Wednesday, July 12, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ६४

नरसिंहराव यांच्या काळात दहशतवादाची तीव्रता कमी कमी होत जाण्यामागे जशी सुरक्षादलांची धडक कारवाई कारणीभूत होती तशीच दहशतवादी संघटनांचा आपसातील संघर्षही कारणीभूत होता. 
---------------------------------------------------------------------------------


काश्मीर बाबतीत जगभर प्रचार करून आपली बाजू खरी असल्याचे भासविण्याची संधी पाकिस्तान व अतिरेकी संघटनांना मिळाली त्याचे कारण होते जगभरातील माध्यमांच्या प्रतिनिधीना त्यावेळी काश्मिरात जावून वार्तांकन करण्याची बंदी होती. सरकारी प्रसार माध्यमांवर फारसा कोणाचा विश्वास उरला नव्हता. अशा परिस्थितीत ज्या बातम्या काश्मीर बाहेर झिरपायच्या त्यांना जगभरच्या प्रसार माध्यमात स्थान मिळायचे. बातम्यांच्या खरे - खोटेपणा बद्दल तपासणी करायची संधीच नव्हती. काश्मिरात काय चालले हे काश्मिरी जनतेला बीबीसी रेडीओवर कळायचे. पुष्कळदा बीबीसीला काश्मीरमधील बातम्यांसाठी पाकिस्तानी प्रतिनिधीवर अवलंबून राहण्याची पाळी यायची. या सगळ्या कारणांनी त्याकाळी काश्मीर संबंधी अर्धवट व अर्धसत्य बातम्या प्रसारित होत होत्या. पाकिस्तान सांगते ते खोटे आहे तर मग खरे काय हा प्रश्न जगभर विचारला जाणे स्वाभाविक होते. जे काही चालले ते जगाला दिसले पाहिजे हाच त्यावरचा उपाय होता. पुन्हा जिनेव्हात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची पाळी येवू नये यासाठी नरसिंहराव यांनी झटपट निर्णय घेतलेत. विविध देशाच्या दूतावासातील राजकीय प्रतिनिधींनी किंवा कोणत्याही देशाने काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी प्रतिनिधी पाठविला तर त्यांना काश्मिरात जावू देण्याचा निर्णय घेतला. तसेच परदेशी वार्ताहराना काश्मीरमध्ये जावून वार्तांकन करण्याची परवानगी देण्यात आली. या काळात काश्मीरमधील वृत्तपत्रांचे प्रकाशन जवळपास ठप्प झाले होते. ती सुरु करण्यासाठी नरसिंहराव यांनी पाउले उचलली. दहशतवाद्यांनी दिलेल्या बातम्या प्रकाशित केल्या तर राज्य प्रशासन बडगा उगारत होते आणि त्यांच्या बातम्या दिल्या नाही तर दहशतवादी धमकावत होते. प्रशासन आणि दहशतवादी यांच्या कात्रीत सापडलेल्या अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. वृत्तपत्रे सरकारी अधिकृत बातम्या प्रकाशित करीत असतील तर दहशतवाद्यांच्या बातम्या देतात म्हणून त्यांचेवर कारवाई करू नये असे केंद्राच्या वतीने राज्यप्रशासनाला निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी आपले प्रकाशन पुन्हा सुरु केले. याचा परिणाम असा झाला की स्थानिक वृत्तपत्रा सोबत राष्ट्रीय वृत्तपत्रे लोकांपर्यंत पोचू लागली. त्याआधी राष्ट्रीय वृत्तपत्रे विमानाने श्रीनगरला पोचत होती पण पुढे त्यांच्या वितरणात अडचणी येत होत्या त्या दूर झाल्या. ही सगळी पाउले उचलणे त्याकाळात मोठ्या धाडसाची होती. सुरुवातीला साचलेल्या प्रतिकूल बातम्या जगभर गेल्या पण नंतर दहशतवाद्यांची काळी बाजूही जगासमोर येवू लागल्याने मानवाधिकारा संदर्भात भारता विरुद्धच्या टीकेची धार बऱ्याच प्रमाणात कमी झाली. शिवाय काश्मिरी जनतेचे आणि जगाचे काश्मीर मधील बातम्यांसाठी पाकिस्तान व बीबीसीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले.  स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अफवांचा बाजार बंद झाल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. 

नरसिंहराव यांच्या काळात दहशतवादाची तीव्रता कमी कमी होत जाण्यामागे जशी सुरक्षादलांची धडक कारवाई कारणीभूत होती तशीच दहशतवादी संघटनांचा आपसातील संघर्ष कारणीभूत होता. १९९० चा काश्मिरातील संघर्ष जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु झाला होता. प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत पाकिस्तानची होती. जेकेएलएफचे नेतृत्व मात्र काश्मिरी होते. १९७० च्या दशकातील दहशतवादी कारवायातही या संघटनेची महत्वाची भूमिका होती पण पुढे नेतृत्व परिवर्तना सोबत संघटनेची भूमिकाही बदलत गेली.१९७० च्या दशकातील जेकेएलएफला तिथे राहणाऱ्या पंडितांसह व पाकव्याप्त काश्मीरसह स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष काश्मीर
पाहिजे होते. काश्मीरच्या भारतात किंवा पाकिस्तानात विलय होण्याच्या विरोधात ही संघटना होती. त्यामुळे पाकिस्तानने त्यावेळी या संघटनेची मदत करणे थांबवून अनेकांना तुरुंगात देखील टाकले होते आणि या कारवाईने तेव्हा ती संघटना तुटली होती.  १९९० च्या दशकातील जेकेएलएफला इस्लामी काश्मीर हवा होता. जेकेएलएफच्या या भूमिकेमुळेच काश्मीरच्या राजकीय संघर्षाने धार्मिक वळण घेतले होते. जहाल धर्मवादाने काश्मिरातील सुफी परंपरेचा पराभव केला होता. १९९० मधील जेकेएलएफलाही पाकव्याप्त काश्मीरसह इस्लामी काश्मीर हवा असला तरी त्याचे पाकिस्तानात विलीनीकरण नको होते. हेच पाकिस्तानला नको होते. काश्मीरमध्ये जनतेला भारताविरुद्ध उभे करून बंडाळी माजविण्याचे इप्सित जेकेएलएफ कडून पूर्ण होताच १९७० च्या दशकाप्रमाणे जेकेएलएफला दिली जाणारी मदत थांबविली. यावेळी केवळ मदत थांबवून पाकिस्तान थांबला नाही तर त्या संघटनेला संपवून पाकिस्तानच्या पूर्ण नियंत्रणात असणाऱ्या व काश्मीरचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासाठी तयार असणाऱ्या हिजबुल मुजाहदिन सारख्या संघटनांच्या हाती काश्मीरमधील कारवायाचे नेतृत्व राहील असे प्रयत्न सुरु केले.

पाकिस्तानच्या मदतीने हिजबुल मुजाहदिनने जेकेएलएफला स्वत: संपविण्याचा प्रयत्न तर केलाच शिवाय भारतीय सुरक्षादलाना जेकेएलएफच्या ठावठिकाण्याची आणि संभाव्य कारवायांची माहिती पुरवून जेकेएलएफ विस्कळीत करण्यात यश प्राप्त केले. जेकेएलएफचे बरेचसे सदस्य मारल्या गेलेत, यासीन मलिक सारख्या म्होरक्यासह  अनेकजण तुरुंगात गेलेत, काही हिजबुलमध्ये सामील झालेत तर अनेकांनी भारतीय सेनेपुढे शरणागती पत्करली. पाकिस्तानपासून मोह्भंग झालेल्या दहशतवादी नेत्यांना दहशतवाद सोडून निवडणूक प्रक्रियेत त्यांनी सामील व्हावे यासाठी नरसिंहराव यांनी प्रयत्न केलेत. जेकेएलएफच्या यासीन मलिकने १९९४ साली तुरुंगातून सुटका होताच स्वतंत्र काश्मीरसाठी सशस्त्र संघर्ष सोडून देत असल्याची घोषणा केली होती. त्याच्या प्रमाणे अनेकांनी दहशतवादी मार्ग सोडला. जे शरण आलेत त्यांचा उपयोग सुरक्षादलाने दहशतवाद संपविण्यासाठी केला. पाकिस्तानी व पाकिस्तानी समर्थक दहशतवाद्यांविरुद्ध लढायला भारतीय सुरक्षा दलाच्या आशीर्वादाने काश्मिरी दहशतवाद्यांचा जो समूह तयार झाला त्याचे नाव होते इखवान ए मुसलमीन. या इखवानचा नेता होता मोहम्मद युसुफ पर्रे जो कुका पर्रे या नावाने ओळखला जायचा. दहशतवाद्यान्विरुद्ध लढण्यासाठी काश्मीर पोलिसांनी जावेद अहमद शाह याच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांना पाठबळ दिले होते. तो जावेद अहमद शाह इखवान मध्ये सामील झाला. शिवाय अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी कारवायात सामील लियाकत खान हाही इखवान मध्ये सामील झाला. सुरक्षादलाच्या संरक्षणात व पाठबळाने इखवानने अनेक पाकी दहशतवाद्यांना ठार केले. पण ज्यामुळे सुरक्षादलाची बदनामी झाली असती अशा गोष्टी सुरक्षादलाने इखवान कडून करून घेतल्याचा आरोप त्याकाळी झाला. पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्याची हत्या अशी कामे इखवानकडून करून घेतल्याचा आरोप झाला. सुरक्षादलाशी सहकार्य करण्याच्या बदल्यात इखवानने सुरक्षादलाच्या संरक्षणात अनेक अनैतिक व बेकायदेशीर कामे करून दहशत निर्माण केली होती. भारतीय सुरक्षादल समर्थित इखवान सारखी दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान समर्थित अनेक दहशतवादी संघटना यांच्या एकमेकाविरुद्धच्या कारवायात काश्मिरी जनता भरडली गेली. दहशतवादी स्वातंत्र्यासाठी लढतात यावरचा काश्मिरी जनतेचा विश्वास उडाला आणि निवडणुकांना जनतेच्या  असलेल्या विरोधाची तीव्रता कमी झाली. निवडणुकीतील फसवेगिरीच्या अनुभवाने सशस्त्र संघर्षाच्या समर्थनार्थ उतरलेली जनता हळू हळू निवडणुकीला अनुकूल बनू लागली. इखवान उल मुसलमीन मार्फत निवडणुकीला विरोध करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडण्यात सुरक्षादल यशस्वी झाले. दहशतवादाच्या या कालखंडात विस्कळीत आणि मोडकळीस आलेल्या राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी तयार करण्याचे मोठे आव्हान नरसिंहराव यांचे समोर होते. त्यासाठी त्यांनी उचललेली पाउले धाडसी म्हणता येईल अशीच होती.

                                              (क्रमशः)

---------------------------------------------------------------------- 
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment