Thursday, December 19, 2024

ई व्हि एम बाबतच्या संशयकल्लोळास सरकार आणि संवैधानिक संस्था जबाबदार -- १

जगातील मोठा उद्योजक व तंत्रज्ञ असलेला इलॉन मस्क याने कोणतेही ई व्हि एम हॅक करणे शक्य असल्याने मतदानासाठी त्याचा वापर थांबविण्याची जाहीरपणे मागणी केल्याने ई व्हि एम विरोधाची धार वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाची भूमिका संशयास्पद ठरते. त्यामुळे ई व्हि एम संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याचे पहिले कारण भारतीय निवडणूक आयोग आहे. 
----------------------------------------------------------------------------------------


 कोणत्याही निवडणूक विजयाचा अर्थ निवडणूक निकालानंतर लावायला आजवर अडचण गेली नाही. २०१४ पासूनचा विचार केला तरी हे लक्षात येईल. २०१४ च्या मोदी विजयाला मनमोहन सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि आरोपाला आडून आडून का होईना सर्वोच्च न्यायालयाने व कॅग या दोन्ही वैधानिक संस्थांनी लोकांच्या मनात संशय निर्माण होईल अशी केलेली विधाने कारणीभूत होती हे सर्वमान्य आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बीजेपीचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता हस्तगत केल्याने २०१९ ची निवडणूक चुरशीची होईल असे मानले जात होते. पण लोकसभेच्या त्या निवडणुकीत काही महिन्यापूर्वी विधानसभा जिंकणारी कॉंग्रेस भुईसपाट झाली होती. अगदी ५ महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक जिंकणारी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत भुईसपाट झाली तशी. विधानसभा जिंकलेल्या राज्यात कॉंग्रेसला एकही लोकसभा जागा न मिळण्याचा प्रकार तेव्हा घडला होता. त्याबाबतीत कोणालाही आश्चर्य वाटले नव्हते. पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक बाबत जणू काही मोठे युद्ध जिंकले असा गाजावाजा करण्यात सत्ताधारी पक्षाच्या प्रचारतंत्राला जनउन्माद निर्माण करण्यात आलेल्या यशाचा तो परिणाम होता आणि २०१९ चे मोदींचे यश हे सर्जिकल स्ट्राईकचे यश होते याबाबत दुमत नव्हते.                                                             

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अनपेक्षित प्रचंड यशाला असे कोणतेही कारण नसल्याचा उहापोह मागच्या तीन लेखात [अनाकलनीय व अतार्किक निकाल ] केला होता. विजयाचे पटण्यासारखे कोणतेही कारण नसल्याने ई व्हि एम बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि ई व्हि एम बाबतचा विरोध वाढलाच नाही तर मारकडवाडीने तो रस्त्यावर आणला. एकाचे मतदान दुसऱ्याला गेले असा कोणताही पुरावा समोर आला नसला तरी ई व्ही एम च्या आधीपासून चालत आलेल्या वादाचे रुपांतर गदारोळात झाले आहे. असा गदारोळ होवून ई व्हि एम बाबत संशयकल्लोळ निर्माण होण्यामागे त्या मशीन पेक्षा त्या मशीनची पाठराखण करणाऱ्या सरकारची व निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालया सारख्या संस्थांची भूमिका अधिक कारणीभूत ठरली आहे. ई व्हि एम मशीन बाबत बोलायचे झाले तर एकाला दिलेले मत दुसऱ्याला जाईल असे त्यातील चिपचे प्रोग्रामिंग करणे शक्य आहे एवढेच तज्ञांच्या सांगण्यातून समोर येते. 'आप' पार्टीच्या एका आमदाराने दिल्ली विधानसभेत एका पक्षाला किंवा उमेदवाराला दिलेले मत दुसऱ्या पक्षाला किंवा उमेदवाराला कसे जावू शकते याचे प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविले. अशी आणखी काही प्रात्याक्षिके युंट्यूब वर उपलब्ध आहेत. निवडणूक आयोग अशा प्रयोगासाठी वापरण्यात येत असलेल्या मशीन बाबत शंका व्यक्त करीत आहे. ते काही निवडणूक आयोगाच्या तंत्रज्ञांनी प्रमाणित केलेले मशीन नसल्याने ते काय दर्शविते यावर आयोग विचार करणार नाही असे आयोगाचे म्हणणे आहे.  जगातील मोठा उद्योजक व तंत्रज्ञ असलेला इलॉन मस्क याने कोणतेही ई व्हि एम हॅक करणे शक्य असल्याने मतदानासाठी त्याचा वापर थांबविण्याची जाहीरपणे मागणी केल्याने ई व्हि एम विरोधाची धार वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाची भूमिका संशयास्पद ठरते. त्यामुळे ई व्हि एम संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याचे पहिले कारण भारतीय निवडणूक आयोग आहे. 

अनेक कारणांनी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसातळाला गेल्याने आयोग ज्या पद्धतीने ई व्हि एम ची पाठराखण करीत आहे त्यावर विश्वास ठेवणे अनेकांना जड जात आहे. हा निवडणूक आयोग कायम सत्ताधाऱ्यांच्या सोयीने आणि बाजूने निर्णय घेत आल्याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. प्रचलित नियम व कायदे धाब्यावर बसवून शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देणे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटून निघालेल्या अजित पवारांच्या हाती देण्याने आयोगाचे अंतरंग उघड झाले आहे. पंतप्रधान मोदी आणि अनेक भाजपा नेते निवडणुकीत जी भाषा आणि जे मुद्दे वापरण्यास बंदी आहे टी भाषा आणि मुद्दे खुलेआम वापरत असूनही निवडणूक आयोग काहीच कारवाई करत नसल्याचे प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. सत्ताधारी पक्षाला व सरकारला योजनांच्या घोषणासाठी व प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा अशा सोयीने निवडणूक कार्यक्रम घोषित करते व राबविते हे लपून राहिलेले नाही. एवढा उघड पक्षपात करणारा निवडणूक आयोग असेल तर ई व्हि एम बाबतचे आयोगाचे दावे विरोधक मान्य करणे शक्य नाही. ई व्हि एम बाबतच्या सर्व शंकाकुशंका पारदर्शक पद्धतीने दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना आयोग ई व्हि एम चा विरोध करणाऱ्यांना ई व्हि एम चुकीच्या पद्धतीने काम करते हे सिद्ध करण्याचे आव्हान देत असते. पुन्हा मशीनला हात न लावता ते सिद्ध करून दाखवा अशी आयोगाची हास्यास्पद भूमिका असते. प्रायोगिक रुपात हेराफेरी दाखविले जाणारे मशीन निवडणूक आयोगाचे नाही म्हणून तो प्रयोग गांभीर्याने बघणार नसल्याच्या आयोगाच्या म्हणण्यातील हवा काढणारे एक उदाहरण समोर आले आहे. लोकप्रतिनिधीना परत बोलावण्याचा अधिकार मिळावा यासाठी चळवळ चालविणारे आणि तंत्रज्ञ असलेले चिमणभाई मेहता यांनी निवडणूक आयोगाला १२ फेब्रुवारी २०२४ रोजी एक पत्र लिहिले. पत्रा सोबत ४० हजार रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जोडला आणि व्हिव्हिपॅट सहित ईव्हिएम चा आयोगाच्या ताब्यातील पूर्ण सेट द्यावा अशी मागणी केली. तुमच्या सेट वर तुमच्या समोर या यंत्रातून मतांची हेराफेरी कशी करता येते हे दाखवून देतो असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. १२ फेब्रुवारीच्या पत्राला आजतागायत निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाचे मौन ई व्हि एम बद्दलचा संशय वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.                       

व्हिव्हिपॅटची मते मोजण्या बाबतची आयोगाची भूमिकाही संशयाला जन्म देणारी आहे. ई व्हि एम वर नोंद झालेली मते आणि व्हिव्हिपॅट मध्ये पडलेली मते यांची जुळणी झाल्यावरच निकाल घोषित करण्यात यावा या मागणीला निवडणूक आयोग कायम विरोध करीत आले आहे. त्यासाठी देण्यात येणारे कारणही फुसके आहे. असे केले तर निकाल घोषित करायला वेळ लागेल हे आयोगाच्या विरोधाचे कारण . मतदानाचा कार्यक्रम दोन दोन महिने आणि अनावश्यक अशा अनेक फेऱ्यात राबविणाऱ्या आयोगाला व्हिव्हिपॅट मतांची मोजणी करायला आणखी काही तास खर्च करायला असणारा विरोध समजण्याच्या पलीकडचा आहे. एखाद्या उमेदवाराचा काही केंद्रावर अशी मतमोजणी करण्याचा आग्रह असेल तर आयोग त्यासाठी लाखो रुपये भरायला लावते. आयोगाची अशी करणी संशयाला जन्म देणारी ठरते. ई व्हि एम बद्दलचे आक्षेप आहेच पण त्याचा एक फायदा असा आहे की कोणत्या क्षणी किती मतदान झाले हा आकडा तत्काळ कलतो. तासातासाला याबाबत अचूक अपडेट देणे निवडणूक आयोगाला शक्य होते. त्यामुळे प्राथमिक आकडे आणि अंतिम आकडे वेगवेगळे असण्याचे कारण नाही. इंटरनेट उपलब्ध नव्हते आणि झालेल्या मतदानाची बेरीज करायला वेळ लागायचा तेव्हा पहिल्या दिवशीच्या आकड्यापेक्षा दुसऱ्या दिवशीचा वाढीव आणि वेगळा असणे स्वाभाविक होते. ई व्हि एम मुळे आकडा पटकन कलतो व इंटरनेट मुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात लगेच कळू शकतो अशा स्थितीत अंतिम आकडा विलंबाने व वेगळा येण्याचे काहीच कारण नाही. मतदान संपण्याची वेळ ७ ची आहे त्या वेळेपर्यंतचा आकडा निवडणूक आयोग रात्री १० च्या आत घोषित करू शकत असेल तर सात वाजे नंतर रांगेत उभे असलेल्या मतदारांनी मतदान केल्याचा आकडा सांगायला दिवस कशाला लागतो. आयोग अंतिम आकडा देण्यास अनाकलनीय विलंब लावतो संशयाला वाव मिळतो. वाढीव मतदान ई व्हि एम मध्ये कसे सामील करीत असतील असा प्रश्न निर्माण होवून इव्हिएम बद्दल संशय निर्माण होतो. ई व्हि एम च्या कार्यपद्धती बद्दल तंत्रज्ञच ठाम सांगू शकतात पण आयोगाच्या कार्यपद्धतीचे आकलन सर्वसामान्याला होते. मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था असताना मतदानाची वेळ संपली तेव्हा किती लोक रांगेत उभे होते त्याचे सीसीटीव्ही द्वारे झालेले चित्रण दाखविण्याची मागणी आयोगाने पूर्ण न  करणे आक्षेपार्ह आणि संशयास्पद ठरते. 
                                                             
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Thursday, December 12, 2024

अनाकलनीय आणि अतार्किक निकाल -- ३

 महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आला त्यासाठी कोणतेही परिस्थितीजन्य किंवा तर्कसंगत कारण देता येत नाही. त्यामुळे या निकालासाठी ई व्हि एम कडे बोट दाखविणारांची संख्या एकाएकी वाढली आहे. मतदारांचे मत ई व्हि एम मुळे बदलू शकते का या विषयावर चर्चा होवू लागली आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल पैशाने बदलला असे मानणे हे सर्वसामान्य जनता व मतदार यांना लोकशाहीशी काही देणेघेणे नाही असे मानण्यासारखे आहे. पाच महिन्यापूर्वी ज्या मतदारांनी संविधान रक्षणासाठी मतदान केले हे जिंकणारे व हरणारेही मान्य करतात या पार्श्वभूमीवर लोकांना लोकशाहीशी देणेघेणे नाही ही मान्यता चुकीची ठरते. याचमुळे एक है तो सेफ है ही मोदींची घोषणा किंवा बटेंगे तो कटेंगे ही योगीची घोषणा आरेसेसने घरोघरी पोचवून धृवीकरण घडवून आणण्यात यश मिळाल्याने असा निकाल लागला हे मान्य करता येत नाही. मोदी योगीच्या घोषणानी धृवीकरण होतय हे त्यांच्या सभातुनच लक्षात आले असते. त्यांच्या सभात उन्मादी चित्कार ऐकायला मिळाले असते. असा कोणताही प्रतिसाद त्यांच्या सभांना मिळाला नाही. लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या दरम्यान धार्मिक ध्रुवीकरणाला पोषक अशा कोणत्याही घटना महाराष्ट्रात किंवा देशात घडलेल्या नव्हत्या. उलट लोकसभा निवडणुकीपूर्वी लव्ह जिहाद सारखे मुद्दे घेवून हिंदू एकता समितीच्या नावावर ठिकठिकाणी मोठमोठे मोर्चे काढण्यात आले होते. त्यात अत्यंत चिथावणीखोर भाषणे देण्यात येत होती. मुस्लिमांवर बहिष्कार टाका अशी कायद्याची उल्लंघन करणारी आवाहने उघडपणे केली जात होती. मोर्चात सामील होणाऱ्या लोकांची सांख्य मोठी होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांना ही पार्श्वभूमी असताना निकालात धार्मिक धृविकरणाचा लवलेशही नव्हता. लोकसभा निवडणुकी नंतर तर या मंडळींचा धृविकरणाचा प्रयत्न आणि आवाज तर बंदच झाला होता . उलट मदरसा शिक्षकांना भरपूर पगारवाढ, वक्फ बोर्डाला अनुदान यासारखे निर्णय मधल्या काळात झालेत. हिंदू-मुस्लीम तणावाची कोणतीही पार्श्वभूमी विधानसभा निवडणुकीला नव्हती. संघाच्या लोकांनी मुस्लिमांविरुद्ध विषवमन करणारी पत्रके घरोघरी वाटली होती हे खरे. पण असे ते प्रत्येक निवडणुकीतच करतात. यावेळची भाषा अधिक उग्र व कायद्याची भीती न दर्शविणारी होती हे खरे पण त्यांच्यामुळे विधानसभेचे असे निकाल लागले हे म्हणणे फारच हास्यास्पद आहे. आपल्या प्रयत्नाचा हा विजय असल्याचे संघाचे प्रतिपादन हे मोदीशाहच्या दरबारात आपले महत्व अधोरेखित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. संघाचा अजित पवारांना असलेला विरोध सर्वश्रुत आहे. महायुतीत असूनही अजित पवार यांनी मोदी-योगी यांच्या ध्रुवीकरणासाठी दिलेल्या घोषणांचा प्रचारा दरम्यान जाहीर विरोध केला होता. तरीही अजित पवारांच्या पक्षाला महायुतीतील दुसऱ्या पक्षासारखाच मोठा विजय मिळविला आहे.                                                                                                                                     

 मोदी-योगी यांनी ज्या घोषणा दिल्या त्याच्या आडून धृविकरणाचा प्रयत्न केला. पण मनसेच्या राज ठाकरेंनी तर आडपडदा न ठेवता धृविकरणाचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणाची सुरुवातच 'माझ्या हिंदू भावा-बहिणीनो' अशी असायची. मस्जीदीवरील भोंगे ४ तासात उतरवायची वल्गना ते करायचे. हा स्वघोषित नवा हिंदू हृदय सम्राट लोकांनी झिडकारला. भाजपने जाहीर समर्थन देवूनही राज ठाकरेंना आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही. आधीचा एक आमदारही या निवडणुकीत टिकवता आला नाही. हिंदू एकता हाच महायुतीच्या मोठ्या विजयाला कारणीभूत असणारा मुद्दा असता तर या निवडणुकीत जेवढे मुस्लीम आमदार निवडून आलेत तेवढे आले नसते आणि ज्या मतदारसंघात प्रभाव पडण्या सारखी मुस्लीम मते आहेत त्या मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाली नसते.  शिवाय धार्मिक ध्रुवीकरण आणि मराठा - ओबीसी धृवीकरण या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. दोन्ही पैकी एकच धृवीकरण शक्य आहे. मग प्रश्न पडतो धार्मिक धृविकरणामुळे महायुतीचा विजय झाला नसेल तर ओबीसी-मराठा धृवीकरण विजयाला कारणीभूत आहेत का ? पण तसेही दिसत नाही. तसे धृवीकरण झाले असते तर मराठा समाज आरक्षण मुद्द्यावर महायुती विरोधात असल्याने मराठाबहुल मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असते. तसे घडलेले नाही. पैसा, धार्मिक धृवीकरण व जातीचे ध्रुवीकरण यापैकी कोणतेही एक कारण या विजयासाठी पुढे करता येत नाही. थोड्याफार प्रमाणात या तिन्ही घटकांनी महायुतीच्या विजयात हातभार लावला असा दावा नक्की करता येईल. पण मग कोणती लाट नव्हती हे मान्य करावे लागेल. लाट नव्हती तर निकाल लाट असताना लागतात तसे का लागलेत या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आला त्यासाठी कोणतेही परिस्थितीजन्य किंवा तर्कसंगत कारण देता येत नाहीत त्यामुळे या निकालासाठी ई व्हि एम कडे बोट दाखविणारांची संख्या एकाएकी वाढली आहे. मतदारांचे मत ई व्हि एम मुळे बदलू शकते का या विषयावर चर्चा होवू लागली आहे. 


तशी ही चर्चा नवी नाही. मतदानासाठी  ई व्हि एम चा वापर सुरु झाल्यापासून अशी चर्चा सुरु आहे. ई व्हि एम विरोधात चर्चा सुरु करण्याचे श्रेय भाजपलाच द्यावे लागेल. लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी सारख्या भाजप नेत्यांनी ई व्हि एम ला प्रखर विरोध केला होता. त्या तुलनेत आजवर पराभव होवूनही कॉंग्रेसने तसा विरोध केला नव्हता. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाला नंतर कॉंग्रेसने ई व्हि एम ला विरोध जाहीर केला आहे. अशी समजूत आहे की मतप्त्रीकाना पर्याय म्हणून कॉंग्रेसने ई व्हि एम सुरु केले. पण ते खरे नाही. ई व्हि एम द्वारे मतदान घेण्याचा विचार १९७७ मध्ये जनता पार्टीच्या राजवटीत पुढे आला. प्रायोगिक स्वरुपात एका विधानसभा मतदार संघात केरळात ई व्हि एम चा वापर करण्यात आला. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. पण नंतर ई व्हि एम चा विचार मागे पडला आणि नंतर पुढे आला तो गैर काँग्रेसी राजवटीत. १९९८ ते २००४ पर्यंत काही ठिकाणी विधानसभा व लोकसभे साठीचे मतदान ई व्हि एम ने घेण्यात आले. पहिल्यांदा ई व्हि एम चा २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदार संघात ई व्हि एम चा वापर झाला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला ! यानंतर भाजपने ई व्हि एम चा विरोध केला होता. एवढ्यात सुप्रीम कोर्टाने असे निरीक्षण नोंदविले आहे की पराभव होतो ते लोक ई व्हि एम चा विरोध करतात. सकृतदर्शनी खरे वाटावे असे हे निरीक्षण आहे. पराभूत राजकीय पक्ष ई व्हि एम वर ठपका ठेवत असले तरी ई व्हि एम चा विरोध करणारे बिगर राजकीय समूहही आहेत आणि त्यांचा ई व्हि एम ला सातत्याने विरोध राहिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाला नंतर ई व्हि एम बद्दल शंकाकुशंका जनतेकडून व्यक्त होवू लागल्या आहेत. शंका निरसनासाठी मारकडवाडी सारखे प्रयोग करण्याची तयारी अनेक ठिकाणी सुरु असल्याच्या वार्ता आहेत. याचा अर्थ पराभूत राजकीय पक्षच नाही तर ई व्हि एमच्या विरोधात सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. महाराष्ट्रविधान सभेचे निकाल ई व्हि एम मुळे असे लागलेत का याचे समाधानकारक उत्तर सध्यातरी समोर आलेले नाही. तज्ञांची मते लक्षात घेवून अगदी तांत्रिक अंगाने विचार केला तर असे होणे शक्य आहे एवढेच उत्तर मिळते. पण त्याच सोबत असे घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या तर ई व्हि एम ने निवडणूक जिंकणे अवघड आहे हेही लक्षात येते. निवडणूक आयोगानेच आपली विश्वासार्हता गमावली असल्याने त्याच्या उपाययोजनांवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न उडवून लावण्यासारखा नाही. एकूणच निवडणूक प्रणाली पारदर्शक व विश्वासार्ह बनविण्याची निकड महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालाने अधोरेखित केली आहे.
 
------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, December 5, 2024

अनाकलनीय आणि अतार्किक निकाल - २

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या कारणासाठी लोकसभेत मतदारांनी सहानुभूती व्यक्त केली होती ती विधानसभा निवडणुकीत कुठेच का दिसली नाही या प्रश्नाचे कोणतेही समर्पक उत्तर निवडणूक निकालातून मिळत नाही.
------------------------------------------------------------------------------------------


एकीकडे अवघ्या ५ महिन्यात निकालात उलटफेर घडावा असा पराक्रम महायुती सरकारने गाजविला नाही तर  दुसरीकडे लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीकडून घोडचुका घडल्यात का तर तसेही दिसत नाही. निकाला नंतर अशी चर्चा जरूर होते आहे की महाविकास आघाडीने अमुक करायला पाहिजे होते तमुक करायला पाहिजे होते. पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक लढली त्याच पद्धतीने विधानसभा लढली. उलट लोकसभेपेक्षा अधिक आत्मविश्वासाने लढली. आघाडीत कुरबुरी चालतात व कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असतो. तो लोकसभेतही झाला आणि विधानसभेतही झाला. यामुळे दारूण पराभव होत नसतो. काही जगावर फटका जरूर बसू शकतो. ट्रंपेट व तुतारी या चिन्हातील साम्याचा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभेत बसला तसा विधानसभेतही बसला. ते विधानसभेतील घसरणीचे कारण असू शकत नाही. भाजपकडून उभे करण्यात आलेल्या अपक्ष उमेदवारामुळे आणि भाजप -महायुती विरोधात लढणाऱ्या पक्षात झालेल्या मतविभागणीचा फटका काही जागांवर महाविकास आघाडीला जरूर बसला. तरीही या कारणांनी एवढा मोठा पराभव संभवत नाही.  म्हणूनच महाराष्ट्रातील निवडणूक निकाल समजून घेण्याचे व समजून देण्याचे मोठे आव्हान राजकीय विश्लेषका समोर आहे. लोकसभा निवडणुकी नंतर महाराष्ट्रातील निवडणूक निकालांचे विश्लेषण ज्यांनी ज्यांनी केले त्यात प्रामुख्याने ३ मुद्दे अधोरेखित करण्यात आले होते.                                                                                                                                               


पहिला मुद्दा होता भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले तर संविधान बदलाचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी मतदारांनी एकजूट होवून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय मिळवून दिला. लोकसभेतील महाविकास आघाडीच्या विजया मागे दुसरा मुद्दा जो अधोरेखित करण्यात आला होता तो ज्याप्रकारे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तोडण्यात आली आणि निवडणूक आयोगा सारख्या संवैधानिक संस्थेने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून पार्टी तोडणाऱ्याला पार्टीचेनाव व चिन्ह बहाल केले ते जनतेला आवडले नाही. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी न्याय देण्यात अक्षम्य दिरंगाई चालविण्याचा मुद्दाही निकालामागे असल्याचे सांगण्यात आले. लोकसभेच्या निकालामागचे तिसरे कारण अधोरेखित करण्यात आले होते ते म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे , इडी, सीबीआय सारख्या संस्थांचा ससेमिरा मागे लावायचा आणि मग त्याच लोकांना सोबत घेवून सत्तेवर मजबूत पकड बसवायची या भाजप नेतृत्वाच्या कार्यपद्धती विरुद्ध मतदारांनी असंतोष व्यक्त केला. विजयाचे चौथे कारण नमूद करण्यात आले होते ते शेतीमालाच्या भावाचे. शेतकऱ्यातील वाढत्या असंतोषाचा फटका. महाराष्ट्र सरकारातील तिन्ही म्होरके लोकप्रिय नसल्याचे लोकसभा निकालातून स्पष्ट झाले होते. 

लोकसभा निवडणूक निकालाने घटना बदलण्याची सत्ताधारी भाजपची शक्ती मतदारांनी हिरावून घेतल्याने तो मुद्दा विधानसभा निवडणुकीत उरला नव्हता हे खरे. पण ४ पैकी ३ मुद्दे उरलेच नाही तर अधिक तीव्र झाले होते. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत एका पत्रकाराचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या पुस्तकात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे एक नेते छगन भुजबळ यांचा हवाला देवून स्पष्ट करण्यात आले होते की राष्ट्रवादीच्या फुटी मागे इडीचे लचांड होते. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला नसता तर त्यांच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता होती. अटकेच्या भीतीने अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला असे प्रतिपादन त्या पुस्तकात छगन भुजबळ यांच्या हवाल्याने करण्यात आले होते. जर विधानसभा निवडणुकीत पक्ष फोडल्याबद्दल मतदारांनी अजित पवार आणि त्यांच्या गटा बद्दल राग व्यक्त करून लोकसभा निवडणुकीत पराजित केले होते तर विधानसभा निवडणुकीत नवीन खुलाशानंतर अजित पवार गटाचा दारूण पराभव व्हायला हवा होता. पण झाले उलटेच. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या कारणासाठी लोकसभेत मतदारांनी सहानुभूती व्यक्त केली होती ती विधानसभा निवडणुकीत कुठेच का दिसली नाही या प्रश्नाचे कोणतेही समर्पक उत्तर निवडणूक निकालातून मिळत नाही. खरे तर विधानसभेची मुदत संपून गेली तरी सुप्रीम कोर्टाने निकाल देण्याचे टाळून मोठा अन्याय केला होता. या अन्यायामुळे तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढायला पाहिजे होती. ज्या मुद्द्यावर विधानसभेत मतदारांनी निर्णय दिला होता त्याच मुद्द्यावर अवघ्या ५ महिन्यानंतर आधीच्या निर्णया विरुद्ध निर्णय मतदारांनी कोणत्या कारणासाठी दिला ते स्पष्ट होत नाही.                                                                                 


जसे लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण समोर आले तसे विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयाच्या विश्लेषणातून जी कारणे समोर आली आहेत त्यात लाडकी बहिण योजना आणि पैशाचा मत विकत घेण्यासाठी झालेला वापर हे पहिले कारण सांगितले जाते. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या मोदी-योगींच्या घोषणांनी आणि या घोषणा घरोघरी पोचविण्यासाठी आरेसेसने घेतलेल्या परिश्रमामुळे हिंदू मतदारांची एकजूट झाल्याने असा निकाल आल्याचे दुसरे कारण सांगितले जाते. तिसरे कारण आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी मतदारांचे झालेले ध्रुवीकरण सांगण्यात येते. यामुळे ओबीसी मतदार महायुतीसाठी एकवटला आणि त्यामुळे महायुतीला मोठे यश मिळाल्याचा दावा केला जातो. या तिन्ही कारणांच्या प्रभावाचा विचार आणि विश्लेषण केले तर महायुतीच्या यशाचे रहस्य उलगडण्या ऐवजी रहस्य अधिक गडद झालेले दिसेल. लाडकी बहिण योजना आणि पैशाचा झालेला अमाप वापर यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीची परिस्थिती सुधारली यात वाद नाही. लाडकी बहिण योजना ही काही सर्व महिलांसाठी नव्हती. कमी उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ही योजना होती. त्यामुळे सरसकट महिलांनी महायुतीला मतदान केले हा तर्क पटण्या सारखा नाही. बहुतांश मुस्लीम समाज हा कमी उत्पन्न गटात मोडतो. त्यामुळे मुस्लीम महिलांनी मोठ्या प्रमाणात लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेत आणि निवडणुकीपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झालेत. मोदी आणि योगी यांनी एक है तो सेफ है व बटेंगे तो कटेंगे या घोषणा कोणाला डोळ्यासमोर ठेवून निवडणूक प्रचारात दिल्या हे सर्वांनाच माहित आहे. अशा स्थितीत लाडकी बहिण योजनेच्या मुस्लीम लाभार्थी महिला भाजपला मतदान करायला धजावणार नाहीत हे उघड आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांनी महायुतीला मत दिले असे मानता येत नाही. या योजनेमुळे काही टक्के महिलांनी महायुतीला मते दिली आहेत. पण जेवढा मोठा विजय मिळाला त्यासाठी हे कारण पुरेसे ठरत नाही. नगर परिषद व ग्राम पंचायतीच्या निवडणुका सारखे पैसे वाटप विधानसभा निवडणुकीत झाल्याची चर्चा यावेळी होती. पण पैसे घेवून मतदान करणाऱ्या वर्गापेक्षा पैसे न घेवून मतदान करणारा वर्ग फार मोठा आहे. कितीही पैसे वाटले गेले असतील तरी हे वास्तव बदलत नाही. पैसा हे कारण महायुतीच्या विजया मागे संभवत नाही. 

                                                          [अपूर्ण]
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८