Thursday, April 18, 2019

प्रधानमंत्र्याला कोंडीत पकडण्यात विरोधीपक्ष अपयशी !


आभासी शत्रू लोकांसमोर उभे करायचे आणि त्यांना मारण्याचा पवित्रा घ्यायचा ही मोदीजींची प्रचारपद्धत राहिली आहे. विरोधी पक्ष मात्र पारंपारिक प्रचारात अडकले आहेत. त्यामुळे सामना विषम वाटतो.
------------------------------------------------------------------------

लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या भोंग्यापासून नागरिकांना वाचविण्यात निवडणूक आयोगाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र नेत्यांच्या कर्णकर्कश भाषणांपासून नागरिकांची सुटका झाली नाही. नेत्यांची भाषणे नुसती कर्णकर्कश असतात असे नाही तर समाजात आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी असतात. तेढ आणि विद्वेष पसरविणाऱ्या हीन प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने आधी सोयीस्कर दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग झोपले आहे का असे रागाने विचारल्यावर आयोगाने हातपाय हलवायला सुरुवात केली. हीन दर्जाची टिपण्णी करणाऱ्या आझमखान पासून समाजात धर्माच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या मनेका गांधींच्या वक्तव्यावर आयोगाने कारवाई केली. मायावतीजी व मुख्यमंत्री योगी यांच्यावरील कारवाईने आयोगाची झोप उघडल्याचा संदेश गेला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्याच्या आधी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि प्रधानमंत्री मोदी यांची धर्मभेदी वक्तव्य करून झाली होती. त्यावर आयोगाने कारवाई केलेली नसली तरी भविष्यात अशी वक्तव्य महाग पडतील याची जाणीव मोदी आणि शाह यांना नक्कीच झाली असणार हा या कारवाईचा मोठा फायदा. यापुढे प्रधानमंत्र्यांच्या तोंडून धर्मभेदी वक्तव्य टळणार असे मानायला जागा असली तरी प्रधानमंत्र्यांकडून होणारी बिनबुडाची आणि आभासी वक्तव्य थांबणार नाहीत. अशा वक्तव्याच्या बाबतीत प्रधानमंत्र्याची बोलती बंद करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही तर विरोधीपक्षांची आहे. विरोधी पक्षांना ही जबाबदारी पार पाडता आलेली नाही.

प्रधानमंत्र्याची प्रचारपद्धत एका जगप्रसिद्ध स्पॅनिश कादंबरीच्या लोकप्रिय नायकाची आठवण करून देणारी आहे. कादंबरीचे आणि नायकाचे नांव आहे.डॉन क्विझॉट. नायकाला इतिहासाचं बरेच वेड असते. त्यात रममाण होण्यामुळे एक दिवस तो स्वात:ला इतिहासातील पात्र समजू लागतो आणि तशाप्रकारचा ऐतिहासिक समाज प्रस्थापित करण्याच्या मोहिमेवर तो निघतो. आपल्या प्रधानमंत्र्यालाही पौराणिक कथांचे किती आकर्षण आहे आणि त्या सत्य समजून ते विज्ञान परिषदात मांडत असतात.  आपले प्रधानमंत्री आणि डॉन क्विझॉट यांच्यात एवढेच साम्य नाही. डॉन क्विझॉटला जसा शत्रूचा आभास होतो आणि मग त्याच्यावर हल्ला करतो तसेच आमचे प्रधानमंत्री देखील करतात. नोटबंदीच्या माध्यमातून काळ्या पैशावर त्यांनी केलेला हल्ला कोणीच विसरू शकत नाही. रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना खूप समजावले होते. पैसा लोक घरात साठवत नाहीत तर सोन्यात आणि जमिनीत गुंतवतात. मोदीजींना मात्र गादीत ,गादीखाली, भिंतीत, फरशीखाली सिनेमात दाखवतात तशा लोकांच्या घरात पैशाच्या गड्ड्या दिसत होत्या. म्हणून त्यांनी नोटबंदी लादली. नोटबंदीतून काही निघाले नाही असे म्हणू शकता पण प्रधानमंत्र्याची लोकप्रियता वाढली हे कोणी नाकारू शकत नाही. कादंबरीतील डॉन क्विझॉट जेव्हा मोहिमेवर निघतो तेव्हा त्यालाही अशाच शत्रूचा आभास होतो आणि त्यावर तो हल्ला करतो. एकदा त्याला रस्त्यावर मेंढ्याचा कळप दिसतो. शत्रू आपल्यावर चाल करून आला असे वाटून तो त्या कळपावर हल्ला करतो. पुढे जातांना त्याला पवनचक्क्या दिसतात. त्याच्यावरही तो हल्ला करतो. आपले प्रधानमंत्री निवडणूक प्रचारात अशा कल्पित शत्रूवर हल्ला करून त्याला परास्त करीत असतात. कधी त्यांना अवकाशातून शत्रू आलेला दिसतो आणि मग क्षेपणास्त्राचा मारा करून त्याला परास्त केल्याचे जनतेला दाखवून देतात. भारतासमोर अगदी किड्या-मुंग्यासारखा असणारा पाकिस्तान हा डॉन क्विझॉट पवनचक्क्यांना महाकाय शत्रू समजतो तसा महाकाय शत्रू असल्याचे भासवून त्याच्या बंदोबस्तासाठी आपल्याशिवाय पर्याय नसल्याचा ते प्रचार करतात. डॉन क्विझॉट या कादंबरीतील पात्राला आभासी शत्रूंवर हल्ला करून जी लोकप्रियता मिळते तशी लोकप्रियता मोदीजींच्या वाट्याला आली आहे. या आभासी जगाबाहेर मोदीजींना खेचण्यात विरोधी पक्षातील नेते अपयशी आणि असमर्थ ठरले आहेत.   

प्रधानमंत्र्याची प्रचारपद्धत लक्षात न घेता पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यात विरोधीपक्ष नेते अडकल्याने मोदींचा रथ जमिनीवर आणणे शक्य झाले नाही. आक्रमण हाच संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे या उक्तीनुसार प्रधानमंत्र्याचे प्रचार आचरण आहे. मोदी प्रधानमंत्री होण्या आधीच्या निवडणुकांतील प्रचारावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल कि, बेभान आणि बेछूट आरोपाची बरसात विरोधी पक्षांकडून होत असे. आक्रमक विरोधीपक्ष आणि हत्तीच्या चालीने चालणारा सत्तापक्ष हे आजवर भारतीय निवडणुकांचे वैशिष्ट्य होते. आज आपल्याला उलट चित्र दिसते. आक्रमक मोदी आणि त्यांच्यापुढे क्षीण आवाजात बोलणारे विरोधी पक्ष असे आजचे स्वरूप आहे. ५ वर्षातील आपल्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित करण्याची संधीच मोदी विरोधीपक्षांना देत नाहीत. अशी संधी देण्याचे काम मोदींचे नाहीच. विरोधी पक्षांना ती संधी घेता येत नाही हे त्यांचे अपयश आहे. आभासी शत्रू लोकांसमोर उभे करायचे आणि त्यांना मारण्याचा पवित्रा घ्यायचा ही मोदीजींची प्रचारपद्धत राहिली आहे. मोदींनी कल्पित शत्रू विरुद्ध छेडलेल्या कल्पित युद्धात जनता रममाण होते. या खेळातून मोदींना व जनतेला बाहेर आणण्यात आणि 'हा सूर्य हा जयद्रथ' हे जनतेला आणि मोदींना दाखविण्यात विरोधीपक्ष आतापर्यंत अपयशी ठरला आहे. 'हा सूर्य आणि हा जयद्रथ'चा प्रयोग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी यशस्वीपणे करून दाखविला आहे. जे राज ठाकरेंना जमले ते इतर पक्षाच्या नेत्यांना जमत नसेल तर त्यांनी राजकारणापासून संन्यास घेण्याची वेळ आली आहे हे समजून दूर होण्यातच त्यांचे आणि देशाचे हित आहे.
--------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment