Friday, August 29, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४२

 जागतिक व्यासपीठावर भारत सरकार काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करीत होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद सार्वमत घेण्याचा निर्देश देत होती त्यावेळी काश्मिरातील जनतेने आधीच भारताच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे नव्याने सार्वमत घेण्याची गरज नाही हे ठामपणे सांगणारे एकमेव नेते शेख अब्दुल्ला होते.
--------------------------------------------------------------------------------------------


पंडीत नेहरूंची देशाला आणि जगाला जी ओळख आहे त्याच्या विपरीत त्यांचे वर्तन काश्मीर आणि शेख अब्दुल्लांच्या बाबतीत घडले. काश्मीरच्या बाबतीत वारंवार ज्या भूमिकेचा पुनरुच्चार नेहरू १९४७ ते १९५२ या काळात करीत आलेत त्या भूमिकेलाच छेद देणारी कृती त्यांनी १९५३ मध्ये केली. शेख अब्दुल्लांची अटक भारताच्या काश्मीर विषयक घोषित भूमिकेला छेद देणारी होती. अटकेचे कारण फार दुबळे आणि हास्यास्पद होते. शेख अब्दुल्ला पाकिस्तानशी संगनमत करून भारतापासून काश्मीरला वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप त्या शेख अब्दुल्लावर करण्यात आला ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान ऐवजी भारताची निवड केली. धर्मांध व सरंजामशाही असलेल्या पाकिस्तान ऐवजी त्यांना लोकशाही समाजवादी भारत जवळचा वाटला. काश्मीरला लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी बनवायचे असेल तर पाकिस्तानात राहून ते शक्य होणार नाही. त्यासाठी भारतासोबत राहणेच योग्य असल्याचे त्यांचे ठाम मत होते. जसे भारताने वेळोवेळी काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क जाहीरपणे मान्य केला होता तसेच शेख अब्दुल्लांनी आपल्या स्वप्नातील काश्मीर भारतात राहूनच साकार होईल हे वेळोवेळी सांगितले होते. पाकिस्तान बरोबर जायचे नाही यावर ठाम असल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी घूसखोरा विरुद्ध मदत केली होती. सैन्याच्या खांद्याला खांदा लावून शेख अब्दुल्ला समर्थक पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध लढल्याचा इतिहास आहे. १९५२ पर्यंत , अगदी १९५२ चा दिल्ली करार होईपर्यंत, भारत सरकार व शेख अब्दुल्लांचे सरकार यांच्यामध्ये मतभेद नव्हते. काश्मीरच्या बाबतीत जागतिक व्यासपीठावर भारत अनुकूल भूमिका घेण्यात शेख अब्दुल्ला भारताच्याही पुढे एक पाउल होते. जागतिक व्यासपीठावर भारत सरकार काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करीत होते आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद सार्वमत घेण्याचा निर्देश देत होती त्यावेळी काश्मिरातील जनतेने आधीच भारताच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे नव्याने सार्वमत घेण्याची गरज नाही हे ठामपणे सांगणारे एकमेव नेते शेख अब्दुल्ला होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर शेख अब्दुल्ला यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की पाकिस्तानचा काश्मीरशी काही संबंधच नसल्याने काश्मीरने भारतात राहायचे की पाकिस्तानात यावर सार्वमत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. १९५२ पर्यंत अशा भूमिकेवर ठाम असणाऱ्या शेख अब्दुल्लांना १९५३ मध्ये अटक करून भारत सरकारने काश्मीर समस्येचा पाया घातला. 

१९५२चा दिल्ली करार ते १९५३ मधील शेख अब्दुल्लांची अटक या दरम्यान शेख अब्दुल्लांची भूमिका बदलली का की आणखी काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली का की ज्यामुळे शेख अब्दुल्लांना अटक करणे भाग पडले या प्रश्नाचे सरळ उत्तर सापडत नाही. पण १९५२ चा दिल्ली करार निमित्त ठरला भारत सरकार आणि शेख अब्दुल्ला यांचे मार्ग वेगळे करण्यासाठी. विशेष म्हणजे हा करार दोहोंच्या पूर्ण संमतीने झाला होता. हा असा करार होता ज्याची खरे तर काहीच आवश्यकता नव्हती. हा करार झाला तेव्हा काश्मीरची संविधान सभा गठीत होवून तिचे कामकाज सुरु झाले होते. भारत आणि काश्मीर यांच्यातील संबंध स्पष्ट आणि निश्चित करणारी सर्वोच्च आधिकारिक संस्था संविधान सभाच असल्याचे भारत सरकार आणि शेख अब्दुल्लाचे एकमत होते. अशावेळी जे काही ठरवायचे ते संविधान सभेला ठरवू द्यावे, संविधान सभेच्या विचारार्थ काही प्रस्ताव द्यायचे असतील तर ते द्यावेत हा मार्ग उपलब्ध असताना भारत सरकार व शेख अब्दुल्लाचे सरकार यांना तातडीने एखादा करार करण्याची काय आवश्यकता होती हा प्रश्न पडतो. अर्थात यात शेख अब्दुल्लांना दोष देता येणार नाही. करार नेहरूंच्या पुढाकाराने झाला. काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाल्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत संघटनांनी काश्मीर वेगळे होणार असा प्रचार करून देशातील उरल्यासुरल्या धार्मिक सौहार्दाला सुरुंग लावण्याच्या प्रयत्न चालविला होता. त्याला आळा घालण्यासाठी आणि काश्मीर भारतापासून वेगळे होणार नाही हे दाखविण्याच्या उद्देशाशिवाय या कराराची कोणतीही निकड होती असे दिसत नाही. वास्तविक जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाले त्यावेळी केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीरने भारतात राहणे त्याच्या हिताचे आणि गरजेचे असल्याचे प्रतिपादन शेख अब्दुल्लाने करून संविधान सभेच्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली होती. त्यामुळे वेगळा करार करून हीच गोष्ट पुन्हा दाखवून देण्याची गरज नव्हती.                                                                                                       

संविधान सभेतील शेख अब्दुल्लांच्या प्रतिपादनावर संघप्रणीत संघटनांचा विश्वास नव्हता तो अशा कराराने बसेल असे मानणेच व्यर्थ होते. काश्मीरचा शासक म्हणून शेख अब्दुल्ला असणे त्यांना मान्य होण्यासारखे नव्हते. त्यामुळे काश्मीरच्या सामीलीकरण कराराबाबत आणि त्यावेळी दिलेल्या आश्वासना बाबत जनतेला पूर्ण आणि स्पष्ट माहिती देवून काश्मीरच्या बाबतीत गोंधळ निर्माण करणाऱ्या संघटना व पक्षांचा बंदोबस्त करण्याची गरज होती. ते न करता नेहरूंनी शेख अब्दुल्लाना अटक करून नवे प्रश्न निर्माण केलेत. १९५२ चा करार नेहरूंनी काश्मीरचे नेतृत्व भारतीय राज्यघटना लागू करण्याच्या विरोधी नाही हे विरोधकांना दाखवून देण्यासाठीच केला हे पूर्ण सत्य नाही. नेहरुंना कोणत्याही परिस्थितीत काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा असला पाहिजे असे वाटत होते.  याबाबत कोणत्याच शंकेला जागा नको असे वाटण्यातून हा करार जन्माला आला. एकीकडे हा करार अंमलात आणण्याची नेहरुंना झालेली घाई व त्यासाठी त्यांनी वाढविलेला दबावही शेख अब्दुल्लांना असुरक्षित वाटण्यास कारणीभूत ठरला. या असुरक्षिततेतून शेख अब्दुल्लांची नेहरुशी असहकार्याची भूमिका घेतली. या असहाकारातून दोन नेत्यात अविश्वास निर्माण झाला आणि याची परिणती शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटकेत झाली. अवेळी अनावश्यक करार करण्याची घाई ही नेहरूंची पहिली चूक आणि या कराराची अंमलबजावणी शेख अब्दुल्ला करायला तयार नाहीत म्हणून त्यांना अटक करण्याचे टोकाचे पाउल उचलून दुसरी चूक केली. वास्तविक ज्या परिस्थितीत व ज्या विश्वासाने शेख अब्दुल्ला यांनी भारताची निवड केली ते लक्षात घेता आपण शेख अब्दुल्लांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे जगाला आणि देशांतर्गत विरोधकांना दाखविण्याची गरज होती त्यावेळी अटक झाल्याने काश्मीरचे चित्रच पालटले. 
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 21, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४१

१९५२ च्या दिल्ली कराराद्वारे  देशाचे सार्वभौमत्व व काश्मीरची स्वायत्तता यात सुवर्णमध्य साधण्याचा नेहरूंनी प्रयत्न केला पण घडले उलटेच. या करारालाच स्वायत्ततेचा विरोध करणाऱ्यांनी विरोधाचा मुद्दा बनविला. या विरोधाने शेख अब्दुल्ला विचलीत झाले व कराराच्या पालना बद्दल त्यांच्या द्विधा मन:स्थितीमुळे त्यांचे नेहरू सोबतचे संबंध ताणले गेले. 
----------------------------------------------------------------------------------------  

१९५२ चा दिल्ली करार काश्मीर बाबतीत मैलाचा दगड ठरण्या ऐवजी समस्या निर्मितीचा प्रारंभ ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजनीतिक शाखा म्हणून २१ ऑक्टोबर १९५१ रोजी स्थापन झालेल्या जनसंघ पक्षाला या कराराने एक कोलीत आणि कार्यक्रम मिळाला. जनसंघ स्थापन करण्यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पुढाकार घेतला व या कामी त्यांना संघ प्रचारक असलेल्या बलराज मधोक व दीनदयाळ उपाध्याय यांची मदत झाली. जनसंघ स्थापन होण्याच्या आधी बलराज मधोक यांनी जम्मूत प्रजा परिषद नावाची राजकीय संघटना स्थापन केली होती. जम्मू-काश्मीरचे राजा हरीसिंग यांना बळ देण्यासाठी ही संघटना होती. राजा हरीसिंग यांनी भारत किंवा पाकिस्तानात सामील न होता जम्मु आणि काश्मीर स्वतंत्र ठेवून त्यावर राज्य करावे अशी प्रजा परिषदेची इच्छा होती. पण पाकिस्तानने काश्मीर बळकाविण्याच्या इराद्याने पश्तुनी कबाईली काश्मीर मध्ये घुसविल्याने राजा हरीसिंग यांना भारताकडे मदत मागावी लागली व त्यासाठी भारतात सामील होण्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी करावी लागली. राजा हरीसिंग यांना स्वतंत्र राहता आले नाही तरी काश्मीरवर शेख अब्दुल्लांचे वर्चस्व राहता कामा नये यासाठी बलराज मधोक यांच्या प्रजा परिषदेने कंबर कसली होती. प्रजा परिषदेच्या स्थापनेच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने व राजा हरीसिंग यांच्या मदतीने डोग्रा हिंदूंची {राजा हरीसिंग डोग्रा हिंदू होते.} जम्मू-काश्मीर राज्य हिंदू सभा जम्मूत सक्रीय होती. आरेसेसचे जम्मू प्रमुख असलेले प्रेम नाथ डोग्रा जम्मू-काश्मीर हिंदू सभेचे प्रमुख नेते होते. जनसंघ, प्रजा परिषद आणि हिंदू सभा यांचा समान कार्यक्रम म्हणजे कलम ३७० व जम्मू-काश्मीर राज्याच्या स्वायत्ततेला विरोध हा होता.                                                                                                                     

जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या घटना समितीचे सदस्य होते . त्यांनी घटना समितीत कलम ३७० चा अजिबात विरोध केला नव्हता. पण जनसंघाची स्थापना केल्यावर मात्र पक्षाचा कलम ३७० ला विरोध हा मुख्य कार्यक्रम बनला. कलम ३७० मुळे जमू-काश्मीरला स्वायत्तता मिळाली नव्हती. स्वायत्ततेचे मूळ होते राजा हरीसिंग यांनी स्वाक्षरी केलेला सामीलनामा. या सामिलनाम्याचा घटनात्मक स्वीकार कलम ३७० अन्वये करण्यात आला. सामीलनाम्या नंतरच्या घटनांनी स्पष्ट झाले होते की राजा नामधारी असणार आणि राज्याची सारी सूत्रे राज्याचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्या हाती असणार. संघ, जनसंघ ,हिंदुसभा आणि प्रजा परिषद यांना हेच नको होते. राजा हरीसिंग यांच्या अधिपत्या खाली स्वतंत्र जमू-काश्मीर राष्ट्र त्यांना चालणार होते पण शेख अब्दुल्लाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ राज्याचा स्वायत्त घटक असलेले जम्मू-काश्मीर राज्य त्यांना नको होते. त्यामुळे हे सगळे समूह राजा हरीसिंग यांचे समर्थक असताना राजा हरीसिंग यांनी ज्या अटी-शर्तीनिशी भारतात काश्मीर सामील केले त्या अटी -शर्तीचा हे समूह विरोध करू लागले होते. फाळणीमुळे हिंदू-मुस्लीम तणावाच्या पार्श्वभूमीवर शेख अब्दुल्लांना निशाणा बनविणे या समूहासाठी सोपे आणि सोयीचे होते. सामीलनाम्यात निहित स्वायत्तता कायम राहावी यासाठी शेख अब्दुल्ला कमालीचे आग्रही होते. १९५२ च्या दिल्ली कराराने राजा हरीसिंग यांनी केलेल्या सामीलनाम्याचा करार , जो हिंदुत्ववादी संघटनांसाठी गैरसोयीचा व अडचणीचा होता तो बाजूला पडला आणि त्या सामीलनाम्यामुळे नाही तर पंडीत नेहरूंनी हा जो करार केला त्यामुळे काश्मीरचे इतर राज्या पेक्षा वेगळे असे स्थान निर्माण झाल्याचे फसवे चित्र संघ ,जनसंघ, जम्मू-काश्मीर हिंदू सभा आणि प्रजा परिषद यांना निर्माण करता आले. अर्थात हा करार होण्याच्या आधीपासूनच या संघटनांनी व पक्षांनी कलम ३७० व जम्मू-काश्मीरच्या स्वयात्तते विरोधात रान पेटविले होते. याविरुद्ध जम्मूत हिंसक आंदोलनेही झालीत.                                                                               

हा विरोध शमविण्याचा एक भाग म्हणून नेहरूंनी काश्मीरच्या प्रतिनिधीना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा करार घडवून आणला होता.  काय होईल हा त्यांना प्रश्न पडला. परिणामी त्यांनी १९५२ चा करार अंमलात आणण्यास टाळाभारताचे सार्वभौमत्व व काश्मीरची स्वायत्तता यात सुवर्णमध्य साधण्याचा या कराराद्वारे नेहरूंनी प्रयत्न केला पण घडले उलटेच. या करारालाच स्वायत्ततेचा विरोध करणाऱ्यांनी विरोधाचा मुद्दा बनविला. या विरोधाने शेख अब्दुल्ला विचलीत झाले.  पंडीत नेहरू स्वतंत्र भारताचे सर्वोच्च व सर्वाधिक लोकप्रिय नेते असताना त्यांनी केलेल्या कराराला व काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध होत असेल तर नेहरू नंतरटाळ सुरु केली. यातून नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांचे संबंध ताणले गेले. नेहरूंचे म्हणणे होते की काश्मीरच्या नेत्यांनी जे मागितले ते आम्ही दिले. मग त्या करारात आम्हाला अपेक्षित असलेल्या बाबींची शेख अब्दुल्लाने पूर्ती करायला हवी. वास्तविक या करारामुळे जम्मू-काश्मीरला काहीही वेगळे मिळाले नव्हते. यात शेख अब्दुल्लांच्या इच्छे प्रमाणे एकच गोष्ट झाली. राज्याचे प्रमुख राजा-महाराजा असू नयेत तर विधानसभेने निवडलेला व्यक्ती त्या जागी असावा आणि त्याला महाराजा ऐवजी सादर- ए - रियासत हे नामाभिधान असावे या त्यांच्या म्हणण्याला करारात मान्यता देण्यात आली.


काश्मीरमध्ये आधीपासूनच पंतप्रधान पद होते. त्यामुळे या करारामुळे काश्मीरच्या मुख्यमंत्र्याचे नामाभिधान पंतप्रधान झाले असे म्हणणे चुकीचे आहे. तीच बाब काश्मीरच्या ध्वजाची आहे. काश्मीरचे पंतप्रधानपद किंवा काश्मीरचा ध्वज सामिलीकरणाच्या अटी व शर्तीनुसार कायम राहणार होता. १९५२ च्या कराराने या गोष्टी त्यांना मिळाल्या हा मोठा गैरसमज आहे. उलट या कराराने जम्मू-काश्मीर मध्ये जिथे जिथे राज्याचा ध्वज तिथे तिथे भारतीय राष्ट्रध्वज फडकणे अनिर्वाय झाले. काश्मीरचे सदर ए रियासत पद , पंतप्रधानपद आणि काश्मीरमध्ये काश्मीरचा ध्वज या करारामुळे मिळाला असा अपप्रचार करत त्याविरुद्ध उपरोक्त संघटनांनी काहूर उठवले. ज्यांना शांत करण्यासाठी नेहरूंनी हा करार करण्याची घाई केली तेच या कराराने अधिक चेकाळले. या करारा विरुद्धच्या आंदोलनाचा भाग म्हणून जनसंघ प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी बंदीहुकूम मोडून जम्मू-काश्मीर राज्यात गेले .तिथे त्यांना अटक झाली. अटकेत असताना त्यांचा आजार बळावला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे  १९५२ चा करार शेख अब्दुल्ला अंमलात आणण्यास इच्छुक आणि उत्सुक नसल्याने पक्षांतर्गत नेहरू यांचेवर दबाव वाढला. जो पर्यंत नेहरू आणि शेख अब्दुल्लात सख्य होते तो पर्यंत अब्दुल्लांच्या विरोधात उघडपणे कॉंग्रेसनेते बोलत नव्हते. कॉंग्रेसमध्येही असे अनेक नेते होते ज्यांच्यावर हिंदुत्वाचा पगडा होता. नेहरू-अब्दुल्ला संबंधात तणाव निर्माण झाल्यावर त्यांनी दिल्लीत शेख अब्दुल्ला विरुद्ध वातावरण तयार केले. शेख अब्दुल्लाना पदावरून बडतर्फ करण्यात आले आणि त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीर समस्येची ही सुरुवात आहे ज्याचे अपश्रेय अशाप्रकारे पंडीत नेहरूंकडे जाते. 

 -----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, August 14, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४०

 काश्मीर भारताचा भाग बनला या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही हे स्पष्ट असताना देशात काश्मीरच्या सामिलीकरणाला वादग्रस्त बनविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ आणि जम्मू-काश्मीरची प्रजा परिषद यांनी केले.
----------------------------------------------------------------------------------------


फाळणीची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीपासून पंडीत नेहरूंची नजर काश्मीरवर होती. फाळणी आधीच काश्मीर बाबत लॉर्ड माउंटबॅटन यांचेशी नेहरूंची चर्चा झाल्याच्या नोंदी आहेत. फाळणीची रेषा आखताना मुस्लीम बहुल गुरुदासपूर भारतात आले हा योगायोग नव्हता. गुरुदासपूर भारताकडे आलें नसते तर काश्मीरशी भारताचा संबंध तेव्हाच तुटला असता. काश्मीर मध्ये पाकिस्तानने कबाइली आणि कबाइलीच्या वेषात आपले सैन्य घुसविल्यामुळे तळ्यात मळ्यात करणाऱ्या राजा हरीसिंग यांना भारताकडे मदतीची याचना करावी लागली व मदत मिळविण्यासाठी सामीलनाम्यावर सही करावी लागली. हे सगळे घाईगडबडीत झाल्याने सामीलनामा अंतिम मानण्यात येवू नये व काश्मीरचे भवितव्य सार्वमताने ठरवावे अशी भूमिका लॉर्ड माउंटबॅटन यांनी घेतली व ती त्यावेळच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या गळी उतरविली आणि काश्मीरचे भारतात सामीलीकरण स्विकारताना काश्मिरातील परिस्थिती सामान्य झाल्यावर तिथली जनता सार्वमताने काश्मीरचे भवितव्य निश्चित करील असे पत्र राजा हरीसिंग यांना दिले. हे पत्र काश्मीर समस्येच्या मुळाशी आहे असा भ्रम आहे. युनोच्या ठरावातील अटींचे पालन करून सार्वमत शक्य होते पण पाकिस्तानने त्यातून काढता पाय घेतला व सार्वमताचा प्रश्न मागे पडला. नेहरू जाहीरपणे सार्वमताशी बांधिलकी व्यक्त करत होते तरी पाकिस्तानने जी परिस्थिती निर्माण केली त्यात सार्वमत शक्य नाही या निष्कर्षाप्रत नेहरू आले होते.                                                                                               

काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्या संबंधीचे जे टिपण नेहरूंनी २५ ऑगस्ट १९५२ रोजी शेख अब्दुल्लांना पाठविले त्यात त्यांनी हा निष्कर्ष स्पष्टपणे मांडला होता. शेख अब्दुल्ला तर त्याच्याही पुढे एक पाउल होते. १९५१ साली जम्मू-काश्मीर राज्यात निवडणूक होवून राज्याची घटना समिती बनली त्या समितीच्या उदघाटन भाषणात शेख अब्दुल्लांनी स्पष्टपणे सांगितले होते की काश्मिरात सार्वमत घेण्याची गरजच नाही.ही जी निवडून आलेली घटना समिती आहे त्यातून लोकेच्छा प्रकट झाली आहे व ही घटना समितीच काश्मीरचे भवितव्य ठरविण्यास अधिकार पात्र आहे. जम्मू-काश्मीरची घटना समिती जो निर्णय घेईल तो मान्य करण्यास भारत बांधील असल्याचे नेहरूंनीही १९५२ च्या शेख अब्दुल्लांना पाठविलेल्या टिपणात नमूद केले होते. शेख अब्दुल्लाच्या जम्मू-काश्मीर घटना समिती समोर केलेल्या भाषणात आणि नेहरूंच्या टिपणात आणखी एक महत्वाचे साम्य आहे.शेख अब्दुल्लांनी म्हंटले होते की आम्ही भारताची निवड केली आहे आणि भारता अंतर्गत काश्मीर राहील पण ते स्वायत्त असेल. भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० नूसार भारत आणि काश्मीरचे संबंध असतील. या संविधान सभेचे पहिले काम काश्मीरच्या भारता सोबतच्या झालेल्या सामीलीकरण करारावर शिक्कामोर्तब करणे असणार आहे. पंडीत नेहरूंनी देखील आपल्या टिपणात भारता अंतर्गत काश्मीर स्वायत्त राज्य असेल हे नमूद केले होते. त्यामुळे १९५२ पर्यंत काश्मीरच्या भवितव्या बद्दल आणि भारताशी काश्मीरचे संबंध कसे असतील याबाबत पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात एकवाक्यता होती.                                                                                                           

१९५० साली राज्यघटना देशात लागू झाली तेव्हा कलम ३७० मुळे भारताच्या राष्ट्रापतीचे अधिकार क्षेत्र काश्मीर पर्यंत विस्तारले होते आणि कलम ३७० च्या माध्यमातून घटनेच्या कलम १ मध्ये नमूद संघराज्याच्या यादीत जम्मु आणि काश्मीर राज्याचा समावेश झाला होता. सार्वमत घेण्यासारखी परिस्थिती नव्हती, शेख अब्दुल्लांचाही सार्वमताचा आग्रह नव्हता ,उलट विरोधच होता आणि जम्मू-काश्मीर राज्याची घटना समिती सामीलीकरण करारावर शिक्कामोर्तब करणार हे निश्चित होते . काश्मीर भारताचा भाग बनला या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही हे स्पष्ट असताना देशात काश्मीरच्या सामिलीकरणाला वादग्रस्त बनविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ आणि जम्मू-काश्मीरची प्रजा परिषद यांनी केले. हिंदुत्ववादी संघटनांनी आधी काश्मीरने भारतात सामील न होता राजा हरीसिंग यांनी स्वतंत्र काश्मीर राज्याची घोषणा करावी यासाठी प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या आक्रमणाने तो प्रयत्न फसला आणि राजा हरीसिंग यांना काश्मीर भारतात सामील करणे भाग पडले. काश्मीर भारतात सामील झाल्याने राजा हरीसिंग नामधारी बनले आणि जनतेचे नेते म्हणून काश्मीरची सारी सूत्रे शेख अब्दुल्ला यांचेकडे आली. या परिस्थितीशी जुळवून घेणे जम्मूतील अनेक वर्षे राज्यकर्ता राहिलेल्या डोग्रा हिंदुना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शक्य नव्हते. त्यात शेख अब्दुल्लांनी जमीन सुधारणा कायद्याची जमीन मालकांना कोणताही मोबदला न देता कडक अंमलबजावणी केली.                                                                       

जमीनदारात बहुसंख्य डोग्रा समाजाचा समावेश असल्याने त्यांना शेख अब्दुल्लाचा निर्णय रुचला आणि पचला नाही. म्हणून ते शेख अब्दुल्लाच्या विरोधात उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रिय असलेले राजा हरीसिंग यांचे शेख अब्दुल्ला हे कट्टर विरोधक होते. शेख अब्दुल्लांचे महत्व स्वीकारणे संघाला जड जात होते. शेख अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीर घटना समिती समोर केलेल्या पहिल्या भाषणात भविष्यातील काश्मीर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी असणार असल्याचे स्पष्ट केले होते. संघाला मान्य नसलेल्या या मुल्यांचा पुरस्कार दिल्लीतील सत्ताधारीही करत होते. दिल्ली आणि श्रीनगर मधील सत्ताधाऱ्याना अडचणीत आणण्यासाठी काश्मीरच्या स्वायत्ततेच्या मुद्द्याला वादग्रस्त बनविण्याचा चंग आरेसेसने बांधला. शेख अब्दुल्लांना स्वतंत्र निर्णय घेता येवू नये यासाठी त्यांचा काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध होता. हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रपतीला निवेदन देवून जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला विरोध दर्शविला. स्वायत्तता विरोधी वातावरण निर्मिती सुरु केली. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये देखील काश्मीरच्या स्वायत्त दर्जाला विरोध करणारे अनेक नेते होते. त्यांचाही दबाव नेहरूंवर होता. तत्व म्हणून काश्मीरचे भवितव्य काश्मीरच्या जनतेने आणि पर्यायाने जनतेने निवडलेल्या घटना समितीने ठरवायला त्यांची मान्यता असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारण लक्षात घेता काश्मीर भारतासाठी महत्वाचे असल्याने तेथील जनतेने नाराज होवून दूर जाण्याचा विचार करता कामा नये असे नेहरुंना वाटत होते. स्वायत्ततेच्या विरोधकांना व स्वायत्ततेच्या समर्थकांना शांत करण्यासाठी पंडीत नेहरूंनी काश्मीरच्या प्रतिनिधी सोबत एक करार केला. हा करार १९५२ चा दिल्ली करार म्हणून ओळखला जातो. या करारानंतर काश्मीर मुद्दा शांत होण्या ऐवजी जास्त तीव्र बनला. कराराचा उद्देश्य काश्मीरचे विलीनीकरण व काश्मीरची स्वायत्तता यात संतुलन राखण्याचा होता. चांगल्या उद्देश्याने केलेला हा करार काश्मीर समस्येच्या निर्मितीला निमित्त ठरला. 

------------------------------------------------------------------------------ 

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, August 8, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३९

 सार्वमताला अनुकुलते पासून सुरु झालेला काश्मीरचा धोरणात्मक प्रवास सार्वमताच्या प्रतिकुलतेत रुपांतरीत होण्यास आमची धोरणेच कारणीभूत ठरली आहे. याची सुरुवात नेहरू काळापासून झाली आणि ती खुद्द पंडीत नेहरूंनी केली. 
------------------------------------------------------------------------------------------


युनो मध्ये काश्मीर विषय नेल्याने आपले कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यावेळी युनोने केलेला ठराव पाकिस्तानला प्रतिकूल वाटल्याने पाकिस्तानने ठरावाची अंमलबजावणी करण्याचे टाळल्याने सार्वमताची पहाट उजाडली नाही. त्यावेळी काश्मिरी जनतेचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला भारता सोबत असल्याने भारताला काश्मीर प्रश्नावर सार्वमत घेतले तर आपलीच सरशी होईल असा विश्वास होता. पाकिस्तानला सार्वमत जिंकण्याचा विश्वास नसल्याने युनोच्या ठरावानुसार सार्वमत घेण्यासाठी युनोच्या ठरावातील पूर्वअटींची पूर्तता पाकिस्तानने केली नाही. सार्वमतात खोडा कोणी घातला असेल तर पाकिस्तानने. आज भारत सरकारने काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी देशद्रोही ठरविली आहे. वास्तविक त्याची गरज नव्हती. काश्मीरमध्ये सार्वमत होवू शकले नाही याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार आहे ही वस्तुस्थिती काश्मिरी जनतेच्या नंतरच्या पिढीला पटवून देण्यात कमी पडल्याने सार्वमताच्या मागणीला देशद्रोह ठरविण्याची पाळी आली. काश्मीर भारतात सामील झाल्यानंतर ५ वर्षेपर्यंत देशात आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सार्वमताने काश्मीरचे भवितव्य ठरविण्याचा वेळोवेळी पुनरुच्चार केला होता. आज मात्र काश्मीरमधून सार्वमत घेण्याची मागणी आमच्यासाठी अडचणीची ठरली आणि अशी मागणी देशद्रोही ठरविण्याची पाळी आमच्यावर आली.         

सार्वमताला अनुकुलते पासून सुरु झालेला काश्मीरचा धोरणात्मक प्रवास सार्वमताच्या प्रतिकुलतेत रुपांतरीत होण्यास आमची धोरणेच कारणीभूत ठरली आहे. याची सुरुवात नेहरू काळापासून झाली आणि ती खुद्द पंडीत नेहरूंनी केली. काश्मीरच्या भारतात सामिलीकरणाने आम्हाला आनंद झाला. सामिलीकरणाच्या अटी आणि शर्ती आम्ही मान्यही केल्या आणि देशांतर्गत राजकारणाच्या परिणामी त्या अटी व शर्ती आम्हाला नकोशा झाल्यात आणि त्याच्या उल्लंघनाची सुरुवात आम्हीच केली. मोदी सरकारचा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब हे त्यावेळच्या अटी आणि शर्तीचे उघडे नागडे उल्लंघन वाटत असले तरी हे निर्णय शवपेटी वर ठोकलेल्या शेवटच्या खिळ्या सारखे आहे. सामिलीकरणाच्या अटी व शर्तीची शवपेटिका तयार करण्याचे काम नेहरू काळात सुरु झाले आणि ही शवपेटिका तयार करतानाचा पहिला खिळा पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंनी ठोकला. नंतरच्या सर्व पंतप्रधानांनी आपापले योगदान देत शवपेटिकेचे काम पूर्ण केले आणि पंतप्रधान मोदींनी या शवपेटिकेवर शेवटचा खिळा ठोकला. 

सामिलीकरणाच्या वेळी जे ठरले त्याचे पालन न करण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला हे जनतेला समजत नाही आणि राज्यकर्त्यांना समजत असले तरी मान्य करण्याचे व मांडण्याचे धाडस त्यांचेकडे नाही. भौगोलिक आणि लोकसंख्येचे निकष हे काश्मीर भारतात सामील होण्यास प्रतिकूल असतानाही काश्मीर भारतात सामील झाले ते पंडीत नेहरू आणि शेख अब्दुल्लाची तशी इच्छा होती म्हणून. दोघांची इच्छा फार मोठा संघर्ष न करता  पूर्ण झाली ती पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे. काश्मीरचा राजा हरीसिंग यांची तर स्वतंत्र राहण्याची इच्छा होती आणि या इच्छेला सावरकर आणि आरेसेस यांनी खतपाणी घातले होते. पाकिस्तानने आक्रमण केल्याने राजा हरीसिंग यांना हतबल होवून भारताची मदत मागावी लागली. पाकिस्तानने आक्रमण केल्यानंतरही त्यांची इच्छा स्वतंत्र राहण्याचीच होती पण भारतात सामील झाल्याशिवाय भारत सैनिकी मदत करणार नाही हे स्पष्ट झाल्यावर राजा हरीसिंग यांनी सामिलीकरणाच्या दस्तावेजावर हस्ताक्षर केले. राजापासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या चळवळीचे नेते म्हणून शेख अब्दुल्ला ओळखले जात. त्यांना सुद्धा काश्मीर स्वत:च्या कल्पनेप्रमाणे घडवायचा होता. गांधी-नेहरूच्या विचाराने ते प्रभावित होते आणि म्हणून त्यांचा कल भारताकडे होता. या मागे दोन कारणे होती. ज्या प्रकारचा काश्मीर शेख अब्दुल्लांना घडवायचा होता ते भारतात राहूनच शक्य होते. भारतातील मुस्लीम सरंजामदार व जमिनदारांनी पाकिस्तान पसंत केले होते आणि ज्या जामीन सुधारणा शेख अब्दुल्लांना राबवायच्या होत्या त्याला पाकिस्तानात विरोध झाला असता. भारतात सामील झालो नाही तर पाकिस्तान आपला घास घेईल ही भीती असल्याने शेख अब्दुल्लांचा कल भारतात सामील होण्याकडे होता.                                                                                         

काश्मीर स्वतंत्र राहणे व्यावहारिक नसल्याने शेख अब्दुल्लाने स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार केला नाही पण भारता अंतर्गत त्यांना पूर्ण स्वायत्तता हवी होती. सामिलीकरणाच्या अटी व शर्ती लक्षात घेता त्यांना हवी असलेली स्वायत्तता भारतात मिळण्याची शाश्वती होती आणि पंतप्रधान नेहरू यांचेवर पूर्ण विश्वास असल्याने शेख अब्दुल्लाने काश्मीरचे सामीलीकरण पाकिस्तान ऐवजी भारतात होण्यासाठी पुढाकार घेतला. भारतात इतर राज्यासारखे एक राज्य म्हणून काश्मीर राहील हे कधीच त्यांच्या मनात नव्हते. भारता अंतर्गत अधिकतम स्वायत्तता हीच त्यांची इच्छा आणि लक्ष्य होते. काश्मिरी जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार त्यावेळी मान्य करण्यात आला. सामिलीकरणा सोबत विलीनीकरणाचा आग्रह इतर राज्यांच्या बाबतीत धरला होता तसा काश्मीर बाबतीत भारताने धरला नाही आणि तसा आग्रह धरण्याची परिस्थिती देखील नव्हती.   

 हा प्रश्न सर्वस्वी काश्मिरी जनतेच्या इच्छेवर सोडण्यात आला आणि त्यामुळेच भारतात सामील होण्याला काश्मिरी जनतेचा विशेषत्वाने काश्मिरी मुसलमानांचा विरोध झाला नाही. काश्मीरचे भवितव्य तेथील जनता ठरवील या भारताने दिलेल्या वचनाची घटनात्मक अभिव्यक्ती म्हणून घटनेत कलम ३७० आले. असे अभिवचन देतांना नेहरू आणि इतर भारतीय नेत्यांना मात्र मनापासून काश्मीर इतर राज्या सारखाच भारताचा भाग बनावा ही इच्छा होती व कालांतराने तसे होईल ही खात्रीही होती. भारतीय नेत्यांची ही इच्छा आणि भारता अंतर्गत स्वायत्त राहण्याचा काश्मिरी जनतेचे नेते शेख अब्दुल्ला यांचा आग्रह यातून काश्मीर प्रश्नाची निर्मिती झाली. शेख अब्दुल्लांना काश्मीरच्या संविधानानुसार काश्मीरचा राज्यकारभार करायचा होता तर भारताला विशेषत: नेहरुंना भारतीय संविधान काश्मीर मध्ये लागू करण्याची घाई झाली होती. पूर्ण संविधान नाही पण किमान महत्वाच्या तरतुदी लागू व्हाव्यात यासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी आणि काश्मीर सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होवून १९५२ चा नवी दिल्ली करार मान्य करण्यात आला. भारताच्या सोयीच्या आणि हिताच्या या कराराला भारतातातील हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या तीव्र विरोधाचा परिणाम शेख अब्दुल्ला यांच्या बिथरण्यात झाला.  

-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Friday, August 1, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३८

 पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला.
------------------------------------------------------------------------------------

 
कलम ३७० रद्द केल्याने काश्मीर प्रश्न संपला किंवा सुटला हा काश्मिरेतर भारतीयांचा भ्रम पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने बऱ्याच अंशी दूर झाला पण असा दहशतवादी हल्ला प्रश्न संपला की नाही याचा मापदंड असू शकत नाही. हा हल्ला कलम ३७० शी निगडीत नाही. कधीही आणि कोणत्याही दहशतवादी गटाने किंवा संघटनेने कलम ३७० च्या पुनर्स्थापनेची मागणी केलेली नाही. काश्मीरखोऱ्यातील जनतेची ती मागणी आहे आणि त्यांनी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीतून प्रकट केली आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मिरातील घडामोडीचा जो आढावा इथे घेतला आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कलम ३७० मधील नमूद प्रक्रियेचा उपयोग करून पंडीत नेहरू पासून नरेंद्र मोदी पर्यंतच्या केंद्रातील सरकारने स्वत: मान्य केलेल्या काश्मीरच्या स्वायत्ततेचा गळा घोटण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला. काश्मीर बाबत ज्या करणासाठी संघ,जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी नेहरुंना सातत्याने दोष देत आली त्या बाबतीत पंडीत नेहरू पूर्णपणे निर्दोष आहेत. नेहरूंनी काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्यासाठी सार्वमताला मान्यता दिली, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात नेला , पाकव्याप्त काश्मीर न घेताच शस्त्रसंधी केली आणि कलम ३७० चे निर्माता नेहरू आहेत आणि यातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि याला सर्वस्वी नेहरू जबाबदार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या राजकीय शाखेचे म्हणजे जनसंघ-भारतीय जनता पार्टीचे मत. १९५२ पासून ते वर्तमान काळापर्यंत हिरीरीने आणि चिकाटीने ही मंडळी असे मत मांडत आली आहे. याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत कॉंग्रेस मागे राहिल्याने सर्वसामान्य जनताही या मताची बनत गेली. नेहरू संघ परिवार म्हणतो त्या कोणत्याही बाबतीत दोषी नाहीत आणि तरीही त्यांनी काश्मीर समस्येचा पाया घातला तो कसा हे नीट समजून घेतले तर काश्मीरची नेमकी समस्या आपल्या लक्षात येईल.                                                   

काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय असला तरी त्यात प्रमुख भूमिका नेहरूंची होती हे खरे. काश्मीरवर व पर्यायाने भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले आहे आणि त्या बाबतीत पाकिस्तानला दोषी ठरवून आपल्या हद्दीत परत जाण्याचा आदेश द्या अशी तक्रारवजा मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली. भारताने संयुक्त राष्ट्राकडे न जाता पाकिस्तानने ताब्यात घेतलेला भाग जिंकून घ्यायला हवा होता असा संघ परिवाराने निर्माण केलेला मतप्रवाह आहे. असे म्हणण्यामागे भारताने युद्ध थांबवून संयुक्त राष्ट्राकडे धाव घेतली असा समज या मागे आहे जो खरा नाही. भारत संयुक्त राष्ट्रात गेला तरी काश्मिरात युद्ध चालूच होते. राजा हरीसिंग यांनी काश्मीर भारतात सामील करण्याच्या सामीलनाम्यावर सही करेपर्यंत [२६ ऑक्टोबर १९४७] पाकिस्तानी घुसखोर श्रीनगरच्या सीमेजवळ पोचले होते. भारतीय सैन्य दुसऱ्या दिवशी श्रीनगरला उतरले आणि घूसखोरा विरुद्ध लढाई सुरु केली. ही लढाई सुरु असताना भारताने १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानी आक्रमणा विरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्या नंतरही युद्ध सुरूच ठेवले. भारताच्या तक्रारीवर संयुक्त राष्ट्र संघाने ४ महिन्या नंतर निर्णय घेत ठराव केला. या ठरावात तेच होते ज्याची मागणी भारताने केली होती. संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तानला सर्व घुसखोरांना व आपल्या सैन्याला परत घ्यायला सांगितले तर भारताने गरजेपुरते सैन्य काश्मीरमध्ये ठेवून अतिरिक्त सैन्य परत घ्यायला सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची तक्रार खरी मानून पाकिस्तानला आक्रमक ठरवले आणि परत जायला सांगितले. ठरावातला दुसरा मुद्दा होता काश्मीरच्या जनतेला भारतात राहायचे की पाकिस्तानात याचा निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याचा. भारताने तर सामिलीकरणाच्या वेळीच सार्वमत घेण्याचे मान्य केले होते त्यामुळे या मुद्द्यावरही भारताच्या म्हणण्यानुसार निर्णय झाला. मग संयुक्त राष्ट्र संघात भारता विरोधात कोणताच निर्णय झाला नसताना संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याची चूक झाली असे कसे म्हणता येईल.                                                                                                                   
भारत संयुक्त राष्ट्र संघात जाण्याआधी दोन महिने युद्ध सुरु होते, संयुक्त राष्ट्र संघाचा ठराव ४ महिन्यानंतर झाला तेव्हाही युद्ध चालूच होते आणि हा ठराव झाल्या नंतरही तब्बल ९ महिने युद्ध चालू होते! श्रीनगर पर्यंत आलेल्या पाकिस्तानी घुसखोर आणि सैनिकांना मागे ढकलत भारतीय सेनेने दोन तृतीयांश भागावर कब्जा मिळविला. मोठा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यातून परत मिळविल्या नंतर हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला होता. दोन दिवस नेहरूंनी युद्धविराम टाळला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता हा निव्वळ अपप्रचार आहे. पाकिस्तान विरूद्धचे १९६५ चे युद्ध १७ दिवस आणि १९७१ चे युद्ध १३ दिवस चालले हे लक्षात घेतले तर अत्यल्प संसाधने असताना १५ महिने युद्ध चालल्याने त्यावेळच्या परिस्थितीत किती ताण आला असेल याची कल्पना येईल. संयुक्त राष्ट्र संघाने ऑगस्ट १९४८ मध्ये आपल्या मूळ ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली. दोन्ही देशांनी सार्वमत घेवून काश्मीर प्रश्न सोडवायला मान्यता दिल्याने युद्ध चालू ठेवणे शहाणपणाचे नव्हते म्हणून भारताने शस्त्रसंधी स्वीकारली. पुढे पाकिस्ताननेच सैन्य मागे घेण्यास नकार दिल्याने सार्वमत घेता आले नाही. या सगळ्या प्रकरणात भारताची कोणती चूक झाली असेल तर ती ही होती की संयुक्त राष्ट्र संघाचा तो ठराव अंमलात यावा यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत. संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका व इंग्लंडची त्यावेळची दादागिरी बघून पंडीत नेहरूंचा संयुक्त राष्ट्र संघा बद्दल मोह्भंग झाला व आपण उगीच संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावले अशी त्यांची भावना झाली होती. असे असले तरी  संयुक्त राष्ट्र संघात गेल्यामुळे कुठलाही आपल्या हिताच्या विपरीत निर्णय आपल्याला मान्य करावा लागलेला नाही. उलट आपल्याला पाहिजे तसा ठराव संयुक्त राष्ट्र संघाने केला .आधी त्या ठरावाला पाकिस्तानने मान्यता दिली पण नंतर अंमलबजावणी करण्याचे टाळले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात जाण्याचा भारताला फारसा फायदा झाला नाही असे म्हणता येईल. पण गेल्याने तोटा झाला असे म्हणायला काहीच आधार नाही. संयुक्त राष्ट संघात जाणे हे पाकिस्तानला आक्रमक ठरवून त्याला मागे जाण्याचा आदेश देण्याच्या मर्यादे पर्यंत होते. ज्याला काश्मीर प्रश्न म्हणतो तो सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाला मध्यस्थी करण्यास तेव्हा किंवा नंतर कधीही भारताकडून सांगण्यात आले नाही किंवा मध्यस्थी स्वीकारण्यात आली नाही. संयुक्त राष्ट्र संघात जाण्याने आपला कोणताही तोटा झाला नसताना नेहरुंना दुषणे देणे चुकीचे आहे. पण नंतर जे नेहरूंनी केले त्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. 


------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८