Thursday, September 28, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७५

आग्रा परिषदे नंतर तीन पाकिस्तानी  दहशतवाद्यांनी १ ऑक्टो.२००१  रोजी काश्मीर विधानसभेवर   
हल्ला केला. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवून पाकिस्तान चालवीत असलेली आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. काश्मीर विधानसभेवरील हल्ल्यानंतर दोनच महिन्यात नवी दिल्ली येथे दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. --------------------------------------------------------------------------------------


विसाव्या शतकाचा शेवट भारतासाठी वाईट झाला. दहशतवाद्यांच्या मागण्यांपुढे झुकून तीन दहशतवाद्यांना सोडावे लागले. नव्या सहस्त्रकाचा प्रारंभही चांगला झाला नाही. काश्मीर मधील शांततेच्या आशा वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्यातील आग्रा परिषदेवर केंद्रित झालेल्या होत्या. पण त्या परिषदेतून काहीच निष्पन्न न झाल्याने सर्वांचीच निराशा झाली. सर्वाधिक निराशा काश्मिरी जनतेची झाली. दशकभर हिंसाचाराच्या झळा सोसलेल्या काश्मिरी जनतेला शांतता हवी होती. आग्रा परिषद असफल होण्याचा सर्वाधिक फटका काश्मिरी जनतेलाच बसणार होता. परिषद असफल होणे म्हणजे काश्मीर मध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया वाढण्याची भीती होती. ही भीती खोटी नव्हती हे आग्रा शिखर परिषदे नंतर दोन महिन्यातच दिसून आले. काश्मीर विधानसभेवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी १ ऑक्टोबर २००१ रोजी हल्ला केला. हा आत्मघाती दहशतवादी हल्ला होता ज्यात तीन दहशतवादी सामील होते. त्यांच्यापैकी एकाने स्फोटकाने भरलेली टाटासुमो गाडीने विधानसभेच्या प्रवेशद्वारावर धडकविली. सुरक्षा रक्षक व विधानसभेचे कर्मचारी असे ८ लोक जागीच ठार झाले तर तेथून जाणाऱ्या शाळकरी मुलीचा या बळी गेला. हा आत्मघाती हल्ला होता. स्फोट झाल्या नंतर अन्य दहशतवादी विधानसभेच्या इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ३० लोक दगावले तर ६० च्यावर गंभीर जखमी झाले. हल्ल्याच्या एक तास आधीच विधानसभेची बैठक स्थगित झाल्याने आमदारांपैकी तिथे कोणी नव्हते. सभापती,कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तेवढे होते. सुरक्षादलाने सभापतींना सुरक्षित स्थळी हलविल्याने त्यांचे प्राण वाचले. पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवून पाकिस्तान चालवीत असलेली आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. काश्मीर विधानसभेवरील हल्ल्यानंतर दोनच महिन्यात नवी दिल्ली येथे दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला.

१३ डिसेंबर २००१ रोजी बनावट स्टीकर लावलेल्या गाडीतून ५ दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात प्रवेश मिळविला. हल्ल्याच्या ४० मिनिटे आधीच संसदेचे कामकाज स्थगित झाले होते. त्यामुळे बहुतांश खासदार आणि मंत्री आपापल्या निवासस्थानात आणि कार्यालयात परतले होते. तरीही राज्यसभेचे अध्यक्ष तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचे सहित १०० च्या वर राजकीय नेते आणि अधिकारी संसद भवनात उपस्थित होते. संसदेच्या आवारात गाडी घेवून शिरलेल्या दहशतवाद्यांनी तिथे उभी असलेल्या उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या गाडीला ठोस दिली आणि गाडीच्या खाली उतरून अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पाचही अतिरेकी एके ४७ रायफल,ग्रेनेड आणि ग्रेनेड लौंचरने सज्ज होते. उपराष्ट्रपतीच्या सुरक्षा रक्षकांनी आणि तिथे असलेल्या इतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. एका अतिरेक्याच्या कंबरेला बांधलेल्या स्फोटकाला गोळी लागल्याने स्फोट होवून त्याच्या चिंधड्या उडाल्या. इतर चार अतिरेकीही सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार झाले. संसद भवन आवारातील या चकमकीत सुरक्षा रक्षकांसह ९ जण ठार झालेत तर १७ जखमी झालेत. त्यावेळी संसद भवनात उपस्थित उपराष्ट्रपती, गृहमंत्री , अन्य खासदार व मंत्री यापैकी कोणीही जखमी झाले नाहीत. सुरक्षा रक्षकांनी त्या सर्वाना सुखरूप बाहेर काढले. या आधी काश्मीर विधानसभेवर झालेल्या हल्ल्यानंतर वाजपेयी सरकारने कडक शब्दात पाकिस्तानची निर्भत्सना केली होती व आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका असा इशारा पाकिस्तानला दिला होता. ३८ जणांचा बळी गेलेल्या त्या घटनेचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करण्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाच्या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आणि त्यानंतर भारतीय संसदेवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मात्र वाजपेयी सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली. संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्या नंतर काही तासातच पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला संबोधन करून संसदेवरील हल्ल्याची माहिती दिली. आतंकवादा विरुद्धची लढाई आता निर्णायक वळणावर आली असून आतंकवाद संपविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. संसदे वरील हल्ल्यात आणि त्यापूर्वी काश्मीर विधानसभेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या पाकिस्तान स्थित आतंकवादी संघटनेचा सहभाग होता. विमान अपहरण प्रकरणात ज्याची सुटका करावी लागली होती त्या मौलाना मसूद अजहर याने सुटकेनंतर ही संघटना बनविली होती.

संसदेवरील हल्ल्यानंतर मात्र पाकिस्तानला धडा शिकविण्याचा विचार उच्च पातळीवर सुरु झाला. अतिरेक्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात यावी असा दबाव वाजपेयी सरकारवर वाढला होता. पाकिस्तानवर दबाव वाढविण्याची आणि राजकीय प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान वाजपेयींना पटले होते मात्र युद्धासाठी ते अनुकूल नव्हते. त्याऐवजी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून हेतू साध्य करावा असा त्यांचा विचार होता. त्यातून ऑपरेशन पराक्रम या मोहिमेचा जन्म झाला. या अंतर्गत भारताने जवळपास पाच लाख सैन्य युद्ध सामुग्रीसह सीमेवर आणून ठेवले होते. भारताची सैन्य सज्जता पाहून पाकिस्तानने सुद्धा सीमेवर सैन्य आणून ठेवले. केव्हाही युद्धाची ठिणगी पडेल असे चित्र होते. शेवटी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणून परिस्थिती निवळावी यासाठी पुढाकार घेतला. अमेरिकेच्या दबावात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तान रेडीओ व टेलीव्हिजन वर जाहीरपणे सांगावे लागले की भारता विरुद्ध आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू दिला जाणार नाही. २००२ साली मुशर्रफ यांनी अशी जाहीर घोषणा केल्या नंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची संभावना संपुष्टात आली. त्यानंतर सहा महिन्यांनी वाजपेयी सरकारने सीमेवर पाठवलेली अतिरिक्त फौज मागे घेतली. युद्ध टळले तरी दोन्ही बाजूनी तैनात सेनेत अधूनमधून होणाऱ्या गोळीबारात दोन्हीकडचे सैनिक बळी गेलेच. तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन पराक्रम दरम्यान सीमेवरील गोळीबारात आणि अपघातात मिळून १८७४ भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी भारताने सीमेवर सैन्याची जमवाजमव केल्यानंतर भारताविरुद्ध आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करू न देण्याची भूमिका जाहीर केली. ही भूमिका त्यांनी आग्रा शिखर परिषदेत घेतली असती तर कदाचित काश्मीरवर त्यांनी सुचविलेला तोडगा मान्य होवून आग्रा शिखर परिषद यशस्वी झाली असती.

(क्रमशः)

-------------------------------------------------------------------------------------------------- सुधाकर जाधव पांढरकवडा जि.यवतमाळ मोबाईल : ९४२२१६८१५८


No comments:

Post a Comment