Thursday, April 20, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५२

भारताने बांगलादेश निर्मितीत महत्वाची भूमिका निभावली. बांगलादेश निर्मितीने पाकिस्तानच्या निर्मितीचा धर्म हा आधारच कोसळला. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी व विविध धर्माचे लोक एकत्र नांदू शकत नाहीत हे सिद्ध करण्यासाठी काश्मीरघाटीतून पंडितांना पळवून लावण्याची योजना पाकिस्तानने तयार करून तडीला नेली.
-----------------------------------------------------------------------------------------------

निवृत्त लष्कर प्रमुख जनरल वीज यांच्या म्हणण्या प्रमाणे भारताने पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान वेगळे करून बांगलादेशच्या निर्मितीत मोठा हातभार लावला होता त्याचा सूड घेण्यासाठी पंडितांना बाहेर काढून काश्मीरचे इस्लामी राज्य बनवायचे होते. भारताने बांगलादेश वेगळा करून धर्माधारित राष्ट्राची संकल्पना फोल असल्याचे दाखवून दिले होते. त्याला उत्तर म्हणून हिंदू-मुस्लीम एकत्र नांदू शकत नाही हे दाखवून देण्यासाठी पाकिस्तानने पंडितांना बाहेर काढण्याची योजना आखून यशस्वी केली. काश्मीरघाटीतून सर्व पंडितांना बाहेर घालवून नवे इस्लामीराज्य निर्माण केले या अर्थाने पाकिस्तान यशस्वी झाले नाही. पण हिंदू-मुसलमान एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाही ही कल्पना भारतीयांच्या गळी उतरविण्यात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात यश मिळविले. हिंदू-मुसलमान एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाही असा मानणारा एक समूह भारतातही होता आणि आहे. पाकिस्तानच्या पंडितांना काश्मीरघाटीच्या बाहेर काढण्याच्या खेळीने भारताच्या या संघटीत समूहाच्या हाती आयते कोलीत दिले. हे कोलित त्यांनीही आपला हेतू साध्य करण्यासाठी पुरेपूर वापरले. पंडीत समुदायावरील अत्याचाराच्या अतिरंजित कथा प्रसृत करून भारतीय जनमानस काश्मिरी मुसलमानांबद्दल कलुषित केले. बाहेर पडावे लागलेले पंडितांचे कुटुंब , त्यांच्या निर्वासितासारख्या वस्त्या किंवा छावण्या हिंदू - मुस्लिमात तेढ आणि द्वेष निर्माण करण्यासाठी वापरण्यात आल्या. आपत्तीत सापडलेल्या कुटुंबाचा राजकीय वापर झाला आणि आजही होतो आहे. इतक्या वर्षाच्या वनवासानंतरही पंडितांना न्याय मिळत नाही  न्याय मिळायचा असेल तर पाकिस्तानने हे सगळे का घडवून आणले आणि कसे घडवून आणले हे समजून घ्यावे लागेल.

काश्मीरमध्ये पंडितांवर अत्याचार झाले नाहीत का ? झालेत आणि त्याचे स्वरूप भीषण म्हणता येईल असेच होते. पण या घटना व्यक्तिगत स्तरावर घडत होत्या.  एका समूहाने दुसऱ्या समूहावर सामुहिक अत्याचार केले असे घडले नाही. कोणाला कधी मारायचे याचे नियोजन दहशतवादी नेतृत्वाकडून होत होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दहशतवाद्यांना मिळत होते. आणि हे क्रूरकर्मा दहशतवादी त्याची कठोरपणे अंमलबजावणी करत होते. एकावेळी एका पेक्षा अधिक लोक मारले गेलेत ते एकतर सुरक्षादलाचे होते किंवा सरकारी कर्मचारी होते. परंतु घरात घुसून जेव्हा दहशतवादी हत्या करायचे ती ज्याची हत्या करायचा आदेश असायचा त्याचीच करायचे किंवा त्याला एकट्याला उचलून दुसरीकडे नेवून त्याची क्रूरपणे हत्या करायचे. यामागे एक सूत्र होते. एकाला मारले की हजार लोक जीवाच्या भीतीने पलायन करतील. आणि तसेच झाले. ठराविक ठिकाणी ठराविक अंतराने पंडिताची हत्या करायची हे तंत्र अवलंबून दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करून हजारो पंडीत कुटुंबियांना काश्मीरघाटी बाहेर पलायन करायला भाग पाडले. लष्कराने जेव्हा आतंकवाद्यांची नाकेबंदी केली आणि लष्कराचा मुकाबला करणे अशक्य बनले तेव्हा लष्कराला आव्हान देण्याचा प्रयत्न म्हणून अनेक गांवातून सामुहिक हत्याकांडही केले व अनेक गांवात पंडितांच्या घरांचीही जाळपोळ केली. पण सुरुवातीच्या काळात एकाला मारून हजाराला पळवून लावायचे हेच धोरण होते. जमावाच्या हल्ल्यात काश्मिरी पंडीत मारल्या गेले नाहीत किंवा जमावाने काश्मिरी पंडितांच्या घरावर हल्ले केलेले नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. १९४७ नंतरच्या इतिहासात असे जमावाचे हल्ले दोनदा झाले. बाबरी मस्जीद पाडण्यात आल्या नंतर अनंतनाग जिल्ह्यात काही ठिकाणी पंडितांच्या घरावर आणि मंदिरांवर हल्ले झाले होते. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असलेले मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी ते हल्ले घडवून आणल्याचा तेव्हा आरोप झाला होता. दुसरा हल्ल्याचा प्रकार १९८८-८९ मध्ये आतंकवाद बोकाळायला सुरुवात झाली तेव्हा घडला. अशीच कुठली तरी संघटना छत्री सारखी उभी राहिली आणि त्या संघटनेने दारू दुकाने व सिनेमागृहे बंद करण्याचा फतवा जारी केला. ही बहुतांश प्रतिष्ठाने पंडीत समुदायाच्या मालकीची होती आणि त्यावेळी या प्रतिष्ठानाची जाळपोळ झाली होती. पंडितांच्या विरोधात जमावाची हिंसा १९९० मध्ये जेव्हा पंडीत समुदायाने घाटी सोडायला सुरुवात केली त्यावेळी झाली नाही. 

१९९० च्या घटनेला धरून  लाखो पंडितांना घाटी सोडावी लागली, हजारो मारल्या गेलेत , जाळपोळ झाली, लुटालूट झाली अशा प्रकारचा प्रचार काहीसा अतिरंजित आहे. यातली प्रत्येक गोष्ट घडली पण ज्या प्रमाणात आणि ज्यावेळी घडल्याचे सांगितले जाते ते खरे नाही. उदाहरणार्थ, लाखो पंडितांना काश्मीर सोडावे लागले या म्हणण्यातून  ५-१० लाख पंडीत समुदायाला घाटी सोडावी लागली असे ध्वनित होते. १९८८ नंतर दहशतवादी कारवाया वाढल्या . त्याआधी काश्मिरात १९८१ ची जनगणना सुरळीत पार पडली होती. या जनगणनेनुसार काश्मीर विभागातील  (जम्मू व लडाख वगळून ) हिंदूंची लोकसंख्या सव्वा लाख होती आणि या सव्वालाखात पंडीत समुदायासह डोग्रा व इतर हिंदूंचा समुदाय सामील आहे. एका दशकात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेतली तरी पंडीत समुदाय दीड लाखाच्या पलीकडे जात नाही. पंडितांचे काश्मीरमधून बाहेर पडणे हे एकदोन दिवसात किंवा एकदोन आठवड्यात घडलेले नाही. पूर्ण दशकभर बाहेर पडणे सुरु होते. दशकभरात एक ते सव्वालाख पंडितांना काश्मीर बाहेर पडावे लागले हे सत्य आहे. जेव्हा अतिशय भीतीदायक वातावरण होते (१९ जानेवारी १९९० नंतरचे काही महिने) तेव्हा सगळे पंडीत बाहेर पडलेले नाहीत. निम्मे पंडीत कुटुंब १९९०च्य वर्षभरात बाहेर पडले असे आकडे सांगतात. त्या भीतीदायक वातावरणात पोलीस आणि सुरक्षादलाची मदत मिळण्याची शक्यता दिसत नसताना अनेक पंडीत कुटुंब १९९० मध्ये आणि त्यानंतरही थांबले ते कोणाच्या भरवशावर हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे. १९९० मध्ये राज्यपालपदी जगमोहन यांची नियुक्ती झाल्यानंतर घडलेल्या घटनांनी मुस्लीम समुदाय संतप्त होवून रस्त्यावर उतरला होता. या क्षुब्ध समुदायाच्या घोषणा पंडिताचे घर दिसले की वाढत होत्या. हा समुदाय घरावर चालून आला तर काय होईल या भीतीने गर्भगळीत झालेले कुटुंब जीवाच्या आकांताने फोनवरून मदत मागत होते. कोणाचीही मदत मिळाली नाही पण तेव्हा ती कुटुंबे सुरक्षित राहिली कारण क्षुब्ध जमावाने असे हल्ले केले नाहीत. राज्यपाल जगमोहन यांनी आपल्या पुस्तकात आणि त्यानंतर एका इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात त्यावेळच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. रात्रभर त्यांचे फोन वाजत होते ते भयभीत लोकांच्या मदतीच्या मागणीचे. पण जमावाने अमुक ठिकाणी हल्ला केला असा एकही फोन आला नव्हता. चुकीच्या माहितीने आणि चुकीच्या प्रचाराने कलुषित  झालेल्या वातावरणाने सत्याचा बळी घेतला आहे.

                                                               (क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा , जि.यवतमाळ 
मोबाईल -९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment