Thursday, April 19, 2012

जात -- राजपुत्राची आणि राजसी संस्थांची

-----------------------------------------------------------------------------------------------
शाळा-महाविद्यालयातील संस्कारामुळे वैज्ञानिकात देखील वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होत नाही. शाळा-महाविद्यालयातील धार्मिक संस्कारांवर निर्बंध घालण्याची निकड आय आय टी मधील घटनांनी अधोरेखित केली आहे. पण हा वरवरचा उपाय आहे. जाती निर्मूलनाची थंडावलेली चळवळ नव्या जोमाने सुरु करने हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे. अशी चळवळ उभी राहात नाही तो पर्यंत एम्स आणि आय आय टी सारख्या लाडात वाढलेल्या संस्था देखील राहुल गांधी प्रमाणे आपली जात दाखवून जाती निर्मूलनाची तळमळ असणाऱ्यांना आणि फुले- आबेडकर-शाहू महाराज सारख्या महापुरुषांना वाकुल्या दाखवितच राहणार आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------

जाती निर्मुलन लढ्यातील अग्रणी महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वावर देशातील जातीच्या दाहक वास्तवाने मन सुन्न आणि विषण्ण करणाऱ्या दोन घटना समोर आल्या. पहिली घटना आहे देशातील युवा नेतृत्व म्हणून ज्यांचा गवगवा करण्यात आला आणि देशातील समस्त कॉंग्रेसजन ज्यांच्या राज्याभिषेकाची आतुरतेने वाट पाहात आहेत त्या राजपुत्र राहुल गांधी यांनी खुलेआम आणि अभिमानाने आपण ब्राम्हण असल्याचे जाहीर करून आपली जात दाखवून दिल्याची. देशाचे भावी नेतृत्व जातीला स्थान आणि महत्व देवून जात अधोरेखित करीत असेल तर भारतातील जातीव्यवस्थेचे प्राबल्य कायम असल्याचे ते द्योतक आहे. आमच्या मनात आणि समाजात जात कशी आणि किती घर करून आहे या राहुल गांधीच्या वक्तव्यातून प्रकट झालेल्या सत्याची पुष्ठी करणारी धक्कादायक आणि वेदनादायक माहितीही याच सुमारास उजेडात आली आहे. देशात व आंतरराष्ट्रीय जगतात ज्यांना मानाचे स्थान आहे आणि ज्यांचा दबदबा आहे अशा भारतातील एम्स आणि आय आय टी संस्था मधील जातीयवादामुळे अनेक दलित विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्याची माहिती दिल्लीच्या 'इनसाईट फाउंडेशन' ने उजेडात आणली आहे. देशाचे नेतृत्व करण्याची मनीषा बाळगून असणारे नेतृत्व आणि देशातील शैक्षणिक जगताचे नेतृत्व करणाऱ्या आणि संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या नामांकित संस्था यांच्यावरच जातीचा व जाती व्यवस्थेचा पगडा असेल तर सारा देश अद्याप जातीच्या दलदलीत फसून असल्याचे मान्य करावेच लागेल.

बुडत्याला जातीचा आधार

भारतीय राजकारणात नेहमीच जातीचे प्राबल्य राहात आले आहे. जेव्हा आपण जातीचे प्राबल्य हा शब्द वापरतो तेव्हा त्यात उच्चजातीचे प्राबल्य हेच गृहित असते. पक्ष कोणताही असला आणि त्याची धोरणे पुरोगामी असो की प्रतिगामी , पण नेतृत्व मात्र उच्चवर्णीयांच्याच हाती राहिले आहे. या नेतृत्वाने राजकीय फायद्यासाठी जातीच्या बाबतीत नेहमीच तडजोडीचे धोरण स्वीकारल्याने राजकारणातून जात हद्दपार झाली नाही. असे असले तरी आजवरच्या राजकीय नेतृत्वाने कधी आपली जात जाहीरपणे मिरविली नव्हती. देशाच्या राजकारणात गांधी-नेहरू घराण्यां बद्दल विरोधाचे आणि असहमतीचे अनेक मुद्दे नेहमीच चर्चिले गेले आहेत , पण गांधी -नेहरू घराण्याच्या जाती आणि धर्म निरपेक्षतेवर फारसे दुमत नव्हते. अपरिहार्यता म्हणून नेहरू की इंदिरा गांधी यांनी निवडणुकीत जाती-धर्माचा उपयोग करून घेतला असला तरी त्यांची ओळख जातीवादी आणि धर्मवादी कधीच नव्हती. त्यांचे सोडा पण ज्या पक्षावर जातीयवादी असल्याचा सातत्याने आरोप होत आला आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या ब्राम्हणी नेतृत्वाने देखील कधी आपली जात जाहीरपणे मिरविली नाही. या पार्श्वभूमीवर नेहरू-गांधी घराण्याच्या वारसावर हक्क सांगणारे राहुल गांधी आपण ब्राम्हण असल्याचे जाहीरपणे सांगणे हा केवळ त्या घराण्याचा अपमान ठरत नाही तर ब्राम्हणी वर्चस्वा विरुद्ध लढून जाती निरपेक्ष समाजाची मुहूर्त मेढ रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेचा व प्रयत्नाचा अपमान आहे. राहुल गांधीचा आपण ब्राम्हण आहे हे सांगण्या मागे उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे असतील. पण त्यांच्या अशा अपरिपक्व आणि नादान वक्तव्याने जातीला प्रतिष्ठा आणि जाती व्यवस्थेला खतपाणी मिळाले आहे. जाती व्यवस्थेपुढे राहुल गांधीनी पत्करलेली हि शरणागती आहे. राहुल गांधीच्या वक्तव्याचा साऱ्या देशाने अंतर्मुख होवून विचार करण्याची गरज होती आणि आहे . या निमित्ताने गांधी-नेहरू घराण्याच्या नेहमीच्या विरोधकांनी ते 'ब्राम्हण' कसे असा प्रश्न उपस्थित करणारी नेहरू-गांधी घराण्याची खरी-खोटी कुंडली मांडून बेशरमपनाचे दुसरे टोक गाठले आहे. जाती प्रश्नाच्या गम्भिरतेकडे लक्ष देण्या ऐवजी या मंडळीनी या निमित्ताने गांधी - नेहरू घराण्यावर कमरेखाली वार करण्याची खाज आणि हौस तेवढी भागवून घेतली आहे. ब्राम्हणत्व जाहीरपणे मिरवून जातीला प्रतिष्ठा देण्यावर यांचा आक्षेप नाही , यांचा आक्षेप ते ब्राम्हण असण्यावर आहे. हा विषय एवढ्या खालच्या पातळीवर जावून चर्चा करण्याचा नाही. पण ' ना जात पे ना पात पे , मुहर लगेगी हाथ पे' अशी घोषणा देवून निवडणुका जिंकणाऱ्या इंदिराजी आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीत जोरदार आपटी खाल्ल्यावर स्वत:ची जात जाहीर करण्याची गरज भासलेले राहुल गांधी याकडे व्यक्तीचा राजकीय प्रवास असे पाहून चालणार नाही. भारतीय राजकारणाचा प्रवास कोणत्या दिशेने चालू आहे याचे हे दिशा निदर्शक आहे . जाती निर्मूलनाची वाट सोडून जनमानसावर जात बिम्बविण्याच्या रस्त्यावर आम्ही चालू लागलो आहोत याचे निदर्शक राहुल गांधी यांचे वक्तव्य असल्याने या वाटचालीवर मंथन करण्याची खरी गरज आहे. राहुल गांधीच्या वक्तव्यात जसे बेशरमपण आहे तशीच अगतिकता देखील आहे. जातींची समीकरणे जुळविल्या शिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत ही ती अगतिकता आहे. असे अगतिक आणि शरणागत नेतृत्व आपल्याला नाकारता येईल , पण परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उपायावर विचार करायचे नाकारून चालणार नाही. निवडणूक सुधारणांच्या पल्याडचा हा विषय आहे.

लाज वाटली पाहिजे

एम्स आणि आय आय टी म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दुधावरची साय आहेत. सर्व सामान्यांच्या घामाच्या पैशावर उभ्या राहिलेल्या या संस्था मधून नावाजलेले संशोधक आणि तंत्रज्ञ निर्माण झाले असतीलही पण यातील विद्यार्थी चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनतो असा या संस्थांचा कधीच लौकिक नव्हता. इथे शिकायचे आणि गलेलठ्ठ पगारावर परदेशी चाकरी करून परदेशात स्थायिक होणाऱ्यांचा कारखाना म्हणजे या संस्था होत. यातील काहीना देशप्रेमाचा उमाळा येतोही , पण तो परदेशी नागरिकत्व मिळवून स्थिरस्थावर झाल्यावर. अशा स्वार्थी आणि आत्ममग्न विद्यार्थ्यांकडून फार मोठया अपेक्षा ठेवता येत नाही , पण वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वैज्ञानिक सत्य त्यांनी स्वीकारले आणि मानले पाहिजे एवढी तर या थोर थोर संशोधक आणि वैज्ञानिक मंडळी कडून अपेक्षा करने चुकीचे म्हणता येणार नाही. जात ही कोणत्याही निकषावर समर्थनीय नाही हे साधे सत्य एम्स किंवा आय आय टी मधील विद्यार्त्याना आणि प्रशासकांना समजत आणि मान्य होत नसेल तर अशा संस्थांची देशाला लाज वाटली पाहिजे. अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळणे हे दलितांसाठी आधीच दुरापास्त. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर आरक्षणाची मदत घेवून दलित विद्यार्थी तिथ पर्यंत पोचला तरी तिथे राहून त्याला सुखासुखी शिक्षण घेवू द्यायचे नाही ही तेथील बहुसंख्य असलेल्या उच्चवर्णीय विद्यार्थ्याची व प्रशासनाची मानसिकता. या मानसिकतेने गेल्या २-३ वर्षात १९ दलित विद्यार्थ्यांचा बळी घेतला आहे. अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. पूर्वीच्या काळी शिक्षणाचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांचा होता , इतरांना शिक्षणापासून वंचित ठेवून गुलामी करायला भाग पाडण्यात येत होते. आय आय टी किंवा एम्स मधील विद्यार्थी व प्रशासन आजही तेच करीत आहे. आमचे शिक्षण विद्यार्थ्याच्या मनावर कोणते मूल्य बिंबवीत आणि रुजवित आहे याचे हे उघडे नागडे रूप आहे. जाती आणि धर्माबद्दलचा निकोप आणि वैज्ञानिक दृष्टीकोन शालेय शिक्षणा पासून ते उच्च शिक्षणा पर्यंत रुजाविलाच जात नाही आणि त्यामुळे चातुर्वण्य नव्या स्वरुपात डोके वर काढीत राहते. आय आय टी सारख्या संस्थांमध्ये दलितांना शिकू न देने हे नवे चातुवर्ण्य आहे. आय आय टी सारख्या संस्थांमध्ये शिकणारे तरुण मध्ययुगीन मूल्ये जोपासतात याचे मूळ आमच्या शालेय शिक्षणातील संस्कारात आहे. जोतीबानी आपल्या लिखाणातून ज्या भाकड धार्मिक कथांवर कोरडे ओढले आहेत त्याच भाकडकथा मूल्य शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना सांगितल्या जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म निरपेक्ष मूल्य रुजविण्या ऐवजी  देव देवतांचे पूजन होते. या गोष्टी करण्यासाठी धार्मिक शाळा उघड्याव्यात आणि कराव्यात. पण अन्य सर्व शाळामध्ये फक्त वैज्ञानिक मूल्य आणि राज्य घटनेतील मूल्य याचाच मूल्य संस्कारात अंतर्भाव असला पाहिजे. पूजन करायची हौसच असेल तर शैक्षणिक संस्थामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सरस्वतीचे नव्हे तर राज्यघटनेचे पूजन झाले पाहिजे. शाळा-महाविद्यालयातील अशा संस्कारामुळे वैज्ञानिकात देखील वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होत नाही. शाळा-महाविद्यालयातील अशा संस्कारांवर निर्बंध घालण्याची निकड आय आय टी मधील घटनांनी अधोरेखित केली आहे. पण हा वरवरचा उपाय आहे. जाती निर्मूलनाची थंडावलेली चळवळ नव्या जोमाने सुरु करने हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे. अशी चळवळ सुरु करण्यात आरक्षण हा मुद्दा अडथळा बनू पाहतो आहे. वेगाने जाती निर्मूलनाच्या उद्देश्यानेच दलितांना आरक्षण देण्यात आले होते हे विसरून आता सर्वच जाती आरक्षणाची मागणी करू लागल्या आहेत. यामुळे दलित आरक्षणाचा हेतू साध्य होण्या ऐवजी जातीचे बळकटीकरण होण्याची भिती निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या संदर्भात जाती निर्मूलनाची नवी मांडणी झाल्याशिवाय अशी चळवळ उभी राहण्याची शक्यता धुसर आहे. अशी चळवळ उभी राहात नाही तो पर्यंत एम्स आणि आय आय टी सारख्या लाडात वाढलेल्या संस्था देखील राहुल गांधी प्रमाणे आपली जात दाखवून जाती निर्मूलनाची तळमळ असणाऱ्यांना आणि फुले- आबेडकर-शाहू महाराज सारख्या महापुरुषांना वाकुल्या दाखवितच राहणार आहेत. (समाप्त)


सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ

1 comment:

  1. भारतात जातिनिर्मूलनाच्या दिशेने कधी कुठल्याही पक्षाने मनःपूर्वक प्रयत्न केले आहेत असे वाटत नाही. तशी त्यांची इच्छाही नाही. अर्थात हा तात्कालिक संदर्भ झाला. वस्तुतः माझा, तुझा असा आप परभाव असणे हे समग्र मानव जातीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, जातीयता हे त्याच बीजाचे प्रकटीकरण आहे. जसे की प्रांतीयता, राष्ट्रीयता हेही आहे. जातीयतेचा निषेध करणारे आपण सर्व,राष्ट्रीयतेमधील संकुचितता समजण्याइतके प्रगल्भ होऊ का? सामान्य माणूस भित्रा आहे, त्याला कुठल्या तरी कळपात राहावेसे वाटते, हा कळप कधी जातीचे स्वरूप घेतो, कधी कुटुंबाचे तर कधी प्रांतीयतेचे घेतो. विविध संदर्भांमध्ये विवक्षित संकुचिततेचे उदात्तीकरण केले जाते. जसे की राष्ट्रभक्ती. जेव्हा आपण सगळेच एका प्रकारच्या संकुचिततेचे समर्थन करतो, तेव्हा नकळत जातीयातेवरही पसंतीची मोहोर उठवत असतो. संपूर्ण चराचर सृष्टीवर प्रेम करण्याची कल्पना, जिचा आपल्या संतांनी पुरस्कार केला, तिथपर्यंत पोचणे मानवांना अशक्य दिसते. त्यामुळे जातीयवादाचे पूर्ण परिमार्जन होणे मानवांसाठी अशक्य आहे.

    ReplyDelete