Wednesday, January 30, 2013

कसोटीला न उतरलेल्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा !

जनतेशी संवाद साधू शकणारा संवेदनशील पंतप्रधान ही कॉंग्रेसची तातडीची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्याचे आव्हान स्विकारण्याची राहुल गांधींची तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे. ते आव्हान स्विकारणे त्यांना उद्यावर ढकलून चालणार नाही. राहुल गांधी यांची आजच पंतप्रधान बनायची तयारी नसेल तर किमान त्यांनी पक्षात स्विकारले तसे सरकारात देखील दुसऱ्या क्रमांकाचे पद स्विकारून हे आव्हान पेलण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले तरच काँग्रस पक्षाला राहुल पासून आशा करता येईल . 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कॉंग्रेस साठी चिंताजनक बनलेल्या राजकीय परिस्थितीवर चिंतन करण्यासाठी जयपूर या गुलाबी शहरात कॉंग्रेस पक्षाची चिंतन बैठक नुकतीच पार पडली. या वर्षी होणाऱ्या ७-८ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आणि २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविण्या  बाबत कॉंग्रेस नेतृत्वात असलेली साशंकता आणि चिंता नेत्यांच्या भाषणातून पाहिल्या दोन दिवसात स्पष्टपणे व्यक्त झाली. संघटनेत आणि सरकारात काही तरी कमी आहे याची नेतृत्वाला तीव्र जाणीव असल्याचे पहिल्यांदाच जाणवले. कॉंग्रेसच्या चिंतन बैठका आणि शिबिरे यापूर्वीही झाली आहेत आणि अडचणीच्या व प्रतिकूल परिस्थितीत झाली आहेत. त्या कोणत्याही शिबिरात आपले काही चुकते आहे याची जाणीव कधीच झाली नव्हती. उलट जे काही चुकते आहे ते विरोधकाचे आणि विशेषत: कॉंग्रेसचा परंपरागत विरोधी असलेल्या संघपरिवाराचे हाच त्या चिंतन बैठका आणि चिंतन शिबिराचा सूर असायचा. त्यांना नेस्तनाबूत करण्याची भाषा वापरली जायची. जिंकण्याची परिस्थिती नसली तरी जिंकण्याचा विश्वास प्रकट केला जायचा. तळागाळातल्या लोकांचे आपणच कैवारी असल्याची झुल पांघरून गरिबी हटविण्याची घोषणा देत कॉंग्रेसची अधिवेशने पार पडत. पहिल्यांदाच जयपूरला या सगळ्या नौटंकीला फाटा दिला गेला. कॉंग्रेस नेतृत्व प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याच्या मूड मध्ये असल्याचे जयपूरला दिसत होते. जिंकण्याचा फाजील आत्मविश्वास नव्हता की विरोधकावर कुरघोडी करण्याचा आव नव्हता. देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे संघपरिवारावरील बालिश आणि बाष्कळ आरोप याला अपवाद म्हणता येईल. कॉंग्रेस नेतृत्वाच्याच्या गंभीर आत्मपरीक्षणाच्या प्रयत्नाला आणखी एक गालबोट लागले आणि ते अपेक्षितच होते. विरोधकांसाठी जरी कॉंग्रेसजणांच्या जीभा सैल झाल्या नसल्यातरी त्या जीभा राहुल गांधींची लाळ घोटण्यासाठी जास्तच सैल झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेसवर कब्जा केल्यापासून पहिल्यांदाच  कॉंग्रेस नेतृत्वाच्या भाषणात काहीसा प्रामाणिकपणा आणि गांभीर्य प्रकट झाल्याने या गोष्ठी झाकल्या गेल्या. कॉंग्रेसचा तळाला गेलेला आत्मविश्वास वर उसळी मारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराने देशापुढे उभे केले हे मान्य करावे लागेल.
                            नेतृत्वाकडून रोग निदान
कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला पक्ष आहे. सत्ता हे विष आहे हा राहुल गांधी यांनी सांगितलेला सोनिया उवाच खरा मानला तर कॉंग्रेसच्या नसानसात सत्तेचे विष भिनलेले असणार हे उघड आहे. पक्ष जुना , पक्षाचे नेतृत्व जुने त्यामुळे या पक्षाला नव्या जगाशी जुळवून घेताना खूप दमायला आणि थकायला होणे साहजिक आहे. यात वयापेक्षा कल्पना दारिद्र्य जास्त कारणीभूत आहे. नव्या परिस्थितीशी जुळवून घेताना उडालेला गोंधळ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणातून स्पष्ट झाला आहे. कॉंग्रेसला आजतागायत देशातील मध्यम वर्गाची निवडणूक जिंकण्यासाठी कधी गरज वाटली नव्हती. निवडणुकीत प्रभाव पडावा इतका प्रभावी हा वर्ग नव्हता आणि राजकीय प्रक्रिये विषयी अनास्था हे या वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण होते. यातील जो वर्ग सजग होता तो आदर्शवादाकडे झुकलेला असल्याने सत्ते विषयी फारसे आकर्षण नव्हते. गरीब आणि अल्पसंख्याकांना संघपरिवारात एकवटलेल्या उच्च वर्णीया बद्दलची  भीती आणि तिटकारा विरोधी पक्षांचा आधार असलेल्या मध्यमवर्गीय मतदारावर मात करण्यासाठी कॉंग्रेसला उपयुक्त ठरत होता.  पण आता परिस्थिती बदलली आहे.  पूर्वी सारखा दुर्लक्ष करावा इतका मध्यमवर्ग लहान राहिलेला नाही. कॉंग्रेसने आणि नंतर भाजप नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या आर्थिक उदारीकरण व जागतिकीकारणाच्या धोरणामुळे मध्यमवर्गीयांची संख्या प्रचंड वाढली आहे. आपल्याच धोरणातून उदयाला आलेला हा वर्ग कॉंग्रेस साठी समस्या बनला आहे. संपत्तीवान होण्यासोबतच नव्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाने या वर्गाच्या शासन आणि प्रशासन याबद्दलच्या कल्पना बदलल्या आहेत. कॉंग्रेसची राज्य करण्याची शैली जुनी आणि सरंजामदारीच राहिली आहे. कॉंग्रेसने नव्या ज्ञानासाठी आणि तंत्रज्ञानासाठी देशाच्या सीमा खुल्या करण्याचे ऐतिहासिक कार्य जरूर केले , पण या ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा शासन आणि पक्ष संघटनेत कधीच उपयोग करून घेतला नाही. इंटरनेट आणि मोबाईल क्रांतीचे श्रेय कॉंग्रेसकडे जाते . पण याचा उपयोग करून तयार झालेले सोशल नेटवर्किंगचे महाजाल कॉंग्रेस विरोधी वातावरण निर्माण करण्यात आघाडीवर आहे. सोशल नेटवर्किंगच्या महाजालात कॉंग्रेस अस्तित्व हरवून बसली आहे. या नव्या माध्यमाशी मैत्री करा असे आवाहन जयपूर मेळ्यात करण्याची पाळी कॉंग्रेस अध्यक्षावर आली ती याच मुळे. कॉंग्रेसला जडलेल्या आणखी एका रोगावर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अचूक बोट ठेवले. कॉंग्रेसच्या संघटनेतील आणि सत्तेतील नेत्यांनी आपल्या भोवतालच्या कोंडाळ्याचाच फक्त लाभ करून देणे सोडले पाहिजे असे सांगून कॉंग्रेसला जडलेल्या महारोगाचे निदान केले. कॉंग्रेस नेते जनतेत वावरणे कधीच बंद झाले आहे.
समर्थकांच्या कोंडाळ्यात वावरणे ही त्यांची जीवनपद्धती बनून गेली आहे. या होयबा समर्थकांनी त्यांना जमिनी वास्तवापासून दुर ठेवले आहे. जनतेशी संपर्क न राहिल्याने निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो आणि हा पैसा खर्च करण्यासाठी भ्रष्टाचार करावा लागतो या दुष्टचक्रात एकूणच भारतीय राजकारण अडकले आहे आणि कॉंग्रेस तर पूर्णपणे अडकली आहे. सोनिया प्रमाणेच पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी देखील पक्षाच्या व सरकारच्या एका महत्वाच्या उणीवेवर बोट ठेवले. आपली धोरणे , केलेल्या उपाय योजना आणि त्याचे झालेले लाभ जनते पर्यंत पोचविण्यात पक्ष व सरकार कमी पडत असल्याचे मनमोहनसिंह यांनी सांगितले. खरे तर या बाबतीत खरे गुन्हेगार स्वत: मनमोहनसिंह आहे. त्यांच्या तोंड शिवून बसण्याचे दुष्परिणाम कॉंग्रेस आणि कॉंग्रेसप्रणित सरकारला भोगावे लागत आहे. सरकारचा आणि जनतेचा संबंध तुटण्यास आणि त्यातून सरकार विरोधी वातावरण तयार होण्यास स्वत: पंतप्रधान कारणीभूत ठरले आहे. याचे सर्वात उत्तम उदाहरण २ जी स्पेक्ट्रमचे आहे. या संदर्भातील सरकारी धोरणाचा देशाला फार मोठा फायदा झाला आणि सरकारी तिजोरीला झालेले लाखो कोटीचे नुकसानीचे आकडे कपोलकल्पित होते हे स्पेक्ट्रमच्या ताज्या लिलावाने सिद्ध झाले. कपोलकल्पित आकड्याचा फुगा फोडून धोरणाचे समर्थन करण्या ऐवजी पंतप्रधान या संपूर्ण काळात अपराधी चेहरा करून मुग गिळून बसले आणि सर्वात मोठे भ्रष्टाचारी सरकार असा शिक्का आपल्या पाठीवर मारून घेतला. आता तो फुगा फुटला पण शिक्का मात्र पुसला गेला नाही .कारण पक्षाचा आणि सरकारचा जनतेशी संवाद राहिलेलाच नाही. याला सर्वस्वी जबाबदार पक्षाचे आणि सरकारचे सर्वोच्च नेतृत्व राहिलेले आहे. दिल्लीतील बलात्काराच्या भयंकर घटनेवर किंवा पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या अमानवी आणि क्रूर कृत्या सारख्या अतिशय संवेदनशील प्रश्नावर तोंड उघडायलाच पंतप्रधानांना ८-८ दिवस लागतात. दरम्यानच्या काळात लोकांच्या मनातून सरकार उतरून  गेलेले असते.  कॉंग्रेस अध्यक्षांनी देखील स्वत;ला राष्ट्रीय सल्लागार समितीच्या नावावर स्वयंसेवी संस्थांचे कोंडाळे  बनवून घेतले आहे आणि त्यातच त्या रममाण असतात. म्हातारपणी 'हरी हरी' करीत बसण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याला अनुसरूनच स्वयंसेवी संस्थांच्या नादी लागून सोनियाजी काही पुण्याची कामे करताना दिसतात. अन्न सुरक्षा सारख्या अव्यवहारी योजना त्या पुण्यकर्माचाच एक भाग आहे ! अशा  पक्ष नेतृत्वाकडून कॉंग्रेस जणांना आशा नाही हे देखील जयपूर मेळ्यात स्पष्ट झाले.  राहुल गांधीनी नेतृत्व करावे ही उपस्थित काँग्रेसजनांची एकमुखी मागणी कॉंग्रेसच्या लाचार संस्कृतीची जितकी निदर्शक आहे तितकीच कॉंग्रेस आणि कॉंग्रेस प्रणित सरकारच्या नेतृत्वाने काँग्रेसजनांच्या केलेल्या भ्रमनिरासाचे देखील निदर्शक मानले पाहिजे. यावरून एक गोष्ठ तर स्पष्ट होते की पहिल्यांदाच कॉंग्रेसजनांना पक्ष संघटनेला आणि सरकारला झालेल्या रोगाचे निदान करण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. रोग मुळापासून बरा करायचा असेल तर त्याचे निदान होणे महत्वाचे असते. असे निदान झाले की योग्य ती औषध योजना करता येते. कॉंग्रेसला जडलेल्या रोगावर राहुल हेच रामबाण औषध असल्याची काँग्रेसजनांची भावना आहे . या औषधाने कॉंग्रेसचा रोग दुर होवून कॉंग्रेस पुन्हा धडधाकट होईल का हा खरा प्रश्न आहे .
                                चैतन्य टिकेल का ?

राहुल गांधी २००४ सालापासून कॉंग्रेस संघटनेत सक्रीय झाले आहेत. युवक कॉंग्रेस मध्ये सक्रीय राहूनही त्यांना देशातील युवकांना पक्षाकडे  आकर्षित करण्यात यश आले नाही. कॉंग्रेसचे जे युवा नेते समजले जातात ती घराणेशाहीची उपज आहे , सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद , नवीन जिंदाल, मिलिंद देवरा, ज्यांचे नुकतेच अपघाती निधन झाले ते महाराष्ट्रातील आमदार निलेश पारवेकर आणि यांच्या सारखे अनेक युवा नेते  हे नेतृत्व राहुल गांधी मुळे राजकारणात आलेले नाहीत.  राजकीय वारसा असलेल्या या  युवा नेतृत्वाला राहुल गांधीच्या कृपेने पदे मिळालीत एवढेच. त्याच बरोबर या युवा नेतृत्वाची कामगिरी राहुल गांधी पेक्षा सरस ठरणार नाही याची काळजी देखील घेतली गेली आहे. याचाच भाग म्हणून  पक्ष संघटनेतील किंवा सरकारातील कोणत्याही युवा नेत्याच्या कामगिरीची आजतागायत लोकात किंवा माध्यमात चर्चा झाली नाही. राजकीय वारसा नसलेले युवा नेतृत्व पक्षात आणून त्यांना पदे देवून राहुल गांधीनी पक्षात सुस्थापित केले किंवा प्रतिष्ठा दिली असे उदाहरण अपवादानेही सापडत नाही. ज्या युवक कॉंग्रेस मध्ये राहुल गांधी अनेक वर्षे सक्रीय राहिले ती युवक कॉंग्रेस राजकारणात सक्रीय राहिली किंवा राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर भूमिका घेवून लक्षात येण्यासारखे कार्य केले असे घडले नाही. गेल्या दोन वर्षात देशातील युवकांची राजकीय , आर्थिक परिस्थिती बद्दलची अस्वस्थता उग्रपणे प्रकट झाली. पण त्याची दखल युवक कॉंग्रेस आणि तिचे नेते राहुल गांधी यांनी घेतली नाही, अस्वस्थता दुर करण्याच्या दिशेने प्रयत्न करने तर दूरच राहिले. कॉंग्रेसच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न या आधीही  केला होता. केंद्रातील सत्तेच्या जडण घडणीत महत्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात कॉंग्रेसने गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत . पण त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. या राज्यात राहुलचे गांधी हे नांव निवडणुकीत चमत्कार घडवू शकले नाही . असा चमत्कार घडविण्याच्या प्रयत्नात इतर प्रांताकडे दुर्लक्ष होवून राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर सक्रीय राहू शकले नाहीत. हा त्यांचा आणि त्यांच्या सल्लागारांच्या रणनितीचा एकप्रकारे झालेला पराभवच आहे.

गेल्या दोन वर्षात कॉंग्रेसला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण या आव्हानाचा सामना करण्यासाठी कॉंग्रेसचे नेतृत्व संपूर्णपणे अपयशी ठरले. या आव्हानांचा सामना करण्यासाठी कॉंग्रेसचे नेतृत्व मैदानात उतरलेच नाही. उलट हातपाय गाळून कान, डोळे आणि तोंड बंद करून बसले. अशावेळी ज्याच्याकडे कॉंग्रेसचे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जाते त्या राहुल गांधीनी सेनापती बनून मैदानात उतरण्याची गरज होती. सैरभैर झालेल्या कॉंग्रेसला लढाऊ सेनापतीची गरज होती आणि ती गरज पूर्ण करण्यात राहुल गांधी देखील अपयशी ठरले. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंह यांच्या पेक्षा राहुल गांधींचे वर्तन वेगळे नव्हते. सोनिया - मनमोहन यांनी लोकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना कधी उत्तरे दिली नाहीत की लोकांचा सरकार व कॉंग्रेस वरील राग कमी व्हावा म्हणून त्यांनी कधी जनतेशी गेल्या दोन वर्षात संवाद साधला नाही. राहुल गांधी तर त्यांच्याही पुढे चार पावले होते. देशात आणि संसदेत घडणाऱ्या घटनाशी आपला काहीच संबंध नसल्यासारखे बेदरकार नसले तरी निर्विकार वर्तन राहुल गांधीचे राहिले आहे. लोकपाल आंदोलनात सारा देश ढवळून निघाला , पण त्या आंदोलनाच्या बाबतीत देखील राहुल गांधी निर्विकार राहिले. या प्रश्नावर ते ७ मिनिटे लोकसभेत बोलले एवढेच. त्यांची संसदीय कारकीर्द देखील लोकांच्या लक्षात यावी अशी चमकदार आणि लक्षवेधी राहिली नाही. नेतृत्व नसलेल्या बलात्कार विरोधी आंदोलनातील युवकासोबत राहण्याची , त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि अशा प्रश्नावर आपण नेतृत्व देवू शकतो हे दाखवून देण्याची उत्तम संधी होती. पण सोनिया आणि मनमोहन प्रमाणेच राहुल गांधीनी आपली संवेदन शून्यता दाखवून दिली आणि लोकपाल आंदोलनात मुत्सद्देगिरीचा अभाव असल्याचेही दाखवून दिले. एकूणच जयपूर चिंतन बैठकीच्या आधीचा राहुल गांधी यांचा कार्यकाळ कॉंग्रेस साठी आशादायी वाटावा असा राहिलेला नाही. तरीही कॉंग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साऱ्या आशा राहुल गांधी यांच्यावर केंद्रित झाल्याचे जयपूरला दिसून आले आहे. आजच्या परिस्थितीत कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणायचे असेल तर जादूची छडीच लागेल हे कॉंग्रेसजणांना कळून चुकले आहे. मनमोहनसिंह यांची कॉंग्रेस साठीची उपयुक्तता कधीच संपली आहे. काँग्रस मधील सोनिया युग संपत आल्याचे भान कॉंग्रेसजणांना तीव्रतेने झाले आहे. 'गांधी' नावाशिवाय कॉंग्रेस तरेल याचा कॉंग्रेसजणांना अजिबात विश्वास नाही. कारण तसा विश्वास कॉंग्रेसजनात कधी निर्माणच होवू नये अशाच प्रकारची कॉंग्रेसची जडणघडण इंदिरा गांधींच्या काळापासून झाली आहे. राजकीय विश्लेषकांसाठी राहुलचा राजकीय भूतकाळ फारसा आश्वासक नसला तरी कॉंग्रेसजणांना मात्र राहुल शिवाय कोणतेच भविष्य नाही याचे यथार्थ भान आहे .   काँग्रसजन चुकीचा विचार करीत नाहीत आणि राजकीय विश्लेषक राहुल गांधीचे मूल्यमापन बरोबर करतातच असेही नाही याचे पुसटसे दर्शन राहुल गांधीच्या जयपूर येथील ऐतिहासिक भाषणातून घडले हे मान्य करावे लागेल. त्यांचे भाषण होण्या आधी देशातील राजकीय विश्लेषक, राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय विरोधक यांची राहुल गांधी बद्दलची नेतृत्वगुण नसलेला , राजकीय परिस्थितीचे आकलन नसलेला पोकळ नेता अशी जी धारणा बनली होती ती धारणा बदलायला लावण्या इतपत आशयसंपन्न भाषण होते. जमिनीवर पाय असलेला आणि दृष्टी असलेला नेता अशी नवी प्रतिमा त्या भाषणाने राहुल गांधींची निर्माण झाली हे मान्य करावे लागेल. राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक यांना चकित करणारे आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची बोलती बंड करणारा राहुलचा नवा अवतार देशाला दिसला. लिहून दिलेले भाषण म्हणून दाखविणे वेगळे आणि राजकीय अनुभवातून डोळे उघडे ठेवून केलेले भाष्य वेगळे असते. राहुलचे भाषण पहिल्या प्रकारातील नक्कीच नव्हते. पक्षाच्या , सरकारच्या व देशाच्या परिस्थितीचे राहुलला सुस्पष्ट आकलन असल्याचे पहिल्यांदा जाणवले ते जयपूरलाच. आज पर्यंत जबाबदारी घेण्यास सातत्याने नकार देणारा नेता अशी राहुलची प्रतिमा निर्माण झाली होती. पहिल्यांदा पुढे येवून बुडणाऱ्या पक्षाला नेतृत्व देण्याचे आव्हान स्वीकारून आपली नवी प्रतिमा कार्यकर्त्यात ठसविण्याचा यशस्वी प्रयत्न राहुल गांधीनी केला आहे. गांधी घराण्यां भोवती त्यागाचे , बलिदानाचे जे वलय आहे ते आजही परिणामकारक  आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा उपयोग करून घेण्या इतपत धूर्तता राहुल गांधी मध्ये असल्याचे जयपूरला दिसून आले. गांधी घराण्याचे बलिदानाचे वलय आणि स्वत: राहुल गांधीनी सत्तेत जाण्यात , सत्ता हाती घेण्यात न दाखविलेला रस हे गुण सत्तेत पोचण्यासाठी शिडीचे काम करू शकतात. राहुल गांधी यांनी मनात आणले असते तर २००८च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान होण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकले नसते ही वस्तुस्थिती आहे.  बलिदान आणि सत्तेचा मोह नसणे हे भारतीय जनमानसाला नेहमीच आकर्षित करीत आले आहेत. शिवाय   नाम महात्म्य आणि नाम स्मरण यावर या देशातील जनतेचा नेहमीच विश्वास राहात आला आहे. धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रात जसा देवादिकांच्या नाम चमत्काराची चर्चा आहे , तशीच आपल्या देशातील राजकारणात गांधी नावाचा महिमा आहे. रामाच्या नावाने पाण्यावर दगड देखील तरले या कथेवर बुद्धीवन्ताचा नसेल पण सर्व सामन्याचा अजूनही विश्वास आहे. कॉंग्रेसला आव्हान देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तर नक्कीच आहे. कॉंग्रेसजणांची गांधी नावाबद्दल अशीच धारणा व विश्वास आहे. तो चुकीचा नसल्याचे जयपूरलाच दर्शन घडले. राहुलने उपाध्यक्षपद स्विकारताच कॉंग्रेस मधील मरगळ संपून कॉंग्रेसजनात नवा उत्साह निर्माण झाल्याचे देशाने पाहिले. असे असले तरी मनमोहनसिंह निवडणुका होईपर्यंत पंतप्रधानपदी राहिले तर निर्माण झालेला उत्साह तो पर्यंत टिकण्याची सुतराम शक्यता नाही. इतकी वर्षे पंतप्रधान राहूनही मनमोहनसिंह यांना राजकारणाची बाराखडी देखील आत्मसात करता आलेली नाही. अर्थकारण हे त्यांचे बलस्थान आहे , पण अर्थकारणा शिवाय त्यांना दुसरे काहीच कळत नसल्याने आर्थिक उपाय योजना देखील निष्प्रभ ठरल्या आहेत.   जनतेशी संवाद साधू शकणारा संवेदनशील पंतप्रधान ही कॉंग्रेसची तातडीची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारण्याची राहुल गांधींची तयारी असेल तरच कॉंग्रेसला राहुल गांधी पासून आशा ठेवता येईल. त्यासाठी जनतेला त्याची झलक दिसली पाहिजे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी तशी झलक दाखविण्यासाठी राहुल गांधीच्या हाती पुरेसा वेळ आहे. राहुल गांधी यांची आजच पंतप्रधान बनायची तयारी नसेल तर किमान त्यांनी पक्षात स्वीकारले तसे सरकारात देखील दुसऱ्या क्रमांकाचे पद स्विकारून सरकारला जनताभिमुख करण्याची किमया करून दाखविली पाहिजे.  अन्यथा जयपूर बैठकीत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षात निर्माण केलेले चैतन्य क्षणभंगुर ठरण्याचा धोका आहे.

                           ( समाप्त )

सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ 

1 comment:

  1. BJP-NDA IS NOT IN POSITION TO GIVE ALTERNATE TO CONGRESS... ITS BIG GAIN TO CONGRESS AS FRAGMENTED AND BROKEN OPPOSITION IS INDIRECTLY BENEFITING CONGRESS THOUGH PEOPLE DONT LIKE IT..

    ReplyDelete