Friday, September 26, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४५

पंडीत नेहरुंना काश्मीर भावनिक आणि धोरणात्मक दृष्ट्या भारतात आले पाहिजे असे वाटत होते. स्वत: काश्मिरी पंडीत असणे हा त्यातला भावनिक भाग होता तर काश्मीर भारतात समाविष्ट झाला नाही तर उत्तरेकडील सर्व सीमाच असुरक्षित राहील हा धोरणात्मक विचार होता. 
----------------------------------------------------------------------------------

              
१९५२ च्या दिल्ली कराराच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून शेख अब्दुल्लाच्या बडतर्फीचे आणि अटकेचे महाभारत घडले तो करार अंमलात कधी आला तर १९५४ मध्ये. जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेने मान्यता दिल्या नंतरच १९५४ मध्ये राष्ट्रपतींनी या संबंधीची अधिसूचना जारी केली. १९५२ चा करार करण्याची घाई न करता भारता बरोबरचे संबंध कसे राहतील हे तिथल्या संविधान सभेला ठरवू दिले असते तर शेख अब्दुल्लांना अटक करण्याची अप्रिय घटना टळली असती. भारता बरोबरचे संबंध ठरविण्याचा जम्मू-काश्मीर संविधान सभेचा घटनात्मक आणि नैतिक अधिकार केंद्र सरकारने मान्य केला होताच. शेवटी संविधान सभेने भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी काश्मीरचे सर्वोच्च नेते शेख अब्दुल्ला या निर्णयात सहभागी नव्हते. ते तुरुंगात होते. हाच निर्णय शेख अब्दुल्लाच्या उपस्थितीत झाला असता तर पुढचा घटनाक्रम वेगळा राहिला असता. केंद्र सरकारला शेख अब्दुल्लाच्या निर्णयाविषयी खात्री नसल्याने अटकेचे आततायी पाउल उचलले गेले. काश्मीरला भारतासोबत भारताचा भाग बनून राहायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार तिथल्या जनतेचा हे भारत सरकारने वचन दिले होते आणि कलम ३७० द्वारे त्या वचनाची वैधानिक पुष्टी केली होती तरी त्यांचा निर्णय स्वीकारण्याची मनापासून तयारी नव्हती हेच शेख अब्दुल्लाच्या अटकेतून ध्वनित होते. पंडीत नेहरुंना काश्मीर भावनिक आणि धोरणात्मक दृष्ट्या भारतात आले पाहिजे असे वाटत होते. स्वत: काश्मिरी पंडीत असणे हा त्यातला भावनिक भाग होता तर काश्मीर भारतात समाविष्ट झाला नाही तर उत्तरेकडील सर्व सीमाच असुरक्षित राहील हा धोरणात्मक विचार होता.               

काश्मीरला भारतासोबत जोडण्यासाठी शेख अब्दुल्लाच मुख्य भूमिका निभावू शकतात याची त्यांना जाणीव असल्याने स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच त्यांनी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने शेख अब्दुल्ला व त्यांच्या पक्षाशी जवळीक साधली होती. याचे फळ देखील भारताच्या पदरात पडले. काश्मीरला भारतात सामील करण्यासाठी स्वत: शेख अब्दुल्लांनी पुढाकार घेतला. पण हा पुढाकार घेताना शेख अब्दुल्लाची भूमिका स्पष्ट होती. भारतीय संघराज्यात आम्ही सामील होवू पण सामिलनाम्यात ज्या विषयावर भारताला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत ते वगळता जम्मू-काश्मीर संबंधीचे सगळे निर्णय आम्ही घेवू. अशा प्रकारच्या स्वायत्त काश्मीरची त्यांची स्पष्ट भूमिका होती. जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेत केलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी याच भूमिकेचा स्पष्ट शब्दात पुनरुच्चार केला होता. काश्मीरला आपले स्वातंत्र्य व आपली लोकशाही टिकवायची असेल , आपल्या स्वप्नातील काश्मीर घडवायचा असेल तर भारतासारख्या लोकशाही राष्ट्राच्या पाठबळाची गरज आहे. भारतातच आपण स्वतंत्र राहू शकतो. भारताबाहेर राहिलो तर पाकिस्तान सारखे देश आपला घास घेतील हे त्यांनी मांडून भारतात सामील होण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते. भारताच्या संविधान सभेने आणि भारत सरकारने ही भूमिका मान्य केली हाच कलम ३७० घटनेत सामील केल्याचा अर्थ होता. ही भूमिका देशातील व जम्मूतील राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणीत हिंदुत्ववादी संघटना व पक्षांना मान्य नव्हती म्हणून त्यांनी १९५२ च्या दिल्ली करारा विरुद्ध काहूर उठविले आणि भारतात सामील होण्याचा आपला निर्णय चुकला तर नाही ना हा संभ्रम शेख अब्दुल्लाच्या मनात निर्माण केला. अशावेळी भारत सरकारचे प्रमुख म्हणून पंडीत नेहरूंनी शेख अब्दुल्लांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची गरज होती. पण पंडितजी स्वत: सामिलनाम्या व्यतिरिक्त आणखी संवैधानिक तरतुदी लागू करण्याबाबत आग्रही व उतावीळ बनल्याने शेख अब्दुल्लाचा संभ्रम वाढला.

 भारतीय संघराज्य निर्मितीत आणि उभारणीत हिंदुत्ववादी संघटना व पक्षांचा कोणताच सहभाग नव्हता उलट संघराज्य निर्मितीत आणता येईल तेवढे अडथळे त्यांनी आणल्याचा इतिहास आहे. अनेक संस्थानांना भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्यासाठी त्यांनी चिथावणी दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अगदी काश्मीरच्या बाबतीत देखील त्यांनी हेच केले होते. राजा हरीसिंग यांनी भारतात सामील न होता स्वतंत्र राहावेत यासाठी प्रयत्न झालेत. राजा हरीसिंगलाही तेच हवे होते पण पाकिस्तानी घुसखोरांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरविले व काश्मीर भारतात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध राजाचे सैनिक किंवा हिंदुत्ववादी लढले नाहीत तर भारतीय सैनिकाची साथ आणि मदत केली ती शेख अब्दुल्लाचे नेतृत्व मानणाऱ्या जनतेने. खरेतर हिंदुत्ववादी संघटनांनी आणि विशेषत: जम्मूतील हिंदुत्ववाद्यांनी शेख अब्दुल्लांचे ऋणी असायला हवे होते की त्यांच्यामुळे पाकिस्तान सारख्या धर्मांध देशात आपल्याला जावे लागले नाही. पण त्यांना लोकशाही मार्गाने राज्य करणारा मुस्लीम नेता नको होता. त्यांच्या कारवाया शेख अब्दुल्लांना भारतापासून दूर लोटण्यात यशस्वी झाल्या. काश्मीर भारतात राहण्यासाठी शेख अब्दुल्ला भारताच्या बाजूने राहणे अपरिहार्य आहे हे  पंडीत नेहरुंना माहित असताना हिंदुत्ववादी संघटनांना रोखून शेख अब्दुल्लांना जवळ आणण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी त्यांनी शेख अब्दुल्लांना अटक करून आणखी दूर लोटले. तांत्रिकदृष्ट्या शेख अब्दुल्लांच्या अटकेशी नेहरूंचा संबंध नाही. जम्मू-काश्मीरचे राजप्रमुख असलेले डॉ. करणसिंग यांच्या आदेशाने शेख अब्दुल्लाना पंतप्रधान पदावरून बडतर्फ करण्यात आले व अटक करण्यात आली असली तरी नेहरूंच्या संमती शिवाय हे घडणे शक्य नव्हते. १९३० पासूनच शेख अब्दुल्ला राजा हरीसिंग विरुद्ध लढत आले होते त्यामुळे राजप्रमुख पदास व त्या पदावर राजघराण्यातील राजकुमारास बसविण्यास शेख अब्दुल्लांचा विरोध होता. पण जम्मूतील हिंदुना आणि काश्मिरातील पंडीत समुदायांना सुरक्षित वाटेल म्हणून राजपुत्र करणसिंग यांना त्या पदावर राहू द्यावे असा नेहरूंनी आग्रह धरला आणि शेख अब्दुल्लांनी नेहरूंचा आग्रह मानला. पुढे नेहरूंचा हाच आग्रह त्यांच्यासाठी गळफास बनला. 

------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, September 18, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४४

 पंडीत नेहरू हयात असताना आणि पदावर असतांना जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला आणि स्वायत्ततेचे अभिवचन देणाऱ्या कलम ३७० ला विरोध होत असेल तर नेहरू नंतर काय होईल असा प्रश्न त्यावेळी शेख अब्दुल्ला यांनी विचारला होता. पण नेहरू नंतर जे घडण्याची आशंका त्यांना वाटत होती ते नेहरू राजवटीतच घडले ! 
--------------------------------------------------------------------------------------------


नेहरू काळात शेख अब्दुल्लांना झालेल्या अटकेच्या आधी राजा हरीसिंग यांनी शेख अब्दुल्लांना १९४६ साली राजद्रोहाच्या आरोपावरून अटक केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 'भारत छोडो' हे महत्वाचे आंदोलन होते. त्यापासून प्रेरणा घेवून शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  काश्मिरात राजा हरीसिंग यांच्या विरुद्ध 'काश्मीर छोडो' आंदोलन सुरु करण्याची परिणती अब्दुल्लांच्या अटकेत झाली होती. काश्मिरात राजेशाही समाप्त करून लोकतांत्रिक सरकार स्थापन करण्याच्या उद्देश्याने 'काश्मीर छोडो' चळवळ सुरु झाली होती. भारताने या चळवळीला पाठींबा दिला होता. भारताने शेख अब्दुल्ला यांच्या अटकेचा तीव्र निषेध आणि विरोध नोंदवून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. केवळ मागणी करून न थांबता पंडीत नेहरूंनी शेख अब्दुल्लांच्या सुटकेसाठी आणि काश्मीरच्या लोकलढ्याला सक्रीय पाठींबा देण्यासाठी काश्मिरात जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीर प्रवेशावर राजाने घातलेली बंदी मोडून नेहरू काश्मीरला गेले. तिथे त्यांना अटक करण्यात आली. भारतात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने राजा हरीसिंग यांनी नेहरूंची तत्काळ सुटका केली. या घटनेने शेख अब्दुल्ला व काश्मिरी जनता भारताच्या अधिक जवळ आली होती. भारताप्रती आधीपासून असलेला विश्वास या घटनेमुळे अधिक वृद्धिंगत झाला होता. काश्मीरला भारताशी जोडण्याच्या बाजूने वजन टाकण्याची शेख अब्दुल्लांची जी अनेक कारणे होती त्यापैकी राजेशाहीच्या विरोधात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनास भारताने दिलेला पाठींबा हे एक महत्वाचे कारण होते.
 

भारतात राहिल्याने काश्मिरातील धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादाचे स्वप्न साकार होईल , पाकिस्तान त्यासाठी अनुकूल नाही या शेख अब्दुल्लांच्या मताला या घटनेने पुष्टी मिळाली होती. नवनिर्मित पाकिस्तानचा शेख अब्दुल्लांच्या समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही मताला विरोध होता आणि राजा हरीसिंग यांना पाठींबा होता. राजा हरीसिंग यांनी शेख अब्दुल्लांना केलेल्या अटकेमुळे शेख अब्दुल्ला व काश्मिरी जनता भारताच्या जितक्या जवळ आली होती ती नेहरू काळात शेख अब्दुल्लांना झालेल्या अटकेमुळे तितकीच दूर गेली. विश्वासाचे रुपांतर अविश्वासात झाले. नेहरू काळात शेख अब्दुल्लांना अटक होईपर्यंत काश्मिरात सार्वमत घेण्याची शेख अब्दुल्लांनी कधीच मागणी केली नव्हती. सार्वमताचा प्रस्ताव भारताचा होता आणि सार्वमताची मागणी पाकिस्तानची होती. शेख अब्दुल्लांच्या १९५३ साली झालेल्या अटकेनंतर चित्र बदलले. शेख अब्दुल्ला सोबत अटक झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी 'जम्मू-काश्मीर सार्वमत आघाडी'ची स्थापना केली. अधिकृतपणे या आघाडीत शेख अब्दुल्ला कधीच सामील झाले नाहीत तरी या आघाडीच्या स्थापनेमागे त्यांची प्रेरणा व बळ होते हे कोणीही अमान्य करू शकत नव्हते. तुरुंगा बाहेर असलेल्या शेख अब्दुल्ला समर्थक व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सार्वमत घेण्याचा विचार जनतेत रुजवायला सुरुवात केली. सार्वमताच्या विचारासोबत भारताबद्दलची अविश्वासाची भावनाही रुजायला आणि वाढायला लागली. नेहरू काळात शेख अब्दुल्लांना झालेल्या अटकेतून काश्मीर समस्येचे बीज अशाप्रकारे पेरले गेले. 

शेख अब्दुल्लांच्या अटकेआधी जम्मू-काश्मीर भारतात सामील होणार की नाही असा मुद्दाच नव्हता. काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्यासाठी सार्वमत घेण्याचा मार्ग स्वत: शेख अब्दुल्ला यांनी फेटाळला होता. सामिलीकरणा बाबत त्यांच्या मनात संभ्रम किंवा अनिच्छा असती तर जेव्हा पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेची काही कलमे लागू करण्याचा अध्यक्षीय आदेश निघाला तेव्हाच शेख अब्दुल्लांनी विरोध केला असता. घटनेच्या कलम ३७० प्रमाणे असा आदेश काढण्यासाठी जम्म-काश्मीर सरकारची संमती आवश्यक होती आणि त्यावेळेस जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान शेख अब्दुल्लाच होते. त्यांनी संमती दिली म्हणून घटनेची काही कलमे जम्मू-काश्मीरला लागू करण्याचा आदेश भारताच्या राष्ट्रपतीच्या सहीने निघू शकला. २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरु झाला त्याच दिवशी जम्मू-काश्मीर सरकारच्या सहमतीने राष्ट्रपतींनी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेच्या ३९५ कलमांपैकी ९८ कलमे जम्मू-काश्मिरात लागू करण्याचा आदेश काढला. या आदेशाला जम्मू-काश्मीर मधून कोणी विरोध केल्याची नोंद नाही. जम्मू-काश्मीरचे राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात सामील करण्याच्या ज्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली होती त्याच्याशी सुसंगत असाच राज्यघटनेतील ९८ कलमे जम्मू-काश्मीर मध्ये लागू करण्याचा राष्ट्रपतीचा आदेश होता. सामीलनाम्यानुसार संरक्षण,दळणवळण आणि परराष्ट्र धोरण या तीन विषयात जम्मू-काश्मीरच्या वतीने निर्णय घेण्याचे , त्यासंदर्भात अस्तित्वात असलेली कायदे लागू करण्याचे आणि त्या विषया संदर्भात नवे कायदे करण्याचा अधिकार भारत सरकारला होता. सामिलनाम्यानुसार राज्यघटनेची कलमे लागू झालीत यावर आक्षेप नव्हताच. यापुढे जावून भारतीय राज्यघटनेची इतर कलमे जम्मू-काश्मिरात लागू करण्याची जी घाई झाली त्यातून काश्मीरबाबत अनर्थकारी घटनांची मालिका सुरु झाली.             


यातील पहिली घटना म्हणजे शेख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरच्या पंतप्रधान पदावरून बडतर्फ करून अटक करण्याची होती. राज्यघटनेचा जम्मू-काश्मीरमध्ये विस्तार करण्यासाठी करण्यात आलेला १९५२ चा दिल्ली करारही शेख अब्दुल्लांनी मान्य केला होताच. पण या कराराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघसंलग्न संघटना आणि पक्षांनी केलेला तीव्र आणि हिंसक विरोध यामुळे शेख अब्दुल्ला विचलीत झाले आणि राज्यघटनेची अन्य कलमे काश्मिरात लागू करण्याबाबत पुनर्विचार करू लागलेत. अशावेळी पंतप्रधान नेहरू आणि केंद्र सरकारने कोणी कितीही विरोध केला तरी समिलनाम्याच्या वेळी दिलेल्या आश्वासनाचे पालन होईल याबाबत शेख अब्दुल्लांना आश्वस्त करण्याची गरज होती. संघ आणि संघप्रणीत संस्था संघटनांचा विरोध चुकीचा आहे हे सांगण्या ऐवजी आणि तो विरोध मोडून काढण्यासाठी त्यांचेवर कायदेशीर करण्याऐवजी केंद्र सरकारने बेकायदेशीर निर्णय घेत शेख अब्दुल्लानाच त्यांच्या पदावरून बडतर्फ करून अटक केली. पंडीत नेहरू हयात असताना आणि पदावर असतांना जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेला आणि स्वायत्ततेचे अभिवचन देणाऱ्या कलम ३७० ला विरोध होत असेल तर नेहरू नंतर काय होईल असा प्रश्न त्यावेळी शेख अब्दुल्ला यांनी विचारला होता. पण नेहरू नंतर जे घडण्याची आशंका त्यांना वाटत होती ते नेहरू राजवटीतच घडले ! राज्यघटनेतील कलमांचा दुरुपयोग करत निर्वाचित सरकारांना बडतर्फ करण्याची अनैतिक परंपरा काश्मीर पासून सुरु झाली. पण आपल्याकडे मान्यता अशी आहे की अशी सुरुवात केरळ पासून झाली. काश्मीरमध्ये नेहरूंनी जे केले ते योग्यच होते अशी आमची धारणा आहे. 'राष्ट्रवादा'च्या आड काय काय चालून जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, September 5, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १४३

 भारतीय संविधानाची कलमे काश्मिरात लागू करण्याच्या घाईतून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. या घाईने भारताच्या हेतूबद्दल शेख अब्दुल्लाच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्यांनी त्याला विरोध केला. परिणामी त्यांना अटक करण्यात आली. अटके नंतर सार्वमताचे भूत बाटली बाहेर आले ! 
------------------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीरचे नेते शेख अब्दुल्ला यांना झालेली अटक काश्मीर प्रश्नाचा प्रारंभ बिंदू आहे आणि केंद्र बिंदूही आहे. इथे एका व्यक्तीला झालेली अटक महत्वाची नाही. या मागचे नेमके कारण महत्वाचे आहे आणि ते समजले तरच काश्मीर प्रश्न समजेल. ज्यांना काश्मीर प्रश्न कळलाच नाही तेच कलम ३७० कडे बोट दाखवतात. कलम ३५ अ कडे अंगुली निर्देश करतात. नेहरूंनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेत नेवून घोडचूक केली म्हणतात. काश्मीर पटेलांनी हाताळले  असते तर कोणताच प्रश्न निर्माण झाला नसता वगैरे वगैरे. या सगळ्या निरर्थक व अज्ञानमूलक गोष्टी आहे. काश्मीर बाबत भारतीय नेतृत्व व त्यावेळचे काश्मीरचे नेतृत्व यांच्या धारणा आणि स्वप्न भिन्न होती. काश्मीर प्रश्न म्हणजे या भिन्न धारणा आणि भिन्न स्वप्न यातील संघर्षातून निर्माण झाला आहे. काश्मीर बाबतची भारताची अधिकृत भूमिका आणि या भूमिकेच्या विपरीत काश्मीर बाबतची धोरणे अंमलात आणण्याची घाईच काश्मीर बाबत नडली आहे. काश्मीर बाबत भारताची अधिकृत भूमिका म्हणजे स्वीकारलेला सामीलनामा आणि सामीलनाम्यातील अटीशर्तीना कलम ३७० नूसार दिलेली संवैधानिक मान्यता आहे. तत्कालीन सर्वपक्षीय सरकारचा आणि संविधान सभेचा हा एकमुखी निर्णय होता. या निर्णयाचे सार एकच होते आणि ते म्हणजे काश्मीर बाबत निर्णय घेण्याचा प्रथम आणि अंतिम अधिकार जम्मू-काश्मीरच्या जनतेचा आहे. ही बाब तत्त्वतः मान्य करून व्यवहारात मात्र वेगळी पाउले उचलण्याची घाई केली गेली. भारताची काश्मीर बाबतची भूमिका जशी कलम ३७० मधून स्पष्ट होते तशी काश्मीर नेतृत्वाची काश्मीर बाबतची भूमिका काश्मीरच्या निर्वाचित संविधान सभेत शेख अब्दुल्ला यांनी केलेल्या पहिल्या भाषणातून स्पष्ट होते.                                                                                                                             

भारतीय संघराज्यात इतर संस्थानांचे जसे बिनशर्त विलीनीकरण झाले तसे काश्मीरचे झाले नाही ही बाब शेख अब्दुल्लांच्या या भाषणातून [आणि कलम ३७० मधून देखील } स्पष्ट होते. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचे कामकाज सुरु झाले त्यावेळी त्या दिवशी केलेल्या भाषणात शेख अब्दुल्ला यांनी म्हंटले होते की काश्मीरचे भारतात सामीलीकरण सशर्त झालेले आहे. सामीलीकरण सशर्त असले तरी आपण विचाराने भारताशी जोडले गेलेलो आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हा काश्मीर आणि भारतातील समान दुवा आहे. धर्माधारित पाकिस्तान हे जम्मू-काश्मीरच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक व आपण जतन केलेल्या मूल्यांशी  विसंगत असल्याने आपण भारताची निवड केली आहे. याचा अर्थ आपण भारताचे प्रभुत्व स्वीकारले असा होत नाही.  काश्मीरच्या स्वायत्ततेच्या हमी आधारित समानतेच्या पायावर आपले हे संबंध असणार आहेत. या भाषणात पुढे त्यांनी नि:संदिग्ध शब्दात स्पष्ट केले होते की, जम्मू-काश्मीर राज्याने संरक्षण, विदेशनीती व दळणवळण हे तीन विषय केंद्र सरकारच्या अधीन ठेवण्याचे मान्य केले आहे आणि बाकी विषया संदर्भात निर्णय घेण्यास काश्मीर पूर्णत: स्वायत्त असणार आहे. तीन विषय वगळता बाकी विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार अबाधित राखण्यावर या भाषणात त्यांनी जोर दिला होता. भारत आणि काश्मीर यांचे संबंध कलम ३७० नूसार असतील. पूर्ण विली नाही तर भारता अंतर्गत स्वायत्त काश्मीर ही शेख अब्दुल्लांची अवधारणा होती. काश्मीर बाबत भारतीय नेतृत्वाच्या मनात काहीही असले तरी शेख अब्दुल्लांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमती व्यक्त केली होती . जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेबाबत केवळ सहमतीच नव्हती तर कलम ३७० अन्वये तशी हमी देण्यात आली होती. 


याच भाषणात त्यांनी भारताच्या अनुकूल काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. काश्मीरवर पाकिस्तानचा दावा निराधार आहे. पाकिस्तान टोळीवाल्यांना पाकिस्तानात घुसवून हिंसाचार माजविण्यास जबाबदार आहे. पाकिस्तानने बळजबरीने ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याची अट न पाळल्याने संयुक्तराष्ट्र संघाच्या निर्देशानुसार सार्वमत घेणे शक्य नाही. काश्मीरच्या जनतेने निवडून दिलेली संविधान सभाच काश्मीर बाबत निर्णय घेवू शकते आणि तसा निर्णय घेण्यासाठी काश्मीरच्या संविधान सभेच्या कामकाजाला प्रारंभ होत असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले होते. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार काश्मीरच्या संविधान सभेचा असल्याचे भारत सरकार तर्फे नेहरूंनी जाहीरपणे मान्य देखील केले होते. संविधान सभेच्या निवडून आलेल्या सदस्यांचा शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांनी भाषणात ज्या बाबी स्पष्ट केल्या होत्या त्यावर शिक्कामोर्तब केले असते. भारतापासून वेगळे होण्याचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नव्हती. तेव्हा काश्मीरच्या संविधान सभेच्या निर्णयाची वाट बघणे संयुक्तिक असताना १९५२ चा करार करण्याची घाई करण्यात आली. या घाईमागे फाळणीने नाजूक बनलेले हिंदू-मुस्लीम संबंध काश्मीर प्रश्नावरून अधिक बिघडू देण्याची संधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघप्रणीत पक्ष संघटनांना मिळू नये हेच कारण सकृतदर्शनी दिसते.                                                                   

या कराराच्या अंमलबजावणी वरून निर्माण झालेल्या तणावातून शेख अब्दुल्लांना अटक झाली. हा करार न करता संविधान सभेच्या निर्णयाची वाट बघितली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. देशांतर्गत राजकारणाला विपरीत वळण मिळू नये म्हणून भारतीय संविधानाची कलमे काश्मिरात लागू करण्याच्या घाईतून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. या घाईने भारताच्या हेतूबद्दल शेख अब्दुल्लाच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्यांनी त्याला विरोध केला. परिणामी त्यांना अटक करण्यात आली. अटके नंतर सार्वमताचे भूत बाटली बाहेर आले ! शेख अब्दुल्लांना अटक करून काश्मीरच्या राजकारणापासून अलग पाडल्यामुळे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी जम्मू-काश्मीर सार्वमत आघाडी स्थापन केली. स्वत: शेख अब्दुल्ला या आघाडीपासून दूर राहिले तरी त्यांच्या प्रेरणेशिवाय व आशीर्वादाशिवाय त्यांच्या जवळच्या नेत्यांनी सार्वमत आघाडीची स्थापना करणे पटणारे नाही. अटकेत राहिल्याने शेख अब्दुल्लाच्या भूमिकेत काही बदल झाला का हे जाणून घेण्यासाठी त्यांची १९५८ साली तुरुंगातून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्यांनी काश्मिरी जनते समोर केलेल्या भाषणात काश्मीरचे भवितव्य काश्मीरच्या जनतेला सार्वमता द्वारे ठरवू देण्याची मागणी केल्याने पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे काश्मिरात सार्वमत शक्य नाही आणि त्याची गरजही नाही असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या शेख अब्दुल्लांना सार्वमताच्या मागणीकडे वळविण्यास भारत सरकारची धोरणेच कारणीभूत ठरली. 

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८