Thursday, June 8, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५९

 
आधीच्या पिढीने काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील सलोखा आणि सौहार्द अनुभवला तो नंतरच्या पिढीच्या वाट्याला आला नाही. दोन्ही समुदायातील तरुण संघर्ष वेगळा असला तरी त्यात होरपळले आहेत आणि त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांच्या बाबतीत कटू भाव आहेत.
---------------------------------------------------------------------------------

१९९० च्या दशकातील काश्मीरमधील संघर्षाचा परिणाम तिथल्या युवकांवर झाला तसाच तो महिलांवरही झाला. रस्त्यावर कधी संघर्ष सुरु होईल याचा नेम नव्हता. जागोजाग सुरक्षा सैनिकांची तैनाती. त्यामुळे महिलांना घरातच राहणे भाग पडायचे. पण त्या घरात असल्या तरी संघर्षापासून अलिप्त राहू शकत नव्हत्या. कारण ज्या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबार व्हायचा त्या भागाची नाकेबंदी करून सुरक्षादल दहशतवाद्यांना शोधायचे. घराघराची झडती घेतली जायची. अशा प्रसंगी सुरक्षादलाच्या आदेशानुसार मुले आणि पुरुष घराबाहेर येवून मोकळ्या जागेत जमायची. महिला व मुली घरातच असायच्या आणि त्यांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली जायची. अशा प्रसंगी महिलांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या अनेक तक्रारी यायच्या. हा सगळा प्रकार वारंवार घडायचा. कारण निवासी भागातून सुरक्षादलावर गोळ्या चालविणे दहशतवाद्यांसाठी सोयीचे असायचे. असे झाले की घरांची झडती घेण्याशिवाय सुरक्षादलांकडे पर्याय नसायचा. या झडतीला तोंड देण्याचे काम महिलांना करावे लागले याचा वेगळाच परिणाम त्यांच्यावर झाला. सुरक्षादलाची भीती कमी झाली. पुरुषांच्या बाबतीत मात्र वेगळाच परिणाम दिसून आला. झडतीच्या वेळी महिलांच्या होणाऱ्या अपमानापासून आपण त्यांना वाचवू शकत नाहीत याचा एक न्यूनगंड त्यांच्यात आला. नंतरच्या काळात निदर्शनासाठी किंवा मोर्चासाठी महिला व मुली  रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरू लागल्या .                                                                                         

काश्मिरातील आतंकवाद संपविण्यासाठी सुरक्षादालाचा जो वरवंटा फिरला त्यातून काश्मीर घाटीतील मुस्लीम महिलांची सक्रियता कशी वाढली याचे उदाहरण म्हणून परवीन अहंगर या महिलेचे कार्य पहिले की लक्षात येते. जावेद अहमद हा या महिलेचा मुलगा.ऑगस्ट १९९० पासून बेपत्ता आहे. सुरक्षा दलाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर तो कोणाला दिसलाच नाही. सुरक्षा दलाच्या चौक्या, तुरुंग, हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी परवीनाने मुलाला शोधले पण तो सापडला नाही. आपल्या मुलाचा शोध घेत असतांना तिच्या लक्षात आले की आपल्या मुलासारखी गायब झालेली अनेक मुळे आहेत जी सुरक्षा दलांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली पण नंतर दिसलीच नाही. आपल्याच नाही तर या सर्व मुलांच्या शोधासाठी १९९४ साली परवीनाने हरवलेल्या मुलांच्या पालकाचे संघटन तयार केले. पुढे परवीनाने आपल्या कार्याचा विस्तार केला. पुरुषसत्ताक व्यवस्थेचे भोग १९९०च्या दशकातील संघर्षात इथल्या स्त्रियांना ही भोगावे लागले. या काळातील अनेक बलात्कार पिडीताना त्यांच्या पतींनी तलाक देवून दुसरा निकाह केला अशा महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम परवीनाच्या संघटनेने केले. जशी काही महिलांची मुले गायब झालीत तसे अनेक महिलांचे पतीही या काळात बेपत्ता झालेत. अशा महिलांचे ना सासर राहिले ना माहेर. अशा महिलांना परवीनाच्या संघटनेने आधार दिला. परवीनाचे कार्य लक्षात घेवून २००५ साली त्यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देखील झाले होते. १९९० च्या दशकात पाकिस्तानच्या मदतीने व प्रेरणेने काश्मीरचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न जोरात झाला. जगातल्या ज्या ज्या भागात इस्लामी सत्ता स्थापण्याचा प्रयत्न झाला त्या त्या भागातील महिलांना बुरख्यात आणि घरात बंदिस्त राहावे लागले. काश्मीरमधील महिला मात्र बुरख्यात आणि घरात बंदिस्त झाल्या नाहीत. २०१० ते २०२० च्या दशकात काश्मीरमध्ये जी आंदोलने आणि निदर्शने झालीत त्यात पुरुषांपेक्षा महिला आणि मुलांचाच सहभाग अधिक राहिला आहे. 

१९९० च्या प्रारंभी सुरु झालेल्या दहशतवादी कारवायांवर सुरक्षादलाने तीन वर्षात नियंत्रण मिळविले पण या संघर्षाचे परिणाम नियंत्रित करणे अवघड होते आणि ते सुरक्षादलाचे काम नव्हते. ती वेगळी राजकीय सामाजिक जबाबदारी होती जी पार पाडल्या गेली नाही. काश्मीरमध्ये राहिलेल्या व काश्मीर बाहेर पडलेल्या काश्मिरींवर या  संघर्षाचा वेगवेगळा परिणाम झाला. काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न झालेत तसे प्रयत्न काश्मीर प्रश्न सुटून शांतता नांदावी यासाठी न झाल्याने काश्मीर मधील मुस्लीम तरुण या संघर्षापासून अलिप्त राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकला नाही. काश्मीरमधील मुस्लीम नोकरदार वर्गाची आणि श्रीमंत व राजकारणी वर्गाची मुले त्याकाळात अलीगड विद्यापीठात शिकायला गेलीत पण सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना संघर्ष काळात काश्मीरमध्येच मिळेल तसे शिक्षण घेणे भाग पडले. दुसरीकडे बाहेर पडलेल्या पंडीत समुदायाने सुरुवातीच्या खडतर परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घेतली. निर्वासित म्हणून सुरुवातीला अव्यवस्थेला आणि तोकड्या सरकारी मदतीमुळे होणाऱ्या ओढातानीला तोंड द्यावे लागले पण काही वर्षांनी परिस्थिती सुधारत गेली. सरकारी मदत वाढली आणि शैक्षणिक सुविधा देखील वाढल्यात. महाराष्ट्रासह अनेक प्रांतांनी आपल्या शैक्षणिक संस्थात काश्मिरी पंडीत विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे झाले. यातील अनेक शिक्षणासाठी आणि काम मिळाल्याने परदेशी जावू शकली.  

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना काश्मिरातील नोकर भरतीत पंडीत समुदायाच्या तरुणांना स्थान देणारी योजना सुरु झाली ती आजही अस्तित्वात असल्याने अनेक काश्मिरी पंडीत तरुण काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. मुळचे काश्मिरी असलेले आणि आज काश्मिरात नोकरी व व्यवसायानिमित्त परतलेले काश्मिरी पंडीत काश्मीरसाठी परकेच ठरलेले आहेत. याचे कारण जसे त्यांना समजू लागले तेव्हापासून ते काश्मीरच्या बाहेरच आहेत. काश्मिरी भाषा आणि संस्कृतीशी त्यांचा संबंध टिकू शकला नाही. आधीच्या पिढीने काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील सलोखा आणि सौहार्द अनुभवला तो या पिढीच्या वाट्याला आला नाही. हे काश्मीर बाहेर पडलेल्या तरुणांइतकेच काश्मीरमध्ये राहिलेल्या तरुणांच्या बाबतीतही तितकेच लागू आहे. दोन्हीकडचे तरुण संघर्ष वेगळा असला तरी त्यात होरपळले आहेत आणि त्यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांच्या बाबतीत कटू भाव आहेत. जुन्या पिढीत असलेले सौहार्द नव्या पिढीत निर्माण होण्यासाठी जी पाउले सातत्याने उचलायला पाहिजे होती ती उचलल्या न गेल्याने पंडितांचे काश्मिरात परतणे मृगजळ बनले. काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगे काढण्याचे प्रयत्न १९९० च्या संघर्षपूर्ण दशकात आणि त्यानंतरही अनेक झालेत. पण दुरावलेले मानवी संबंध पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. झाले असतील तर ते अगदीच तोकडे व परिणामशून्य राहिले आहेत. मुळात राजकीय तोडगा निघाला की मानवीय संबंध सुधारतील हे मानून चालण्यात चूक झाली आहे. काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुसलमान यांचे संबंध पूर्ववत केल्याशिवाय राजकीय तोडगा निघू शकणार नाही हे मानून प्रयत्न झाले असते तर आज काश्मिरात वेगळी परिस्थिती दिसली असती. १९९० आणि त्यानंतरच्या घटनांनी जसे काश्मीर पंडितांचे जग आणि भावविश्व बदलले तसेच काश्मिरी मुसलमानांचे जग आणि भावविश्वही बदलले. या बदलातून त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलत गेला. हा बदल , त्यामागची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न होत नसल्याने काश्मीरचा प्रश्न १९९० च्या दशकातच अडकून पडला आहे. 

                                              (क्रमश:)

--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment