Thursday, June 1, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५८

काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान या दोन्ही समुदायाच्या मुलांना आणि महिलांना १९९० च्या दशकातील काश्मीरच्या संघर्षाची झळ विशेषत्वाने बसली. कारणे आणि परिणाम वेगळे असतील पण वेदना जवळपास सारख्याच होत्या.
------------------------------------------------------------------------------------

काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील संबंध आणि सलोख्याला तडा गेल्याचा परिणाम दोन्ही समूहांना भोगावा लागला आहे. आज काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबद्दल उरबडवेगिरी करणारांना देखील काश्मिरी पंडितांना ज्या दिव्यातून जावे लागले, भोगावे लागले याची काहीच कल्पना नाही त्यांना काश्मिरात पंडीत बाहेर पडल्यानंतर मुसलमानांना काय भोगावे लागले याची कल्पना कोठून असणार. जेव्हा पंडितांना मदतीचा हात देण्याची गरज होती, त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आपलेसे करण्याची गरज होती तेव्हा त्यांना परके मानणारे आज आपले म्हणू लागले आहेत. आपले घरदार सोडून निर्वासित बनण्याच्या यातनातून सावरायला आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना एक दशक तरी संघर्ष करावा लागला. आपल्याच भूमीत परके व पोरके म्हणून राहण्याची पाळी जशी पंडितांवर ज्या घटनांमुळे आली त्या घटनांचे परिणाम आपल्याच घरात राहणाऱ्या काश्मिरी मुसलमानांना देखील भोगावे लागले आहेत. दोन्ही समुदायाच्या मुलांना आणि महिलांना १९९० च्या दशकातील काश्मीरच्या संघर्षाची विशेष झळ बसली. कारणे आणि परिणाम वेगळे असतील पण वेदना जवळपास सारख्याच होत्या. दहशतवाद्यांपासून पंडितांना वाचविण्याचे कर्तव्य पार पाडण्यात चुकल्याची किंमत काश्मिरी मुसलमानांना देखील चुकवावी लागली आहे.                                   


निर्वासनामुळे शाळेत, महाविद्यालयात शिकणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या  मुलामुलींच्या शैक्षणिक विश्वात मोठी उलथापालथ झाली. जम्मू , दिल्ली किंवा चंडीगड सारख्या ठिकाणी त्यांना शाळा-महाविद्यालयात प्रवेश तर मिळाला पण अभ्यासाचे वातावरण मिळाले नाही. काश्मीरघाटीत १२, २४ किंवा ४८ खिडक्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला अचानक एका किंवा फारतर दोन खोल्यांच्या घरात राहण्याची वेळ आली. अनेकांना तर बरेच दिवस तंबूत दिवस काढावे लागले. एवढ्या छोट्या जागेत कुठे बसणार , कुठे स्वयंपाक करणार आणि या दाटीवाटीत कुठे अभ्यास करणार. काश्मीरघाटीत बहुतेक मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली असायची. पण घाटीच्या बाहेर पडावे लागल्यावर अभ्यासासाठी बसायला जागा मिळणे कठीण झाले होते. नवे ठिकाण , मित्र नसलेले नवे वातावरण याचेशी जुळवून घ्यायला पडणारे कष्ट याची कल्पना करता येईल. मुलींच्या बाबतीत १९९० पूर्वी कधीही न वाटणारी भीती व ताण नव्याने नव्या ठिकाणी नव्या वातावरणात कुटुंबाना जाणवू लागला होता. नव्या परिस्थितीत सर्वात जास्त समस्यांचा सामना करावा लागला तो कुटुंबातील महिलांना. जीवापाड जपलेल्या कुटुंबाची झालेली आणि होत असलेली परवड कुटुंबातील महिला सहन करू शकत नाही. यामुळे मनावर आलेला ताण आणि झालेले दु:ख पंडीत कुटुंबातील प्रत्येक महिलेला सहन करावे लागले. मुलांच्या शिक्षणाची काळजी, घर चालविण्याची चिंता आणि एवढ्याशा जागेत आंघोळीचा आणि शौचालयाचा प्रश्न कसा सोडवायचा याची विवंचना. या सगळ्या गोष्टींचा मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला. याच्या परिणाम महिलांना अनेक शारीरिक व मानसिक व्याधींचा सामना करावा लागला. तर या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही अशी निराशेची , हतबलतेची भावना कुटुंब प्रमुखात होती. या परिस्थितीमुळे आपण काश्मीर सोडून चूक केली असे अनेक कुटुंबाना वाटू लागले होते. बाहेर एवढ्या समस्या आणि ताणतणावांचा सामना करावा लागतोय त्यापेक्षा तिथेच बंदुकीच्या गोळ्यांनी मेलो असतो तर बरे असे वाटाण्यासारख्या परिस्थितीत पंडीत कुटुंबियांना अनेक वर्ष राहावे लागले. काश्मीरघाटीत परतण्या सारखी परिस्थिती नसल्याने सगळे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

ज्या शैक्षणिक खेळखंडोब्याचा सामना काश्मीरघाटीतून बाहेर पडलेल्यांना करावा लागला काश्मीरघाटीत काही वेगळी परिस्थिती नव्हती. १९९० पासून काश्मिरात सुरु झालेल्या संघर्षाची तीव्रता पुढे तीन वर्ष कायम होती. नंतर संघर्षाची तीव्रता कमी होत गेली पण संघर्ष चालूच होता. या काळात निदर्शने, मोर्चे , त्यावर सुरक्षादलाचा गोळीबार आणि गोळीबार झाला म्हणून पुन्हा निदर्शने आणि मोर्चे याची शृंखलाच काश्मिरात सुरु होती. एक तर लोकांनी पुकारलेला बंद असायचा किंवा मग सुरक्षादलांनी पुकारलेली संचारबंदी असे चक्र सुरु होते. असे काही झाले की याचा पहिला परिणाम शाळा-कॉलेज बंद होणे हा असायचा. याचा विपरीत परिणाम तिथल्या मुलामुलींच्या शिक्षणावर झाला. शाळा-कॉलेजातून मिळणाऱ्या धड्या ऐवजी त्यांना रस्त्यावर दुसरेच धडे मिळत होते. शाळेत शिकविल्या जाणाऱ्या शब्दांऐवजी लहान वयातच त्यांच्या कानी आणि तोंडी कर्फ्यू, क्रॅकडाऊन , कॉरडन, फायर ,कस्टडी, कस्टडी किलिंग, अटक , तुरुंग असे संघर्षातील शब्द येवू लागले होते. हे फक्त त्यांच्यासाठी नवे शब्द नव्हते. अशा घटनाही त्यांच्या डोळ्यासमोर घडत होत्या. मोठ्या संख्येने बाहेरून आलेल्या सुरक्षादलाला राहण्यासाठी शाळांच्या इमारतीशिवाय दुसरा चांगला पर्याय नव्हता. त्यामुळे शाळेच्या अर्ध्या भागात सुरक्षादलाचा निवास तर कर्फ्यू किंवा बंद नसेल तेव्हा अर्ध्या भागात शाळा भरायची. शाळेत निवास असलेल्या सुरक्षा सैनिकावर शाळा सुरु असतांना काही वेळा आतंकवादी हल्ले झालेत. त्याप्रसंगी झडलेल्या गोळीबाराचे आवाज ऐकत मुले शिकत होती. त्याकाळात शिकणाऱ्या मुलांच्या मनावर पुस्तकांचा परिणाम झाला असेल की त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा याचा सहज अंदाज करता येईल. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुले घरात रमण्यापेक्षा रस्त्यावर अधिक रमतात. काश्मिरात ही मुले रस्त्यावर आले की पदोपदी त्यांचा सामना रस्त्यावर तैनात सुरक्षादलाशी होत असे. ओळखपत्र दाखविण्याची सक्ती, अनेक प्रसंगी झडतीला सामोरे जाणे , काही वेळा सुरक्षादलाकडून अपमान सहन करावा लागणे या गोष्टी त्याकाळात नित्याच्या बनल्या होत्या. सुरक्षादलाकडून होणारा अपमान सहन न झाल्याने त्याकाळी अनेक तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्याकडे लहानमुले जसा चोर-पोलीस खेळ खेळतात त्या धर्तीवर त्याकाळी काश्मिरातील मुले दहशतवादी-सुरक्षादल असा खेळ खेळायचे. अशा मानसिकतेत तिथली पिढी तरुण होत होती. फक्त ज्यांची परिस्थिती मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठविण्याची होती अशा कुटुंबातील मुलेच १९९० च्या दशकात खंड पडू न देता शिकू शकली. शिक्षण नाही, उद्योग-व्यवसाय बंद म्हणून हाताला काम नाही , नोकरी मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता. अशा परिस्थितीत सापडलेल्या अनेक तरुणांनी त्याकाळी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला. 

                                                                     (क्रमशः)

--------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
 मोबाईल - ९४२२१६८१५८                                                         

No comments:

Post a Comment