Thursday, February 5, 2015

महापुरुषांना समजून घेतांना ... !

भारतासारख्या व्यक्तीपुजक देशात कोणत्याही महापुरुषाची चिकित्सा करणे सोपे नाही. महापुरुषांशी आम्हा भारतीयांची भावनिक गुंतवणूक हीच त्यांच्या विचार आणि कार्याची चिकित्सा करण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे.
---------------------------------------------------------------------------------


उगवत्या सूर्याचा देश ही जशी जापानची ओळख आहे तशीच व्यक्तीपुजकांचा देश म्हणून जगाला भारताची ओळख आहे. मूर्ती पूजेसारखी इथे व्यक्तीची पूजा होते. ज्या व्यक्तीची पूजा आम्ही करतो त्याच्या विचाराबरहुकूम आचरण करण्यापेक्षा त्याच्यावर चार फुले वाहून कृतज्ञता प्रकट करणे आम्हाला जास्त आवडते आणि भावते. खरे तर असेच व्हायला हवे. कोणत्याही महापुरुषाचे आमच्या जीवनात यापेक्षा अधिक स्थान का असावे याचाच आधी विचार करण्याची गरज आहे. विशिष्ट काळात मानवी जीवनाला भेडसावणारी एखादी समस्या एखाद्या महापुरुषाच्या दूरदर्शीपणाने , विचारशीलतेने आणि कृतीशीलतेने मार्गी लागते आणि साऱ्याच समाजाचे एक पाउल पुढे पडते. अशा महापुरुषांबद्दल समाजाने कृतद्न्य राहायलाच हवे. नंतर येणाऱ्या समस्या सोडविताना अशा महापुरुषाचे विचार आणि कार्य संदर्भ म्हणून नक्कीच उपयोगी पडू शकते आणि त्या मर्यादेत त्याचा वापर समाज आणखी पुढे नेण्यासाठी होवू शकतो. त्यासाठी त्यांच्या विचाराचा आणि कृतीचा सतत अर्थ लावत राहणे गरजेचे असते. मात्र असा अर्थ लावतांना वर्तमान संदर्भात तो किती ओढूनताणून लावायचा याचे भान ठेवले नाही तर कोणी एके काळी आपल्या समस्या सोडविणारा महापुरुष समाजासाठी समस्या बनतो. कोणी कितीही दूरदर्शी असला आणि त्याने त्याच्या हयातीत महान पराक्रम केला असला तरी त्याच्या विचाराला आणि कर्तृत्वाला स्थळकाळाच्या मर्यादा असतात. त्याचे विचार आणि मार्ग त्याकाळी , त्या परिस्थितीत यशस्वी झाले म्हणजे आजच्या काळात आणि आजच्या परिस्थितीत यशस्वी होतीलच असे नसते. किंबहुना ते तसे होतच नसते. इतिहासाची पुनरावृत्ती होणे ही काही भूषणावह बाब नाही. पुनरावृत्ती होत असेल तर आपण एक तर मागे जात आहोत किंवा पुढे जाण्याचा मार्ग खुंटला आहे एवढाच त्याचा अर्थ होईल. समाजाने पुढे जायचे असेल तर नवा इतिहास घडावा लागतो. आणि असा इतिहास घडविण्यासाठी नवे इतिहासपुरुष निर्माण व्हावे लागतात. नव्या इतिहासपुरुषांना जुन्या इतिहास पुरुषांचा खांद्यावर बसून अधिक दूरचे बघता येते आणि हाच होवून गेलेल्या महापुरुषांचा मानव जातीला उपयोग आहे. त्यांचे विचार चिरंतन आहेत , काळ्या दगडावरची रेष आहे असे मानणे यालाच अंधभक्ती म्हणतात. म्हणूनच महात्मा गांधी असोत कि महात्मा फुले असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत , या सारख्या महापुरुषांच्या बाबतीत स्वत: बाबासाहेबांनी संविधान सभेत २५ नोव्हेंबर १९४९ साली जो इशारा दिला तो समजून घेवून त्याचे पालन करण्याची गरज आहे. त्या भाषणात त्यांनी अगदी सडेतोड शब्दात सांगितले होते कि कोणत्याही नेत्याचे चिकीत्सेविना अंधानुकरण करू नका. त्याच भाषणात त्यांनी जॉन स्तुअर्ट मील यांच्या विचाराचा दाखला देवून महापुरुषांच्या चरणी लोकांनी आपली बुद्धी गहाण टाकू नये असे आवाहन केले होते.

गौतम बुद्धाच्या काळातील समाज किंवा पैगंबराच्या काळातील समाज किंवा येशूच्या काळातील समाज आणि आजचा समाज यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. त्याकाळचे त्यांचे विचार आज लागू करण्याचा , आचरणात आणण्याचा प्रयत्न हा समस्या सोडविणारा नाही तर समस्या वाढविणारा ठरतो या अनुभवातून समाज जात आहे आणि तरी या अनुभवापासून तो शिकायला तयार नाही. त्या त्या काळी या महापुरुषांच्या विचाराने आणि कार्याने समाजाला दिशा दिली , नवा समाज घडविला यात वाद नाही. पण त्यालाच चिकटून बसल्याने आता मात्र पुढे जाण्यात अडथळा निर्माण होतो आहे हे लक्षात घेतले कि कोणत्याही महापुरुषाच्या मर्यादा लक्षात यायला अडचण जाणार नाही. महापुरुषांची पाउले त्यांच्या काळाच्या चार पाउले पुढे असतात हे खरे पण प्रत्येक काळाच्या ते पुढेच असतात हे मानणे याला वास्तवाचा आधार नसल्याने ती अंधश्रद्धा ठरते. सगळ्याच महापुरुषांबद्दलच्या अशा अंधश्रद्धेने आमचा समाज त्रस्त आहे. समाजाची ही अंधश्रद्धा दूर करायची असेल तर प्रत्येक महापुरुषाची-इतिहासपुरुषाची परखड चिकित्सा होणे गरजेचे आहे. महापुरुषाला धरून ठेवणे हे फक्त अंधश्रद्धेतून घडते असे नाही तर कर्तृत्वहीन समाजाची ती गरज असते. आपल्या कर्तृत्वाने व्यक्ती किंवा समाज आपली ओळख निर्माण करू शकत नसतील तेव्हा अशा महापुरुषांचा पदर पकडून आपली ओळख दाखविण्याची धडपड सुरु होते. आणि मग आम्हाला आमची ओळख , आमचा पुरुषार्थ दाखविण्यासाठी वेदकाळापर्यंत मागे जाण्यातही आम्हाला लाज वाटत नाही. इतिहासपुरुष आणि इतिहास यांचा अनुनय करण्यातच धन्यता मानणारा हा कर्तृत्वशून्य समुदाय  अनुयायी म्हणून ओळखला जातो. अनुयायांना स्वत:ला कधी ते ज्याचे अनुयायित्व पत्करतात ते महापुरुष समजत नाहीत , एवढेच नाही तर इतरांना महापुरुष समजण्यात खऱ्या अर्थाने ते अडथळा ठरतात.गांधीना नव्याने समजून घेण्याची गरज निर्माण झाली ती त्यांच्या अनुयायांनी गांधीला सर्वसाधारण समाजापासून दूर नेले म्हणून.


कोणत्याही महापुरुषाला समजून घ्यायचे असेल तर ते त्याच्या जीवित कार्याच्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. अनुषंगिक कामे किंवा अनुषंगिक विचाराला वाजवीपेक्षा जास्त महत्व देवून समाजातील समग्र समस्यांना संपूर्ण समाधान देणारा महामानव अशी प्रतिमा रंगविण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाहीत. यातून त्यांच्या मुख्य कार्यावरचे लक्ष उडून अनावश्यक वादांचा जन्म होतो. गांधीजींच्या बाबतीत तेच होत आहे. गांधी हे विचारवंत सदरात मोडणारे महापुरुष नव्हेत. पुस्तकी पंडित तर ते कधीच नव्हते. समाजाशी आमना सामना होताना जे त्यांना दिसले त्यावर त्यांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.हिंदूधर्माप्रती श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीवर जसा भगवतगीतेचा प्रभाव असतो तसा त्यांच्यावरही होता. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला गीतेतील जन्माधारित नसलेल्या चातुर्वण्याचा पुरस्कार केला होता. पण समाजात प्रत्यक्ष वावरतांना आणि काम करताना असे जन्माधारित नसलेले चातुर्वर्ण्य अस्तित्वातच नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याचा पुढे कधीच पुरस्कार केला नाही. अस्पृश्यता हिंदूधर्माचा भाग असेल तर असा धर्म नाहीसा झालेला चांगला या निष्कर्षापर्यंत ते आले होते. अस्पृश्यता त्यांना खटकली तेव्हा त्यांनी त्याविरुद्ध जनजागृती केली. अस्पृश्यता निवारणाला महत्वही दिले. त्या कार्याला आपल्या चळवळीचा एक भागही बनविला. मात्र महात्मा फुले आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेचा जो समग्र विचार केला , त्याची उकल केली आणि त्यावर उपाय सुचविले आणि योजिले तसे काही गांधीनी केले नाही.त्यामुळे जातीव्यवस्थेत पिळलेल्या दलितांचा मुक्तिदाता म्हणून जसे फुले - आंबेडकर यांना पाहता येते तसे अट्टाहासाने  गांधींच्या बाबतीत म्हणण्याचे कारण नाही. पण म्हणून गांधींच्या अस्पृश्यता निवारण कार्याचे महत्व कमी होत नाही. आपल्या पहिल्या बिहार दौऱ्यात गांधीजी जेव्हा डॉ, राजेंद्र प्रसाद यांचे घरी गेले तेव्हा त्यांना कनिष्ट जातीचे म्हणून वागणूक मिळाली ,तेच राजेंद्रप्रसाद पुढे जातीव्यवस्थेला तिलांजली देणाऱ्या घटना समितीचे अध्यक्षपद भूषवितात ही साधी घटना नाही. गांधींच्या चळवळीचा आणि प्रयत्नांचाच तो परिपाक होता हे अमान्य करता येणार नाही. स्वातंत्र्याच्या लढ्याशी अस्पृश्यता निवारणा सारखी जी जी कामे त्यांनी निगडीत केलीत त्यामागे कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवणे हा जसा महत्वाचा उद्देश्य होता तसाच स्वातंत्र्या नंतरचा समाज कसा असेल याचे प्रायोगिक दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रायोगिक आणि प्राथमिक स्वरुपात चळवळीची गरज म्हणून त्यांनी जे मांडले त्यालाच गांधींचे समाजदर्शन समजून समाजावर लादणे चुकीचे आहे. त्यांच्या विचारावर आणि दर्शनावर स्थळकाळाचा आणि त्याकाळच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम होणे अपरिहार्य होते. परिस्थिती बदलली कि त्यांचे विचारही बदलले असते हे त्यांच्या सामाजिक विचारात झालेल्या बदलावरून अनुमान काढता येते. अभावग्रस्त समाजात अपरिग्रह मूल्याची गरज असेल , पण अभाव संपला कि अपरिग्रहाचे महत्व उरत नाही. महत्व येते ते त्याचा उपभोग प्रत्येकाला घेता आला पाहिजे याचा ! म्हणून गांधी भोगवादाविरुद्ध होते अशी हाकाटी अनावश्यक ठरते. 'हिंदस्वराज्य' या शंभर वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकाला गांधीचे आर्थिक दर्शन मानणे हे चुकीचे ठरेल.तो त्यांनी जोपासलेला एक व्यक्तिगत आदर्श किंवा स्वप्न समजले पाहिजे. त्यांनी ते जगण्याचा प्रयत्न केला, मात्र समाजात ते चालू शकत नाही याचे भान त्यांनी सोडले नाही. आधुनिक व्यवस्थेला त्यांचा विरोध नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे 'हिंदस्वराज्य' पुस्तकातील प्रत्येक विचाराचा उघड विरोध करणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या हाती त्यांनी अत्यंत विश्वासाने देशाची सूत्रे सोपविली ! जे गांधीनी थोपविले नाही त्याला एक दार्शनिक रूप देवून मांडण्याचा प्रयत्न झाला तर गांधी समजले नाहीत एवढाच त्याचा अर्थ होईल.
मग गांधींचे सामाजिक , राजकीय आणि आर्थिक विचार चिरंतन नसतील तर गांधींचे ओझे आम्ही आमच्या खांद्यावर का वाहायचे हा प्रश्न पडतो. गांधी दर्शनात गांधींचे महत्व आणि महात्म्य नाही . ते त्यांच्या कृतीत आहे. अन्याया विरुद्ध , गुलामगिरी विरुद्ध लढायची , उभे राहण्याची जी ताकद, उभारी आणि आत्मविश्वास गांधीनी दिला ते प्रत्येक व्यक्तीसाठी , समाजासाठी आणि जगातील प्रत्येक राष्ट्रासाठी गांधीनी दिलेले योगदान आहे. जगभर गांधीजींना कुतूहलाने जे बघितले जाते ते याच मुले. हे कुतूहल चे ग्वारा, हो ची मिन्ह या सारख्या हिंसक संघर्षात गुंतलेल्यांपासून गांधी मार्गाने लढणाऱ्या मार्टिन लुथर किंग , नेल्सन मंडेला यांच्यासाठी सारखेच आहे. जुलमी सत्ते विरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढायचा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा गांधींची आठवण जगाला येणार आहे. चीन सारख्या बंदिस्त कम्युनिस्ट राष्ट्रातील तियानमन चौकात रणगाड्यांचा मुकाबला करणाऱ्या कोवळ्या विद्यार्थ्यांना गांधींची आठवण झालीच होती. धर्मांध सत्ते विरुद्ध लढणाऱ्या अरब राष्ट्रातील नागरिकांनाही ती झाली आणि आपल्याच देशात टीकेला पात्र ठरलेल्या गांधींची आठवण रामलीला मैदानातही आली होतीच आणि असे प्रसंग येतील तेव्हा भविष्यातसुद्धा येत राहील. ही आठवण गांधी तत्वज्ञानाची नाही तर त्यांच्या लढण्याच्या तत्वज्ञानाची आहे. बदलाचे तत्वज्ञान महत्वाचे आहे. ज्यासाठी बदल करायचे आहेत ते दर्शन चिरंतन असू शकत नाही. ते स्थळकाळानुसार बदलत राहणार आहे. म्हणून गांधी समजून घ्यायचा असेल तर ते दर्शनाच्या अंगाने नाही तर कृतीच्या अंगाने समजून घ्यावा लागेल. आणि हेही समजून घ्यावे लागेल कि गांधी हा तुमच्या आमच्या सारखा हाडामासाचा सामान्य माणूस होता आणि सर्वांकडून होतात तशा चुका त्यांनीही केल्या. मोठ्या माणसांच्या चुकाही  मोठ्याच ठरतात आणि त्या चुकांबद्दल त्यांना कोणी दोषी धरून टीका करीत असेल तर गांधींच्या बचावासाठी धावून जाण्याची गरज नाही. याच अनाग्रहाने सगळ्या महापुरुषांकडे पाहिले तर व्यक्तीपुजेपासून आम्ही , आमचा समाज आणि देश मुक्त होईल.

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------------  

1 comment: