१९९० पर्यंत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान हेच एकमेकांची साथ निभावत होते. हे वेगळेपणच काश्मिरियत म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक धार्मिक दंगली झाल्यात पण काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील दृढ संबंधामुळे काश्मीरमध्ये तसे काही घडले नाही.
----------------------------------------------------------------------------------------------
जम्मूमध्ये आपल्याच देशात निर्वासित बनून राहावे लागलेल्या काश्मिरी पंडीत कुटुंबियांना तिथल्या हिंदू समुदायाकडून परकेपणाची वागणूक मिळण्यामागे काश्मिरी पंडीत आणि इतर हिंदू यांच्यातील सांस्कृतिक तफावत हे महत्वाचे कारण राहिले आहे. पंडीतांचे काश्मीर आणि नवी दिल्लीतील प्रशासनात असलेले स्थान इतर हिंदुना हेवा वाटावा असेच होते. स्वातंत्र्यापूर्वी जम्मू-काश्मिरात डोग्रा राजाची सत्ता होती पण प्रशासनात प्रभुत्व डोग्रा ऐवजी काश्मिरी पंडितांचे राहिले. स्वतंत्र भारतातही इंदिरा राजवटी पर्यंत पंतप्रधान कार्यालयात काश्मिरी पंडितांचा दबदबा राहिला आहे आणि जो पर्यंत बाहेरचे अधिकारी जम्मू-काश्मीरमध्ये नेमण्याची वैधानिक तरतूद नव्हती तोपर्यंत राज्याच्या प्रशासनातही पंडितांचाच वरचष्मा होता. तेव्हा आपण इतर हिंदूपेक्षा वेगळे आहोत, वरचढ आहोत अशी भावना होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे १९९० पर्यंत स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा काश्मिरी पंडीत असण्याचा अभिमान होता. जनगणनेत सुद्धा काश्मिरी पंडीत ही आपली वेगळी ओळख त्यांनी टिकवून ठेवली होती. अनपेक्षितपणे काश्मीरघाटी सोडून बाहेर निर्वासित म्हणून राहण्याची पाळी आली तेव्हा इतर हिंदुनी त्यांचा अभिमान पायदळी तुडविण्याची संधी सोडली नाही. जम्मूमध्ये त्यांची झालेली उपेक्षा आणि शोषण याचीच परिणती होती. सण आणि ते साजरी करण्याची पद्धत यावरूनही सांस्कृतिक फरक लक्षात येतो. भारतात शिवरात्र सगळीकडे साजरी होत असली तरी अनेक सणांपैकी तो एक सण असतो. काश्मिरी पंडितांचा मुख्य सण शिवरात्री असतो ज्याला ते हिरथ म्हणतात. सगळे कुटुंबीय एकत्र येवून तीन दिवस हा सण साजरा करतात. भारतभर महादेवाच्या मंदिरात रोषणाई आणि गर्दी असते. काश्मिरात सर्वच मंदिरात या तीन दिवसात पूजाअर्चा होते. तीन दिवसाच्या या हिरथ सणाचा दुसरा दिवस 'सलाम' म्हणून ओळखला जातो. या दिवशी काश्मिरातील मुस्लीम हिंदुना भेटून घरी जावून शुभेच्छा देतात. १९९० पर्यंत या प्रथेत खंड पडला नाही.
१९९० पर्यंत काश्मिरातील पंडीत आणि मुस्लीम हेच एकमेकांच्या सुख-दु:खातील साथीदार होते. त्यांच्यात फरकांचे अनेक मुद्दे होते आणि काही मुद्दे तर तेढ वाढेल इतके तीव्र होते. प्रशासनात जनसंख्येच्या तुलनेत पंडीत समुदायाचा मोठा हिस्सा मुस्लिमांची नाराजी वाढवत होता तर मुस्लीमामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्यावर त्यांचे प्रशासनातील भरतीचे प्रमाण वाढले व आपल्याला कमी संधी मिळते म्हणून पंडितांची मुस्लीमाप्रती नाराजी होती. दोघातील दुराव्याचे दुसरे कारण राजकीय होते. शेख अब्दुल्लांनी पाकिस्तान ऐवजी आपले वजन भारताच्या पारड्यात टाकल्याने प्रारंभी पंडीत समुदायाला शेख अब्दुल्लाचे नेतृत्व मान्य होते. नंतरच्या घडामोडींनी आणि नेहरूंच्या निधना नंतर जनसंघाने पंडीत समुदायात शिरकाव करायला सुरुवात केली तेव्हा पंडितांचा मोठा गट शेख अब्दुल्लांच्या विरोधी बनला. जनसंघा प्रमाणेच या गटानेही शेख अब्दुल्लांच्या सुटकेचा विरोध केला होता. अशा गोष्टीवरून दोन समुदायात मानसिक तणाव बऱ्याच वर्षापासून होता तरी १९९० पर्यंत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील सौहार्दाला तडा गेला नव्हता. आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जो सांस्कृतिक फरक काश्मीरी पंडीत आणि इतर हिंदू समुदायामध्ये होता तसाच फरक काश्मिरी मुसलमान आणि भारतातील इतर मुसलमानांमध्येही होता. भारतातील मुसलमानांची दु:खे काश्मिरी मुसलमानांना कधी आपली वाटली नाहीत आणि काश्मिरी मुसलमानांची दु:खे आणि आकांक्षा याच्यापासून काश्मिरेतर भारतीय मुसलमान कटाक्षाने दूर राहिला. परदेशी मुस्लिमांनी काश्मिरी मुसलमानांच्या राजकीय आकांक्षांचे समर्थन केले पण अशा समर्थनापासून भारतातील इतर भागातील मुस्लीम दुरच राहिलेत. स्वायत्ततेची किंवा स्वातंत्र्याची काश्मिरी मुसलमानांची मागणीमुळे आपण अडचणीत येवू अशी भिती काश्मिरेतर मुसलमानांना सतत वाटत असल्याने ना त्यांनी काश्मिरी मुसलमानांच्या कुठल्या आंदोलनात सहभाग नोंदवला ना त्यांच्या समर्थनासाठी कधी रस्त्यावर उतरलेत.
१९९० पर्यंत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान हेच एकमेकांची साथ निभावत होते. हे वेगळेपणच काश्मिरियत म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक धार्मिक दंगली झाल्यात पण काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील दृढ संबंधामुळे काश्मीरमध्ये तसे काही घडले नाही. १९९० मध्ये आणि त्यानंतर जे घडले त्याला धार्मिक दंगली म्हणता येणार नाही. १९९० मध्ये काश्मिरात टोकाचे धार्मिक ध्रुवीकरण होवूनही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीने लढवला गेलेला तो राजकीय लढा होता. स्वातंत्र्यानंतर दंगलीची एकमेव नोंद काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील आहे ज्यात हिंदूंच्या मालमत्तेला आणि मंदिरांना जमावाने लक्ष्य केले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराचे कुलूप उघडल्याचे निमित्त करून ही दंगल झाली असली तरी ही दंगल धार्मिक नव्हती . राजकीय कारणासाठी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घडविल्याचा त्यावेळी आरोप झाला होता. ही कथित दंगल झाल्या नंतर मुस्लीमानीच वर्गणी करून मंदिरांची दुरुस्ती केली होती. १९९० नंतर काश्मिरात जो संघर्ष उभा राहिला त्यात काही मंदिरांचे नुकसान झाले. पण ते नुकसान जमावाने हल्ला करून तोडफोड, जाळपोळ केली अशा कारणाने झाले नाही. सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्या लढाईत असे नुकसान प्रामुख्याने झाले. एखाद्या धर्मांध माथेफिरूने रात्रीच्या अंधारात एखाद्या मंदिराची तोडफोड किंवा जाळपोळ केली नसेलच असे सांगता येत नाही. पण जमावाने हल्ला करण्याची घटना नाही. सुरक्षा दलाच्या दहशतवाद्या बरोबरच्या चकमकीत जसे मंदिराचे काही ठिकाणी नुकसान झाले तसेच नुकसान मस्जीदीचे देखील झाले आहे. सुरक्षादलाच्या कारवाई पासून सुरक्षित राहण्यासाठी धार्मिक स्थळात आसरा दहशतवादी घेत असल्याने असे नुकसान अपरिहार्य होते. याचमुळे श्रीनगरमधील एक ऐतिहासिक मस्जीद जळून खाक झाली होती. बाबरी मस्जीद पाडल्या नंतर भारतीय जनता पक्षावर टीका होवू लागली तेव्हा अडवाणी व इतर भाजपा नेत्यांनी काश्मीरमध्ये मंदिरांच्या झालेल्या तोडफोडीला मुद्दा बनवला. पक्षाचा प्रत्येक नेता मनाला येईल ती संख्या सांगत होता. नरसिंहराव यांच्या काळात काश्मिरातील धार्मिक स्थळांच्या तोडफोडी बद्दल दिलेल्या माहितीनुसार ३८ धार्मिक स्थळांना नुकसान पोचल्याचे सांगण्यात आले ज्यात १६ मस्जीदींचा समावेश आहे. बाकी हिंदू मंदिर आहेत पण ती सगळी १९९० नंतर क्षतिग्रस्त झालेली नाहीत. त्यात १९८६ साली अनंतनाग जिल्ह्यात मंदिरांची जी तोडफोड झाली होती त्याचाही समावेश आहे. ज्या मंदिरांची तोडफोड झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला होता त्या दाव्यातील सत्यता तपासण्यासाठी इंडिया टुडे नियतकालिकाने आपला प्रतिनिधी १९९३च्या सुरुवातीला काश्मिरात पाठविला होता. या प्रतिनिधीने हानी झालेल्या मंदिराची जी सूची भाजपाने जाहीर केली होतील त्यातील २३ मंदिराची पाहणी केली. त्या प्रतिनिधीला २३ पैकी फक्त २ मंदिरे क्षतिग्रस्त झाल्याचे दिसले. या संबंधीचा सविस्तर वृत्तांत २८ फेब्रुवारी १९९३ च्या इंडिया टुडे मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. १९९० नंतर काश्मीरमध्ये अनेक हत्या झाल्या आणि त्यात जीव गेला तो काश्मीरला ज्याचा अभिमान होता त्या काश्मिरियतचा. त्यामुळेच अपप्रचार करणारांचे फावले. याची किंमत काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमानांनाही मोजावी लागली.
-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment