Thursday, May 29, 2014

राहुल गांधीना धोबीपछाड

राहुल गांधीच्या हातात पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज करायला एकसंघ पक्षासह दीड वर्षाचा कालावधी होता. याच्या उलट नरेंद्र मोदी यांच्या हातात विभाजित पक्षासह फक्त सहा महिन्याचा कालावधी होता.  पण कमी वेळात नरेंद्र मोदींनी प्रचाराचे जे नियोजन केले आणि जो झंझावात निर्माण केला तसा अधिक साधने आणि वेळ दिमतीला असताना राहुल गांधीना करता आला नाही
------------------------------------------------------

लोकसभा निवडणुकीच्या तब्बल दीड वर्ष आधी कॉंग्रेसने जानेवारी २०१३ मध्ये राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्षपद देवून कॉंग्रेसमध्ये जुन्या पिढीच्या हातून नव्या पिढीकडे नेतृत्व सोपविले. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यात निर्माण झालेले चैतन्य पाहता कॉंग्रेस सुरक्षित हाती सोपविली गेल्याचा  आभास निर्माण झाला होता. अतिशय भावूक आणि उत्साहाच्या वातावरणात पक्षातील सत्तांतर घडून आले होते. राहुल गांधीचे वय लक्षात घेता खऱ्या अर्थाने पक्षाला युवा नेतृत्व लाभले होते. दुसरीकडे या घटनेच्या तब्बल सहा महिन्या नंतर म्हणजे जून २०१३ मध्ये कॉंग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या गोवा अधिवेशनात नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून म्हणून नियुक्ती करून भाजपातील नेतृत्व बदलाचे संकेत दिले. पक्षांतर्गत विरोधामुळे  नेतृत्व बदलावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही. लालकृष्ण अडवाणी यांचेसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा नरेंद्र मोदी यांना असलेला विरोध मोडीत काढत नरेंद्र मोदी यांचेकडे पक्षाचे नेतृत्व सोपविण्यास आणखी तीन महिन्याचा कालावधी लागला . सप्टेंबर २०१३ मध्ये नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित होवून भाजपची सूत्रे त्यांच्या हाती आली. कॉंग्रेसने युवा पदाधिकाऱ्यांची राहुल गांधीना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची मागणी फेटाळली असली तरी निवडून आल्यावर कोणाकडे सरकारचे नेतृत्व सोपविले जाईल याबाबत कोणतीच संदिग्धता नव्हती. भाजपात मात्र या पदाचे अनेक दावेदार असल्याने संभ्रम दूर करण्यासाठी निवडून आले तर सरकारचे नेतृत्व कोण करणार याची घोषणा आवश्यक होती. लोकसभा निवडणूक घोषित होण्याच्या सहा महिने आधीच लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना होणार हे स्पष्ट झाले होते. वेळेचा विचार करता राहुल गांधीच्या हातात पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज करायला एकसंघ पक्षासह दीड वर्षाचा कालावधी होता. याच्या उलट नरेंद्र मोदी यांच्या हातात विभाजित पक्षासह फक्त सहा महिन्याचा कालावधी होता. कॉंग्रेस आणि भाजपात अनुक्रमे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचेकडे नेतृत्व सोपविताना निर्माण झालेले पक्षांतर्गत चैतन्य सारखेच होते. पण कमी वेळात नरेंद्र मोदींनी प्रचाराचे जे नियोजन केले आणि जो झंझावात निर्माण केला तसा अधिक साधने आणि वेळ दिमतीला असताना राहुल गांधीना करता आला नाही . राहुल गांधीचा प्रचार मोदींच्या तुलनेत फिका , दिशाहीन आणि विस्कळीत राहिला. राहुल गांधीना या निवडणुकीत आपली छाप अजिबात पाडता आली नाही हे मान्य करून कॉंग्रेसजनांनी आपल्या नेत्यातील उणिवांचे विश्लेषण करून सुधारणा करायला भाग पाडले नाही तर कॉंग्रेसची स्थिती आजच्या पेक्षाही अधिक वाईट होण्याचा धोका आहे.

राहुल गांधीना नरेंद्र मोदीकडून धोबीपछाड मिळण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मनमोहनसिंग आणि राहुल गांधी यांच्यात नेतृत्वाच्या बाबतीत असलेले समान गुण-दोष ! मनमोहनसिंग यांनी सरकारात राहून चांगले काम केले असेल पण एका पंतप्रधानाचा जनतेशी जसा संवाद पाहिजे तसा त्यांना कधीच करता आला नाही . राहुल गांधीनी पक्ष बांधणीसाठी भरपूर मेहनत घेतली असेल पण त्यांचा संवाद पक्षांतर्गत मर्यादित राहात आला . लोकांशी संवाद साधण्यात ते मनमोहनसिंग यांचे इतकेच कच्चे निघालेत. त्यांनी युवक कॉंग्रेसची , विद्यार्थी कॉंग्रेसची बांधणी केली त्यांच्यात चैतन्य निर्माण केले याबद्दल राहुल गांधीचे कॉंग्रेसमध्ये खूप कौतुक झाले. त्यांनी चांगले काम केलेही असेल. युवक कॉंग्रेस आणि विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याशी त्यांचा संवाद होत असेलही . पण त्याच्या बाहेर असलेल्या प्रचंड संख्येतील युवकाशी राहुलचा काहीच संवाद स्थापित होवू शकला नाही हे कटूसत्य आहे. राहुल गांधी हे इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वयाने तरुण असल्याने त्यांना तरुणाशी संवाद साधायला अडचण जाण्याचे कारण नव्हते. पण राहुल गांधी या तरुणांकडे पाठ फिरवून युवक कॉंग्रेस , विद्यार्थी कॉंग्रेस याच्यातच रममाण राहिलेत. अण्णा हजारेच्या नेतृत्वाखाली केजरीवाल यांनी जे भ्रष्टाचार विरोधी प्रचंड मोठे आंदोलन उभे केले त्यात युवावर्ग प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरला होता. त्याकाळात राहुल गांधी , त्यांची आवडती युवक कॉंग्रेस आणि विद्यार्थी कॉंग्रेस कुठेही , काहीही करताना दिसत नव्हती. युवकांच्या भावना आणि इच्छा-आकांक्षा जाणून घेण्याची , त्यानुसार बदल करण्याची या आंदोलनाने दिलेली संधी कॉंग्रेसचा युवा चेहरा असलेल्या राहुल गांधीनी वाया घालविली. आंदोलक युवकांशी कोणताही संपर्क आणि संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही. ज्यावर राहुल गांधीनी आपला वेळ व शक्ती घालविली ती युवक कॉंग्रेस आणि विद्यार्थी कॉंग्रेस किती मुर्दाड आहे हे या दोन संघटनांनी आंदोलना संदर्भात कोणतीच भूमिका न घेवून सिद्ध केले तरी राहुल गांधीना जाग आली नाही हे त्यांच्या मोठ्या पराभवाचे कारण बनले. या आंदोलनाने मोठ्या संख्येने युवक ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल वेबसाईटकडे वळला. तेथील चर्चेतून त्याची मते बनायला लागलीत. आपल्या मतांबाबत तो आक्रमक आणि आग्रही बनू लागला. प्रचलित प्रसिद्धी माध्यमाइतकेच हे नवीन माध्यम शक्तीशालीच बनले असे नाही तर युवकांचा आवाज बनले. युवाशक्ती एक स्फोटक रूप घेवू लागली होती. केजरीवाल आणि नरेंद्र मोदींनी हे चटकन हेरले आणि ते त्यांच्यात मिसळून गेलेत. पण राहुल गांधीना याची गंधवार्ताही नव्हती ! त्यामुळेच युवकांकडून त्यांची 'पप्पू' म्हणून हेटाळणी झाली. युवावर्ग राहुल गांधीकडे आकर्षित होण्या ऐवजी राहुल गांधीची टिंगलटवाळी करू लागला. संवादाची उरलीसुरली शक्यता सोशल वेबसाईटने संपविली. राहुल गांधी युवा असले तरी आक्रमकतेच्या अभावी एक नेभळट नेता म्हणून युवकात त्यांची प्रतिमा उभी राहिली. ही प्रतिमा अधिक पक्की झाली ती निवडणूक प्रचारात जे मुद्दे ते मांडत होते त्यामुळे ! या निवडणुकीत युवावर्गाची निर्णायक भूमिका राहिली हे लक्षात घेतले तर राहुल गांधी कुठे कमी पडले हे लक्षात येते.

प्रचार काळात विकासाचा मुद्दा प्रमुख बनला असतांना आणि कॉंग्रेसने ६० वर्षे सत्तेत राहून काहीही केले नाही हे भडकपणे सांगितले आणि रंगविले जात असतांना उत्तरादाखल विकासाच्या संदर्भात कॉंग्रेसची कामगिरी जनतेपुढे मांडण्या ऐवजी राहुल गांधी जनतेसाठी आम्ही अमुक कायदे केले तमुक कायदे केले हे सांगत बसले. अन्न सुरक्षा , भूमी अधिग्रहणा संबंधीचा कायदा, माहितीचा अधिकार या चांगल्याच गोष्टी आहेत पण जागतिकीकरणाच्या परिणामी जग प्रत्यक्ष पाहिलेल्या किंवा इन्टरनेट सारख्या माध्यमातून जे जग आजच्या युवकांना कळले त्याच्या पुढे या गोष्टीचे त्यांना महत्व न वाटणे स्वाभाविक होते. उलट कॉंग्रेसने राबविलेल्या गरिबांसाठीच्या योजनांबाबत मध्यमवर्गीय जनमत कॉंग्रेसच्या विरोधात बनले होते. अशा वेळी अशा योजनांचा उदोउदो करणे म्हणजे युवक आणि मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षा लक्षात न घेवून त्यांना दूर लोटण्या सारखे होते. राहुल गांधीच्या प्रचारातील मुद्द्याने हेच केले. हिंदुत्व हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे बलस्थान होते. पण अत्यंत हुशारीने नरेंद्र मोदींनी हा मुद्दा प्रचारात कुठेही येवू दिला नाही. कारण हा मुद्दा प्रचारात आणला असता तर समाजातील मोठा वर्ग त्यांच्यापासून दूर गेला असता. कॉंग्रेसने या बाबतीत नरेंद्र मोदी पासून शिकायला हवे होते. गोरगरिबांसाठीच्या योजना हे कॉंग्रेसचे बलस्थान राहिले आहे. पण त्याच बरोबर वरचा वर्ग आणि मुखर वर्ग अशा योजनांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. अशा वेळी विशिष्ट वर्गाच्या हिताच्या योजनांचा उदोउदो न करता सर्वांसाठी काय केले किंवा करणार आहोत हे सांगणे गरजेचे होते. जुन्या पठडीतील प्रचाराने कॉंग्रेसची बलस्थाने त्याची कमजोरी बनले. २ जी स्पेक्ट्रम वाटप हा कॉंग्रेससाठी गळफास बनला. खरे तर अशा वाटपाने मोबाईल ग्रामीण भागातही घरोघरी पोचला. आज ग्रामीण युवकांचे  मोबाईल हे साधन जीव कि प्राण बनला आहे. कॉंग्रेसने २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात झालेली बदनामी मुकाट्याने स्विकारली आणि २ जी स्पेक्ट्रम वाटपामुळे झालेल्या चांगल्या बदलाचे श्रेय घेण्यातही कॉंग्रेस मुकाट राहिली. कॉंग्रेसने घडविलेल्या स्पेक्ट्रम क्रांतीचा उपयोग करीत नरेंद्र मोदी घराघरात पोचले आणि कॉंग्रेस या तंत्रज्ञानाचा उपयोग आणि वापर करण्यापासून कोसो दूर राहिली. पक्ष आणि त्याचा नेता यांचा जनतेशी संपर्क तुटला कि कोणते मुद्दे कसे मांडायचे हे कळेनासे होते आणि राहुल गांधीचे तेच झाले आहे.

२००४ साली पहिली निवडणूक लढवून लोकसभा सदस्य बनलेल्या राहुल गांधीनी त्यांना मिळालेल्या संधीचा काहीच उपयोग केलेला दिसत नाही. महत्वाकांक्षा , सत्ताकांक्षा आणि पुढे येवून जबाबदारी घेणे या प्रत्येक राजकारणी व्यक्तीसाठी अनिवार्य अशा बाबी आहे. सत्ताकांक्षा आणि महत्वकांक्षा याला समाजात दुर्गुण समजत असले तरी राजकारणात यशस्वी होण्यासाठी याला पर्याय नाही. ही महत्वाकांक्षा आणि सत्ताकांक्षाच नेत्याला लोकांपर्यंत जायला भाग पाडते. राहुल गांधी यांच्यात नेमका याच गुणांचा अभाव आहे. राहुल गांधींचा दारूण पराभव झाल्यामुळे गांधी घराण्याची  त्यांची खिल्ली उडविणे सोपे झाले आहे. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे कि मागच्या १० वर्षाच्या काळात मनात येईल तेव्हा राहुल गांधीना पंतप्रधान होता आले असते. पक्षात विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता , उलट वेळोवेळी पक्षातून तशी मागणी होत होती. राहुल गांधी जबाबदारीपासून दूर पळत आले. संसद गाजवून त्यांना देशाचे लक्ष वेधता आले असते . त्या आघाडीवरही त्यांनी पळच काढला. सत्ताकांक्षा आणि महत्वाकांक्षा नसणे हे त्यासाठी जितके कारणीभूत आहे तितकेच त्यांच्या संथ आणि मंदगतीने काम करण्याला  पक्षातून त्यांना आव्हान नसणे हे देखील कारण आहे. राहुल गांधी सारख्या संथ आणि मंद गतीने नरेंद्र मोदींनी काम केले असते तर पक्षातील त्यांच्या पेक्षा ज्येष्ठ नेतृत्वाने त्यांना पंतप्रधान पदावर कधीच पोचू दिले नसते. सत्तेबद्दलची उदासीनता आणि युवक कॉंग्रेस ,विद्यार्थी कॉंग्रेस ,अमेठी आणि उ.प्र. ही चौकट सोडून राहुल गांधी जनतेत गेल्या शिवाय कॉंग्रेससाठी सत्तेचा दरवाजा पुन्हा उघडणार नाही .
---------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------

1 comment: