Wednesday, February 6, 2013

मोदी ज्वराने भाजपला पछाडले !

राजकीय वास्तवतेचे भान नसलेल्या मोठया संख्येतील  मध्यमवर्गीयांमधील  लक्षणीय संख्या मोदींच्या पंतप्रधानपदाच्या मृगजळा मागे बेभानपणे धावते आहे हे खरे. असे असले तरी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तर सोडाच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील बनणे कठीण आहे. त्यांचे बलस्थान असलेला गुजरात मधील नरसंहार हाच त्यांचा पक्षाचा आणि देशाचा नेता बनण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींचा जाहीरपणे धावा करणाऱ्या पक्षातील नेत्यांना  दिलेली तंबी याचेच निदर्शक आहे.
--------------------------------------------------------------------------------

कॉंग्रेस आणि भाजप हे या देशातील दोन प्रमुख पक्ष असल्याने यांच्यातील घडामोडीकडे साऱ्यांचेच लक्ष असते. एवढ्यात या पक्षात लक्षवेधी घडामोडी घडल्यामुळे दोन्ही पक्षातील वातावरण ढवळून निघाले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंह या दोघांचेही उत्तराधिकारी म्हणून राहुल गांधी यांचे एकमेव नांव सातत्याने चर्चेत असल्याने जयपूर चिंतन बैठकीत राहूल गांधी यांना मिळालेली बढती अनपेक्षित नव्हती आणि त्यांच्या बाबतीत जे घडले ते इंदिरा गांधी पासूनच्या कॉंग्रेस परंपरेला शोभेसे आणि साजेसे असेच होते. याला समांतर अशा ज्या घडामोडी भारतीय जनता पक्षात घडल्या आहेत आणि घडत आहेत त्या मात्र अनपेक्षित अशाच आहेत. नितीन गडकरींचे भाजपात शीर्षस्थानी बसणे जितके अनपेक्षित होते तितकेच तेथून त्यांचे पायउतार होणे देखील तितकेच अनपेक्षित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपा वरील प्रभाव सर्वश्रुत आहे. भाजपच्या प्रत्येक अध्यक्षावर संघाचा वरदहस्त असणे ही त्या पक्षाची अपरिहार्यता आहे. पक्षाध्यक्षाच्या निवडीत संघाचा कल नेहमीच लक्षात घेतला गेला असला तरी पक्ष्याध्यक्षाची निवड पक्षाचे प्रमुख नेतेच करीत आले आहेत. पक्ष नेतृत्वाने निवडलेल्या अध्यक्षावर संघ शिक्कामोर्तब करीत असे. गडकरींचे पक्षाध्यक्ष बनणे याला अपवाद ठरले होते . गडकरींची निवड पक्ष नेतृत्वाने न करता स्वत: संघाने करून यावर शिक्कामोर्तब करायला भाग पाडले होते. म्हणूनच गडकरींची निवड अनपेक्षित होती. संघ गडकरींची एकदा निवड करून थांबला नाही तर त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनाच दुसऱ्यांदा संधी मिळावी म्हणून पक्ष घटनेत दुरुस्ती करायला संघाने भाग पाडले होते. पण या घटना दुरुस्तीचा फायदा गडकरींना न मिळता राजनाथसिंह यांना मिळाला. भाजपातील ही घडामोड केवळ अनपेक्षित नव्हती तर अभूतपूर्व अशी होती. ही घडामोड अभूतपूर्व या अर्थाने होती की पहिल्यांदाच भाजपाने संघाची अवज्ञा केली !संघ प्रचारक आणि सत्तेतील भाजप नेते यांच्यात यापूर्वी अनेकदा संघर्ष निर्माण झालेत , पण त्याला संघ विरुद्ध भाजप असे स्वरूप कधीच प्राप्त झाले नाही. गडकरी प्रकरणाला मात्र तसे स्वरूप प्राप्त होवून संघाच्या अधिकाराला भाजपा कडून पहिल्यांदाच आव्हान मिळून गडकरी आणि संघ या दोहोंचीही शोभा झाली. गडकरींच्या पतना सोबत भाजपात नरेंद्र मोदी यांचा भाव आणि प्रभाव वाढीस लागून भाजपात पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाची पद्धतशीर हाकाटी सुरु झाली. भाजपातील गडकरींचे पतन आणि मोदींच्या उदयाने भाजप-संघ यांचे संबंध प्रभावित होणार असल्याने आणि स्वत: भाजपच्या आजच्या स्वरूपावर मोठा परिणाम होणार असल्याने भाजपातील उथळ-पुथळ नव्या राजकीय शक्यता आणि समीकरणाना जन्म देणारी ठरणार आहे.

                                     गडकरींचे पतन
गडकरींच्या 'पूर्ती' उद्योग समूहातील उघडकीस आलेले गैरप्रकार आणि अनियमितता यामुळे गडकरींचे अध्यक्षपद गेले असे सकृतदर्शनी वाटत असले तरी तसे मानणे भाबडेपणाचे ठरेल. अशा कारणांनी पदावर राहायचे नाही म्हंटले तर कोणत्याच पक्षात कोणत्याच पदावर बसायला माणसे मिळणारच नाहीत. अशा गोष्टीचा उपयोग राजकारणात एकतर नको असलेल्या व्यक्तींना दुर सारण्यासाठी केल्या जातो किंवा सौदेबाजी साठी केला जातो. 'पूर्ती' उद्योग समूहातील भानगडींचा उपयोग गडकरींना दुर सारण्यासाठी करण्यात आला इतकेच. गडकरींना पक्षाध्यक्षपदी पुन्हा बसविण्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती होणार होती त्याच्या १-२ दिवस आधीच गडकरींच्या पूर्ती समूहा बद्दल गौप्यस्फोट करण्यात आला होता आणि दुसऱ्यांदा पक्षाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार होती त्याच्या चार दिवस आधी आयकर विभागाच्या नोटीशी बद्दल आणि चौकशी बद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होतील याची काळजी घेण्यात आली होती. हा योगायोग नक्कीच नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारकडून चौकशीची घोषणा झाली होती आणि त्या संदर्भात आयकर विभाग पाउले उचलणार हे ठरलेलेच होते. याच कारणासाठी राजीनामा द्यायचा किंवा घ्यायचा  होता तर चौकशीच्या घोषणेनंतर लगेच दिला किंवा घेतल्या गेला असता. या प्रकरणा नंतरही संघाचा गडकरी बद्दलचा आग्रह कायम होता आणि त्याला सुरुंग लावण्यासाठी पूर्ती प्रकरणाचा वापर करण्यात आला. राजीनामा देणे भाग पडल्या नंतर गडकरींनी संतप्त होवून तोल जाणारी जी विधाने केली त्यामागे पक्षातील सहकाऱ्यांनी केलेल्या कट कारस्थानावर त्यांचा रोख होता. यामागे कॉंग्रेस असल्याचे त्यांनी विधान केले असले तरी गडकरी त्या पदावर असणे कॉंग्रेस साठी फायद्याचे होते हे लक्षात घेतले तर गडकरींना घालविण्यात कोणाचा हात आहे हे लक्षात येते. संघाने भाजप वरील पकड घट्ट करण्यासाठी गडकरींचा मोहरा म्हणून उपयोग केला होता आणि संघाची ही खेळी संघावर उलटविण्यासाठी भाजप नेतृत्वाने या मोहऱ्याचा बळी घेतला. गडकरींना अध्यक्ष पदावर बसविण्यात आले तेव्हा गडकरी भाजपातील पाहिल्या फळीचे नेते नव्हते. महाराष्ट्रात सुद्धा नेतृत्वाच्या बाबतीत मुंडे नंतरच त्यांचे नांव घेतल्या जायचे. अशा दुसऱ्या फळीतील नेत्याला पक्षाच्या सर्वोच्चपदी बसविलेले पहिल्या पंक्तीतील नेत्यांना कधीच रुचले नव्हते. पण संघाविरुद्ध बंड करण्याची ताकद भाजप नेत्यात नसल्याने गडकरी दिल्लीत स्थानापन्न झाले. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागावा तसे भाजपच्या पाहिल्या फळीतील नेत्यांनी गडकरींना सहन केले होते. वाजपेयी -अडवाणी वगळले तर भाजपाचे सगळेच नेते संघप्रकाशित आणि संघावलंबी आहेत. वार्धक्यामुळे वाजपेयींचा अडसर दुर होताच अडवाणींना एकाकी पाडून संघाने भाजप वरील पकड मजबूत केली होती. मोदींनी देखील स्वत:चा जम बसवून ते संघावलंबी नाहीत हे दाखवून दिल्याने भाजपात मोदींचे प्रस्थ वाढणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली होती. पण 'पूर्ती'चे कोलीत हाती मिळताच अडवाणी-मोदी यांनी संघाचे प्यादे असलेले गडकरी यांना पटावरून काढून टाकले.अडवाणी आणि मोदी यांनी मिळून ही खेळी तडीस नेली असे म्हणायला आधार नाही. मोदी समर्थकांनी निर्माण केलेल्या वातावरणाचा अडवाणी यांनी अचूक वेळ साधून उपयोग करून घेतला. गडकरींच्या गळ्यात गळा घालणाऱ्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी गोड बोलून गडकरींचा गळा कापून अडवाणींना साथ दिली.  अडवाणी यांना पंतप्रधान पदापासून दुर ठेवण्याच्या संघाच्या खेळीला अडवाणींचे हे उत्तर होते. संघाने प्रयत्न करूनही पक्षातील अडवाणींचा प्रभाव ओसरला नाही हे या निमित्ताने सिद्ध झाले आणि केंद्रात भाजप प्रणीत सरकार गठीत होण्याची शक्यता निर्माण झाली तर अडवाणी यांना पंतप्रधान पदापासून दुर ठेवणे सोपे नाही याची चुणूक अडवाणींनी दाखवून दिली आहे. तसाही वय हीच  एकमेव बाब अडवाणी यांचे विरोधात आहे. म्हाताऱ्या नेतृत्वाचे देशाला वावडे नाही हे तर दिसतेच आहे . इतर पक्षांना मान्य होईल अशा भाजप नेत्यांमध्ये अडवाणी नक्कीच अग्रक्रमावर आहेत.  संघ प्रचारक राहिलेले मोदी सत्तेत आल्यानंतर स्वत:चे स्थान आणि मान निर्माण करण्यात यशस्वी झाले. मोदी हे आत्मकेन्द्री नेते असल्याने संघ परिवाराला भावणारा चमत्कार त्यांनी २००२ च्या गुजरात दंगलीत करूनही त्यांना भाजपच्या नेतृत्वाच्या पहिल्या फळीत कधीच स्थान मिळाले नाही. शिस्ती साठी प्रसिद्ध असलेल्या भाजपात बंडाळी माजवून त्यांनी या निमित्ताने एका दगडात दोन पक्षी मारले आहे. मोदीना यापुढे राष्ट्रीय नेतृत्वाच्या वर्तुळा बाहेर ठेवता येणार नाही हे त्यांनी भाजपच्या सध्याच्या ' सामुहिक नेतृत्वाला ' आणि संघालाही दाखवून दिले आहे. अडवाणी किंवा मोदी यांचे  गडकरींशी वैयक्तिक वैर असण्याचे कारण नाही , संघ त्यांचेशी जो दुजाभाव दाखवीत आहे त्याचा वचपा त्यांनी काढला आणि संघ-भाजप संबंध नव्या वळणावर आणून ठेवले. भाजप-संघ यांचे संबंध आणि सीमा याचे पुनर्निर्धारण झाले तर त्याचा भाजप आणि देश याचा फायदाच होणार आहे.
                                       मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय
भाजपात एकाएकी मोदींचे नांव पंतप्रधान पदासाठी पुढे करण्यात संघाचा हात असल्याची चर्चा आहे.  संघाचा संपूर्ण पाठींबा आणि आशिर्वाद असलेल्या गडकरींविरुद्ध पक्षात रान पेटविणारे सगळेच मोदी समर्थक होते हे लक्षात घेतले तर संघ आणि मोदी यांचे संबंध सौहार्दपूर्ण नाहीत हे कोणाच्याही लक्षात येईल. पक्ष आणि संघटना याची फारशी तमा न बाळगता निर्णय घेण्याची मोदींची पद्धत संघाला न रुचणारी आहे. वाजपेयी नंतर अडवाणींच्या एकछत्री नेतृत्वाला संघाने सुरुंग लावल्यावर भाजपात साधारणपणे सर्व समान मानले गेलेले  सामुहिक नेतृत्व निर्माण झाले. त्यात मोदींना स्थान न मिळण्या मागे मोदींचा एककल्ली आणि एकतंत्री कारभार कारणीभूत ठरला. गुजरात दंगलीत मोदींनी दाखविलेले  कर्तृत्व सगळ्याच कट्टरपंथी हिंदुना भुरळ घालणारे आणि आनंदाच्या उकळ्या आणणारे होते तरी सुद्धा भाजपने त्यांना राष्ट्रीय नेतृत्वात कधीच स्थान दिले नाही कारण हे कर्तृत्व निवडणुकीच्या राजकारणात यशाच्या आड येणारे होते. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकीत भाजप अपयशी ठरला त्यामागे मोदींच्या राज्यात घडलेला नरसंहार हे महत्वाचे कारण होते. मोदींची ती ओळख मिटावी म्हणून 'विकास पुरुष आणि उत्कृष्ट प्रशासक'  अशी प्रतिमा निर्माण करण्याचा मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी चंग बांधला . ज्यांना हिटलर सारखा नरसंहार घडवून आणण्यात यश आले त्यांना हिटलरचेच प्रचारतंत्र वापरून विकास पुरुष अशी प्रतिमा उभी कारणे कठीण नव्हतेच. कट्टरपंथी हिंदू कधीच मोदींच्या प्रेमात पडले होते  या नव्या प्रतिमेने हिटलर विषयी प्रेम असणारे मध्यमवर्गीय आणि शहरी तरुण नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले आहेत. त्याच बळावर नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपचे तख्त हलवून सोडले आहे. पक्ष नेतृत्व मनाविरुद्ध नरेंद्र मोदी साठी पायघड्या अंथरायला मजबूर झाले ते नरेंद्र मोदींनी स्वत:ची जी प्रतिमा निर्माण केली त्यामुळे.  सामुहिक नेतृत्व ही भाजपची जशी जमेची बाजू राहिली आहे तशीच ती कमजोरी देखील बनत चालली आहे. एक तर या सामुहिक नेतृत्वाची कामगिरी फारसी चांगली राहिली नाही. विरोधी पक्षाचे खरे काम सिविल सोसायटीच्या हजारे-केजरीवाल यांनी केले. त्यांच्या पुढे भाजपचे केंद्रीय नेतृत्व फिके पडले. त्यांच्या पेक्षा मोदी आणि शिवराजसिंह चौहान या मुख्यमंत्र्याची कामगिरी सरस राहिल्याने इतर केंद्रीय नेत्यापेक्षा पंतप्रधान पदासाठी या दोन मुख्यमंत्र्यांची दावेदारी प्रबळ ठरली आणि त्यातही प्रचारतंत्राच्या जोरावर मोदीने आपले घोडे पुढे दामटले. भारतीय जनमानस सामुहिक नेतृत्वा ऐवजी शक्तिशाली नेता , चमत्कार घडवून आणू शकेल अशा नेत्यांना नेहमीच अनुकूल राहात आले आहे. अगदी नव्याने स्थापन झालेल्या आणि सगळे निर्णय सगळ्या ग्रामसभेने घ्यावेत असे मानणाऱ्या आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा देखील अरविंद केजरीवाल हेच आहेत. मतदारांना आकर्षित करणारा असा एक नेता जवळपास प्रत्येक पक्षाचा आहे. वाजपेयी-अडवाणी नंतर भाजपकडे असा राष्ट्रीय नेता नसल्याने ती उणीव भरून काढण्यासाठी नरेंद्र मोदीची हवा बनविण्यात येत आहे. अशी हवा बनविण्यात सध्याच्या नेतृत्व वर्तुळात स्थान न मिळालेल्या आणि आजच्या नेतृत्वाने अडगळीत टाकलेल्या यशवंत सिन्हा. राम जेठमलानी या सारख्या मंडळींचा समावेश आहे.नरेंद्र मोदींना पुढे करण्यामागे यांचा हेतू पक्षात स्वत:ला प्रस्थापित व प्रतिष्ठीत करण्याचा आहे.  ही मंडळी संघा बाहेरची आहेत हे लक्षात घेतले तर नरेंद्र मोदींना पुढे करण्यात संघाचा हात नसल्याचे स्पष्ट होईल. विश्व हिंदू परिषदेचे सिंघल मोदींचा धावा करीत असले तरी नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या मोठया गटाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काम केले होते हे लक्षात घेतले तर सिंघल यांच्या प्रयत्नाकडे स्वत:चे महत्व वाढविण्याचा प्रयत्न असेच पहावे लागेल.   भाजपला उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करणे धोक्याचे वाटते.  साधू-संतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या परंपरेनुसार पंतप्रधान पदाचा उमेदवार साधू संत ठरविणार अशी घोषणा झाली तेव्हा त्यावर भाजपच्या सहकारी पक्षानेच जोरदार आक्षेप घेतला होता . कट्टरपंथी हिंदुपेक्षाही आपण अधिक कट्टर आहोत हे दाखविण्याच्या फंदात भाजपचे मुस्लीम प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार साधू संत नाही तर पाकिस्तानचा आतंकवादी हाफिज सईद ठरविणार का असे वक्तव्य करून भाजपची पंचाईत केल्याचे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या प्रतिपादना वरून स्पष्ट होते. भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपच्या उच्चाधिकार प्राप्त संसदीय मंडळात ठरेल असे वारंवार स्पष्टीकरण राजनाथसिंह यांना द्यावे लागत आहे. भाजपला हिंदुत्वाचा लाभ घ्यायचा आहेच, पण तो गाजावाजा न करता.  नरेंद्र मोदीना राष्ट्रीय नेतृत्वात मानाचे स्थान दिले तर हिंदुत्वाचा प्रचार न करताही भाजप हिंदुत्वाशी बांधील असण्याचा संदेश जाईल. भाजप नेतृत्वाला  नरेंद्र मोदींचा यासाठी नक्कीच वापर करून घ्यायचा आहे . भाजपात मोदींचा प्रभाव वाढण्या मागची  ही खरी कारणे आहेत. पण नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तर सोडाच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील बनणे कठीण आहे. त्यांचे बलस्थान असलेला गुजरात मधील नरसंहार हाच त्यांचा पक्षाचा आणि देशाचा नेता बनण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींचा जाहीरपणे धावा करणाऱ्या पक्षातील नेत्यांना  दिलेली तंबी हेच दर्शविते. स्वत:च्या मर्जीने पंतप्रधान बनविण्या इतपत संख्याबळ आगामी निवडणुकीत भाजपला मिळण्यासारखी परिस्थिती नाही. सरकार बनले तरी इतर पक्षांच्या पाठिंब्यावर बनेल . शिवसेना-मनसे वगळता इतर कोणताही पक्ष नरेंद्र मोदींच्या नावाला पाठींबा देण्याची सुतराम शक्यता नाही. राजकीय वास्तवतेचे भान नसलेला मोठया संख्येतील  मध्यमवर्गीयांमधील  लक्षणीय संख्या मोदींच्या पंतप्रधानपदाच्या मृगजळा मागे बेभानपणे धावते आहे हे मात्र खरे. पण म्हणून मोदीना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले तर भाजप वर देखील सत्तेच्या मृगजळामागे धावायची पाळी येईल. मोदिकडे नेतृत्व न सोपविता मोदी समर्थकांचा निवडणुकीतील यश वाढविण्यासाठी उपयोग करण्याचे भान आणि कौशल्य भाजप नेतृत्वाने दाखविले  तर दिल्लीचे तख्त भाजपा पासून फार दुर राहणार नाही.
                              (समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि. यवतमाळ 

No comments:

Post a Comment