Friday, June 27, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३३

 कलम ३७० अस्तित्वात होते तेव्हा दहशतवादी हल्ले होतच होते आणि कलम ३७० रद्द झाल्यानंतरही ते सुरूच आहेत. ही गोष्ट कलम ३७० आणि दहशतवाद याचा परस्पर संबंध नसल्याचे निदर्शक आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------


१९९० च्या दशकात काश्मीर घाटीतून बहुसंख्य पंडीत कुटुंबाना वाढत्या आतंकवादी घटनांमुळे काश्मीर सोडावे लागले होते. काश्मीर समस्येचा विषय निघाला की काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा पाढा हमखास वाचला जातो. पलायन करावे लागलेल्या पंडीत समुदायाच्या कुटुंबाना परत काश्मिरात आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काश्मीरघाटीत पलायन केलेल्या पंडीत कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरीत सामील करून घेण्याची योजना तयार केली आणि अंमलात आणली. पंडीत समुदायानेही या योजनेचे स्वागत करून योजनेत सामील झालेत. तेव्हापासून हजारो काश्मीर पंडीत सरकारी नोकरदार म्हणून काश्मीर घाटीत कार्यरत आहेत. दशकभरात काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांनी आम्हाला काश्मीरमध्ये असुरक्षित वाटते, काश्मीरघाटी बाहेर आम्हाला काम द्या अशी मागणी केली नव्हती. अशी मागणी कधी झाली तर कलम ३७० रद्द झाल्या नंतरच्या दिवसात. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द झाल्या नंतर काश्मिरातील दहशतवाद संपल्याचा व परिस्थिती स्थिर आणि शांत असल्याचा प्रचार केला. सरकारच्या या प्रचारातील हवा काश्मीर पंडीत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानेच काढली. कलम ३७० रद्द केल्या नंतर काश्मिरात जे दहशतवादी हल्ले झालेत त्यातील काही हल्ल्यात काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. असे हल्ले होवू लागल्यामुळे पंडीत कर्मचारी भयभीत झाले होते. काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात जी हिंसा झाली त्याची सुरुवात अशाच घटनांनी झाली होती व त्यामुळेच काश्मिरी पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आली या इतिहासाची पुनरावृत्ती तब्बल ३० वर्षानंतर झाली आणि तीही कलम ३७० रद्द झाल्या नंतर. काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर घाटीत कार्यरत कर्मचारी  १९९० सारखेच भयभीत झाले होते. सरकारने त्यांची नियुक्ती काश्मीरघाटी बाहेर जम्मूत किंवा इतरत्र करावी या मागणीसाठी २०२२-२३ साली संप पुकारून तब्बल ३१० दिवस जम्मूत आंदोलन केले होते.     

एरवी काश्मिरी पंडितावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचणाऱ्यानी ३१० दिवस चाललेल्या काश्मीर पंडीत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगारच बंद केले. दहशतवादी हल्ल्यात मरायचे की उपासमारीने मरायचे एवढाच पर्याय सरकारने कर्मचाऱ्यांसमोर शिल्लक ठेवला होता. पगार बंद करणे हा सरकारी दहशतवाद असल्याचा आरोप काश्मिरी पंडीत कर्मचार्यांनी केला पण हा आरोप कोणी गांभीर्याने घेतला नाही. काश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टांचे भांडवल करून कलम ३७० विरोधात वातावरण निर्माण करणाऱ्या सरकारने काश्मिरी पंडीत कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे साफ दुर्लक्ष केले. सरकारला शरण येण्यावाचून दुसरा पर्यायच नसल्याने ३१० दिवसानंतर पंडीत समुदायाचे सरकारी कर्मचारी कामावर परतले. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मिरातील परिस्थिती सुरळीत झाली हा सरकारी प्रचाराचा फुगा फुटला असता. सरकारने या कर्मचाऱ्यांचा पगार बंद करून नाक दाबल्याने पंडीत सरकारी कर्मचारी मना विरुद्ध काश्मीर घाटीत राहिलेत. पण या काळात अशा काही पंडीत कुटुंबांनी काश्मीर सोडले ज्यांनी १९९० च्या हिंसाचारा नंतरही काश्मीर सोडले नव्हते. कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पंडीतच दहशतवादाचे बळी ठरले नाहीत तर अशा अनेक घटना घडल्यात ज्यात इतर नागरिकांचा आणि सैनिकांचा बळी गेला. 

ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतरचा घटनाक्रम लक्षात घेतला तर असे म्हणता येईल की दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ले करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला. पूर्वी नागरी वस्त्यात येवून सुरक्षादलावर आणि दहशतवादी ज्यांना पोलीस व सुरक्षादलाचे खबरे मानत त्यांच्यावर हल्ले केले जायचे. २०१९ नंतर तसे हल्ले कमी झालेत याचे कारण नागरी वस्त्यात वाढलेल्या सुरक्षादलाच्या चौक्या आणि संख्या. ७-८ लोकांमागे १ सुरक्षा सैनिक अशी स्थिती असेल तर दहशतवाद्यांना वस्तीत येवून हल्ले करणे सोपे राहिले नसणार. त्यामुळे जंगलातून सुरक्षादलावर अचानक हल्ले करणे, स्फोटका द्वारे विस्फोट घडवून आणणे असे मार्ग दहशतवाद्यांनी स्वीकारले. नागरी वस्तीत विशेषत: मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या खेड्यांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक , पटवारी सारख्या पंडीत कर्मचाऱ्यांवर आणि बाहेरून मजूर म्हणून काम करायला आलेल्या श्रामिकावर हल्ले करण्याची पद्धत अवलंबिली. दहशतवाद्यांना मोठ्या राजकीय नेत्यावर हल्ले करता आले नसतील पण अनेक स्थानिक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. असा एक हल्ला यशस्वी झाला तरी मोठ्या क्षेत्रात दहशत पसरते. दहशतवाद्यांच्या अशा कार्यकलापामुळे मोठे दहशतवादी हल्ले न करताही काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना आपली दहशत टिकवून ठेवता आली. सरकार मात्र मोठे दहशतवादी हल्ले झाले नाहीत म्हणजे दहशतवाद उतरणीला लागला असा भ्रम पसरविण्यात यशस्वी राहिले. काश्मिरेतर भारतीय जनतेला कलम ३७० रद्द करण्याचे एवढे अप्रूप की त्यांनी सरकारी प्रचारावर डोळे झाकून विश्वास ठेवला. 

कलम ३७० रद्द झाल्यानंतर नुकत्याच घडून गेलेल्या पहलगाम हल्ल्या आधीही मोठा हल्ला घडवून आणण्यात दहशतवादी यशस्वी झाले होते. काश्मीर खोऱ्यात प्रचंड संख्येने सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले असल्याने दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य बनविले. वर्षभरा पूर्वी जून २०२४ मध्ये धार्मिक यात्रेकरूंच्या बसवर जम्मूत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत १० यात्रेकरू ठार झाले होते तर ३० जखमी झाले होते. सुरक्षादलावर झालेल्या हल्ल्यांची संख्या तर मोठी आहे. सुरक्षा दलाच्या चौक्यांवर ग्रेनेड फेकणे, सुरक्षादलाच्च्या गस्तीपथकांवर हल्ला करणे, त्यांची वाहने विस्फोटाने उडवून देण्याचे प्रकार कमी होण्या ऐवजी वाढल्याचे दिसून येते. नागरी भागातील हल्ल्यातील कमी सुरक्षादलावर अधिक हल्ले करून भरून काढली. काश्मीरखोऱ्यात सुरक्षादलाच्या प्रचंड तैनातीमुळे आलेली कमी जम्मू विभागात अधिक हल्ले करून दहशतवाद्यांनी भरून काढली. असे म्हणता येईल की कलम ३७० रद्द झाल्यानंतर दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप आणि पद्धत बदलली. पण याचा कलम ३७० रद्द करण्याशी काडीचाही संबंध नाही. कलम ३७० रद्द करतेवेळी काश्मीरखोऱ्यातील जनतेचा त्याविरुद्धचा आवाज आणि उद्रेक रोखण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या संख्येत सुरक्षादल तैनात करण्यात आले त्याचा हा परिणाम आहे. सुरक्षादलाच्या अशा तैनातीमुळे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध काश्मीरखोऱ्यातील जनतेचा उद्रेक रोखण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले असले तरी दहशतवाद्यांची हल्ला करण्याची क्षमता केंद्र सरकारला नष्ट तर सोडा कमी देखील करता आलेली नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे दहशतवाद, दहशतवादी आणि कलम ३७० याचा प्रत्यक्ष संबंध नाही. कलम ३७० अस्तित्वात होते तेव्हाही दहशतवाद होताच आणि कलम ३७० रद्द झाल्यानंतरही दहशतवाद संपलेला नाही. 

-------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Friday, June 20, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३२

 घटनेत लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांचा शब्दकोशातीलच नव्हे तर व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला तरी कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा घटनेवर चालविलेला बुलडोजर वाटतो. 
-------------------------------------------------------------------------------------------


कलम ३७० संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित नाही. गेल्या १० वर्षातील निकालांकडे दृष्टीक्षेप टाकला तर सर्वोच्च निकालामागचे एक सूत्र स्पष्ट होते. केंद्र सरकार अडचणीत येणार नाही एवढेच नव्हे तर सरकार अडचणीत येत असेल तर अडचणीतून त्याची सुटका करणे हे ते सूत्र. इथे कोणी म्हणेल की इलेक्टोरल बॉंड प्रकरणी नाही का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की या निकालाने सरकारची कोणतीच अडचण होणार नव्हती. पार्टीसाठी पैसा मिळविण्याचे एक साधन तेवढे गेले पण इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सरकारची अडचणीतून सुटका करण्याची कृती कशी असते टी एका प्रकरणावरून तपासता येईल. सरकारला आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्याकडे सीबीआय कडील महत्वाची प्रकरणे सोपवायची होती. या अधिकाऱ्यामुळे सीबीआय प्रमुखाचे पद नामधारी ठरू लागले होते. याचा अर्थातच त्यावेळच्या सीबीआय प्रमुखाने विरोध केला. सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यावर विविध गंभीर आरोप ठेवून त्याच्या चौकशीचे आदेश दिले. स्वत: पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखाला बोलावून दोन्ही अधिकाऱ्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळचे सीबीआय प्रमुख सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्याची चौकशी करण्यावर ठाम राहिले. सरकारने त्यांना तात्काळ बडतर्फ केले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तातडीच्या प्रकरणात वेळ घेवून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय प्रमुखाच्या बडतर्फी विरुद्ध निकाल दिला. पण विषय तिथेच संपविला नाही. सीबीआय प्रमुखाची नियुक्ती करणारी जी समिती होती तिची बैठक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा मुद्दाच सर्वोच्च न्यायालया समोर नव्हता. सरकारनेही अशी मागणी केलीच नव्हती. पण सरकारने बडतर्फ केलेला सीबीआय प्रमुख त्याच पदावर कायम राहणे हे केवळ सरकारसाठी अप्रतिष्ठेचे नव्हते तर अडचणीचेही होते. सरकारने "अवैध" मार्गाने बडतर्फ केलेल्या सीबीआय प्रमुखाला "वैध"मार्गाने बडतर्फ करण्यासाठी सीबीआय प्रमुखाच्या नियुक्तीसाठी असलेली समितीची बैठक बोलावण्याचा आदेश देण्यात आला होता. घटनेचे पालन करतो असे दर्शविण्यासाठी निर्णय द्यावा लागला आणि त्यामुळे सरकारची अडचण होत असेल तर तशा निर्णया सोबत अडचणीतून सुटका करण्याचा मार्गही दाखवायचा ही गेल्या १० वर्षातील सर्वोच्च परंपरा राहिली आहे.                                                                     

कलम ३७० प्रकरणात मागे घडून गेलेले सीबीआय प्रमुखाच्या प्रकरणाचे स्मरण व्हावे असेच घडले. सर्वोच्च न्यायालया समोर कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती वैध की अवैध एवढाच मुद्दा होता. सरकारने अवलंबलेली पद्धत घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण सर्वोच्च न्यायालय तिथेच थांबले नाही. सरकारने जरी चुकीच्या पद्धतीने कलम ३७० रद्द केले असले तरी कलम ३७० रद्द करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असल्याचा निर्णय दिला. राष्ट्रपतींना असा अधिकार असल्याचा दावा सरकारने केलाच नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीला असा अधिकार "प्रदान" केला नसता तर सरळ सरळ कलम ३७० रद्द करण्याची सरकारची कृती अवैध ठरली असती. या प्रकरणात तर अशा अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने केल्या ज्यावर निर्णय देण्याची मागणी कोणीच केली नव्हती अगदी सरकार पक्षाने देखील केली नव्हती. अशा प्रकारच्या निर्णयात महत्वाचा निर्णय होता जम्मू-काश्मीर राज्याची स्वतंत्र राज्यघटना रद्द करण्याचा निर्णय. कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याची अधिसूचना काढताना राष्ट्रपतींनी राज्याच्या राज्यघटनेला हात लावला नव्हता. त्यामुळे ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० रद्द करण्याच्या निघालेल्या अधिसुचने नंतर तब्बल ४ वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये देशाची राज्यघटना आणि राज्याची घटना याचे सहअस्तित्व होते. कोणाच्याही मागणीविना सर्वोच्च न्यायालयाने हे सहअस्तित्व संपविले. जशी कलम ३७० प्रकरणी सरकारची सरकारच्या अवैध कृतीतून न्यायालयाने सरकारची सुटका केली तशीच सुटका याच प्रकरणात विचाराधीन असलेल्या जम्मू-काश्मीर राज्य पुनार्रचना विधेयका बाबत केल्याचे आपण बघितले आहे. पूर्ण अधिकार असलेल्या राज्याचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याचा सरकारला व संसदेला अधिकार आहे का या मुद्द्यावर निर्णय न देवून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची अडचण होवू दिली नव्हती.                                                                                                     

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे अनपेक्षित नव्हते. अनपेक्षित होते ते या निर्णयाच्या समर्थनार्थ दिलेली कारणे आणि असा निर्णय देण्यासाठी घटनेची केलेली व्याख्या. घटनेत लिहिलेले शब्द आणि त्या शब्दांचा शब्दकोशातीलच नव्हे तर व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला तरी कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा घटनेवर चालविलेला बुलडोजर वाटतो. कलम ३७० चा व्यवहारातला प्रभाव सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या व सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याच्या पुष्कळ आधीच संपला होता. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या या निर्णयाने परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. कलम ३७० रद्द होण्याआधीची काश्मीरमध्ये असलेली स्थिती व लोकभावना आणि कलम ३७० रद्द केल्यानंतरची काश्मीरची स्थिती आणि लोकभावना यामध्ये फरक पडलेला नाही. फरक पडला हा सरकारचा प्रचार होता आणि या प्रचाराने तसा लोकभ्रम तयार करण्यात सरकारला यशही आले होते. सरकार करीत असलेला प्रचार खोटा आहे हे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांना हळू हळू समजायला लागले आहे. खरे तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधीही कलम ३७० रद्द झाल्यानंतर कित्येक आतंकवादी हल्ले झाले होते. काश्मीर मधील आतंकवाद कलम ३७० मुळे आहे या मागच्या ७० वर्षाच्या संघपरिवाराच्या प्रचाराचा प्रभाव जनमानसावर एवढा होता की जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घटना घडत असतानाही जम्मू-काश्मिरात कलम ३७० रद्द झाल्यानंतर शांतता नांदत असल्याच्या सरकारी प्रचारावर जनतेने डोळेझाकून विश्वास ठेवला. असे डोळे झाकल्यामुळे आम्हाला काश्मीरमध्ये असुरक्षित वाटते , जम्मू मध्ये काम द्या अशी तब्बल ३१० दिवस मागणी करत आंदोलन करणारे काश्मिरी पंडीत कर्मचारी जनतेला दिसले नाहीत ! 

-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, June 11, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३१

भारतीय संविधान सभेने कलम ३७० ची रचना करताना यात संसदेची काहीच भूमिका ठेवली नाही हे कलम ३७० च्या वाचनातून लक्षात येईल. प्रत्यक्षातही ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत भारतीय संसदेत काश्मीर राज्या विषयी कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. कलम ३७० मध्ये उल्लेख आहे तो राष्ट्रपतीचा, राज्यशासनाचा आणि काश्मीरच्या संविधान सभेचा ! निर्णयाची ही साखळी सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतली नाही.
---------------------------------------------------------------------------------------

 
सोयीचे तर्क देत कलम ३७० वरील निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यामुळे निकाल अंतर्विरोधाने भरलेला आहे. जशा इतर अनेक राज्यांसाठी तात्पुरत्या व विशेष तरतुदी संविधानात केल्या आहेत तशीच कलम ३७० ची तरतूद काश्मीर बाबत करण्यात आल्याचे कोर्ट सांगते. हा तर्क मान्य केला तर इतर राज्यांसाठी ज्या विशेष तरतुदी आहेत त्या सुरु आहेत तशी कलम ३७० ची तरतूद सुरु राहिली असती तर काही फरक पडला नसता असा अर्थ होतो. मग कलम ३७० रद्द करण्याचा आटापिटा सरकारने व न्यायालयाने कशासाठी केला या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकते आणि ते म्हणजे इतर राज्यांसाठीच्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी आणि काश्मीरसाठीच्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी यात फरक आहे. हा फरक आणखी एका गोष्टीतून अधोरेखित होतो. कलम ३७० वरील सुनावणी दरम्यान एक प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला तो म्हणजे संविधानात तात्पुरते म्हणून उल्लेख करण्यात आलेले कलम ३७० इतक्या वर्षात कसे रद्द करण्यात आले नाही ! हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यात अग्रणी होते न्यायमूर्ती चंद्रचूड. इतर राज्यांसाठी असलेल्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी अजूनही कशा सुरु आहेत हा प्रश्न मात्र चंद्रचूड किंवा कलम ३७० च्या तात्पुरत्या उल्लेखाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या कोणालाही पडला नाही. त्या सुरु राहिल्या तरी चालतात पण कलम ३७० राहिल्याने अनर्थ घडतो असे वाटण्यातच काश्मीरसाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे वेगळेपण सिद्ध होते. कलम ३७० रद्द झाल्याने घटनात्मक एकीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचा जो उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला त्यातूनही इतर राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी आणि काश्मीरसाठीच्या विशेष तरतुदी यात फरक असल्याचे स्पष्ट होते. आणखी एका बाबीतून हा फरक स्पष्ट होतो. कलम ३७० हे फक्त काश्मीरसाठी होते तसेच कलम ३७१ हे इतर राज्यांसाठी आहे. ३७१ अबकड... अशा उपकलमाखाली इतर काही राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता कलम ३७० मध्ये जशी ते कलम रद्द कसे करता येईल याची प्रक्रिया दिली होती तशी कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांसाठी विशेष तरतुदी करताना ते कलम तात्पुरत्या सदरात मोडत असताना देखील ते कलम रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. हीच गोष्ट कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक स्पष्ट करणारी आहे. कलम ३७० चे वेगळेपण ध्वनित करणारी आहे. कलम ३७१ रद्द करण्याची वेगळी प्रक्रिया दिली नाही याचा अर्थ एखादे कलम वगळण्याची किंवा एखादे कलम नव्याने समाविष्ट करण्याची जी तरतूद संविधानात करण्यात आली आहे त्या सर्वसाधारण तरतुदी अंतर्गत कलम ३७१ मध्ये संसदेला बदल करता येईल किंवा ते रद्द करता येईल. कलम ३७० बाबत असा अधिकार संसदेला नव्हता. भारतीय संविधान सभेने कलम ३७० ची रचना करताना यात संसदेची काहीच भूमिका ठेवली नाही हे कलम ३७० च्या वाचनातून लक्षात येईल.                                           

कलम ३७० मध्ये उल्लेख आहे तो राष्ट्रपतीचा, राज्यशासनाचा आणि काश्मीरच्या संविधान सभेचा ! यातही निहित हेच होते की राष्ट्रपती कलम ३७० अंतर्गत जी काही कृती करेल ती राज्यसरकार, राज्य विधान सभा किंवा राज्याची संविधान सभा यांच्या सूचनेने किंवा संमतीने. राज्याची संविधान सभा गठीत होण्यापूर्वी राज्यसरकारच्या सल्ल्याने व संमतीने राष्ट्रपतींनी काश्मीर बाबत जे निर्णय घेतले असतील ते निर्णय देखील स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राज्याच्या संविधान सभेला होता. म्हणजे भारताचे राष्ट्रपती, राज्याचे सरकार किंवा विधानसभा आणि राज्याची संविधान सभा यांच्या काश्मीर बाबतच्या अधिकारात अंतिम अधिकार हे संविधान सभेचे होते. म्हणून भारतीय संविधान सभेने कलम ३७० रद्द करायचे की नाही याचा अंतिम निर्णय काश्मीरच्या संविधान सभेकडे सोपवला होता. भारताचे राष्ट्रपती ही स्थायी संस्था होती किंवा राज्याचे निर्वाचित सरकार ही देखील स्थायी संस्था म्हणता येईल. राज्याची संविधान सभा ही काही स्थायी संस्था नव्हती. संविधान बनविण्याचे काम पूर्ण झाले की तिचे प्रयोजन संपणार होते. भारतीय संविधान सभे समोर ही बाब स्पष्ट असताना संविधान सभेने कलम ३७० चा अंतिम निर्णय राज्याच्या संविधान सभे वर सोपवला होता. कलम ३७० बाबत निर्णय न घेताच काश्मीरची संविधान सभा विसर्जित झाल्याने राष्ट्रपतींना कलम ३७० रद्द करण्यासाठी काश्मीरच्या संविधान सभेच्या शिफारसीची गरज उरली नाही हा सर्वोच्च न्यायालयाने काढलेला अर्थ भारतीय संविधान सभेच्या निर्णयाशी विसंगत आहे. काश्मीरच्या संविधान सभेने कलम ३७० बाबत निर्णय घेतला नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिपादन चुकीचे आहे. काश्मीरच्या संविधान सभेने कलम ३७० मध्ये एक दुरुस्ती सुचविली होती आणि भारताच्या राष्ट्रपतींनी कलम ३७० मधील दुरुस्तीची अधिसूचना देखील जारी केली होती. याचा अर्थच त्या दुरुस्तीसह कलम ३७० कायम ठेवण्याचा निर्णय तिथल्या संविधान सभेने घेतला होता. कलम ३७१ मध्ये ते कलम सुरु ठेवण्याची किंवा रद्द करण्याची अशी कोणतीही निहित प्रक्रिया नाही.  हे मोठे आणि महत्वाचे वेगळेपण या दोन कलमात आहे. इतर राज्यांसाठी जशा तात्पुरत्या विशेष तरतुदी केल्यात तशाच जम्मू-काश्मीर राज्यांसाठी तात्पुरत्या विशेष तरतुदी करण्यात आल्या या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिपादनाने कलम ३७० चे मोठे आणि महत्वाचे वेगळेपण झाकोळले गेले आहे.                                                                                                                                 

याचा असा अर्थ नाही की कलम ३७० मध्ये निहित वेगळेपण असामान्य आहे आणि आणि कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना देण्यात आलेले वेगळे अधिकार सामान्य श्रेणीतील आहेत. कलम ३७० लागू असताना काश्मीरला देखील असे विशेष अधिकार नव्हते जे कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना विशेष अधिकार मिळाले आहेत. काश्मीर बाबत जशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची धारणा होती की देशात 'एक विधान ,एक निशाण आणि एक प्रधान' याच्या आड कलम ३७० येते अगदी तसेच कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांना जे विशेष अधिकार मिळाले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या धारणेच्या आड येणारे आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा ठराव संसदेत मांडल्या नंतर काही सदस्यांनी कलम ३७० सारखेच कलम ३७१ असताना ते रद्द करण्याचा निर्णय सरकार का घेत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० ची तुलना कलम ३७१ शी होवू शकत नाही असे सांगितले होते. पण कलम ३७० संपूर्ण राज्यघटना लागू करण्यातील अडथळा असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे मत होते आणि वेगळ्या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात या मताला दुजोरा दिला आहे. कलम ३७१ अंतर्गत काही राज्यांसाठी केलेल्या तरतुदी या राज्यघटनेचा पूर्ण अंमल होण्यात अडथळा ठरणाऱ्या आहेत की नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले नसले तरी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सरकारच्या वतीने जे भाष्य केले त्यावरून कलम ३७१ हे एक विधान,एक निशाण आणि एक प्रधान याच्या आड न येणारे निरुपद्रवी कलम वाटते. पण काही राज्यासाठी करण्यात आलेल्या काही तरतुदी तसे दर्शवत नाही. कलम ३७० व कलम ३७१ एका पारड्यात तोलू नका म्हणत केंद्र सरकारने काश्मीरला लक्ष्य  केले तर या उलट कलम ३७१ मध्ये काही राज्यांसाठी जशा विशेष तरतुदी आहेत तशाच तरतुदी काश्मीरसाठी कलम ३७० अंतर्गत करण्यात आल्या असे मानणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाकडून बळी गेल्या त्या कलम ३७० अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी. 

---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८