Thursday, April 26, 2012

महाराष्ट्राची महाघसरण

----------------------------------------------------------------------------------------------------     येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देवाच्या आळंदीला निघालेला महाराष्ट्र यशवंतरावांच्याच कराड गावचे सुपुत्र असलेल्या पृथ्वीराज चव्हाणच्या नेतृत्वाखाली चोराच्या आळंदीला कसा पोचला ही वाट चुकलेल्या महाराष्ट्राची व्यथा या लेखात मांडली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------


देशा पेक्षा श्रेष्ठ समजणे हे भारतीय संघराज्याच्या घटक राज्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.  आणि या सर्व घटक राज्यात आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत ही समजूत ज्या राज्यात तळागाळातील लोकापर्यंत रुजली आहे ते राज्य अर्थातच महाराष्ट्र आहे ! हा अभिमान स्वपराक्रमा मुळे आहे असा मात्र कोणाचाच दावा नाही. ही अर्थातच महाराष्ट्रीयन लोकांच्या पूर्वजांची पुण्याई . पेशवाईचा अप्रिय कालखंड वगळता रयतेचा राजा शिवाजी पासून नामदेव - तुकाराम आणि त्यानंतरचे फुले - शाहू महाराज यांच्या पराक्रमाने महाराष्ट्र राज्य आघाडीवर आले होते. महाराष्ट्राकडे नेतेपण आले ते यांचे मुळे . पण नेतेपद टिकवायचे असेल तर पूर्वजांच्या पराक्रमाच्या गाथा उरी कवटाळून बसून चालत नाही. त्या पराक्रमाची परंपरा पुढे चालवावी लागते. वर्तमान घडविण्या ऐवजी इतिहासात रममाण होणारी जनता आणि नेतृत्व असेल तर उज्वल इतिहासाकडून अंधाऱ्या वर्तमाना कडे वाटचाल होते . महाराष्ट्राच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. पराक्रम शून्य श्रेष्ठत्वाच्या अहंगंडामुळे महाराष्ट्रातील लोकांना काम धंद्या साठी दुसऱ्या राज्यात जाणे  नेहमीच कमीपणाचे वाटत आले आहे. आपली शाखा दुसरीकडे नसल्याचा अभिमानही यातूनच निर्माण झाला आहे. आपण दुसरीकडे जात नाही , मग दुसऱ्यांनी आपल्याकडे का यावे या भावनेचा  उगमही आपले राज्य आघाडीचे आणि आघाडीवर असल्याच्या समजुतीत सापडेल. देशभरा मध्ये परप्रांतीयांच्या बाबतीत रोष असणारे मोठे राज्य कोणते हे कोणालाही विचारले तर त्यांचे उत्तर चुकण्याची शक्यताच नाही. एका सुरात सर्वांचे उत्तर महाराष्ट्र राज्य हेच येईल . देशातील अन्य घटक राज्यांबद्दल ज्या बातम्या येतात ते विविध क्षेत्रात त्यांची कामगिरी सुधारत असल्याची  पण महाराष्ट्राच्या बाबतीत नेमक्या उलट्या बातम्या येतात. प्रत्येक क्षेत्रात होत असलेली पिछेहाट  हीच महाराष्ट्राची  आधुनिक ओळख बनली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ५२ वर्षात आम्ही मोठा पल्ला गाठला खरा पण तो शिखरावरून तळ गाठण्याचा !                                                                   शेती रसातळाला 

महाराष्ट्र आजही अनेक राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे ,पण त्याला प्राप्त झालेली ही आघाडी विपरीत बाबतीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्राने घेतलेली आघाडी कोणत्याच राज्याला मोडता येणार नाही इतकी मोठी आहे . शेती क्षेत्राचे वाटोळे देशभरातच होत आहे पण त्या क्षेत्राची कंबर मोडण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे, धान्य उत्पादना संदर्भात जे ताजे अंदाज जाहीर झाले आहेत ते लक्षात घेतले तर महाराष्ट्राची वाटचाल इतर राज्यांच्या तुलनेत उलट्या दिशेने होत असल्याचे दिसून येईल. संसदेत जो अधिकृत अंदाज जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार देशात गहू आणि तांदळाचे बंपर उत्पादन होणार आहे .या दोहोच्या उत्पादनात गतवर्षी पेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे.   डाळी वगळता नगदी पिकांच्या उत्पादनातही भरीव वाढीचा अंदाज आहे. पण हे झाले देशभराचे सरासरी चित्र. महाराष्ट्राचा ताजा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले होते त्यातून महाराष्ट्राच्या आजच्या स्थिती वर झगझगीत प्रकाश पडतो. या आर्थिक सर्वेक्षणात महाराष्ट्रात अन्नधान्याच्या उत्पादनात या वर्षी तब्बल २३ टक्क्यांनी घट होणार आहे. गेल्यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील अन्नधान्य उत्पादनात अशीच प्रचंड घट झाली होती हे लक्षात घेतले आणि गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी २३ टक्के घट झाली असे गृहित धरले तर प्रत्यक्षात शेती उत्पादनात महाराष्ट्राने निच्चांकी पातळी गाठली असे म्हणण्या शिवाय प्रत्यवाय नाही. याचे खापर अनियमित पावसावर फोडण्यात येत असले तरी वीज , पाणी , बियाणे , खते अशा शेतीशी निगडीत मुलभूत बाबी कडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. ग्रामीण भागात १८ तास वीज नसणे हा नियम बनून गेला आहे. वाढत्या नागरीकरणाने शेतीसाठीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी वाढला आहे. शिवाय उद्योगाच्या बाबतीतला क्षेत्रीय असमतोल दुर करण्याच्या नावाखाली कोणत्याही नव्या मुलभूत सुविधा निर्माण न करता मागासलेल्या भागात उभे राहणारे उद्योग शेतीला पूरक न ठरता शेतीची  हानी करणारे ठरत आहेत. उद्योगासाठी मोठया प्रमाणावर पाणी लागते आणि त्याची स्वतंत्र सोय केली पाहिजे हे ना आमच्या नियोजनकारानी ध्यानी घेतले ना आमच्या राज्यकर्त्यांनी. परिणामी शेतीचे पाणी पिण्या सोबतच उद्योगासाठी पळविले जावू लागले. महाराष्ट्रात शेती क्षेत्राला अस्मानी संकटा सोबत अशाप्रकारच्या सुलतानी संकटाना मोठया प्रमाणात तोंड द्यावे लागतं असल्याने शेती क्षेत्राची वाताहत झाली आहे.


                                                        भूखंड केंद्रित विकास 

शेती क्षेत्रापेक्षाही महाराष्ट्र औद्योगिक राज्य म्हणून ओळखले जायचे. पण महाराष्ट्राची ही ओळख आता मिटत चालली आहे. वाढत्या नागरीकरणाने जमिनीचे भाव आकाशाला भिडले असल्याने आधीच्या शहर केंद्रित उद्योगांना उद्योग चालवून उत्पादन घेण्याच्या कटकटी पेक्षा उद्योग बंद करून उद्योगाच्या जमिनीचा व्यापार करण्यात प्रचंड फायदा दिसू लागल्याने जुने उद्योग पद्धतशीर बंद पडत आहेत. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेची एकेकाळी ख्याती असलेले हे राज्य अराजकाकडे वाटचाल करू लागल्याने नव्या उद्योगांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली आहे. जुने उद्योग मोडीत निघण्याचे प्रमाण वाढल्याने आणि नव्या उद्योगासाठी राज्यात कोणतीच अनुकूलता नसल्याने महाराष्ट्रात शेती इतकीच औद्योगिक क्षेत्रात ही घसरण होवू लागली आहे. भूखंड हडप करण्यासाठी मात्र कागदोपत्री नव्या उद्योगात वाढ झाल्याचे दिसेल. भूखंडाचा व्यापार आणि व्यवहार ही आता महाराष्ट्राची देश पातळीवर नवी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील केवल राजकारणीच नाही तर जे जे म्हणून कोणी प्रभावशाली व्यक्ती आणि संस्था आहेत त्या सर्वांचा भूखंड व्यवहारात हितसंबंध गुंतलेला आहे असे आढळून येईल. उद्योगासाठी भूखंड नव्हे भूखंडासाठी उद्योग , सावित्रीबाई, जोतीराव , कर्वे किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांचे स्वप्न साकारण्यासाठी  नव्हे तर भूखंडासाठी शिक्षण संस्था , लोकप्रबोधनासाठी आणि बातम्यासाठी वृत्तपत्र नव्हे तर भूखंडासाठी वृत्तपत्र , रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी स्वयंसेवी संस्थां इतिहास जमा होवून मोक्याचे भूखंड हडपण्यासाठी मोठमोठे ट्रस्ट आणि फाउंडेशन अशा भूखंड केंद्रित विकास दौडीत महाराष्ट्र अग्रेसर होत आहे. अशा 'सेवा' क्षेत्रातील अनुत्पादक व्यवसायात लाखो कोटीची दररोज उलाढाल होत असल्याने शेती आणि उद्योग या दोन्ही साठी पैशाचा ठणठणाट आहे. अनुत्पादक व्यवसायातील आकर्षक परतावा आणि ऐषाराम एकीकडे , तर दुसरीकडे उत्पादक व्यवसायात तोटा आणि  फरफट हे महाराष्ट्राच्या विकासाचे खरेखुरे चित्र आहे. गुंडगिरी आणि माफिया याचा उदय आणि विकास ही अनुत्पादक व्यवसायातील अपरिहार्य फलनिष्पत्ती आहे. गुंडगिरी आणि माफियागीरीच्या विकासासाठी राजकारणां इतकी सुपीक जमीन आणि धर्म ,भाषा , संप्रदाय आणि प्रादेशिक वाद याच्या इतकी चांगली औजारे दुसरी नाहीतच. यशवंतराव चव्हाणांच्या काळात देवाच्या आळंदीकडे निघालेला महाराष्ट्र ५२ वर्षानंतर चोराच्या आळंदीत कसा पोचला याचे उत्तर आपल्याला महाराष्ट्राच्या वाटचालीतून मिळते.

                                                         मोबाईल आणि वाहनांचा महाराष्ट्र 

महाराष्ट्रात घरोघरी संडास नाहीत पण मोबाईल आहेत , गावोगावी चुलीच्या धुरा इतकेच धूर फैलावणारे वाहने आहेत याला तंत्रज्ञानाची ताकद हे जितके कारण आहे तितकेच कारण लोक उत्पादक व्यवस्थेत गुंतलेले नसणे हे आहे. आपले काम इमाने इतबारे करण्यापेक्षा त्यातून दलाली कामासाठी कसा वेळ मिळेल याचा प्रबळ विचार महाराष्ट्रात होतो. म्हणूनच लाखाच्या वर पगार घेणारे शिक्षक-प्राध्यापका सारखे नोकरदार शाळा - महाविद्यालयाचा निर्धारित वेळ कधी संपेल याची आतुरतेने वाट पाहात असतात. दलालीच्या दलदलीत महाराष्ट्र कसा खोलवर फसला आहे हे यावरून लक्षात येईल. उत्पादन व्यवस्था विस्कळीत होवून मोडीत निघायला लागली की विकास ठप्प होतो आणि विकासाचा प्रवाह थांबला की तयार होणाऱ्या डबक्यात रोग पसरविणारे जंतू निर्माण होतात तेच महाराष्ट्राचे झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्राची जागा प्रतिगामी आणि रोगट महाराष्ट्राने घेतली आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरा सारखे  विचारवंत आणि थोर व्यक्तिमत्व ज्या क्षेत्रात निवडणूक लढले तिथे खैरलांजी सारखे प्रकार घडतात, तर जोतीबा- सावित्री , बहिणाबाई यांच्या जिल्ह्यात 'ऑनर किलिंग' च्या नावाने कोवळ्या मुलींची हत्त्या होते. मुंबई सारख्या प्रगत औद्योगिक नगरीत आता 'ऑनर किलिंग' सारखे प्रकार होवू लागले आहेत  विकासातील प्रवाहीपण संपून त्याचे डबके झाल्याचा हा परिणाम आहे. परप्रांतीयांमुळे हे घडते अशी उथळ आणि सोपी मांडणी केली जाते आणि ती आपल्याला पटते याचे कारण महाराष्ट्राच्या विनाशाची जबाबदारी झटकून आपल्याला मोकळे व्हायचे असते. शेती आणि उद्योग यांना अनुकूल वातावरण निर्माण केल्याशिवाय महाराष्ट्राची सुरु असलेली घसरण थांबणार नाही. त्यासाठी महाराष्ट्राला गरज आहे विकासाची दृष्टी आणि ध्यास असलेल्या नेतृत्वाची. भूखंडाची आस आणि ध्यास बाळगून त्यावर गिधाडा सारखी नजर ठेवून असलेल्या पक्ष-विपक्षातील राजकीय पिलावळीचे हे काम नव्हे.                      (संपुर्ण) 

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ 

1 comment:

  1. IT IS VERY TRUE THAT-शेती आणि उद्योग यांना अनुकूल वातावरण निर्माण केल्याशिवाय महाराष्ट्राची सुरु असलेली घसरण थांबणार नाही. त्यासाठी महाराष्ट्राला गरज आहे विकासाची दृष्टी आणि ध्यास असलेल्या नेतृत्वाची. भूखंडाची आस आणि ध्यास बाळगून त्यावर गिधाडा सारखी नजर ठेवून असलेल्या पक्ष-विपक्षातील राजकीय पिलावळीचे हे काम नव्हे.

    ReplyDelete