Thursday, June 14, 2012

अण्णा विरुद्ध टीमअण्णा


 अण्णांनी यापूर्वीच व्हि.के.सिंग यांना निमंत्रण दिले आहे. पण अण्णा आंदोलनात सामील व्हायचे तर लष्करातून साधे वाहन चालक म्हणून निवृत्त झालेल्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेल्या सिंग यांना काम करावे लागेल! लष्कर प्रमुखपदी राहिलेल्या व्यक्तीकडे आंदोलनाची सूत्रेही देता येत नाहीत . कारण अण्णांना दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची सवय नाही ! हा तिढा सोडविण्याचा मार्ग म्हणून टीमअण्णाने आंदोलनातून बाहेर पडण्याचा दरवाजा अण्णा साठी उघडून ठेवला आहे !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशात अभूतपूर्व असे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ज्या वेगाने उभे राहिले त्या वेगानेच ओसरले . त्यामुळे  आंदोलनाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या घटकांना धक्का बसने , मोठया प्रमाणावर नैराश्य येणे यात अस्वाभाविक असे काहीच नाही. रामलीला मैदान आंदोलनाची चव चाखलेल्याना पुन्हा तसेच आंदोलन उभा करण्यासाठी धडपडणे अगदी स्वाभाविक आहे. रामलीला मैदानातील अण्णांचे उपोषण आंदोलन ऐतिहासिक होते यात वाद नाही. पण  रामलीला मैदान आंदोलन हा इतिहास होता ही बाब आंदोलनाच्या नेत्यांनी मान्य केली तर ते एक प्रकारे पराभव मान्य करण्या सारखे झाले असते. असा पराभव मान्य करण्यासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीची गुंतागुंत याची जाण आणि प्रांजळपणा असावा लागतो. टीम अण्णाकडे या दोन्ही गोष्टीचा अभाव असल्याचे वर्षभरात अनेकवेळा दिसून आले आहे. तसे नसते तर लोकपाल  हाती न येताच  एवढे मोठे आंदोलन का ओसरले यावर अण्णा व त्यांच्या टीमने चिंतन आणि मनन केले असते. पुन्हा 'रामलीला' चा उदघोष करण्या ऐवजी आंदोलन पुढे नेण्याचा नवा मार्ग चोखाळला असता. पण रामलीला मैदान आंदोलनाच्या नशेने देशभर जो उन्माद निर्माण झाला होता तसाच उन्माद पुन्हा निर्माण करण्याच्या नशेत अजूनही टीम अण्णा आहे हे त्यांच्या ताज्या लीलांवरून स्पष्ट होते. आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते . ती म्हणजे टीम अण्णा अजूनही रामलीला मैदान आंदोलनाच्या नशेत वावरत असली तरी या टीमचे आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते  अण्णा हजारे मात्र त्यांच्या टीम सारखे नशेत नाहीत. ते पूर्णपणे होश मध्ये आहेत आणि आपल्या परीने आंदोलन पुढे नेण्याचा मार्ग शोधीत आहेत. अनुभव आणि उद्दिष्टे याप्रती असलेल्या प्रामाणिकपणातील फरक आपल्याला अण्णा आणि टीम अण्णा यांच्यात दिसून येत आहे. दोघांची वाट वेगळी होण्याचा हा प्रारंभ बिंदू तर नाही ना अशी शंका येण्यासारखी परिस्थिती ताज्या घडामोडीतून निर्माण झाली आहे. 

                               टीम अण्णाचा वेगळा मार्ग 

महाराष्ट्रात लोकायुक्त व लोकपाल यासाठी जनसमर्थन उभे करून सरकारवर दबाव आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून अण्णा हजारे उन्हातान्हात महाराष्ट्रभर सभा घेत जनजागृती करण्यात गुंतले असताना तिकडे दिल्लीत टीम अण्णाच्या म्होरक्यांचे वेगळेच नियोजन सुरु होते. टीम अण्णा म्हंटले कि  अर्थातच अरविंद केजरीवाल, किरण बेदी , प्रशांत भूषण आणि मनिष शिसोदिया या मोजक्या लोकांचाच समावेश होतो हे आता साऱ्या देशालाच माहित आहे. या टीमने अण्णा हजारे यांच्याशी विचारविमर्श न करता किंवा त्यांची संमती न घेताच दिल्लीत नवीच सनसनाटी निर्माण केली . या टीमने चक्क पंतप्रधान मनमोहनसिंह हे स्वत:च भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा खळबळजनक आरोप केला. पंतप्रधान शिखंडी आहेत , धृतराष्ट्र आहेत असे कमरेच्या खाली वार करणारे वक्तव्य टीम अण्णाने केले.  अण्णा आंदोलनामुळे अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ भ्रष्टाचारी आहे असे वातावरण देशात निर्माण झालेले असताना टीम अण्णाने मात्र निवडक १३ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवला ! कोणताही ठोस पुरावा न देता माध्यमांच्या मदतीने कोणावरही भ्रष्टाचारी म्हणून शिक्कामोर्तब करण्याची सोय आणि परंपरा आपल्या देशात असल्याने टीम अण्णाने पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या मंत्रीमंडळातील १३ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे यात कोणाला काही वावगे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पण अशा वातावरणात सुद्धा पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर प्रत्यक्ष भ्रष्टाचाराचा ठेवलेला ठपका आणि देशाच्या पंतप्रधाना विषयी वापरलेली भाषा मात्र बोटावर मोजण्या इतके सत्तातुर भाजप नेते सोडले तर कोणाच्याच पचनी पडली नाही. पंतप्रधाना वरील आरोपाने अनेकजन थक्क झाले पण अण्णा आंदोलनाने निर्माण झालेल्या वातावरणात कोणी भ्रष्ट नाही असे सांगणे सोपे नसल्याने अनेकांनी गप्प बसणे पसंद केले. पण ही कोंडी फोडली ती दस्तुरखुद्द अण्णा हजारे यांनी. दिल्लीत टीम अण्णाने गाजावाजा करून पंतप्रधानावर केलेले आरोप अण्णा हजारे यांनी खोडून काढले. पंतप्रधान साधे, सरळ आणि स्वच्छ असल्याची पावती त्यांनी दिली. अण्णा आणि टीम अण्णा यांच्यातील मतभेद जगजाहीर झाल्यावर टीम अण्णाने अण्णांना दिल्लीत पाचारण करून त्यांना वेढा घातला आणि पंतप्रधानावर देखील आपला विश्वास नाही असे त्यांच्याकडून वदवून घेतले. अण्णाना इंग्रजी समजत नसल्याने त्यांनी आधीची प्रतिक्रिया दिली अशी मखलाशी प्रशांत भूषण आणि टीम अण्णाने केली. पण दिल्लीत टीम अण्णाच्या उपस्थितीत पंतप्रधानावर देखील आपला विश्वास उरला नसल्याचे सांगणारे अण्णा हजारे महाराष्ट्रात परतल्यावर पुन्हा पंतप्रधानांना स्वच्छतेची पावती देवू लागले आहेत. या घटनेने अण्णा आणि टीम अण्णा यांच्यातील फरक अधोरेखित केला असला तरी तेवढ्या मर्यादित अर्थाने या घटनेकडे पाहून चालणार नाही. या घटनेचे इतरही अर्थ आहेत आणि आंदोलनाचे भवितव्य आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट करणारे ते अर्थ असल्याने त्याच्या संभाव्य परिणामाची चिकित्सा करणे गरजेचे आहे.

                         अण्णांना बाजूला सारण्याचे षड्यंत्र 

टीम अण्णाने दिल्लीत पंतप्रधानावर भ्रष्टाचाराचाचे आरोप करणे आणि अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातून लगोलग त्या आरोपाचा इन्कार करणे हा प्रकार पंतप्रधान भ्रष्ट आहेत कि नाहीत अशा प्रकारच्या वादाचा नाही.  अण्णा हजारे यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या शिवाय आंदोलन पुढे नेण्याचा टीम अन्नाचा हा सुनियोजित प्रयत्न म्हणूनच याकडे बघावे लागेल. कारण यापूर्वी कधी असे घडले नाही. टीम अण्णा पैकी कोणी काही दिल्लीत किंवा इतरत्र बोलले आणि अण्णांना ते पसंद पडले नाही तर आख्खी टीम अण्णा केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्धी येथे येवून अण्णाच्या पायाशी बसून खुलासा द्यायची. ही पहिली वेळ आहे कि टीम अण्णाचे वक्तव्य अण्णांना अजिबात मान्य नसताना देखील टीमने खुलाशासाठी अण्णाकडे धाव घेतली नाही . अण्णांना दिल्लीला जावून टीम अण्णाच्या हो मध्ये हो मिळवावा लागला आहे. अण्णा आणि टीमअण्णा यांच्यातील संबंधाबाबत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि अण्णांच्या ब्लॉगचे भूतपूर्व लेखनिक राजू परुळेकर यांनी जी 'आंखोदेखी' सांगितली होती त्याची पुष्ठी आणि प्रचिती आणून देणारी ही घटना आहे. अण्णांचा वापर करून स्वत:ची प्रतिमा देशवासीयांसमोर  प्रतिष्ठीत केल्यावर टीमअण्णाला आता अण्णा हे ओझे वाटू लागल्याचे किंवा आपल्या उद्दिष्ट पूर्तीत अडथळा वाटत असल्याचे संकेत या घटनेतून मिळतात. टीमअण्णाला अण्णांना बाजूला करण्याची घाई का झाली असावी याचा अंदाज बांधणे फारसे कठीण नाही. अण्णांना आपल्या  आंदोलनाचे स्वरूप  अराजकीय ठेवायचे आहे . पण टीमअण्णा मधील सदस्यांना कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्यात विशेष रस आहे. हे त्यांनी हिसार व नंतर उ.प्र. सहित काही राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करून दाखवून दिले आहे. वर्षा-दिड वर्षा नंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सोयीची भूमिका घेण्यासाठी टीमअण्णाला अण्णा हे अडथळा ठरतील अशी भिती वाटणे अनाठायी नाही. अण्णांना बाजूला सारण्यामागे आणखी एक  महत्वाचे  कारण असू शकते.  बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरु केले असून पूर्वी पेक्षा अधिक तयारीनिशी ते आंदोलनात उतरले आहेत. बाबा निरनिराळ्या लोकांचे व गटाचे समर्थन मिळविण्यासाठी आटापिटा करीत आहेत. अण्णा आंदोलनाचा पर्याय म्हणून पुढे येण्याचा बाबांचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे दोन धृवात विभाजन होत असताना कोणाचे पारडे जड होणार या बाबत नुकतेच लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेले व्हि.के. सिंह यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. लष्कर प्रमुखपदी कार्यरत असताना व्हि.के.सिंह यांनी नागरी आंदोलनात दाखविलेली रुची आणि त्या पदावर आणखी एक वर्ष राहण्याची त्यांची इच्छा धुळीस मिळाल्या नंतर सरकार बद्दल खदखदत असणारा राग शांत करण्यासाठी ते आज ना उद्या सरकार विरोधी आंदोलनात सामील होतील हे सांगायला कोण्या जोतीषाची गरज नाही. ते अण्णाच्या गोटात जातील कि बाबाच्या गोटात शिरतील हाच खरा कळीचा प्रश्न आहे. अण्णांनी यापूर्वीच व्हि.के.सिंग यांना निमंत्रण दिले आहे. पण अण्णा आंदोलनात सामील व्हायचे तर लष्करातून साधे वाहन चालक म्हणून निवृत्त झालेल्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेल्या सिंग यांना काम करावे लागेल! लष्कर प्रमुखपदी राहिलेल्या व्यक्तीकडे आंदोलनाची सूत्रेही देता येत नाहीत . कारण अण्णांना दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची सवय नाही ! लष्करातील अधिकाराच्या चढत्या पायऱ्या व त्या तशाच टिकवून ठेवून त्यानुसार वागण्याचा लष्करी शिरस्ता लक्षात घेतला तर व्हि.के.सिंग यांना हे मानावण्या सारखे नाही व मान्य होणे तर त्याहून कठीण. या उलट कितीही मोठया पदावर व्यक्ती असला तरी भगव्या किंवा पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील बाबांच्या चरणी बसायला त्याला अजिबात लाज वाटत नाही, उलट धन्य आणि कृतकृत्य वाटते. या न्यायाने माजी लष्कर प्रमुख व्हि.के.सिंग हे   बाबा रामदेव यांच्या छावणीत  दाखल होण्याची अधिक शक्यता आहे. केजरीवाल आणि प्रशांत भूषण सारख्या त्यांच्या सहकाऱ्यांचा बाबा रामदेव यांना असलेला विरोध लपून राहिलेला नाही. माजी लष्कर प्रमुख सिंग जर बाबांच्या गोटात दाखल झाले तर बाबांचे पारडे जड होणार हे ते जाणून आहेत. म्हणूनच टीम अण्णांना व्हि.के.सिंग यांना आपल्याकडे खेचायचे आहे. त्यात अण्णा यांचा अडथळा होवू शकतो. सिंग यांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी टीमअण्णा अण्णाला बाजूला सारण्याच्या तयारीत असल्याची पुष्टीच ताज्या घडामोडीतून होत आहे. टीमअण्णाने पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर बेताल आरोप करून आणि पंतप्रधान व त्यांच्या सहकाऱ्याच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाची घोषणा करून एका दगडात दोन नव्हे तर अनेक पक्षी मारले आहेत. बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर केंद्रित होत असलेला प्रकाशझोत सनसनाटी आरोप करून आपल्याकडे वळविण्यात काही प्रमाणात यश मिळविले. निर्णय प्रक्रियेत अण्णा हजारे यांना महत्वाचे स्थान नाही किंवा स्थानच नाही आणि आंदोलनाचे नेतृत्व अण्णा कडे नसून 'टीम अण्णा'च्या हाती असल्याचा संकेत माजी लष्कर प्रमुखाना आणि देशवासियांना दिला आहे. स्वाभिमानी अण्णांनी स्वत:हून बाहेर पडावे यासाठी उद्युक्त करणारी ही खेळी आहे. अण्णांनी हे आंदोलन मोठया उंचीवर नेले होते. आता ती उंची गाठणे अण्णांना देखील शक्य नाही हे वास्तव टीम अण्णा जाणून आहे. अस्तंगत होत चाललेल्या आंदोलनाला अण्णांचा उपयोग नाही , पण माजी लष्कर प्रमुख सामील झाले तर देशात नवा उन्माद निर्माण होवू शकतो हे हेरून टीमअण्णाने आंदोलनातून बाहेर पडण्याचा दरवाजा अण्णा साठी उघडला आहे. पंतप्रधानावरील आरोपा बाबत टीमअण्णा गंभीर असती तर टीमने पंतप्रधानाचा राजीनामा मागितला असता. पंतप्रधान निष्क्रिय आहेत, अकार्यक्षम आहेत , निर्णय घेण्याचा त्यांचा अवयव निकामी झाला आहे , मंत्रिमंडळ व देशावरील त्यांची पकड सैल झाल्याने अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे असे अनेक वस्तुस्थिती निदर्शक आरोप करून पंतप्रधानाच्या राजीनाम्याची मागणी समर्थनीय ठरू शकते. पण टीमअण्णाने तसे काही न करता भ्रष्टाचाराचा धूर निर्माण करून आपला छुपा हेतू साध्य करण्याची खेळी चतुराईने खेळली आहे. परिणामाची मात्र काही दिवस वाट बघावी लागेल.

                                 (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि. यवतमाळ 

1 comment:

  1. अतिशय उत्कृष्ट लेख. अण्णांच्या आंदोलनातील या नवीनच आंदोलनाचा एक आगळाच वेध आपण घेतला आहे. यामागची आपली चिकित्सक वृत्ती प्रशंसनीयच आहे. व्यक्तिशः मला तरी अण्णा आंदोलनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यास या लेखाचा उपयोग होईल असे वाटते.

    ReplyDelete