Thursday, December 3, 2015

स्त्रियांचा देव आणि धर्म कोणता ?

स्त्रियांच्या धर्मस्थळी प्रवेशावरील निर्बंध हा काही त्या धर्मस्थळाच्या व्यवस्थापनाच्या बऱ्या-वाईट निर्णयाचा परिणाम नाही. जगातील धर्म नावाच्या संस्थेने स्त्रीच्या पदरी  दुय्यमत्व टाकण्यासाठी मांडलेल्या तत्वज्ञानाचा आणि उभारलेल्या व्यवस्थेची ती किनार आहे. मूळ प्रश्न निर्बंधाचा नाहीच. दुय्यमत्व हा मूळ प्रश्न आहे. स्त्रियांच्या पदरी आलेले दुय्यमत्व संपविण्यासाठी प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापनाला नाही तर साऱ्या धर्मव्यवस्थेला आव्हान देण्याची गरज आहे.
--------------------------------------------------------------------------------------------


देशात सुरु असलेल्या असहिष्णुतेच्या वादात नवी भर पडली आहे ती स्त्री विषयक धर्मीय असहिष्णुतेची. प्रश्न जुनाच आहे आणि अनादिकाळापासून चालत आला आहे. काही निमित्त घडले की स्त्री विषयक धार्मिक असहिष्णुतेची चर्चा काही काळ होते ती या असहिष्णुतेचा जन्मदाता असलेल्या पुरुषांच्या जगात. या चर्चेतही स्त्रिया मौनच असतात . मौन दोन्ही अर्थाने असते.पटत नाही पण पुरुषी वर्चस्व असलेल्या जगात लढणे सोपे नाही म्हणून मौन बाळगणाऱ्या स्त्रिया आहेत तशाच आपण ईश्वराची दुय्यम निर्मिती आहोत त्यामुळे घडते ते फार आक्षेपार्ह न वाटून मुकाट बसणाऱ्या स्त्रियाही आहेत. वैचारिकदृष्ट्या कोणत्याही बाजूचा पुरुष असला तरी कुटुंबातील पुरुष प्रधानता त्याला हवीच असते. प्रत्येक कुटुंबात - प्रत्येक धर्मीय कुटुंबात - स्त्रियांवर घोषित - अघोषित बंधने असतात. ही बंधने सामोपचाराने पाळायची व्यवस्था म्हणजे कुटुंब व्यवस्था अशी या महान व्यवस्थेची अचूक व्याख्या करता येईल. त्यामुळे अशा बंधनांना सरावलेल्या स्त्रिया आणि चटावलेले पुरुष जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वावरत असल्याने स्त्रियांवर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बंधानांवर कधीच निकाली चर्चा होत नाही. आता सुरु झालेल्या चर्चेचे भवितव्य या पेक्षा वेगळे असण्याची शक्यताच नाही. कारण ज्यांच्यावर पुरुषी व्यवस्थेने घरीदारी बंधने लादली आहेत त्यांचीच बंधने झुगारून देण्याची तयारी नाही . बंधना विषयी चीड असल्याशिवाय तशी तयारी होणे शक्यही नाही. कुटुंबव्यवस्था ही भांडवलशाही व्यवस्थेसारखी आहे. भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान निर्माण झाले की ती स्वत:त बदल करून घेवून टिकून राहते. कुटुंबातदेखील कुटुंब तुटू नये इतपत स्त्रियांची घुसमट होणार नाही अशी काळजी घेतली जाते आणि या काळजीपोटी चौकट ओलांडण्याची जी सुविधा स्त्रीला मिळते त्याला आम्ही स्त्री स्वातंत्र्य संबोधतो. यातून बाह्य बदल दिसत असले तरी मानसिकता तीच राहते. त्याचमुळे अशा प्रकारच्या स्त्री स्वातंत्र्यातून स्त्रिया गगनाला गवसणी घालत असल्या तरी त्यांचा धार्मिक ठिकाणचा प्रवेश या ना त्या कारणाने निषिद्धच असतो. प्रत्येक धर्म सांगतो जग ही ईश्वराची निर्मिती आहे. चराचरात ईश्वर वसतो. स्त्री तर ईश्वराची सुंदर निर्मिती म्हणून तिच्यावर स्तुती सुमने वाहिली जातात. अशी स्तुतिसुमने वाहणारीच ईश्वराच्या दरबारात जाण्यापासून प्रतिबंध घालतात. स्त्रीच्या पोटी जन्म घेवून तिचाच यांना विटाळ होतो. हे सगळे तत्वज्ञान पुरुषप्रधान दांभिकतेला साजेसेच आहे. मात्र याकडे निव्वळ पुरुषप्रधान समाजाची दांभिकता म्हणून पाहण्याची चूक करता कामा नये. कारण पुरुषांच्या दांभिकतेवर प्रहार करताना पुरुष निर्मित ईश्वरीय व्यवस्था बदलण्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे.

धर्मस्थळी सर्व जातीच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न आणि आंदोलन अनेकदा झाले आहेत. दलितांना मंदीर प्रवेशाचा अधिकार मिळावा यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरात केलेले आंदोलन किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेले काळाराम मंदीर प्रवेशाचे आंदोलन प्रसिद्ध आहेच, महाराष्ट्रा बाहेर याच कारणासाठी झालेला  गुरुवायूर मंदिराच्या प्रवेशासाठीचा लढा गाजला होता. मात्र स्त्रियांच्या प्रार्थनास्थळीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र लढे झाल्याचा इतिहास नाही. नव्याने धर्मस्थळी स्त्री प्रवेशाची सुरु झालेली चर्चा स्त्रिया आणि स्त्री संघटनाच्या अभिक्रमातून झाली हे वेगळेपण सध्याच्या चर्चेला आहे. सुफीसंत हाजी अली यांच्या मुंबईस्थित दर्ग्यात आतवर प्रवेश करण्यास तिथल्या व्यवस्थापन समितीने केलेल्या मज्जावास काही महिलांनी आणि महिला संघटनांनी मुंबई उच्चन्यायालयात आव्हान दिल्याने ही चर्चा सुरु झाली . त्यानंतर शनीशिंगणापूर येथे एका तरुणीने मज्जाव असलेल्या चौथऱ्यावर चढून शनी देवावर तेलाचा अभिषेक केल्याने चर्चेने खळबळजनक स्वरूप घेतले. त्यातच केरळातील शबरामला देवस्थानात येणाऱ्या स्त्रियांच्या मासिकपाळीच्या तपासणीसाठी यंत्र बसविण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. अनेक स्त्रियांनी आणि स्त्री संघटनांनी देवस्थानच्या या निर्णयाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. तिकडे संसदेत कुमारी शैलजा यांनी देखील द्वारका मंदिराच्या प्रवेशाच्या वेळी त्यांची जात विचारण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर या मुद्द्याची चर्चा घडवून आणली. सध्याची चर्चा प्रथमच स्त्रियांनी आपल्या विरुद्धच्या होत असलेल्या भेदभावा विरुद्ध आवाज उठविण्यातून सुरु झाली हे वेगळेपण नक्कीच आहे. मागे प्रधानमंत्रीपदी असताना इंदिरा गांधी यांना त्यांनी पारशी व्यक्तीशी लग्न केल्याचे कारण सांगून ओडीशातील जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारला होता. थायलंडच्या धर्माने बौद्ध असलेल्या महिला राष्ट्रप्रमुखास देखील मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. जगन्नाथ मंदिरास तब्बल दोन कोटीची देणगी देणाऱ्या स्विस महिलेस ख्रिस्ती असल्याच्या कारणावरून मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. त्या त्या वेळी यावर वादळी चर्चाही झडल्यात. पण या प्रसिद्ध महिलांना प्रवेश त्या महिला आहेत म्हणून नाकारण्यात आला नसून त्यांचा संबंध इतर धर्माशी असल्याने नाकारण्यात आला अशी सारवासारव केली गेल्याने महिला विरुद्धच्या भेदभावाचा प्रश्न धसाला लागला नाही.                                                                                  

सध्या मात्र उपस्थित प्रश्न हा विशुद्धरूपाने महिला म्हणून धर्मस्थळी करण्यात येत असलेल्या भेदभावा बद्दल आहे. आणि त्यावरच्या  प्रतिक्रिया बघितल्या तर रूढी परंपरेच्या नावावर स्त्रियांना दुय्यम समजून दुय्यम वागणुकीला न्याय्य ठरविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विद्रूप चित्र आहे. काहींनी धर्म परंपरेत आणि धर्म व्यवस्थापनात कोणी हस्तक्षेप करू नये अशी सोयीस्कर भूमिका घेत स्त्रियांना दुय्यमत्व हा ईश्वरी निर्णय असल्याची बतावणी करीत आहेत. दुसरा मतप्रवाह आधुनिकतेचा बुरखा पांघरून स्त्रियांना या लढाई पासून परावृत्त करून सनातन्यांची अप्रत्यक्ष पाठराखण करणाऱ्यांचा आहे. त्यांच्या मते मंदिर प्रवेशाची लढाई प्रतिकात्मक स्वरुपाची ठरते व त्यातून काहीच बदल होत नाहीत. उगीचच शक्तिपात करण्याचे टाळावे असे सांगणारा वर्ग वाचलेली शक्ती भेदभावा विरुद्ध कशी वापरावी याबद्दल काहीच सांगत नाही. तिसरा विचारप्रवाह स्त्रीवादी भूमिका असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा आहे. मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्या मंदिराकडे आम्हीच पाठ फिरवितो असे म्हणणारा हा वर्ग आहे. यात बंडखोरी प्रकट होत असली तरी ती मुठभरा पर्यंत मर्यादित राहण्याचा आणि त्यातून सनातनी प्रवृत्तींना रान मिळण्याचा धोका आहे.  पहिल्या मतप्रवाहाच्या सनातनी  मंडळीनी  घटनेतील २६ व्या कलमाची ढाल पुढे करून समता आणि न्यायावर आधारित राज्यघटनेलाच नाकारण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुलभूत हक्क विषयक आणि कोणत्याही नागरिका विरुद्ध जात, धर्म , वंश आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणारे घटनेचे १४ वे आणि १५ वे  कलम याचे मात्र त्यांना स्मरण नाही. हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशास करण्यात आलेल्या मनाईला आव्हान देण्यात आल्याने घटनेतील २६ व्या कलमानुसार धर्मपालनाच्या व धर्मव्यवस्थापनाच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्त्रियांच्या अनुकूल निर्णय लागला तरी त्यामुळे स्त्रीयांविरुद्ध्चा भेदभाव संपेल या भ्रमात राहण्याचे कारण नाही. संपूर्ण राज्यघटना स्त्रियांच्या पाठीशी असताना भेदभाव संपलेला नाही , तो एखाद्या कलमाचा नव्याने अर्थ लावल्याने संपण्याचा प्रश्न नाही. कारण धर्माने स्त्रीवर लादलेले दुय्यमत्व हाच कुटुंबसंस्थेतील लादण्यात आलेल्या दुय्यमत्वाच्या आधार आहे. धर्माने हुशारीने लादलेल्या दुय्यमत्वाचा स्त्रीने भाबडेपणाने स्विकार करून मानसिक गुलामगिरी पत्करली आहे. स्त्रियांच्या याच मानसिक गुलामगीरीवर तर तिची कुटुंबसंस्थेतील गुलामगिरी सुरु आहे. धार्मिक गुलामगिरी आणि कुटुंबातील दुय्यम स्थान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसरे दोन्ही मतप्रवाह स्त्रियांच्या या धार्मिक गुलामगिरीला आव्हान देण्यापासून पळ काढणारे आहेत.                                                                                                            


देवींची पूजा करण्यासाठी पुरुषांना मज्जाव नाही , मात्र देवीच्या मंदीरात प्रवेश करायला स्त्रियांनाच मज्जाव असल्याची उदाहरणे आजही पाहायला मिळतात. वंश परंपरेने पुजारी पद प्राप्त होण्याची धार्मिक परंपरा असलेल्या ठिकाणी या परंपरेचे पालन करीत कर्नाटक सरकारने नेमलेल्या एका महिला पुजाऱ्यास त्या मंदिराच्या गर्भगृहातच प्रवेश करायला मनाई आहे ! याचा एकच अर्थ होतो. धार्मिक परंपरा महत्वाच्या नाहीत तर धर्मासाठी स्त्रीचे दुय्यमत्व महत्वाचे आहे. स्त्रियांना असे दुय्यम लेखणे ही काही विशिष्ट अशा एखाद्या धर्माचे वैशिष्ट्य किंवा मक्तेदारी नाही. सर्व धर्मातील समान धागा कोणता असेल तर तो आहे स्त्रियांना कमी किंवा दुय्यम लेखणे. प्रत्येक धर्माची धर्माभिमानी मंडळी सांगतील की आमच्या धर्मात स्त्रियांचे स्थान किती वरचे आहे. धर्माने त्यांची किती काळजी घेतली आहे. जी काही बंधने आहेत ती काळजीपोटीच आणि स्त्रियांच्या भल्यासाठीच ! धर्माची स्त्रियांबद्दलची ही काळजी आणि हा कळवळाच तिच्या गुलामीचे कारण बनला आहे. धर्मातील ही काळजी आणि कळवळा आणि कुटुंबातील स्त्री विषयक काळजी आणि कळवळा यात असे विलक्षण साम्य आहे आणि परिणामही सारखाच तो म्हणजे गुलामी. स्त्रीची ही गुलामी किंवा दुय्यमत्व धर्मपरत्वे कमी जास्त असू शकते. इस्लाम मध्ये अधिक प्रमाणात तर बौद्ध धर्मात कमी प्रमाणात असेल . पण ज्यात स्त्रियांना दुय्यमत्व नाही असा धर्म नाही . धर्मातील हेच दुय्यमत्व समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेत पाझरले आहे. धर्म वेगळा असेल पण स्त्रीला समानता आणि स्वातंत्र्य नाकारणारी समाजव्यवस्था व कुटुंब व्यवस्था कुठेही सारखीच आढळेल. स्त्री विषयक दृष्टीकोनात फरक असेल तर त्या फरकाचे प्रतिबिंब त्या धर्मियाच्या कुटुंबव्यवस्थेत प्रतिबिंबित झाले असते. फरक आहे तो कमी-जास्त असा तुलनात्मक. त्यामुळे या धर्मात अन्याय होतो म्हणून दुसऱ्या धर्मात प्रवेश करून समान बनण्याचा मार्ग स्त्रियांसाठी उपलब्धच नाही. धर्मातच त्यांच्या गुलामीचे मूळ असल्याने धर्म आणि धर्मव्यवस्थेला नकार देणे हाच गुलामीतून बाहेर येण्याचा मार्ग ठरतो. तुम्ही काय धर्मस्थळी प्रवेश नाकारता , आम्हीच येत नाही अशी अर्धवट बंडखोरी कुचकामाची आहे. जगातील देव आणि धर्माची व्यवस्था पुरुषांनी स्त्रीला गुलामीत ठेवण्यासाठी निर्माण केली आहे हे ओळखून जगाच्या पाठीवरील सर्व देवांना आणि धर्माना नाकारण्याचे पाऊलच स्त्रियांची गुलामगिरी संपवील.
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव ,पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------- 

No comments:

Post a Comment