Wednesday, May 21, 2014

शरद पवारांना साकडे !

आजचे लोकसभेतील बलाबल लक्षात घेतले तर या लोकसभेला अधिकृत विरोधी पक्ष आणि अधिकृत विरोधी पक्ष नेताच असणार नाही. या लोकसभेला अधिकृत आणि मजबूत विरोधी पक्ष देण्याचा एकच मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे कॉंग्रेस मधून फुटून वेगळी चूल मांडलेल्या पक्षांनी पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतणे !
---------------------------------------------------

मा.शरद पवार ,

स.न.वि.वि.

नामदार लोकांपासून दूर पळणारा मी एक सामान्य नागरिक आहे. नामदार लोक सरसकट वाईट असतात असे समजणाऱ्या अण्णा किंवा केजरी भक्तासारखा मी सनकी नाही. पण नामदार लोकांच्या भोवती लाळघोट्यांचा जो जमावडा असतो त्याने माझा जीव गुदमरतच नाही तर ओकारी आणि शिसारी यायला लागते म्हणून मी दूर पळतो. कदाचित आता साऱ्या देशालाच माझ्या या रोगाचा संसर्ग लागला असावा आणि त्यामुळे सारा देशच तुमच्या सारख्या नामदारांपासून दूर गेला असावा. तुमचा माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण परिचित नामदार मित्रांपासून देखील मी दूर पळत आलो आहे. तुमच्यावर ज्यांचा विशेष लोभ होता ते प्रमोदजी महाजन आणि तुमचे नाव घेतल्याशिवाय ज्यांचा दिवस उगत नाही आणि मावळतही नाही असे तुमचे सन्मित्र गोपीनाथजी मुंडे माझेही मित्र होते पण ते नामदार झाले तसा मी त्यांच्यापासूनही दूर गेलो. तुमच्याच बाबतीत माझी ही भूमिका नाही एवढे सांगण्यासाठी हे उदाहरण दिले आहे.

तुम्हाला पत्र लिहावे असा काही आपला संबंध आणि परिचय नाही. पण राजकीय, सामाजिक , आर्थिक घडामोडीचा अभ्यासक म्हणून नेहमीच तुमच्या वाटचालीकडे माझे लक्ष राहिले आहे. तसा मी तुमचा समर्थक नाही आणि विरोधक तर अजिबात नाही. सुरुवातीच्या काळात तर तुमचा मी प्रशंसक राहिलो आहे. आणिबाणीच्या काळात तुम्ही माझ्या आठवणीप्रमाणे शंकरराव चव्हाणांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात गृहराज्यमंत्री होता. त्याकाळी इंदिरा गांधीकडे कोणी चुगली करील म्हणून आणिबाणीला विरोध करणाऱ्या पक्षाच्या नेत्याशी संबंध ठेवायला कॉंग्रेस नेते घाबरत होते त्याकाळात विरोधी पक्षातील लोकांशी तुमची मैत्री तुम्ही लपविली नाही कि तोडली नाही हे मी जवळून पाहिले आहे. त्या काळात राजकीय कैद्यांना पैरोल मुख्यमंत्र्याच्या संमती शिवाय देण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती . तरीही विरोधी पक्षातील तुमचे राजकीय मित्र तुमच्याकडे जी प्रकरणे पाठवायचे त्याबाबतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांना न विचारता तातडीने पैरोल मिळवून देत होता हा तर माझाच अनुभव आहे. राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता तुमच्यातील माणूसपण आणि संवेदनशीलता तुम्ही शाबूत ठेवली होती.



त्याकाळातील काही गोष्टी आजही तुम्ही टिकवून ठेवल्या आहेत हे मी नाकारीत नाही. धर्मवाद , अंधश्रद्धा आणि सत्यसाई सारख्या बुवाबाजा पासून पूर्वी इतकेच आजही दूर आहात. तीव्र विरोध सहन करीत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचे धाडस तुम्ही केले. चौफेर विरोध होत असताना बी टी तंत्रज्ञानाचा पुरस्कार करून तुमच्यातील दूरदर्शीता कायम असल्याचे तुम्ही दाखवून दिले आहे. टीकेचे आणि आरोपाचे धनी होवूनही स्वातंत्र्यानंतरचे देशातील पहिले पर्यटन स्थळ निर्माण करण्यास तुम्ही चालना दिली. आज जे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय तुमच्या नावाने बोटे मोडतात तेच या पर्यटन स्थळी मौजमजा करताना दिसतात ! तेथे होणारी गर्दी तुमच्या निर्णयातील अचूकता दर्शविते. असे असले तरी तुमच्या देवाच्या आळंदीपासून सुरु झालेल्या वाटचालीने अशी काही वळणे घेतली कि तुम्ही चोराच्या आळंदीत येवून पोचला आणि आता तर तुमचा पुढचा मार्गच बंद झाला कि काय अशी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. असे होण्याचे मुख्य कारण पूर्वी तुम्ही लोकांच्या गराड्यात होता आणि हळूहळू लोकांच्या गराड्यात चोर घुसून त्यांनी तुमच्या भोवती कोंडाळे केले आणि लोक तुमच्यापासून कधी दूर गेले हे तुमचे तुम्हाला कळलेच नाही कि चोराची संगतच तुम्हाला सुखावह वाटली हे मला सांगता येणार नाही.



कदाचित राजकारणाची अपरिहार्यता असेल पण विशिष्ट जातीच्या प्रभावाचा उपयोग करून राजकारण करण्याची तळी उचलून तुम्ही तुमच्याच हातानी तुमच्यातील पुरोगामीपणाचा बळी दिला आणि दूरदृष्टी अधू केली. तुम्ही निवडलेल्या मार्गाने राजकारणात फार पुढे जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे जेवढे मिळाले ते टिकवून ठेवण्यासाठी कसरती करण्यात तुमची राजकीय शक्ती खर्च झाली , वाया गेली. देशाला समृद्ध आणि आधुनिक बनविण्याची क्षमता असणारा नेता आपल्या कर्माने महाराष्ट्रापुरता मर्यादित झाला आणि त्यातही एकाच जातीचा होवून राहिला ही तुमची वाटचाल तटस्थतेने पाहणाऱ्या माझ्यासारख्याला अस्वस्थ करते. जे पक्ष आणि नेते आज तुमच्यावर टीकेचा भडीमार करून तुम्हाला नेस्तनाबूत करण्याची भाषा करीत आहेत, जवळपास त्या सगळ्यांनीच तुमच्या खांद्यावर चढून राजकारणात मोठी झेप घेतली आहे . आज याच खांद्यावरून चोर आणि टगे झेप घेत आहेत. हे चुकीचे घडत असले तरी यातून एक अर्थ स्पष्ट होतो कि तुमचे खांदे अजून मजबूत आहेत. या खांद्याचा उपयोग चोर आणि टग्यांना करू न देता देशासाठी झाला पाहिजे असे वाटत असल्यानेच आपणाला हे पत्र लिहित आहे.



खरे तर सगळे राजकीय नेते आणि राजकीय विचारवंत आणि विश्लेषक लोकसभा निवडणूक निकालाला तुमच्या राजकीय कारकीर्दीचा शेवट मानू लागलेले असताना मला मात्र तुमच्या सगळ्या राजकीय चुका विसरल्या जातील असे ऐतिहासिक काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे असे वाटते. या संधीचे सोने फक्त तुम्हीच करू शकता आणि तुम्हाला ते करता आले नाही तर कोणालाच करता येणार नाही असे वाटत असल्याने लहान तोंडी मोठा घास घेत संधीकडे लक्ष वेधीत आहे. तुमच्यासाठी काही मिळविण्याची ही संधी नाही , पण या देशाने तुम्हाला जे भरभरून दिले त्याची परतफेड करण्याची ही ऐतिहासिक संधी ऐतिहासिक निकालाने दिली आहे. देशातील मतदारांनी तुम्हाला आणि सर्वांनाच हवे असलेले स्थिर सरकार दिले आहे. आघाडी करण्याची अपरिहार्यता नसलेले स्थिर सरकार ही देशाची फार मोठी गरज होती. पण देशाला स्थिर सरकारची जेवढी गरज आहे तेवढीच गरज देशातील लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी मजबूत विरोधी पक्षाची आहे. स्थिर सरकार देताना मतदारांचे मजबूत विरोधी पक्ष देण्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. मजबूत सरकार असेल पण मजबूत विरोधी पक्ष नसेल तर काय होवू शकते याचा अनुभव या देशाने इंदिरा युगात घेतला आहे. चुकीची धोरणे राबविण्यापासून ते स्वातंत्र्याची गळचेपी करण्या पर्यंत सगळ्या गोष्टी मजबूत विरोधी पक्ष नसल्याने इंदिराजींना बिनदिक्कतपणे करता आल्या . त्याची पुनरावृत्ती आजच्या स्पर्धेच्या जगात आणि युगात खूप महाग पडेल. त्यामुळे आहे त्या परिस्थितीतून एक मजबूत आणि जबाबदार विरोधी पक्ष उभा करण्याची फार मोठी गरज निर्माण झाली आहे.


आजचे लोकसभेतील बलाबल लक्षात घेतले तर या लोकसभेला अधिकृत विरोधी पक्ष आणि अधिकृत विरोधी पक्ष नेताच असणार नाही. यामुळे महत्वाच्या पदावरील नियुक्त्या आणि एकूणच सरकारी कारभार एकतंत्री आणि एककल्ली होण्याचा धोका आहे. या लोकसभेला अधिकृत आणि मजबूत विरोधी पक्ष देण्याचा एकच मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे कॉंग्रेस मधून फुटून वेगळी चूल मांडलेल्या पक्षांनी पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतणे ! हे काम करू शकणारा सर्वांशी सुसंवाद असणारा तुमच्या इतका समर्थ नेता दुसरा कोणीच नाही. तुम्हालाच का पत्र लिहितो याचा उलगडा आता तुम्हाला आणि इतरांना झाला असेल .

मी कॉंग्रेस समर्थक कधीच नव्हतो आणि आजही नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन करण्याचा तर विचारही कधी मनाला स्पर्शून गेला नाही. तुमची कन्या सुप्रिया हिने ठिकठिकाणी तरुणींचे मेळावे घेवून त्यांच्यात आत्मविश्वास आणि राजकीय जागृतीचे केलेले काम वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मला कधीच काही भावले नाही. मी कधीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पक्षांना मत दिले नाही . अगदी या ताज्या निवडणुकीत सुद्धा. पण कॉंग्रेस नसण्याचा काय अर्थ आणि परिणाम होवू शकतो हे पहिल्यांदा या निवडणूक निकालाने उमगले. कॉंग्रेसने अनेक चुका करीत का होईना रडत रखडत देशाची धर्मनिरपेक्षतेची आणि सर्वसमावेशकतेची परंपरा कायम ठेवली हे आता जाणवते आहे. स्वातंत्र्य आंदोलनाने जी मुल्ये या देशाच्या भूमीत रुजविले , ज्याच्या आधारे स्वतंत्र देशाची जडणघडण झाली त्यावर नव्या सरकारचा विश्वास आहे कि नाही हे आजच सांगता येत नसल्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. निर्वाचित सरकारपासून त्या मूल्यव्यवस्थेला धोका आहे असा आरोप करणे घाईचे आणि आततायीपणाचे ठरेल हे मला कळते. पण निर्वाचित सरकारला ज्या संघटनात्मक शक्तीचे पाठबळ आहे त्या शक्तींचा या मूल्यव्यवस्थेवर फारसा विश्वास नाही हे जगजाहीर आहे. निर्वाचित सरकारला विरोध करण्यासाठी नव्हे तर अशा शक्तीपुढे निर्वाचित सरकारला झुकण्यापासून रोखण्याचे बळ देणारा मजबूत विरोधी पक्ष हवा आणि कॉंग्रेस ती भूमिका समर्थपणे पार पाडू शकते हे लक्षात आल्याने कॉंग्रेसचे महत्व इतक्या वर्षानंतर कळले आहे.

कॉंग्रेस ज्या मूल्यव्यवस्थेला मानते(अर्थात तत्वश: ! प्रत्यक्षात आनंदी आनंदच आहे !) त्या मूल्यव्यवस्थेसाहित त्याची जागा घेणारा एखादा पक्ष उभा राहिला असता तर कॉंग्रेसची आठवण येण्याचे कारण नव्हते. नजीकच्या भविष्यात तरी तसा पर्याय उभा राहण्याची शक्यता दिसत नाही. अनेकांना ‘आप’ हा पर्याय वाटतो आणि त्या पक्षात पर्यायाची बीजे आहेत हे खरेही आहे . परंतु पर्यायाच्या बिजा पेक्षा आत्मघाताची बीजे त्या पक्षात प्रबळ आहेत. ज्या पक्षाला इतर राजकीय पक्षाचा , त्यांच्या विचाराचा सन्मान करता येत नाही असा पक्ष या देशात कधीच पर्याय बनू शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या तरी कॉंग्रेसची जागा घेवू शकेल असा पक्ष दृष्टीपथात नसल्याने त्याचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. कदाचित रस्त्यावर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून ‘आप’ छाप पाडेल , लोकसभेत मात्र विखुरलेल्या व विभागलेल्या कॉंग्रेसला एकत्र केल्याशिवाय सशक्त विरोधी पक्ष उभाच राहू शकत नाही. म्हणूनच पवार साहेब , हे काम करण्यात तुम्ही पुढाकार घ्या. ममता बैनर्जी , जगन्मोहन रेड्डी असे पक्षातून बाहेर पडलेल्या सर्व काँग्रेसजनांना एकत्र आणा. सध्याचे कॉंग्रेस नेतृत्व संभ्रमित आणि हतबल आहे. अशा एकत्रीकरणासाठी पुढाकार घेण्याची त्यांच्यात क्षमता नाही आणि तुम्ही सोडले तर कॉंग्रेस मधून बाहेर पडलेल्या इतर पक्षाच्या नेत्यातही ती शक्ती आणि दृष्टी नाही. माझ्या सारख्या कॉंग्रेस विरोधकाला कॉंग्रेस नसण्याचा अर्थ अस्वस्थ करतो आहे तर तुम्हाला नक्कीच माझ्यापेक्षा अधिक अस्वस्थता वाटत असणार यात शंकाच नाही. राजकीय आयुष्याच्या शेवटच्या पर्वात टग्यांना त्यांच्या जहागिरी सांभाळण्यात मदत करण्यापेक्षा मध्यवर्ती राजकारणातील लोकशाहीला पोषक असा प्रबळ विरोधी पक्ष लोकसभेत उभा करण्याचे ऐतिहासिक कार्य हाती घ्या एवढीच विनंती करण्यासाठी हा पत्रप्रपंच .
-
----------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
------------------------------------------------------

No comments:

Post a Comment