Thursday, January 10, 2013

स्त्री स्वातंत्र्याचे मारेकरी

१९८३ साली सोहेला या १७ वर्षाच्या तरुणीवर सामुहिक  बलत्कार केल्यानंतर रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, बॉयफ्रेंड बरोबर एकांतात फिरणे वाईट असल्याचा नैतिक उपदेश तीला आणि तिच्या मित्राला करणारे बलात्कारी तरुण आणि स्त्रियांनी काय घातले पाहिजे, कधी बाहेर पडले पाहिजे , कोणत्या मर्यादा पाळल्या पाहिजेत याचा हितोपदेश करणारे स्वघोषित संस्कृती रक्षक ,  स्वघोषित संत आणि संवेदनाशून्य राजकीय नेते यांच्यातील साम्य भयचकित करणारे आहे. बलात्कारी तरुण आणि  स्वनामधन्य समाजधुरीण हे दोघेही स्त्रियांचे सारखेच अपराधी आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

१६ डिसेंबरच्या दिल्लीतील घटने नंतर दिल्लीत रस्त्यावर उफाळलेला जन आक्रोश आणि देशभर आलेल्या संतापाच्या लाटेने पहिल्यांदाच स्त्रियांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पितृसत्ताक समाजातील घोर परंपरावादी देखील स्त्रियांच्या बाजूने असल्याचे किमान विरोधात नसल्याचे अपूर्व चित्र क्षणिक का होईना पाहायला मिळाले. राष्ट्रपती भवनात बसलेल्या आपल्या बापा विरुद्ध स्त्री अत्याचार विरोधी आंदोलन असंतोष प्रकट करीत असल्याची मुर्ख समजूत करून घेवून राष्ट्रपती पुत्राने आंदोलकाप्रती अनुदार उदगार काढले होते. हा अपवाद वगळता अशा घटनांसाठी स्त्रियाच जबाबदार आहेत असे छातीठोकपणे बाहेर पडणारे उदगार पहिल्या पंधरा दिवसात  ऐकायला मिळाले नव्हते. पण त्या घटने विरोधी जन आक्रोश ओसरताच तशा प्रतिक्रियांना पुन्हा कंठ फुटला आहे. असा कंठ फोडण्याच्या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी स्वत:कडे घेतल्याने परंपरावाद्यांची बाजू जोरकसपणे समोर आली आहे. स्त्री प्रश्नावर निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या परंपरावादी भूमिकेवर टीकेची झोड उठली आहे. दुसऱ्या बाजूला संघप्रमुखच पुढे झाले म्हटल्यावर छोट्या मोठया परंपरावाद्याना कंठ फुटून अशा प्रकाराना स्त्रीच जबाबदार आहे हे सांगण्याची अहमिका लागली आहे. आंदोलनाच्या प्रभावाने एक पाऊल मागे गेलेले परंपरावादी दोन पावले पुढे टाकून आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करू लागल्याचे व्यक्त होवू लागलेल्या प्रतिक्रीयावरून दिसून येत आहे. अनेकांना या प्रतिक्रिया आवडल्या नसल्या तरी या क्रिया-प्रतीक्रीयातून स्त्री प्रश्नावर मंथन सुरु झाले ही जमेची बाजू आहे. स्त्री अत्याचार विरोधी आंदोलन तीव्र होते त्या काळात कायदा बदल आणि कठोर शिक्षा या दोन मुद्द्या भोवती ते आंदोलन घोटाळले होते. त्या आंदोलनात पुरुषाच्या आणि समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज बोलून दाखविल्या जात होती पण कायदा बदल व कठोर शिक्षा याच्या जोरदार मागणीने मानसिकता बदलाची चर्चा झाकोळली गेली होती. सरसंघचालक व इतरांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चा समाजाच्या मानसिकतेवर केंद्रित होवू लागल्याने संघ प्रमुखाचा राग करण्या ऐवजी अभिनंदन केले पाहिजे. मुख्य म्हणजे स्त्री प्रश्न या चर्चेने केंद्रात राहिला आहे. स्त्रीवादी आणि परंपरावादी या दोन्ही धारा योग्य नेतृत्वासह परस्परासमोर आल्याने आता खरा संघर्ष सुरु झाला आहे. देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना हिंदुत्ववादी तर आहेच पण तिची ओळख मुस्लीम विरोधी अधिक आहे. अशा संघटनेच्या प्रमुखाने हिंदू-मुस्लीम धर्मियातील तणाव जिथे वाढतो आहे त्या आसामात जावून नेहमी प्रमाणे मुस्लिमांच्या बाबतीत वादग्रस्त विधाने न करता स्त्री प्रश्नावर वादग्रस्त विधाने करने पसंत केले . यावरून त्यांचे उदगार म्हणजे  स्त्री प्रश्नावर जे जागरण होत आहे त्यामुळे संघात निर्माण झालेल्या अस्वस्थतेचे ते प्रकटीकरण आहे असे मानता येईल.  देशातील परंपरा आणि संस्कृती याचा अभिमान मानणारी देशातील सर्वात मोठी पुरुषी संघटना अस्वस्थ झाली असेल तर स्त्री आंदोलनाचा बाण नेमक्या जागी आणि वर्मी लागला असे मानायला पाहिजे. पण बदल घडवून आणायचा असेल तर अशा शक्तींना  घायाळ करण्यापेक्षा त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे हे विसरून चालणार नाही.  आज पर्यंत संघ परिवारातील छूटभय्ये लोक स्त्रीयांविरोधी आक्रमक भूमिका घेवून धांगडधिंगा घालत आलेत . त्यामुळे चर्चा होत नव्हती. पण आता तीच भूमिका स्त्रीयांविरोधी कोणतीही अरेरावी न करता संयत शब्दात संघ प्रमुखांनी मांडल्यामुळे स्त्रीवादी आणि परंपरावादी यांच्यात वाद आणि चर्चा होण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच संघ प्रमुखाच्या भूमिकेची हेटाळणी करीत बसण्यापेक्षा त्यांनी व व इतरांनी व्यक्त केलेल्या मतावर  देशव्यापी मंथन घडवून आणले तर स्त्री प्रश्न सोडवणुकीच्या दिशेने प्रगती करता येईल. 

                                                      कोण काय बोलले ? 

परंपरा आणि संस्कृती याच्या उल्लंघनातून स्त्रियांवरील अत्याचार वाढलेत अशा अर्थाच्या प्रतिक्रियांचा रतीबच सुरु झाल्याने कोण  काय बोलले याचा आढावा घेणे देखील अवघड झाले आहे. संघ परिवाराकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अधिक प्रमाणात येत असल्या तरी दुसऱ्या विचारधाराचे लोक फार मागे नाहीत. 'तुमच्यावर बलात्कार झाला तर तुम्ही किती नुकसान भरपाई घ्याल ' असा ममता बैनर्जीना  बेलगाम प्रश्न विचारून स्त्रीचा अपमान करणाऱ्या बंगाल मधील अनिसुर रहमान या  मार्क्सवादी नेत्यापासून ते देशाला मध्यरात्री स्वातंत्र्य मिळाले म्हणून काय स्त्रियांनी मध्यरात्री बाहेर फिरले पाहिजे का असा वाह्यात प्रश्न उपस्थित करणाऱ्या आंध्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष बोट्सा सत्यनारायण सारखे लोक सामील आहेत. स्त्रिया अशा प्रतिक्रिया देण्यात मागे असतील अशी समजूत करून घेण्याचे कारण नाही. प.बंगाल मधील एका बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना तृणमुल कॉंग्रेसच्या महिला नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी ते प्रकरण दोघातील संमती विषयक गैरसमजुतीतून घडल्याचे सांगून बलात्कारी पुरुषाला पाठीशी घालण्यापासून ते स्त्रिया आपल्या पेहरावातून आणि वागण्यातून न कळत बलात्काराला आमंत्रण देतात इथपर्यंत स्त्रियांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. अशी प्रतिक्रिया दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून छत्तीसगड राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची आहे. राजस्थानच्या बनवारीलाल सिंघल या भाजप आमदाराने मुली घालीत असलेल्या स्कर्ट वर आक्षेप घेतला. पण याच्याही पुढे जावून पुद्दीचेरीचे शिक्षणमंत्री यांनी शाळा-कॉलेज मधील मुलीनी ओवरकोट घातलाच पाहिजे असा तालिबानी फतवा काढला आहे. स्त्री विरोधी उदगाराने या आधी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आसाराम बापू मागे राहतील हे तर शक्यच नव्हते. दिल्ली घटनेतील मुलीने तिच्यावर अत्त्याचार करणाराला भाऊ म्हणून संरक्षणाची याचना केली असती तर तो प्रसंग टळला असता असे देशाला दिव्यज्ञान दिले. त्याही पुढे जावून टाळी एका हाताने वाजत नसते असे म्हणून बलात्कार करणाऱ्या इतकीच ती मुलगी दोषी असल्याचा शोध लावला. अनिरुद्ध बापूने तर बापाच्या चार पावले पुढे जात त्या मुलीने 'अनिरुद्ध चाळीशी' १० वेळा म्हटली असती तर समोरचे पुरुष नपुंसक बनले असते असा इलाज सुचवून बापसे बेटे सवाई असल्याचे सिद्ध केले.राज ठाकरे यांनी बलात्कारी बिहारी असल्याचे सांगून त्या मुलीच्या जळत्या सरणावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपती पुत्राच्या वादग्रस्त विधानाचा त्याच्या घरून विरोध झाला असला तरी शिवसेना त्याच्या समर्थनार्थ धावून गेली. स्त्रियांवर बंधने लादण्यात पुढे असलेल्या जमत ए इस्लामीने तर या निमित्ताने सह शिक्षणावरच वार केला. सहशिक्षण बंद  करा अशी मागणीच त्यांनी केली आहे. मागे पुरोगामी ममताजी देखील याच अर्थाचे बोलल्या होत्या. बंगाल मधील वाढत्या बलात्काराबद्दल बोलताना स्त्री-पुरुष एकत्र येण्याच्या संधी वाढल्यामुळे बलात्कार वाढल्याचे त्यांनी विधान केले होते.  संघ परिवारा बाहेरचे लोक असे बोलत असताना संघाने मौन बाळगणे शक्य नव्हते. खरे तर अशा प्रतिक्रिया हा त्यांचाच जन्मसिद्ध अधिकार. हा अधिकार बजावण्यासाठी त्यांच्यातून अनेक महाभाग समोर आलेत. छत्तीसगडच्या गृहमंत्र्यांनी बलात्कारासाठी स्त्रियांच्या ग्रहदशेला दोष दिला. तर मध्यप्रदेशच्या कैलास विजयवर्गीय या मंत्र्याने कोणताही आडपडदा न ठेवता बलात्कारासाठी स्त्रीलाच दोषी धरले. त्याच्यामते स्त्रिया लक्ष्मणरेषा ओलांडत असल्यामुळेच त्या बलात्काराला  बळी पडतात. पाश्च्यात्य संस्कृतीचे आक्रमणाने बलात्कार वाढले असा दावा विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांनी व्यक्त केले. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेहमीच्याच आहे म्हणून त्याच्यावर थोडासा वाद होवून त्या बाजूला पाडल्या असत्या. पण सरसंघचालकांनी पुढे येवून या सगळ्या प्रतिक्रियांना बळ देणारी विधाने करून या प्रतिक्रिया नेहमी सारख्या विस्मरणात जाणार नाहीत याची सोय करून ठेवली आहे. निर्णायक चर्चा होण्याची संधी त्यामुळे उपलब्ध झाली आहे.

                                  संघ प्रमुख काय बोलले ?

संघ प्रमुख जे बोलले त्यावर चर्चा कमी झाली आणि ते नेमके काय बोलले यावर वाद अधिक झालेत. माध्यमांनी त्यांच्या भाषणाचे चुकीचे अर्थच लावले नाही तर त्याचे संदर्भ देखील बदललेत असा भागवत समर्थकांचा आणि संघस्वयंसेवकांचा आरोप आहे. या आधी अन्य मंडळींची जी विधाने आपण तपासालीत ती चुकीची असली तरी रोखठोक होती आणि त्यातून वेगवेगळे अर्थ निघत नाहीत. भागवतांच्या विधानात रोखठोकपणा नाही, तत्ववेत्याचा आणि इतिहासकाराचा आव आणून ते भारतीय परिस्थितीवर आडवळणाने भाष्य करीत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. पाश्च्यात्य देशात स्त्री-पुरुष करार करून राहतात . कराराप्रमाणे स्त्रीने घराची तर पुरुषाने बाहेरची जबाबदारी सांभाळायची असते. दुसऱ्या शब्दात पाश्च्यात्य देशात स्त्रीचे काम चूल आणि मुल सांभाळणे एवढेच आहे. तीने घराचा उंबरठा ओलांडणे अपेक्षित नाही. ते कुटुंबातील ज्या स्थितीचे वर्णन करतात तशी कुटुंबे , तिथे स्थायिक झालेली भारतीय कुटुंबांचा अपवाद सोडला तर , औषधालाही सापडत नाहीत. भारतात मात्र कुटुंबाची सर्वत्र तशीच परिस्थिती आढळते. त्यामुळे त्यांचा रोख भारतीय कुटुंबपद्धतीवर आहे असे मानून माध्यमांनी त्यांच्यावर हल्ला चढविला ते चुकीचे म्हणता येणार नाही. संघ फक्त एवढेच सांगतो की पाश्च्यात्य कुटुंब पद्धतीवर त्यांनी टीका केलीव भारतीय संस्कृतीचा गौरव केला.  मग भागवतांचा  स्त्रीने असे घरात असण्यावर विरोध आहे का आणि भारतीय स्त्रीने अर्थार्जनासाठी बाहेर पडणे मान्य आहे का हे संघ सांगत नाही. पण संघ सांगत नसला तरी या आधीचे वादग्रस्त विधान या विधानाशी जोडून पाहिले की भागवतांना काय म्हणायचे हे लक्षात येते. या आधीचे त्यांचे वादग्रस्त विधान म्हणजे भारतात बलात्कार होत नाहीत , ते इंडियात होतात ! म्हणजे ज्या पाश्च्यात्य संस्कृतीवर ते टीका करतात त्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार इंडियात झाल्यामुळे बलात्कार होतात असा त्यांचा दावा आहे. आकडे याची पुष्ठी करीत नाहीत. आकड्याच्या महाजालात जाण्याची गरजही नाही. कारण भारतात म्हणजे ग्रामीण भागात स्त्रियांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते हे सर्वांनाच माहित आहे. पाश्च्यात्य देशाच्या ज्या परिस्थितीचे ते वर्णन करतात ती तेथे अस्तित्वातच नाही आणि भारताचे ते जे चित्र रंगवितात ते देखील खरे नाही. याला कोणी संघ प्रमुखाची बौद्धिक दिवाळखोरी म्हणेल किंवा हिटलरचा प्रचार प्रमुख गोबेल्स सारखे असत्य दडपून सांगण्याचा प्रयत्न असल्याचे कोणी म्हणू शकते. असे आरोप केल्याने संघाला फरक पडणार नाही.  त्यांच्या अशा  बिनबुडाच्या  आणि उलट सुलट विधानानी त्यांना अपेक्षित असा परिणाम साधला आहे. त्यांच्या भाषणाचा आधार घेत किंवा त्या भाषणाचा धागा पकडून मध्यप्रदेशचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि ज्येष्ठ भाजप नेते बाबुलाल गौर यांनी जे भाष्य केले आहे त्यावरून संघ प्रमुखाला काय म्हणायचे होते याचा संदेश बिनचूक गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पाश्च्यात्य राष्ट्रातील स्त्री प्रमाणे करार करून तात्पुरत्या बंधनात भारतीय स्त्री अडकत नाही . ती जन्मोजन्मीच्या बंधनात स्वत:ला बांधून घेते. पतीला परमेश्वर मानते हा पाच्यात्य आणि भारतीय संस्कृतीतील फरक आहे असे बाबुलाल गौर सांगतात. याच महान संस्कृतीचा भागवतांनी आपल्या भाषणात गौरव केला आहे ! पाश्च्यात्य राष्ट्रात असे होत नाही हे भागवतांच्या टिकेमागचे कारण आहे. शिक्षणाच्या प्रसाराने , तसेच विविध आर्थिक पर्याय इंडियात उपलब्ध झाल्यामुळे  भारताच्या महान संस्कृतीचा परिणाम स्त्रीच्या मन:पटलावरून पुसला जावू लागल्याने भागवत चिंतीत आहेत. इंडियातील स्त्रीने उपलब्ध पर्यायाचा वापर करू नये यासाठी इंडियात जास्त बलात्कार होतात या भीतीचा बागुलबोवा भागवतांना उभा करायचा आहे. भागवतांच्या समर्थनार्थ केवळ हिंदुत्ववादी संघ परिवार पुढे आला नाही तर अबू आझमी सारखे कट्टर मुस्लीम नेते देखील समर्थनार्थ उतरले आहेत.  त्यांच्या भाषणाचे सार समजून न घेता काय मुर्खासारखे बडबड करताहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या भाषणाकडे गंभीरपणे न पाहणारे मुर्ख ठरण्याचा धोका आहे. 

                           प्रतिक्रियांचा अन्वयार्थ

विविध क्षेत्रातल्या आणि विविध विचारसरणीच्या लोकांच्या या प्रतिक्रिया आहे . शब्द वेगळे आहेत . वाक्ये वेगळी आहेत. सर्वांचा सूर सारखाच स्त्री विरोधी आहे . या सगळ्यांचा अर्थ आणि आशय देखील एकच आहे. याचा अर्थ आणि आशय आहे - स्त्रीने घराबाहेर पडूच नये ! ही मंडळी ज्या लक्ष्मणरेषेची गोष्ठ करतात ती लक्ष्मणरेषा म्हणजे घराचा उंबरठा आहे. सह शिक्षणाला , स्त्री आणि पुरुष एकत्र येण्याला यांचा विरोध आहे. स्त्रीने रात्री घराबाहेर पडू नये, आपल्या आवडीची आणि आपल्या पसंतीची कपडे घालू नयेत . या मर्यादा स्त्रीने पाळल्या नाही तर बलात्कार अटळ असल्याची धमकी या प्रतिक्रियांमधून व्यक्त होते. १९८३ साली सामुहिक बलात्काराची पिडा झेललेल्या मुंबईच्या सोहेलाने जी आपली आपबिती लिहिली आहे त्यात तिच्यावर बलात्कार करणाऱ्याने तीला आणि तिच्या मित्राला अगदी असाच सल्ला दिला होता. तुम्ही या मर्यादा पाळीत नसल्याने त्याची शिक्षा म्हणून बलात्कार करीत असल्याचे नैतिक पोलिसाच्या भूमिकेत येवून सांगितले होते. काही महिन्य पूर्वी आसामात गोहाटीच्या रस्त्यावर एका मुलीला भर रस्त्यात मुलांच्या टोळक्याने याच कारणासाठी प्रताडित केले होते. रहदारीचा रस्ता असल्याने प्रत्यक्षात बलात्कार करता आला नाही तरी ते उत्पिडन बालात्कारापेक्षा कमी नव्हते. दिल्लीच्या घटनेत प्रत्यक्ष बलात्कारा आधी त्या मुलीला आणि तिच्या मित्राला बस मधील टोळक्याने या मंडळी सारखाच रात्री बाहेर पडण्यावर , बॉयफ्रेंड सोबत फिरण्यावर आक्षेप घेतला होता.  विविध पक्षाच्या राजकीय नेत्यानी  , स्वघोषित संतानी  आणि स्वघोषित संस्कृती रक्षक संघटनेच्या प्रमुखाने वर उल्लेखिलेला जो हितोपदेश केला आहे त्यात आणि बलात्कार करण्यापूर्वी आणि बलात्कार केल्यानंतर बलात्कारपीडित मुलीला जो बलात्कार करणाऱ्या लोकांनी जो हितोपदेश केला तो शब्दश: सारखाच आहे. बलात्कार करणारे एकट्या-दुकट्या मुलीला अंधारात गाठून असा हितोपदेश करून बलात्काराची शिक्षा सुनावून लगेच ती अंमलात आणतात आणि हे समाज धुरीण उजळमाथ्याने समस्त स्त्री जातीला तसा हितोपदेश करून तो पाळला नाही तर बलात्कार अटळ असल्याचे सांगतात. दोघात काय फरक आहे? एक बलात्कार करून स्त्रीला बंधनात राहण्याचा धडा देतो, दुसरा स्त्री बंधनात राहिली नाही तर बलत्कार होण्याची भिती दाखवितो.  स्त्री स्वातंत्र्याचे दोघेही सारखेच मारेकरी आहेत. स्त्री स्वतंत्र व्हावी म्हणून अनेक समाजसुधारकांनी आपला देह झीजाविला. समाजातील प्रस्थापितांचा आणि धर्ममार्तंडाचा विरोध आणि छळ सहन करून जवळपास १०० वर्षे स्त्री दास्य मुक्तीची चळवळ चालू ठेवण्यासाठी अनेक महापुरुषांनी मोठे योगदान दिले. स्वामी दयानंद, राजा राममोहन राय , महात्मा फुले, लोकहितवादी , आगरकर ,रानडे, महात्मा गांधी, र.धों कर्वे, धोंडो केशव कर्वे , डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी समाज सुधारकांनी प्रयत्न केलेत . मलबारी शेठ सारखी फारसी प्रकाशझोतात न आलेले समाज सुधारक त्याकाळी विलायतेत गेले होते. तेथे त्यांनी इंग्रजांना स्त्रियांच्या परिस्थितीत बदल होण्याची निकड लक्षात आणून दिली होती. देशातील पहिली स्त्री मुक्ती संघटना स्थापन करण्याचा बहुमान ज्यांचेकडे जातो त्या पंडिता रमाबाईला त्याकाळी प्रचंड विरोध झाला. पण त्यांनी विरोधाला न जुमानता धर्मपरिवर्तन करून स्त्री दास्य मुक्तीची लढाई चालू ठेवली. सावित्रीबाईचे कार्य सर्वपरिचित आहे, पण टागोर कन्या स्वर्णकुमारी , ताराबाई शिंदे , रखमाबाई ही नावे तुलनेने कमी परिचित असली तरी स्त्री दास्य मुक्तीतील त्यांचे योगदान मोठे आहे. ताराबाई शिंदे  यांनी त्याकाळी ' स्त्री-पुरुष तुलना ' हे पुस्तक लिहून पुरुषी वर्चस्वाला दिलेले आव्हान हे भारतीय स्त्री चळवळीच्या इतिहासातले सुवर्णपान आहे. बालविवाह झालेल्या पण पसंत नसलेल्या नवऱ्याशी   समाजाचा प्रचंड विरोध पत्करून काडीमोड मागणारी रखमाबाई ही आधुनिक भारतातील पहिली स्त्री आहे. १८५० ते १९५० या शंभर वर्षाच्या कालखंडात या सगळ्या समाजसुधारकांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले म्हणून भारतीय संविधानाने स्त्री स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केले . बलात्कार प्रकरणा नंतर आसारामबापूच्या वेडगळ  प्रतीक्रीयेपासून ते संघ प्रमुख भागवत यांच्या बाळबोध वाटणाऱ्या  प्रतिक्रिया लक्षात घेतल्या तर या मंडळीनी या सगळ्या समाजसुधारकांच्या प्रयत्नावर पाणी फिरविण्याचा प्रयत्न चालविल्याचे स्पष्ट होते. त्यांचा हा प्रयत्न केवळ समाजसुधारकांच्या विरोधीच नाही तर भारतीय संविधान विरोधी देखील आहे. समाजसुधारकांच्या प्रयत्नाने संविधानाने स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी आज बलात्काराचा अस्त्र म्हणून वापर होतो आहे. बलात्काराचे हे अस्त्र निकामी करण्याचे मोठे आव्हान स्त्रिया आणि त्यांच्या संघटनांपुढे आहे. बलात्काराला स्वातंत्र्यावरील हल्ला आणि इतर शारीरिक हल्ल्यापेक्षा जास्त भयंकर काही घडले असे समजण्याची  आत्मघाती मानसिकता बदलली तरच हे अस्त्र बोथट होईल.  बलात्काराला भिवून स्वातंत्र्याचा त्याग करणार नाही असे ठणकावून सांगणाऱ्या नव्या सावित्री , नव्या ताराबाई आणि नव्या रखमाबाई पुढे आल्या पाहिजेत. सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगात प्रकट झालेला पुढील निर्धार प्रत्यक्ष जीवनात त्यांनी प्रकट केला पाहिजे :

मध्यरात्री मी पुन्हा बाहेर पडेन
त्याच बस मध्ये
पूर्वीसारखेच मोठ्याने हसेन मी
तुमच्या भीतीने घरात कैद राहणार नाही
गप्प तर अजिबात बसणार नाही
मी मानव आहे , निर्भय होवून जगेन
तुम्ही स्वत:ला काय समजायचे ते समजा
काय करायचे  ते करा
बस्स !
-----------------------------------
                                                        (समाप्त)

सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि.यवतमाळ 

No comments:

Post a Comment