर काश्मिर चे चलन कोणते ? ते भारतीय आहेत की नाही ? जर ते आपले चलन वापरत असतील तर ते काश्मिरी का भारतीय का नाहीत ? जर काश्मिर भारताचा भाग नाही तर ईथले राजकीय पक्ष तेथे निवडणुका का लढवितात ? ३७० कलम पतप्रधान नेहरूंनी घातले नसते तर परिस्थिती काय राहिली असती असे अनेक प्रश्न तुमचा लेख वाचल्यानंतर माझ्या समोर उभा राहतो आम्ही जसे वैदर्भीय असुनही प्रथम भारतीय आहोत तसे काश्मिरी जनतेने स्वतःला गृहीत धरून वाटचाल केली तर काश्मीरींचा प्रश्न का सुटणार नाही अशा विविध प्रश्नांची उत्तरे कुठे मिळतील?

    ReplyDelete