Wednesday, June 21, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ६१

 नरसिंहराव सरकार काश्मीरमध्ये बळाचा जास्त वापर करीत असल्याचा आरोप होत होता. जागतिक पातळीवर असे आरोप होणे व जागतिक जनमत भारताच्या विरोधात जाणे त्याकाळी भारताला परवडणारे नव्हते. भारत आर्थिक संकटात सापडला होता आणि जागतिक आर्थिक सहकार्याची देशाला गरज होती. 
-----------------------------------------------------------------     


नरसिंहराव यांच्या काळात सुरक्षादलाकडून काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन होत असल्याची जागतिक पातळीवर चर्चा चालू असतानाच दहशतवाद्यांकडूनही मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे ही जगाचे डोळे उघडणारी घटना या काळातच घडली. ४ जुलै १९९५ रोजी हरकत उल अन्सार या दहशतवादी संघटनेच्या पाक प्रशिक्षित ४० अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या सहा विदेशी नागरिकांचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोन टुरिस्ट गाईडचे अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथून अपहरण केले. सहा विदेशी नागरिकांपैकी दोघेजण सपत्नीक आले होते. या दोन महिला पर्यटकांचे अपहरण न करता सोडून देण्यात आले. अपहरण करण्यात आलेल्या विदेशी नागरिकात दोन अमेरिकन, दोन ब्रिटीश , एक जर्मन विद्यार्थी आणि एक नॉर्वेचा नागरिक होता. हरकत उल अन्सारने अल फरान हे नकली नाव धारण करून हे अपहरण कांड केले. या पूर्वी २९ सप्टेंबर १९९४ रोजी अहमद ओमर सईद शेखच्या नेतृत्वाखाली हरकत उल अन्सार या संघटनेने अल हदीद नाव धारण करून  नवी दिल्लीत ४ विदेशी नागरिकांचे अपहरण केले होते यात तीन ब्रिटीश आणि एका अमेरिकन नागरिकाचा समावेश होता. हे विदेशी नागरिक तब्बल २० दिवस अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते. शेवटी दिल्ली पोलिसांनी यशस्वी कारवाई करून चारही विदेशी नागरिकांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणकर्त्यांचा म्होरका अहमद शेखला अटक करून तिहार तुरुंगात डांबले. 
हे अपहरण भारताच्या तुरुंगात असलेल्या हरकत उल अन्सारच्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी करण्यात आले होते. यात यश न आल्याने याच संघटनेने जुलै १९९५ मध्ये उपरोक्त सहा विदेशी नागरिकांचे अपहरण केले. मात्र दिल्लीत अपहरण झालेल्या चार विदेशी नागरीका प्रमाणे यांची सुटका करण्यात यश आले नाही.                                                                                                         

दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यातील  नॉर्वेचा नागरिक असलेल्या कलाकाराची १३ ऑगस्ट १९९५ रोजी मुंडके छाटून त्याची हत्या केली व भारताच्या तुरुंगात असलेला  पाकिस्तानी नागरिक असलेला दहशतवादी मौलाना मसूद अजहर आणि इतर २० दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी दबाव वाढविला.  १७ ऑगस्दटला जॉन चाईल्ड या अमेरिकन नागरिकाला दहशतवाद्याच्या ताब्यातून आपली सुटका करून घेण्यात यश मिळाले. उरलेले चार विदेशी नागरिक दहशतवाद्यांच्या ताब्यातच होते.  दबावाला बळी न पडता नरसिंहराव सरकारने शोध मोहीम राबवून अतिरेक्यांविरुद्ध कारवाई सुरु ठेवली. ४ डिसेंबर १९९५ च्या कारवाईत  अपहरणकर्त्याचा म्होरका अब्दुल हमीद तुर्की सह चार अपहरणकर्ते मारल्या गेले.  १९९६ मध्ये पकडण्यात आलेल्या एका दहशतवाद्याच्या  कथनानुसार सुरक्षादलाच्या ४ डिसेंबरच्या कारवाई नंतर ९ दिवसांनी १३ डिसेंबर १९९५ ला अपहरणकर्त्यांनी त्यांच्या ताब्यातील विदेशी नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली. पण अन्द्रीयान लेवी व कॅथरीन स्कॉट या शोध पत्रकारांनी पुस्तक लिहून एक वेगळाच दावा केला. त्यांच्या कथनानुसार हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेतून फुटून भारताच्या बाजूने आलेल्या आझाद नबी कडून आर्थिक मोबदला घेवून विदेशी नागरिकांना त्याच्या ताब्यात देण्यात आले होते. काही दिवस आपल्या ताब्यात्त ठेवल्यावर २४ डिसेंबर १९९५ ला आझाद नबीने चार विदेशी नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली अशी माहिती त्यांच्या पुस्तकात देण्यात आली. त्यापूर्वीच अपहरणकर्त्यांनी विदेशी नागरिक आपल्या ताब्यात नसल्याचे जाहीर केले होते. चार विदेशी नागरिकांचे काय झाले हे शेवटपर्यंत सुरक्षादलाला किंवा त्यांचा शोध घेणाऱ्या देशी-विदेशी संस्था व व्यक्तींना कळले नाही. त्यांची प्रेतेही सुरक्षादलाला सापडली नाहीत..त्यांना ठार करण्यात आले असे मानून २००३ साली या चार नागरिकांच्या नातेवाईकांना मृत्यूचा दाखला जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिला. विदेशी नागरिकांच्या या दोन्ही अपहरणात तुरुंगातील दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी पूर्ण करून घेण्यात दहशतवादी संघटनेला अपयश आले पण पुढे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात दहशतवाद्यांनी भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण करून आपली मागणी पूर्ण करून घेतली. 


सुरक्षादलावर आतंकवादी हल्ला झाला की त्याचा प्रतिकार करताना सुरक्षादालाकडून नागरी वस्तीवर हल्ले आणि घरे व दुकानांची जाळपोळ करण्याच्या घटना नरसिंहराव काळात काश्मिरात घडल्या. सोपोर येथे जेकेएलएफच्या दहशतवाद्यांनी ६ जानेवारी १९९३ च्या सकाळी सीमा सुरक्षा दलावर अचानक केलेल्या हल्ल्यात एक जवान ठार झाल्याने सीमा सुरक्षा दलाने केलेल्या बदल्याच्या कारवाईत ३०० ते ४०० घरे व दुकाने जाळण्यात आलीत. यात काही नागरिक व दुकानदार जळून मेल्याचा आरोप झाला. शिवाय त्या भागातून जाणाऱ्या एका बस वर करण्यात आलेल्या गोळीबारात चालकासहित १५ प्रवासी ठार झाले होते. या शिवाय २-३ छोट्या वाहनावर गोळीबार करून ती पेटवून देण्यात आली होती. या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने नरसिंहराव सरकारने घटनेस जबाबदार सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून घटनेच्या न्यायिक चौकशीची घोषणा केली होती. १० एप्रिल १९९३ रोजी असेच जळीत कांड श्रीनगरच्या लाल चौकात घडले. आग लावण्यात सीमा सुरक्षा दलाचा हात नव्हता. ९ एप्रिलच्या रात्री सुरक्षा दलाने खाली केलेल्या ठिकाणाला आग लावण्यात आली आणि ती पसरली. घटनास्थळी आलेल्या सीमा सुरक्षा दलाने आगीतून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी गोळीबार सुरु केल्याचा स्थानिकांनी आरोप केला. या गोळीबारातून वाचण्यासाठी ज्यांनी नदीत उड्या मारल्या त्यांच्यावरही गोळीबार केल्याचा आरोप झाला आणि या गोळीबारात एका शिकारा बोटीला लक्ष्य केले गेले. श्रीनगरच्या लाल चौक घटनेत १०० च्यावर नागरिक मारल्या गेले. अनधिकृत आकडा या पेक्षा मोठा आहे. अशा घटनांमुळे नरसिंहराव सरकार काश्मीरमध्ये बळाचा जास्त वापर करीत असल्याचा आरोप झाला. जागतिक पातळीवर असे आरोप होणे व जागतिक जनमत भारताच्या विरोधात जाणे त्याकाळी भारताला परवडणारे नव्हते. भारत आर्थिक संकटात सापडला होता आणि जागतिक आर्थिक सहकार्याची गरज होती. त्यामुळे काश्मिरात भारताकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे या जगभरातून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. या प्रश्नावर भारताची जागतिक कोंडी करू पाहणाऱ्या पाकिस्तानला नरसिंहराव यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने कसे अस्मान दाखविले तो अध्याय मोठा उत्कंठावर्धक आहे. 

                                                     (क्रमशः)                                            

---------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment