Thursday, November 2, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७९

मनमोहनसिंग यांचा  नरसिंहराव काळापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आल्याने काय करण्याची गरज आहे याबाबत त्यांची स्पष्ट अशी भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेत फेरफार किंवा बदल शक्य नाही पण काश्मिरी जनतेला विभागणारी सीमारेषा बदलता येत नसली तरी ती निष्प्रभ ठरवता येईल असा त्यांचा विश्वास होता. सीमेवरून दळणवळण आणि व्यापार वाढला तर सीमा आपोआप पुसट होईल असे त्यांना वाटत होते.
---------------------------------------------------------------------------------------


 सर्वाधिक वेळा काश्मीरचा दौरा करणारे पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांची नोंद घ्यावी लागेल. आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत मनमोहनसिंग यांनी तब्बल १६ वेळा काश्मीरला भेट दिली. या भेटी प्रामुख्याने विकास योजनांचा प्रारंभ करण्यासाठी किंवा काश्मीरमध्ये चिरकाल शांतता टिकावी यासाठी विविध पक्षाशी आणि गटांशी चर्चा करण्यासाठी आयोजिलेल्या असायच्या. पंतप्रधानाच्या एवढ्या भेटी आणि एवढ्या बैठका हा त्याकाळात काश्मीर मधील दहशतवादी गटांच्या कारवायांना बराच आळा बसला होता याचा पुरावा मानला जातो. काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी आधी सारखी अनुकूल परिस्थिती नसल्यानेच भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी  मुंबईत २००८ साली मोठा आतंकवादी हल्ला घडवून आणला.  मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतील पहिली चार वर्षे काश्मिरात बऱ्यापैकी शांतता असल्याने विविध विकासकामांना याकाळात चालना मिळाली. भारत - पाकिस्तान संबंध सुधारले तरच काश्मिरात शांतता नांदेल हे अटलबिहारी वाजपेयी यांनी ओळखले होते आणि म्हणून अनुकूल स्थिती नसतानाही त्यांनी पाकिस्तानशी विविध पातळीवर चर्चा आणि संवाद सुरु ठेवला होता. मनमोहनसिंग यांनी या चर्चेत आणि संवादात खंड पडू दिला नाही. सार्क बैठकीच्या वेळी अटलबिहारी आणि मुशर्रफ यांच्यात २००४ साली शेवटची बैठक झाली होती. त्यात मंत्री आणि अधिकारी पातळीवर बैठका घेवून संबंध सुरळीत करण्यावर भर दिला होता. ही प्रक्रिया मनमोहनसिंग यांनी पुढे नेली. अधिकृत चर्चेशिवाय नागरिक आणि निवृत्त अधिकारी पातळीवर अनौपचारिक चर्चेवरही मनमोहनसिंग यांनी भर दिला होता. नरसिंहराव काळापासून काश्मीर प्रश्नाशी त्यांचा संबंध आल्याने काय करण्याची गरज आहे याबाबत त्यांची स्पष्ट अशी भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेत फेरफार किंवा बदल शक्य नाही पण काश्मिरी जनतेला विभागणारी सीमारेषा बदलता येत नसली तरी ती निष्प्रभ ठरवता येईल असा त्यांचा विश्वास होता. सीमेवरून दळणवळण आणि व्यापार वाढला तर सीमा आपोआप पुसट होईल असे त्यांना वाटत होते व म्हणून त्यांनी त्या दिशेने पाउले उचलली. यातील पहिले महत्वाचे पाउल होते श्रीनगर ते मुजफर्राबाद बस सेवा सुरु करण्याचे .

२००४ साली पंतप्रधान बनल्यानंतर काही महिन्यातच युनोच्या आमसभेच्या प्रसंगी मनमोहनसिंग - मुशर्रफ भेट झाली होती. या भेटीत दोन देशातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी वाजपेयी काळात ठरल्या प्रमाणे अधिकारी व मंत्री पातळीवरच्या बैठका पुढे चालू ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दोन देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत श्रीनगर ते मुजफर्राबाद बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने पश्तुनी टोळ्यांना शस्त्रसज्ज करून काश्मिरात घुसखोरी केली तेव्हापासून या दोन शहरा दरम्यान सुरु असलेली बससेवा खंडित झाली होती. ही बससेवा सुरु करण्यावर पहिल्यांदा १९९९-२००० साला दरम्यान वाजपेयी आणि नवाज शरीफ यांचे दरम्यान चर्चा झाली होती. नंतर २००२ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनल्यानंतर  पंतप्रधान वाजपेयी यांचेकडे या बससेवेचा विषय काढला. वाजपेयी अनुकूल होते पण पाकिस्तानचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नसल्याने तो विषय मागे पडला. सीमापार दळणवळण आणि व्यापार सुरु करण्यात मनमोहनसिंग यांना विशेष रस असल्याने त्यांच्या सरकारने पाठपुरावा करून ही बससेवा सुरु करण्यास पाकिस्तानला तयार केले. दोन्ही देशातील आणि काश्मीरच्या दोन्ही भागातील संबंध सुरळीत होणारे हे पाउल असल्याने दहशतवादी संघटनांचा या बससेवेला विरोध होता. ६ एप्रिल २००५ रोजी श्रीनगरहून सुटणाऱ्या बसला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखविणार होते. तो कार्यक्रम हाणून पडण्यासाठी दहशतवाद्यांनी बस जिथून सुरु होणार होती तिथे जाळपोळ केली होती. तरी सुद्धा ठरलेल्या वेळी बससेवा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि बसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग श्रीनगरला आले. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या व पीडीपी पक्षाची अध्यक्षा महेबुबा मुफ्ती यांनी या पहिल्या बस मधून प्रवास केला. सीमापार बससेवा हा दोन देशातील विश्वास वाढविणारी  घटना होती. हुरियत कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट, आणि इतर विरोधी गटांना बससेवा प्रारंभ करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते पण त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे पसंत केले. काश्मिरी जनतेने मात्र या ऐतिहासिक बससेवेचे स्वागत केले. 

वाजपेयींनी जेव्हा नवी दिल्ली - लाहोर बससेवा सुरु करण्याचा व पहिल्या बसने लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या निर्णयाचा गाजावाजा आणि स्वागत झाले होते. दोन देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने त्या काळातील ते मोठे पाउल होते. तेवढा गाजावाजा श्रीनगर-मुजफर्राबाद बससेवेचा झाला नसला तरी प्रत्यक्ष काश्मिरात सर्वसामान्य जनतेने या बससेवेला डोक्यावर घेतले. अनेक विभागलेल्या कुटुंबाच्या भेटीगाठी या बससेवेने सुकर केल्या होत्या. ही बससेवा सुरु झाल्यानंतर १० दिवसांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ हे भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्याच्या निमित्ताने भारत भेटीवर आले होते. त्यावेळी झालेल्या मनमोहन-मुशर्रफ बैठकीत दोन्ही देशा दरम्यान रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. काश्मीरमधील आणखी काही शहरा दरम्यान बससेवा सुरु करण्याला अनुकुलता दाखविण्यात आली. सर्वात महत्वाचा निर्णय झाला तो काश्मीरमधील नियंत्रण रेषा व्यापारासाठी खुली करण्याचा. नियंत्रण रेषा किंवा सीमारेषा बदलता येणार नसली तरी ती निष्प्रभ ठरविण्याच्या मनमोहनसिंग यांच्या विचाराला व प्रयत्नाला मिळालेले हे मोठे यश होते. याचवर्षी पाकव्याप्त काश्मीरला उध्वस्त करणारा मोठा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपात ८० हजाराच्यावर लोक मृत्युमुखी पडले आणि तितकेच जखमी झालेत. जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. ही मदत लवकर पोचण्यासाठी जम्मू नियंत्रण रेषेवरील मार्ग खुला करणे गरजेचे होते. भारताने तात्काळ मान्यता दिली. हा नवा मार्ग खुला केला तर पाकव्याप्त काश्मीर मधील काही शहरावर भारतीय प्रभाव वाढण्याची पाकिस्तानला भीती वाटत होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीसाठी मार्ग खुला करण्याचा दबाव वाढल्यानंतर जम्मू नियंत्रण रेषेवरून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्याचा मार्ग पाकिस्तानने खुला केला व भूकंपग्रस्तासाठी भारताने केलेली मदत स्वीकारली पण ती देखील मनाचा कोतेपणा दाखवून.  मदत भारतातून आली आहे याचे कोणतेही चिन्ह दिसणार नाही याची काळजी पाकिस्तानने घेतली. श्रीनगर - मुजफार्राबाद बसमुळे विभक्त परिवारांना मिळालेला दिलासा व निर्माण झालेले सौहार्द लक्षात घेवून पुढे २००६ साली पुछ्-रावळकोट बस सुरु करण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली. त्यावेळी पीडीपी-कॉंग्रेस करारानुसार  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री पद कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद यांचेकडे आले होते. त्यांनीच या बसला हिरवी झेंडी दाखविली. दोन देशातील विश्वास आणि जनतेचे संबंध वाढविण्यासाठी मनमोहन काळात झालेला आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे अमृतसरहून गुरु नानक यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे जाण्यासाठी बससेवा सुरु करणे. पंज आब या नावाने ही बस सेवा सुरु झाली. २४ मार्च २००६ साली पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या बसला हिरवी झेंडी दाखविली. पाकिस्तानने दोस्ती नावाने या मार्गावर बससेवा सुरु केली. मनमोहनसिंग यांनी दोन देशातील विश्वास वाढविण्यासाठी आणि जनतेचे संबंध वाढविण्यासाठी बस डीप्लोमसीचा यशस्वीरीत्या वापर केला. मनमोहनसिंग यांचे जन्मगांव पाकिस्तानात असूनही १० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकदाही पाकिस्तानला भेट दिली नाही.

                                                          (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------------  

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment