Thursday, December 31, 2015

कॉंग्रेसचे पतन कोण थांबविणार ?

१३० वर्षाची कॉंग्रेस शून्यावस्थेत आली ती इंदिरा वाटेवर चालल्यामुळे. धर्मनिरपेक्षतेशी तडजोड आणि हायकमांड संस्कृती हे या वाटेवरचे मोठे खड्डे आहेत. याच खड्ड्यात कॉंग्रेस पडली आहे. या खड्ड्यातून कॉंग्रेसला वर येवून पुढे जायचे असेल तर नेहरू वाटेतील समाजवाद बाजूला सारून नेहरू वाटेवर चालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
------------------------------------------------------------------------

 
डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेला कॉंग्रेस १३० वर्षाची झाली. यातील जवळपास निम्मी वर्षे कॉंग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्च केलीत आणि जवळपास तितकीच वर्षे सत्तेत राहून खर्च केलेल्या वर्षाचा मोबदला घेतला . दुसऱ्या पद्धतीने असेही म्हणता येईल की पहिली ६५ वर्षे स्वातंत्र्यासाठी झिजून कमावलेली पुण्याई ६५ वर्षे सत्तेत राहण्यासाठी खर्च केली. या दोन्ही पैकी कोणतीही गोष्ट ग्राह्य मानली तरी कॉंग्रेसच्या दृष्टीने शिल्लक उरते ते शून्य . आज कॉंग्रेसच्या अवस्थेकडे पाहिले तर कॉंग्रेस खरोखरच शून्यावस्थेत असल्याचे दिसून येते. याचा दुसरा अर्थ असा होतो की, कॉंग्रेस १३० वर्षाची झाली असली तरी तीला आता नव्याने उभे राहावे लागणार आहे. जुनी पुण्याई उधळून टाकल्याने नवी पुण्याई कमवावी लागणार आहे. जुनी कात टाकून देवून नव्या रुपात लोकांना सामोरे जाण्याची गरज आहे. हे नवे रूप जसे संघटनेच्या पातळीवर दिसले पाहिजे तसेच विचारधारेत देखील ते दिसण्याची गरज आहे. गेल्या १०-२० वर्षात बदललेला भारत आणि त्यापूर्वीच भारत याच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे २० वर्षापूर्वीची संघटन पद्धती आणि विचारधारा आज कुचकामी आहे. त्यावेळच्या भौतिक परिस्थितीत आणि जीवन पद्धतीत ती विचारधारा उपयोगी ठरली असेल , पण आजच्या परिस्थितीत आमुलाग्र बदलाची गरज आहे. परिस्थितीशी जुळवून घेत जो बदलतो तोच टिकतो हा सृष्टीचा नियम आहे. मोदी आणि भाजपने कॉंग्रेसचा दारूण पराभव केला म्हणून कॉंग्रेसची शून्यावस्था झाली असे मानणे चूक आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत बदलण्याची गरज कॉंग्रेसला वाटली नाही , ओळखता आली नाही तिथेच कॉंग्रेसने आपल्या नाशाची बीजे पेरून ठेवली होती. या बीजाना खतपाणी देवून त्याचे पीक तेवढे मोदी आणि भाजपने घेतले. खऱ्या अर्थाने सामंती संघटन आणि सामंती आचार-विचाराने  कॉंग्रेसनेच आपला पराभव आणि विनाश ओढवून घेतला आहे.

तशी तर कॉंग्रेसची विचारधारा किंवा विचारावर आधारित कॉंग्रेस नेहरूंसोबतच संपली होती. शास्त्रीजींची अल्प कारकीर्द सोडली तर नेहरुनंतर ध्येयवाद संपून सुरु झाला सत्तेचा उघडा नागडा खेळ. सत्तेसाठी काही पण हेच इंदिराकाळात कॉंग्रेसचे धोरण राहिले. सत्तेसाठी धर्मनिरपेक्षता पणाला लावण्याचे युग सुरु झाले ते इंदिरा काळापासून . मुस्लिमांसाठी 'बिग ब्रदर'ची जाहीर भूमिका आणि आम्ही तुमचेच आहोत हा संदेश हिंदुत्ववाद्यांना मिळत राहील या पद्धतीचे आचरण सुरु झाले. प्रधानमंत्र्याचे मंदिरात जाणे, शंकराचार्याच्या मठात जाणे हा त्याचाच भाग होता. परिणामी हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणात शिरून त्यावर प्रभाव पाडण्यासाठी फट मिळाली. नेहरूंनी उभा केलेला धर्मनिरपेक्षतेचा चिरेबंदी वाडा कोसळण्याची ही सुरुवात होती. आणीबाणीत अक्खा संघ इंदिराजींनी तुरुंगात डांबला असला तरी संघाचे इंदिराप्रेम कमी झाले नाही हे त्याकाळी संघ प्रमुखांनी इंदिराजींना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. याचे कारणच इंदिराकाळात हिंदुत्वाबद्दल कॉंग्रेसची मऊ भूमिका ! इंदिराजी चांगल्याच मुत्सद्दी असल्याने उघडपणे त्यांनी कधीच संघाशी हातमिळवणी केली नाही. तरीही संघ इंदिराजी नंतर राजीव गांधींच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी उभा राहिला. इंदिरा गांधीची मुत्सद्देगिरी राजीव गांधीत नसल्याने त्यांनी उघडपणे , खरे तर बावळटपणे, हिंदू आणि मुस्लीम धर्मवाद्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे शहाबानो प्रकरणात कोर्टाचा निर्णय फिरवून मुस्लीम मुलतत्ववाद्यांना खुश केले तर दुसरीकडे कथित रामजन्मभूमी वरील मंदिराचे कुलूप उघडून हिंदुत्ववाद्यांना खुश केले. धर्मनिरपेक्ष राजकारणाचा प्रभाव ओसरून  राजकारणात धर्माचा प्रभाव आणि लुडबुड वाढत जाण्याची ही सुरुवात होती. याचा परिणाम नरसिंहराव यांचे काळात बाबरीचा ढांचा ध्वस्त करण्यात झाला आणि राजकारणाची दशा आणि दिशाच बदलली. धर्मनिरपेक्षता हीच कॉंग्रेसची ताकद होती. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव ओसरल्याने कॉंग्रेसचा प्रभाव उरण्याचे कारणच राहिले नाही.

नरसिंहराव काळातच  भारतीय राजकारण , समाजकारण आणि अर्थकारण  याच्यावर खोलवर परिणाम करून या सर्वांची दशा आणि दिशा बदलणारी आणखी एक ऐतिहासिक महत्वाची घटना घडली. जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय उरला नाही. ओठात समाजवाद आणि पोटात भांडवलवाद असे कॉंग्रेसचे नवे स्वरूप लोकांपुढे आले. लोकांनी जागतिकीकरण स्वीकारले आणि त्याचे चांगले परिणाम त्यांच्या जीवनावर झाल्याचा अनुभव त्यांना येवू लागला. जागतिकीकरणाने देशातील तरुणाईचे रंगरूपच बदलून गेले. राजकारणात , समाजकारणात आणि अर्थकारणात तरुणाई कर्ती बनली. कॉंग्रेसने जागतिकीकरण आणले हे खरे असले तरी त्या पक्षाने मनापासून त्याचा कधी स्वीकार केला नाही. बदललेल्या परिस्थितीसोबत बदलायला नकार देणाऱ्या कॉंग्रेसला बदललेल्या परिस्थितीच्या परिणामाचे आणि तरुणाईच्या बदललेल्या रूपाचे भानच आले नाही. त्याचा परिणाम असा झाला की कॉंग्रेस पक्षाकडे राहुल गांधीच्या रूपाने तरुण नेतृत्व असूनही हे नेतृत्व आणि तरुणाई यांच्यातील अंतर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे. कॉंग्रेसचे तरुण नेतृत्व जुन्या विचाराची पोपटपंची करण्यात गुंतल्याचा हा परिणाम आहे. देश २१ व्या शतकात आणि कॉंग्रेस मात्र ७० च्या दशकात इंदिरा गांधीनी विकसित केलेल्या कार्यपद्धतीत आणि भाषेत अडकून पडली आहे. याच्या पुढे जाण्याची क्षमता सोनिया गांधी यांच्यात कधीच नव्हती. त्यांनी इमाने इतबारे इंदिरा गांधीची गादी चालवत पक्ष कसाबसा जिवंत आणि एकसंघ ठेवला. राजकारणातील इंदिरा पद्धत पुढे चालविण्याच्या प्रयत्नातच सत्ता गेली हे कॉंग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. इंदिराजींनी राबविलेली आर्थिक धोरणे कालबाह्य आहेत हे न उमगल्याने मनमोहनसिंग काळात सरकारला हवे तसे निर्णय घेवू देण्यात कॉंग्रेस नेतृत्वाने आडकाठी आणली आणि सरकार व पक्ष यांच्या विरुद्ध दिशांमुळे दोघांचीही गाडी पुढे सरकू शकली नाही. याचा परिणाम सरकार जाण्यात आणि पक्ष खिळखिळा होण्यात झाला आहे. सोनिया गांधी जशा इंदिरा गांधीच्या प्रभावातून बाहेर पडल्या नाहीत त्याच प्रमाणे राहुल गांधी सोनिया गांधीच्या प्रभावातून बाहेर पडले नाहीत. हे कॉंग्रेसचे खरे संकट आहे . 

बदलती परिस्थिती , बदलत्या जनआकांक्षा याच्याशी पक्षाचा मेळ घालण्यात कॉंग्रेस नेतृत्व अपयशी ठरल्याने सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदिरा पद्धतीने पक्ष चालत असल्याने गांधी घराण्याच्या पलीकडे कॉंग्रेसमध्ये कोणाकडे कणा नाही. त्यामुळे कॉंग्रेसजनांसमोर गांधी घराण्यातील नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. गांधी घराण्यातील सोनिया गांधीच्या नेतृत्वाचा अस्त होत असताना राहुल गांधीचे नेतृत्व काँग्रेसजनांना आश्वासक वाटत नाही यामुळे कॉंग्रेस भांबावली आहे. राहुल गांधीच्या मागे जाण्यात उत्साह वाटत नाही आणि नेतृत्व बदलाची मागणी करण्याची शक्ती आणि हिम्मत कॉंग्रेसजनात नाही. अशा परिस्थितीत पक्षात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता प्रियांका गांधीत आहे की नाही हे आजमावून पाहणे एवढेच काँग्रेसजनांच्या हाती आहे. त्यातही दोन अडथळे आहेत. पहिला अडथळा पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. सोनिया गांधीनी प्रियांकाला पुढे करण्याची इंदिराजींची इच्छा डावलून राहुल गांधीना पुढे करण्यामागे ही पुरुष प्रधान संस्कृतीच कारणीभूत आहे. दुसरा अडथळा प्रियांकाच्या पतीचा - रॉबर्ट वडेराचा - आहे. त्याच्याभोवती वाद निर्माण करून प्रियांकाला नामोहरण करण्याचा प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसने जावयाचा बचाव करण्या ऐवजी चौकशी आणि दोषी असेल तर खुशाल शिक्षा करा अशी मागणी केल्याशिवाय प्रियांका गांधीचे नेतृत्व पुढे येण्याची शक्यता नाही. राहुल गांधी युवक प्रिय आणि लोकप्रिय होण्याची शक्यता नाही. प्रियांका गांधीत मात्र ती शक्यता दिसते. राहुल गांधीचा उपयोग संघटनेच्या पातळीवर तर लोकांच्या पातळीवर प्रियांका गांधीचा उपयोग असा प्रयोग करण्याशिवाय कॉंग्रेसपुढे तरणोपाय नाही. कॉंग्रेसच्या हायकमांड संस्कृतीने १३० वर्षाच्या कॉंग्रेस समोर नेतृत्वाचा एवढा मर्यादित पर्याय शिल्लक ठेवला आहे याची जाणीव ठेवून कॉंग्रेसजणांनी हायकमांड संस्कृती नाकारण्याची हिम्मत दाखविली पाहिजे. एक गोष्ट मात्र नक्की . कॉंग्रेसला जिवंत राहायचे असेल , पुनरागमन करायचे असेल तर इंदिरा वाट सोडावी लागेल. खऱ्याखुऱ्या धर्मनिरपेक्षतेची कास धरून आणि समाजवादी अर्थकारणाच्या मर्यादा लक्षात घेवून नव्या आर्थिकधोरणांचा मनमोकळा पुरस्कार केला तरच भाजपचा पर्याय म्हणून लोक कॉंग्रेसला स्वीकारतील. या वाटेवर कॉंग्रेसला नेण्याची क्षमता असणारे  नेतृत्व कॉंग्रेसला हवे आहे. नेहरू वाट उणे समाजवाद हेच कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे सूत्र असणार आहे.

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------

1 comment: