महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आला त्यासाठी कोणतेही परिस्थितीजन्य किंवा तर्कसंगत कारण देता येत नाही. त्यामुळे या निकालासाठी ई व्हि एम कडे बोट दाखविणारांची संख्या एकाएकी वाढली आहे. मतदारांचे मत ई व्हि एम मुळे बदलू शकते का या विषयावर चर्चा होवू लागली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल पैशाने बदलला असे मानणे हे सर्वसामान्य जनता व मतदार यांना लोकशाहीशी काही देणेघेणे नाही असे मानण्यासारखे आहे. पाच महिन्यापूर्वी ज्या मतदारांनी संविधान रक्षणासाठी मतदान केले हे जिंकणारे व हरणारेही मान्य करतात या पार्श्वभूमीवर लोकांना लोकशाहीशी देणेघेणे नाही ही मान्यता चुकीची ठरते. याचमुळे एक है तो सेफ है ही मोदींची घोषणा किंवा बटेंगे तो कटेंगे ही योगीची घोषणा आरेसेसने घरोघरी पोचवून धृवीकरण घडवून आणण्यात यश मिळाल्याने असा निकाल लागला हे मान्य करता येत नाही. मोदी योगीच्या घोषणानी धृवीकरण होतय हे त्यांच्या सभातुनच लक्षात आले असते. त्यांच्या सभात उन्मादी चित्कार ऐकायला मिळाले असते. असा कोणताही प्रतिसाद त्यांच्या सभांना मिळाला नाही. लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या दरम्यान धार्मिक ध्रुवीकरणाला पोषक अशा कोणत्याही घटना महाराष्ट्रात किंवा देशात घडलेल्या नव्हत्या. उलट लोकसभा निवडणुकीपूर्वी लव्ह जिहाद सारखे मुद्दे घेवून हिंदू एकता समितीच्या नावावर ठिकठिकाणी मोठमोठे मोर्चे काढण्यात आले होते. त्यात अत्यंत चिथावणीखोर भाषणे देण्यात येत होती. मुस्लिमांवर बहिष्कार टाका अशी कायद्याची उल्लंघन करणारी आवाहने उघडपणे केली जात होती. मोर्चात सामील होणाऱ्या लोकांची सांख्य मोठी होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांना ही पार्श्वभूमी असताना निकालात धार्मिक धृविकरणाचा लवलेशही नव्हता. लोकसभा निवडणुकी नंतर तर या मंडळींचा धृविकरणाचा प्रयत्न आणि आवाज तर बंदच झाला होता . उलट मदरसा शिक्षकांना भरपूर पगारवाढ, वक्फ बोर्डाला अनुदान यासारखे निर्णय मधल्या काळात झालेत. हिंदू-मुस्लीम तणावाची कोणतीही पार्श्वभूमी विधानसभा निवडणुकीला नव्हती. संघाच्या लोकांनी मुस्लिमांविरुद्ध विषवमन करणारी पत्रके घरोघरी वाटली होती हे खरे. पण असे ते प्रत्येक निवडणुकीतच करतात. यावेळची भाषा अधिक उग्र व कायद्याची भीती न दर्शविणारी होती हे खरे पण त्यांच्यामुळे विधानसभेचे असे निकाल लागले हे म्हणणे फारच हास्यास्पद आहे. आपल्या प्रयत्नाचा हा विजय असल्याचे संघाचे प्रतिपादन हे मोदीशाहच्या दरबारात आपले महत्व अधोरेखित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. संघाचा अजित पवारांना असलेला विरोध सर्वश्रुत आहे. महायुतीत असूनही अजित पवार यांनी मोदी-योगी यांच्या ध्रुवीकरणासाठी दिलेल्या घोषणांचा प्रचारा दरम्यान जाहीर विरोध केला होता. तरीही अजित पवारांच्या पक्षाला महायुतीतील दुसऱ्या पक्षासारखाच मोठा विजय मिळविला आहे.
मोदी-योगी यांनी ज्या घोषणा दिल्या त्याच्या आडून धृविकरणाचा प्रयत्न केला. पण मनसेच्या राज ठाकरेंनी तर आडपडदा न ठेवता धृविकरणाचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणाची सुरुवातच 'माझ्या हिंदू भावा-बहिणीनो' अशी असायची. मस्जीदीवरील भोंगे ४ तासात उतरवायची वल्गना ते करायचे. हा स्वघोषित नवा हिंदू हृदय सम्राट लोकांनी झिडकारला. भाजपने जाहीर समर्थन देवूनही राज ठाकरेंना आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही. आधीचा एक आमदारही या निवडणुकीत टिकवता आला नाही. हिंदू एकता हाच महायुतीच्या मोठ्या विजयाला कारणीभूत असणारा मुद्दा असता तर या निवडणुकीत जेवढे मुस्लीम आमदार निवडून आलेत तेवढे आले नसते आणि ज्या मतदारसंघात प्रभाव पडण्या सारखी मुस्लीम मते आहेत त्या मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाली नसते. शिवाय धार्मिक ध्रुवीकरण आणि मराठा - ओबीसी धृवीकरण या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. दोन्ही पैकी एकच धृवीकरण शक्य आहे. मग प्रश्न पडतो धार्मिक धृविकरणामुळे महायुतीचा विजय झाला नसेल तर ओबीसी-मराठा धृवीकरण विजयाला कारणीभूत आहेत का ? पण तसेही दिसत नाही. तसे धृवीकरण झाले असते तर मराठा समाज आरक्षण मुद्द्यावर महायुती विरोधात असल्याने मराठाबहुल मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असते. तसे घडलेले नाही. पैसा, धार्मिक धृवीकरण व जातीचे ध्रुवीकरण यापैकी कोणतेही एक कारण या विजयासाठी पुढे करता येत नाही. थोड्याफार प्रमाणात या तिन्ही घटकांनी महायुतीच्या विजयात हातभार लावला असा दावा नक्की करता येईल. पण मग कोणती लाट नव्हती हे मान्य करावे लागेल. लाट नव्हती तर निकाल लाट असताना लागतात तसे का लागलेत या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आला त्यासाठी कोणतेही परिस्थितीजन्य किंवा तर्कसंगत कारण देता येत नाहीत त्यामुळे या निकालासाठी ई व्हि एम कडे बोट दाखविणारांची संख्या एकाएकी वाढली आहे. मतदारांचे मत ई व्हि एम मुळे बदलू शकते का या विषयावर चर्चा होवू लागली आहे.
तशी ही चर्चा नवी नाही. मतदानासाठी ई व्हि एम चा वापर सुरु झाल्यापासून अशी चर्चा सुरु आहे. ई व्हि एम विरोधात चर्चा सुरु करण्याचे श्रेय भाजपलाच द्यावे लागेल. लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी सारख्या भाजप नेत्यांनी ई व्हि एम ला प्रखर विरोध केला होता. त्या तुलनेत आजवर पराभव होवूनही कॉंग्रेसने तसा विरोध केला नव्हता. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाला नंतर कॉंग्रेसने ई व्हि एम ला विरोध जाहीर केला आहे. अशी समजूत आहे की मतप्त्रीकाना पर्याय म्हणून कॉंग्रेसने ई व्हि एम सुरु केले. पण ते खरे नाही. ई व्हि एम द्वारे मतदान घेण्याचा विचार १९७७ मध्ये जनता पार्टीच्या राजवटीत पुढे आला. प्रायोगिक स्वरुपात एका विधानसभा मतदार संघात केरळात ई व्हि एम चा वापर करण्यात आला. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. पण नंतर ई व्हि एम चा विचार मागे पडला आणि नंतर पुढे आला तो गैर काँग्रेसी राजवटीत. १९९८ ते २००४ पर्यंत काही ठिकाणी विधानसभा व लोकसभे साठीचे मतदान ई व्हि एम ने घेण्यात आले. पहिल्यांदा ई व्हि एम चा २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदार संघात ई व्हि एम चा वापर झाला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला ! यानंतर भाजपने ई व्हि एम चा विरोध केला होता. एवढ्यात सुप्रीम कोर्टाने असे निरीक्षण नोंदविले आहे की पराभव होतो ते लोक ई व्हि एम चा विरोध करतात. सकृतदर्शनी खरे वाटावे असे हे निरीक्षण आहे. पराभूत राजकीय पक्ष ई व्हि एम वर ठपका ठेवत असले तरी ई व्हि एम चा विरोध करणारे बिगर राजकीय समूहही आहेत आणि त्यांचा ई व्हि एम ला सातत्याने विरोध राहिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाला नंतर ई व्हि एम बद्दल शंकाकुशंका जनतेकडून व्यक्त होवू लागल्या आहेत. शंका निरसनासाठी मारकडवाडी सारखे प्रयोग करण्याची तयारी अनेक ठिकाणी सुरु असल्याच्या वार्ता आहेत. याचा अर्थ पराभूत राजकीय पक्षच नाही तर ई व्हि एमच्या विरोधात सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. महाराष्ट्रविधान सभेचे निकाल ई व्हि एम मुळे असे लागलेत का याचे समाधानकारक उत्तर सध्यातरी समोर आलेले नाही. तज्ञांची मते लक्षात घेवून अगदी तांत्रिक अंगाने विचार केला तर असे होणे शक्य आहे एवढेच उत्तर मिळते. पण त्याच सोबत असे घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या तर ई व्हि एम ने निवडणूक जिंकणे अवघड आहे हेही लक्षात येते. निवडणूक आयोगानेच आपली विश्वासार्हता गमावली असल्याने त्याच्या उपाययोजनांवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न उडवून लावण्यासारखा नाही. एकूणच निवडणूक प्रणाली पारदर्शक व विश्वासार्ह बनविण्याची निकड महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालाने अधोरेखित केली आहे.
------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment