एप्रिल २००३ मध्ये श्रीनगरच्या सभेत पंतप्रधान वाजपेयींनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठीची त्रिसूत्री मांडली. 'इन्सानियत , जम्हुरियत आणि काश्मिरियत' अशी ती त्रिसूत्री होती. केवळ जाहीर सभेत बोलून अटलबिहारी वाजपेयी थांबले नाहीत. त्यांनी लोकसभेत बोलताना देखील या त्रिसूत्रीवर भर दिला होता. काश्मीरला जे काही द्यायचे ते संविधानाच्या मर्यादेतच या आजवरच्या धारणेला वाजपेयींच्या या त्रिसुत्रीने छेद देवून काश्मिरी जनतेच्या मनात नवी आशा निर्माण केली होती.
----------------------------------------------------------------------------------------------------
१९९८ ते २००४ हा पंतप्रधान वाजपेयी यांचा कार्यकाळ काश्मीर संदर्भातील भरगच्च घडामोडी आणि चांगल्या वाईट घटनांनी भरलेला होता. त्यांची राजवट जावून २० वर्षे झालीत पण त्यांचा कार्यकाळ आजही तिथली जनता विसरली नाही. ज्या पंतप्रधानाची काश्मिरात सर्वाधिक आठवण केली जाते ते पंतप्रधान वाजपेयीच आहेत. आज पन्नाशीच्या पुढचे जे लोक काश्मीरमध्ये आहेत त्यांचे एका बाबतीत एकमत आढळेल आणि ती बाब म्हणजे २००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत एन डी ए चा पराभव झाला नसता आणि वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले असते तर काश्मीरचा गुंता सुटायला मोठी चालना मिळाली असती. काश्मीरच्या बाबतीत सर्वात मोठी घोषणा तर पंतप्रधान नरसिंहराव यांनी केली होती. संविधानाच्या चौकटीत काश्मीरची जनता जे मागेल ते देण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. 'स्काय इज द लिमीट' हा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. त्यानंतरच फारूक अब्दुल्ला यांनी काश्मीर विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आणि एक दशकानंतर तिथे निवडणुका होवू शकल्या. नरसिंहराव आणि देवेगौडा या पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनानुसार संविधानाच्या चौकटीत काश्मीर विधानसभेने स्वायत्ततेची मागणी केली व तसा ठरावही केला. हा ठराव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला तेव्हा पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते. तो ठराव संविधानाच्या चौकटीत आहे हे वाजपेयी आणि अडवाणी दोघानाही मान्य होते. आणि तरीही इंदिरा गांधी यांनी जो तर्क दिला होता तोच तर्क - १९५२ ची स्थिती निर्माण करणे म्हणजे घड्याळाचे काटे मागे फिरविल्या सारखे होईल - देत वाजपेयी सरकारने जम्मू-काश्मीर विधानसभेचा स्वायत्तता विषयक ठराव नामंजूर केला होता. आणि तरीही काश्मीरची जनता वाजपेयींचीच आठवण करतात हे विशेष आहे. पाकिस्तानकडून भारताशी संबंध बिघडतील अशा कारवाया वेळोवेळी होवूनही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न वाजपेयींनी शेवटपर्यंत सोडला नाही हे एक महत्वाचे कारण त्यामागे होते.
पाकिस्तानच्या चिथावणीने १९९० च्या दशकात काश्मिरी जनतेला जे भोगावे लागले त्यामुळे जनतेचा दहशतवादाबाबत भ्रमनिरास झाला होता. काश्मिरात शांतता नांदायची असेल व दहशतवादी कारवाया थांबवायच्या असतील तर भारत-पाक संबंध सुरळीत होणे गरजेचे आहे या निष्कर्षाप्रत लोक आले होते आणि वाजपेयींनी त्यावरच जोर दिला होता. पाकिस्तानशी चर्चा करणे भारतीय जनतेला फारसे आवडत नाही. अशा चर्चेचा आधी जनसंघ व नंतरच्या भारतीय जनता पक्षाने कायम विरोध केला आहे. त्यामुळे भारत पाक चर्चा कायम पडद्याआड व लोकांच्या नजरेआड होत आली आहे. अगदी सध्याचे नरेंद्र मोदी सरकार सुद्धा दुसऱ्या देशाच्या भूमीवर पाकिस्तानशी चर्चा करत असते. पण कारगिल सारख्या घटनेनंतरही पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा आणि हिम्मत वाजपेयींनी दाखविली. २००४ साली तर लालकृष्ण अडवाणी यांनी जाहीरपणे म्हंटले होते की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाकिस्तानला सवलती दिल्या तरी लोक त्याचा विरोध करणार नाही ! त्यांचे हे विधान अजिबात अतिशयोक्त नाही. कारगिल घडविणाऱ्या परवेज मुशर्रफ यांचे दिल्ली व आग्रा येथे झालेले जंगी स्वागत व आग्रा शिखर परिषद अडवाणी यांच्या विधानाची पुष्टी करते. कॉंग्रेसच्या राजवटीत कारगिल घडले असते आणि ते घडविणाऱ्याला कॉंग्रेस सरकारने आमंत्रित करून जंगी स्वागत केले असते तर देशभर काय आणि कशा प्रतिक्रिया उमटल्या असत्या याचा सहज अंदाज करता येईल. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारून काश्मीर प्रश्न सोडवायला चालना देणे कॉंग्रेसला शक्य नाही. ते काम भारतीय जनता पक्षाचे अटलबिहारी सारखे नेतेच करू शकतात या निष्कर्षाप्रत काश्मिरी जनता आली होती आणि म्हणून काश्मिरी जनतेला वाजपेयी यांच्या बद्दल विशेष आस्था आणि प्रेम वाटत आले. भारतीय जनमताचा विचार न करता वाजपेयींनी त्यांच्या कार्यकाळात आणखी एक गोष्ट केली. हुरियतच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या पाकिस्तान धार्जिण्या विभाजनवादी नेत्यांशी काश्मीर प्रश्न कसा सोडविता येईल याची थेट चर्चा सुरु केली. यापूर्वीही नरसिंहराव सरकारने विभाजनवादी व दहशतवादी गटांशी चर्चा केली होती. पण ती चर्चा गाजावाजा न करता , लोकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने केली होती. वाजपेयींनी चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे जाहीर आवाहन करून उघडपणे चर्चा केली. काश्मीरच्या राजकारणात हुरियतच्या नेत्यांना पहिल्यांदाच महत्व मिळाले होते आणि ते नेते वाजपेयीवर जाम खुश होते. पण हाच प्रयोग मनमोहनसिंग सरकारने पुढे चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाने आणि दस्तुरखुद्द वाजपेयींनी विरोध केला.
अटलबिहारी वाजपेयींच्या काश्मीर जनतेमधील लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण ठरले ते काश्मिरी जनतेला भावलेले त्यांचे भावनिक आवाहन ! १८ एप्रिल २००३ रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची श्रीनगरच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये जाहीर सभा झाली. १९८७ नंतर काश्मिरात झालेली पंतप्रधानांची ही पहिली सभा होती. १९८७ साली राजीव गांधींची सभा झाली होती. या सभेपूर्वी वाजपेयींनी काश्मीरला तीनदा भेट दिली होती. सभा मात्र चवथ्यांदा आले तेव्हा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला चर्चेचे आवाहन केले. दहशतवाद्यांनी नवी दिल्लीत संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन पराक्रम'च्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सभेत पुढे बोलताना १९९० च्या दशकात जे भोगावे लागले त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि काश्मीरचा प्रश्न संविधानाच्या मर्यादेत नव्हे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे वचन जनतेला दिले. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठीची त्रिसूत्रीच त्यांनी या सभेत मांडली. 'इन्सानियत , जम्हुरियत आणि काश्मिरियत' अशी ती त्रिसूत्री होती. केवळ जाहीर सभेत बोलून अटलबिहारी वाजपेयी थांबले नाहीत. त्यांनी लोकसभेत बोलताना देखील काश्मीर प्रश्न सोडविण्याची ही त्रिसूत्री मांडली होती. काश्मीरला जे काही द्यायचे ते संविधानाच्या मर्यादेतच या आजवरच्या धारणेला वाजपेयींच्या या त्रीसुत्रीने छेद देवून काश्मिरी जनतेच्या मनात नवी आशा निर्माण केली. काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा काश्मिरी जनतेकडून आजही वाजपेयींची आणि त्यांच्या या त्रिसूत्रीची आठवण करून देण्यात येते. १९५३ नंतर काश्मिरी जनतेचे मन जिंकणारे पंतप्रधान म्हणून वाजपेयींचा उल्लेख होत राहील. काश्मिरी जनतेचे मन जिंकणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्यामुळेच काश्मीर भारताचा भाग बनला हे सत्य असले तरी काश्मिरी जनतेतील त्यांची लोकप्रियता १९५३ च्या शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटके नंतर उरली नाही. काश्मीरमध्ये आज नेहरूंचे नाही तर वाजपेयींचे नाव आदराने घेतले जाते.
(क्रमशः)
------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment