Thursday, February 12, 2015

लोकसंवादातून दिल्ली जिंकण्याचा चमत्कार !

आपल्या चुका कबुल करीत लोकांशी सातत्याने संवाद आणि संपर्क ठेवण्याची जी चिकाटी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविली त्याला तोड नाही. निखळ लोकसंवादातून , खऱ्या अर्थाने लोकांना आपले म्हणणे पटवून देवून जिंकली गेलेली ही पहिलीच निवडणूक असावी.
 ----------------------------------------------------------

१४ महिन्याच्या अंतराने दिल्लीत दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. या चौदा महिन्यात निर्माण झालेल्या मोदी लाटेने देशाच्या राजकारणात अपूर्व असे परिवर्तन झाले होते. या पार्श्वभूमीवर ही दुसरी निवडणूक होत असल्याने या निवडणूक निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. पहिल्या निवडणुकी प्रमाणेच या निवडणुकीचे वर्तविण्यात आलेले अंदाज मोठ्या फरकाने चुकले. प्रचाराच्या शेवटी 'आप' भाजप-कॉंग्रेसपेक्षा पुढे असल्याचा अंदाज आला होता आणि मतदानोत्तर चाचण्याने 'आप'ला बहुमत मिळेल हा अंदाजही व्यक्त केला होता. पण बहुमत एवढे प्रचंड आणि अभूतपूर्व असेल याचा मात्र कोणालाच अंदाज आला नाही , अगदी 'आप'ला सुद्धा नाही. मतदारांच्या सर्वेक्षणासाठी प्रसिद्ध असलेले 'आप'चे नेते योगेंद्र यादव यांनी आपल्या सर्वेक्षणावर आधारित जो अंदाज प्रसिद्ध केला होता त्यात 'आप'ला ७० पैकी ५१ जागा मिळतील असे दर्शविण्यात आले होते आणि जास्तीतजास्त ५७ जागांपर्यंत 'आप' मजल मारू शकेल असेही या सर्वेक्षणाच्या आधारे सूचित करण्यात आले होते. 'आप'चा जास्तीत जास्त जागांचा अंदाजही मतदारांनी खोटा पाडला आणि 'आप'च्या पारड्यात ६७ जागा टाकल्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल कि मतदारांच्या मनात काय चालले आहे याचा नक्की थांगपत्ता कोणालाच लागला नव्हता . या टोकापासून त्या टोकापर्यंतचा दिल्लीतील मतदार मात्र एक सारखा विचार करीत होता आणि हा एकसारखा विचार हे दिल्लीत १४ महिन्याच्या अंतराने झालेल्या दुसऱ्या निवडणुकीचे वैशिष्ठ्य आहे. यापूर्वीच्या दिल्लीच्या निवडणुकीत देखील 'आप' बद्दलचा सर्वांचाच अंदाज चुकला होता. १०-१२ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही असे वाटत असताना पक्षाने २८ जागा मिळविल्या. त्यावेळी हे यश अभूतपूर्व मानले गेले होते आणि देशाच्या राजकारणात केजरीवाल क्रांती घडविणार अशी मोठी हवा त्यावेळी माध्यमांनी आणि 'आप'च्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली होती. हीच हवा 'आप'च्या नेतृत्वाच्या डोक्यात गेल्याने पुढे काय घडले हे सर्वांनी पाहिले. त्याची उजळणी येथे करण्याची गरज नाही. मात्र त्यावेळी माझ्या सारख्या मोजकेच स्तंभलेखक 'आप'च्या हवेत उडाले नव्हते . 'आप'चे त्यावेळचे यश मर्यादित आणि नकारात्मक आहे हे सांगताना मी याच स्तंभात लिहिले होते , 
"या पूर्वीच्या काही चळवळीचे रुपांतर राजकीय पक्षात झाले किंवा चळवळीच्या गर्भातून राजकीय पक्षाचा उदय झाला तेव्हा त्यांना मिळालेले यश ‘आप’च्या तुलनेत कितीतरी मोठे होते. राजकारणाची किंवा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलनाच्या तरुण आणि नवख्या नेत्यांनी यापूर्वी निवडणुकीच्या राजकारणात दैदिप्यमान यश मिळविले आहे. आसामातील ‘आसाम गण परिषद’ हा पक्ष आसामच्या विद्यार्थी आंदोलनाच्या गर्भातून जन्माला. अगदीच नवख्या तरुणांच्या या पक्षाने कॉंग्रेसला चारीमुंड्या चीत करून स्वबळावर आसामची सत्ता काबीज केली होती. त्यांची लढाई देखील भ्रष्टाचार आणि कुशासना विरुद्ध होती. राजकीय व्यवस्थेविषयी कोणताही नकारात्मक संदेश न पसरविता त्यावेळच्या व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या तरुणाचे यश केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळविलेल्या यशा पेक्षा सरस होते. आणीबाणी विरुद्धच्या लढाईतून जन्मलेल्या जनता पक्षाचे यश तर अभूतपूर्व होते. कॉंग्रेसला पहिल्यांदा केंद्रातील सत्ता सोडावी लागली ती जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या कुशीतून निर्माण झालेल्या पक्षामुळे. व्यवस्थेच्या समग्र परिवर्तनासाठी झालेल्या या आंदोलनाचा मुख्य रोख अण्णा आंदोलना प्रमाणेच उच्चस्तरावरील राजकीय भ्रष्टाचारा विरुद्धच होता. जयप्रकाश आंदोलना पेक्षा अण्णा आंदोलन किती तरी मोठे होते. जयप्रकाश आंदोलनाचा जसा बिहार मध्ये जास्त प्रभाव होता तसाच अण्णा आंदोलनाचा दिल्लीत मोठा प्रभाव होता. या तुलनेत देशातील सर्वात मोठ्या दिल्ली केंद्रित आंदोलनाच्या कुशीतून निर्माण झालेल्या पक्षाला विधानसभेच्या ७० जागांपैकी २८ जागा मिळविणाऱ्या ‘आप’ पक्षाच्या यशाला फार मोठे यश किंवा अभूतपूर्व यश नक्कीच म्हणता येणार नाही. आजच्या सारखी प्रचार-प्रसाराच्या साधनांची सहज सुलभ उपलब्धता नसताना आणि आजच्या काही प्रसार साधनांचा जन्मही झाला नसताना  या पूर्वीच्या चळवळीच्या गर्भातून निघालेल्या पक्षांनी मिळविलेले  यश किती तरी मोठे होते हे मान्य करावे लागेल. या पक्षांचे पुढे काय झाले याची ‘आप’शी आत्ताच तुलना करता येणार नाही. कारण ‘आप’चे पुढे काय होणार हे बघायला आणखी काही काळ जावू द्यावा लागणार आहे." (दै.देशोन्नती २९ डिसेंबर २०१३).


याची येथे आठवण हे सांगण्यासाठी दिली आहे कि आज 'आप'च्या यशाची अशी तुलना करायची झाल्यास या सगळ्यांना मागे टाकणारे हे यश आहे. आंदोलनानंतरच्या वातावरणात आंदोलनाच्या प्रभावाचा लाभ मिळून यश मिळणे अवघड नसते. असे कोणतेही वातावरण नसताना , दुसरीकडे भारत नमोमय करण्यात माध्यमांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नसताना 'आप'ने ही विजयश्री खेचून आणली आहे. लोकसभा निवडणुकीत व्यक्तीमहात्म्य निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकली. दिल्ली निवडणुकीचे विशेष हे आहे कि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्या आधीच्या आततायी कृतीने आणि बोलण्याने अलोकप्रिय बनलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 'आप' लढले. अलोकप्रियते पासून पिच्छा सोडवून घेत असा नेत्रदीपक विजय मिळाल्याने हा विजय राजकारणातील एक नवा अध्याय ठरतो. ज्या पद्धतीने हा विजय मिळविला ती पद्धत भारतीय राजकारणासाठी गरजेची आणि अनुकरणीय आहे. आपल्या चुका कबुल करीत लोकांशी सातत्याने संवाद आणि संपर्क ठेवण्याची जी चिकाटी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविली त्याला तोड नाही. निखळ लोकसंवादातून , खऱ्या अर्थाने लोकांना आपले म्हणणे पटवून देवून जिंकली गेलेली ही पहिलीच निवडणूक असावी. प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळाल्याची उदाहरणे सापडतील. २००४ सालची सार्वत्रिक निवडणूक सोनिया गांधी यांनी प्रतिकूल परिस्थितीतच जिंकली होती. पण प्रतिकूल परिस्थितीत एवढे मोठे यश मिळविल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. 'आप'च्या दिल्ली यशाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पहिल्या निवडणुकीतील 'आप'चे यश आणि या निवडणुकीतील 'आप'चे यश यामध्ये जितका संख्यात्मक फरक आहे तितकाच गुणात्मक फरक देखील आहे. पहिली निवडणूक अरविंद केजरीवाल यांचे भोवती वलय निर्माण करून लढविली गेली होती. सगळे राजकारणी चोर आहेत आणि आपणच तेवढे साहू आहोत हा अरविंद केजरीवाल सकट सगळ्याच 'आप' नेत्यांचा अविर्भाव होता. सगळ्यांना तुच्छ लेखणारी 'आप'ची शहाणी जमात पहिल्या निवडणुकीत उतरली होती. मात्र नंतरच्या घटनाक्रमाने 'आप' नेत्यांचा गर्व पार उतरला. 'आप'चे नेते जमिनीवर आलेत. आपल्या चुका तर त्यांनी नि:संकोचपणे मान्य करून पदर पसरून माफी मागितलीच शिवाय राजकीय विरोधकांवर प्रहार करीत बसण्या ऐवजी दिल्लीच्या विकासासाठीच्या योजना लोकांसमोर मांडल्या . लोकांची मते आणि गरजा समजावून घेतल्या. 'आप'चे कार्यकर्ते आणि नेते लोकांमध्ये लोकांचे बनून राहिले . त्यांचे हे लोकांमध्ये असणे हेच त्यांच्या विजयाचे विजयाचे मुलभूत कारण ठरले. 'आप' आणि लोक वेगळे उरले नव्हते आणि म्हणून हा लोकांचा विजय आहे. याला कोणी अरविंद केजरीवाल या व्यक्तीचा विजय समजत असेल तर ते चुकीचे आहे. अरविंद केजरीवाल यांना श्रेय जाते ते त्यांनी वर्षभरात उथळता सोडून परिपक्व आणि पारदर्शी राजकारणी होण्यात जे यश मिळविले त्याचा 'आप'ला फायदा झाला. लोकांच्या या विजयाचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी , त्यांचे उन्मादी हिंदुत्ववादी सहकारी आणि कॉंग्रेस पक्ष यांना दिले पाहिजे.


लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी दिलेल्या जबरदस्त धक्क्यातून कॉंग्रेस नेतृत्व सावरले नाही आणि पक्षात प्राण फुंकण्याची ताकदही त्याच्यात राहिले नाही. कॉंग्रेसचे नेतृत्व एवढे मुर्दाड निघाल्याने कॉंग्रेसजनांचे सैरभैर होणे स्वाभाविक होते. कॉंग्रेसच्या या अवस्थेचा फायदा अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला मिळाला. कॉंग्रेसजनांनी कॉंग्रेसकडे पाठ फिरवून 'आप'ला आपलेसे केले . कॉंग्रेस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीतील लक्षणीय घट आणि ७० पैकी ६३ कॉंग्रेस उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होणे हा त्याचा पुरावा आहे. ज्या अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस लढले ते स्वत:च मोठ्या फरकाने निवडणूक हारून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. कॉंग्रेसच्या या पानिपताने 'आप'ला लाभ झाला. दुसरा सगळ्यात मोठा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ महिन्याच्या कारभाराचा झाला. मागची ९ महिने नरेंद्र मोदी एका पाठोपाठ एक भाषणांचे फड जिंकत राहिले. त्यांचे समर्थक टाळ्या पिटत राहिले आणि संघपरिवार उन्मादी होवून हिंदुत्ववादी अजेंडा राबवू लागला. निवडणूक काळात दिल्ली परिसरात जातीय तणाव निर्माण करण्यात परिवार आघाडीवर होता. याच काळात दिल्लीतील अनेक चर्चवर हल्ले झालेत. पोलीस , प्रशासन आणि सरकार यांनी संघपरिवाराच्या दांडगाईकडे डोळेझाक केली. गेल्या ९ महिन्यात केंद्रसरकारचा प्रमुख परदेशवारीत व्यस्त तर देशात सरकारचा चेहरा कोणता तर भारत हिंदुराष्ट्र झाले पाहिजे असे चिथावत फिरणारे भागवत आणि हिंदुनी चार पासून चाळीस पर्यंत मुले जन्माला घातली पाहिजेत असे सांगणारे साक्षी, प्राची सारखे साधू आणि साध्वी ! भाजपचा हा विद्रूप आणि भयावह चेहरा लोकांना भयभीत करून गेला नसता तरच नवल. त्याचमुळे दिल्लीतील जनता देशाला अडगळीत नेणाऱ्या भाजप पासून दूर जावून 'आप'च्या झेंड्याखाली एकत्र आली. लोकांचा निर्धार आणि 'आप'चा आधार असा संगम झाल्याने दिल्लीचा असा निकाल समोर आला आहे. मात्र दिल्लीच्या या एका निकालाने भारताच्या राजकारणात लगेच मोठे बदल होतील अशी आशा करणे व्यर्थ आहे. मात्र या विजयाचा शंखनाद एवढा मोठा आहे कि त्यामुळे आपल्याच विजयी विश्वात रममाण पंतप्रधान मोदी भानावर येतील आणि कोमात गेलेली कॉंग्रेस शुद्धीवर येईल अशी आशा करायला जागा आहे. 'आप'ची आजची विनम्रता आणि चिकाटी कायम राहिली तर कॉंग्रेस ;भाजपच नाही तर सर्वच पक्षांना बदलावे लागणार आहे. एक मात्र खरे की चिकाटीने आणि विनम्रतेने लोकांवर निष्ठा ठेवून मेहनत केली तर बदल अशक्य नाही हा विश्वास दिल्लीच्या निवडणूक निकालाने राजकारणात निर्माण केला आहे.


------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------  

No comments:

Post a Comment