Wednesday, December 11, 2019

झटपट न्यायाची गाथा !



 चित्रपटातील न्यायव्यवस्थे बाहेर न्याय देणारे 'सिंघम' आमचे आवडते आदर्श असतात. तेलंगणात घडली तशी घृणित आणि संतापजनक घटना घडली की न्यायव्यवस्थे बाहेर न्याय झाला तरच पिडीतेला न्याय मिळेल ही भावना उफाळून वर येते. आज त्याच भावनेने आमच्या मनाचा ताबा घेतला आहे.
-----------------------------------------------------------------


तेलंगाना मधील एका तरुणीवर झालेला पाशवी बलात्कार आणि त्यानंतर तिची जाळून करण्यात आलेली क्रूर हत्या यामुळे सर्वत्र झाल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होणे स्वाभाविकच होते. अशा प्रकरणी लवकर न्याय होत नाही आणि न्याय होवून फाशीची शिक्षा झाली तरी गुन्हेगार फासावर चढायला विलंब होणे हा आमच्या न्याय आणि प्रशासनातील नेहमीचा प्रकार असल्याने असा प्रकार घडला की पिडीतेला न्याय मिळेल यावर सर्वसामान्यांना  विश्वास ठेवणे कठीण जाते. अशावेळी न्यायव्यवस्थे बद्दलची चीड उफाळून येते. यातून न्याय व्यवस्थे बाहेरच न्याय झाला पाहिजे असे जनमानस तयार होते.  चित्रपटातील न्यायव्यवस्थे बाहेर न्याय देणारे 'सिंघम' आमचे आवडते आदर्श असतात. तेलंगणात घडली तशी घृणित आणि संतापजनक घटना घडली की न्यायव्यवस्थे बाहेर न्याय झाला तरच पिडीतेला न्याय मिळेल ही भावना उफाळून वर येते. तेलंगणाच्या घटनेत ती तशी उफाळून आलीच होती.  या  पार्श्वभूमीवर तेलंगाना पोलिसांनी घटनेतील आरोपीचे एन्काऊंटर केले ही बातमी बाहेर पडताच सर्वत्र जल्लोष झाला. तेलंगाना पोलीस दलातील ज्यांनी हे कृत्य केले ते सर्वसामान्यांच्याच नव्हे तर समाजात विशेष स्थान असलेल्या लोकांचे ते हिरो बनलेत. असेच व्हायला पाहिजे होते म्हणत सर्वत्र आणि सर्वांनी घटनेचे समर्थन केले. या झटपट न्यायव्यवस्थेचे फायदे बघितले तर कोणीही या व्यवस्थेच्या प्रेमात पडेल !


एन्काऊंटरमुळे न्यायच मिळाला नाही तर अनेकांना अनेक प्रश्नाची उत्तरे द्यावी लागली असती ती आफत टळली.  आता हेच बघा ना. ज्या पोलिसांवर लोकांनी पुष्पवृष्टी केली ते पोलीस एन्काऊंटरच्या आधी अनेक प्रश्नाच्या घेऱ्यात सापडली होती. मुलीशी संपर्क तुटल्यावर घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठून काय घडले याची माहिती दिली आणि तक्रार नोंदवून घेवून तत्काळ मुलीचा शोध घेण्यासाठी गयावया केली. पण पोलिसांना एवढी गंभीर तक्रार नोंदवून घेण्यासाठी आधार कार्ड पाहिजे होते म्हणे ! ही माहिती बाहेर आल्यावर पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त होवू लागला होता. पोलीसा विरुद्ध्च्या संतापाचे रुपांतर पोलीसांवर पुष्पवृष्टी होण्यात झाले असेल तर झटपट न्याय चांगलाच म्हणावं लागेल ! लोकांच्या संतापाचे रुपांतरही सुहास्यवदनात झाले. त्याप्रसंगाचे फोटो आपण पाहिले असतील तर महिला देखील हसून एकमेकींना गुलाल लावतांना दिसल्या असतील. लोकही जयजयकार आणि जल्लोष करतांना दिसत होते. २-४ दिवस आधी अत्यंत अमानुष परिस्थितीत आपण एका निरागस तरुणीला मुकलो त्याच्या दु:खाची, संतापाची ,चिडीची एकही रेष कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नसेल तर त्याचे संपूर्ण श्रेय पोलिसांनी केलेल्या झटपट न्यायालाच दिले पाहिजे. झटपट न्यायाच्या आधी तेलंगणात मुली सुरक्षित नाहीत अशी तिथल्या सरकारविरुद्ध ओरड होत होती तिचे रुपांतर सरकारच्या कौतुकात झाले.
                                      

दिल्लीतील निर्भया बलात्कारावरून मनमोहन सरकारवर वार करणाऱ्या भाजपला त्यांच्या राजवटीत काय चाललय याची आठवण लोक करून द्यायला लागले होते. सध्याच्या भाजप नेतृत्वाचा आणि एन्काऊंटरचा जवळचा संबंध लक्षात घेता त्यांच्या पासून प्रेरणा घेवूनच पोलिसांनी हे महान कृत्य केल्याच्या समजुतीने त्यांच्या विरुद्धचा रोषही बंद झाला. निर्भया प्रकरणात कायदे कडक करण्यासाठी आमच्या संसदसदस्यांना रक्त आटवावे लागले होते. तेव्हाच्या कायद्याने काही झाले नाही तेव्हा कायदे आणखी कडक करा अशी मागणी जोर धरू लागल्याने त्यांच्यावरही दबाव आला होता. पण या झटपट न्यायाने आम्ही एवढे समाधानी झालो की कायद्याचा विचार करायची गरजच उरली नाही. असे कायदे करीत बसण्यापेक्षा झटपट न्याय केव्हाही चांगला असे आमचे कायदेमंडळच बोलू लागले. एरव्ही तुम्हाला ज्या कामासाठी पाठवले ते तुम्ही करत नसाल तर तुमचा उपयोग काय असे विचारून लोकांनी भंडावून सोडले असते. पण कायदे करण्याची जबाबदारी असलेल्यांनीच कायदेमंडळात अशा प्रकरणी कायद्याची नाही तर झटपट न्यायाची गरज प्रतिपादिली तेव्हा आम्हाला आमच्या प्रतिनिधींचा किती अभिमान वाटला. त्यांची लोक रोषातून आपोआप सुटका झाली.                                                                     
आणि तुमचे आमचे काय ? तर तुमचा आमचा दुहेरी फायदा झाला. बलात्कार करून जाळलेल्या तरुणीचे भेसूर कल्पनाचित्र आमच्या डोळ्यासमोर उभे राहून आम्हाला वाटणारी बेचैनी, अस्वस्थता आणि त्यातून होणारा निद्रानाश या झटपट न्यायाने टळला. त्या ऐवजी छाती फुगलेले शूरवीर पोलिसांचे चेहरे डोळ्यापुढे तरळून निर्धास्तपणे सुखासमाधानाची झोप घेवू लागलो हा पहिला फायदा. बलात्कार टाळायचे असतील घरातील पुरुषसत्ताक  व्यवस्थेला फाटा देवून स्त्रियांशी सन्मानाने वागण्याचे बाळकडू आपल्या बाळांना देण्याची कटकट स्वत:ला शहाण्या समजणाऱ्या मंडळीनी लावली होती त्यांचे तोंड आता बंद करता येणार हा त्याहून मोठा फायदा झाला. तुमच्या असल्या त्रासदायक उपाया ऐवजी एन्काऊंटरचा झटपट न्याय चांगला हे आता आम्ही त्यांना छातीठोकपणे सुनावू शकतो. हैदराबादच्या एन्काऊंटर नंतर लगेच बलात्कार करून मुलीना मारण्याच्या ३-४ घटना समोर आल्या असल्या तरी त्यावर फार विचार करण्याची गरज नाही. सापडलेले उत्तर इथे लागू केले की बस्स. आता या झटपट न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारे निघतीलच. ही आदर्श झटपट न्यायव्यवस्था सर्व क्षेत्रात लागू केली तर अशा प्रश्नकर्त्यांचा झटपट निकाल लावायला कितीसा वेळ लागणार !
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment