Thursday, November 28, 2024

अनाकलनीय आणि अतार्किक निकाल - {पूर्वार्ध }

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे लागले तसे एकतर्फी निकाल पूर्वीही लागले आहेत. पूर्वी तसे निकाल एखाद्या मुद्द्यावर लाट निर्माण होवून लागले आहेत. अशी कोणतीही लाट महाराष्ट्रात नसताना लागलेले एकतर्फी निकाल म्हणूनच अचंबित करणारे व बुचकाळ्यात टाकणारे आहे. निवडणूक निकाल समजून घेणे व समजावून सांगण्याचे मोठे आव्हान राजकीय विश्लेषकांसमोर आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

२३ नोव्हेंबरला लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल निवडणूक लढविणारे उमेदवार ,पक्ष, त्यांना मत देणारा मतदार आणि राजकीय विश्लेषक या सर्वाना अचंबित करणारे ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी झालेल्या बहुसंख्य  मतदान चाचण्यात महाविकास आघाडीला आघाडी दाखविण्यात येत होती तर मतदानोत्तर झालेल्या चाचण्या पैकी अनेक चाचण्यात महायुती जिंकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मतदाना आधीच्या आणि मतदाना नंतरच्या चाचाण्यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती ती म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढत अतिटतीची असणार आहे आणि दोन्ही पैकी कोणीही सत्तेवर येवू शकतो किंवा दोन्ही आघाड्यांना सत्तेत येण्यासाठी निवडून येणाऱ्या अपक्ष उमेदवारांची आणि १-२ जागा मिळविणाऱ्या छोट्या पक्षांची मदत लागू शकते असे मतमोजणी पूर्वीचे चित्र होते. हे चित्र लक्षात घेवूनच दोन्ही आघाड्यांनी निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्षांशी व छोट्या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. निवडून आलेले आपले उमेदवार दुसऱ्या आघाडीच्या हाती लागू नये याच्या योजना तयार करण्यात येत होत्या मतदानाचा दिवस आणि निवडणूक निकालाचा दिवस या दरम्यान दोन ठिकाणी विमाने सुसज्ज ठेवण्यात आल्याच्या बातम्याही आल्या होत्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होत होती की दोन्ही आघाड्या विजयाचा दावा करीत असल्यातरी बहुमतापासून थोडे दूर राहू शकतो याची दोन्हींना धाकधूक होती. राजकीय अभ्यासकांचे तेच मत होते आणि निवडणूक चाचाण्यातून व्यक्त होणारे अंदाज तशीच स्थिती दर्शविणारे होते. निवडणूक निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता सर्वानीच फेटाळली होती. प्रत्यक्षात या सर्व कयासाना धक्का देत , मोडीत काढत निकाल वेगळे आणि एकतर्फी लागलेत.                                           

या एकतर्फी निकालाचा धक्का जसा महाविकास आघाडीला बसला तसाच नाही तरी सुखद असा धक्का महायुतीला बसला. महायुतीच्या काही नेत्यांनी अशा विजयाची आपण कल्पना केली नव्हती अशी प्रांजळ कबुली जाहीरपणे दिली. हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्यासाठी हा निकाल सारखाच अनपेक्षित आणि अनाकलनीय ठरला. लाडकी बहिण आणि बँक खात्यात सरळ पैसे जमा करणाऱ्या इतर योजनांमुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीची परिस्थिती सुधारली होती हे सगळेच मान्य करतात. अशा योजना विजयही मिळवून देतात हे मध्यप्रदेश सारख्या राज्यांनी दाखवूनही दिले आहे. तरी अशा योजनांमधून असा एकतर्फी विजय संभवत नाही. कारण या योजना विशिष्ट घटकांना डोळ्यासमोर ठेवून आखल्या जातात , सर्वांसाठी त्या नसतात. त्यामुळे सर्व मतदार अशा योजनांना भुलून मतदान करतात हा दावा टिकणारा नाही. दिल्लीत असा एकतर्फी विजय मिळाल्याचा दाखला दिला जाईल. पण तेथील योजनांचे स्वरूप वेगळे होते. काही योजना रेवडी वाटप सदरात मोडणाऱ्या असल्या तरी दिल्लीतील शिक्षण,आरोग्य, वीजबिल, पाणी बील या सारख्या योजनांचा लाभ सर्व रहिवाशी घेवू शकतील अशा होत्या. लाडक्या बहिणी सारख्या योजनांचे स्वरूप तसे आणि तेवढे सर्वसमावेशक नाही. त्यामुळे ४-५ महिन्यापूर्वी दिलेला कौल एकदम उलटा करण्याची क्षमता या योजने मध्ये नाही. असे निकाल एका विशिष्ट परिस्थितीत लागतात. देशात समाजवादाची चलती होती तेव्हा इंदिराजींच्या काही निर्णयामुळे जनमत एकीकडे झुकले होते. त्याचे स्वरूप आपल्याला काही मिळाले असे नव्हते पण ज्याला मिळत होते ते काढून घेतल्याचा आनंद लोकांनी मतपेटीतून व्यक्त करून एकतर्फी निकाल दिले आहेत. २०१४ चा निकालही कोणाला काही देणारा नसताना एकतर्फी लागला होता. त्यावेळी सत्ता बदलली की भ्रष्टाचार बंद होईल व भ्रष्टाचार बंद झाला की लोककल्याणासाठी पैसा उपलब्ध होईल अशी समजूत स्थापित करण्यात नरेंद्र मोदी व त्यांचा पक्ष यशस्वी झाला होता. युद्धातील विजय असे एकतर्फी निकाल लावतात अगदी युद्धातील काल्पनिक विजय देखील एकतर्फी यश मिळवून देवू शकतो हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले.                                                                                                     

एकतर्फी विजयाचे असे कोणतेही कारण नसताना महायुतीला एकतर्फी विजय मिळाल्याने राजकीय विश्लेषकांना देखील या विजयाने चक्रावून टाकले आहे. त्यांच्यासाठी देखील हा विजय अनाकलनीय आणि अतर्क्य असा ठरला आहे. आणखी एक गोष्ट ४-५ महिन्यात मतदानाच्या कलात एवढा उलटफेर होण्याचे उदाहरण सापडणार नाही. पक्षांना आणि विषेत: सत्ताधाऱ्याना त्यांच्या चुका भोवतात व त्याची शिक्षा त्यांना मतदानातून मिळते हे खरे. इथेही ज्यांनी चुका केल्यात त्यांना शिक्षा मिळालेली नाही आणि जे चुका करण्याच्या स्थितीत नव्हते त्यांना मात्र कठोर शिक्षा झाली. लोकसभा ते विधानसभा निवडणुका दरम्यानच्या ४-५ महिन्याच्या काळात जे घडले त्यावर नजर टाकली तरी लक्षात येईल की ४-५ महिन्यात जे घडले ते सत्ताधाऱ्याना अडचणीत आणणारे होते आणि दोन अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात काय घडले , सरकार कोणत्या पद्धतीने सत्तेत आले ते सगळे बाजूला ठेवले तरी महायुतीची चार-पाच महिन्यातील कामगिरी त्यांना अडचणीत आणणारीच होती. या काळात आपण शेतीमालाचे भाव कमी होताना आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढताना बघितले. महाराष्ट्रातील उद्योग व महाराष्ट्रात येवू घातलेले उद्योग गुजरात राज्यात जाताना बघितले. नव्या उद्योगा अभावी व सरकारी नोकर भारती जवळपास बंद असल्याने बेरोजगारीने चिंताजनक पातळी गाठताना आपण बघितले आहे. ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद पडल्या आणि चालू असलेल्या शाळा अदानीउद्योग समूहाकडे सोपवून सरकार आपली जबाबदारी झटकताना आपण पाहिले आहे. स्त्रियांची असुरक्षितता आणि पालघर मध्ये शालेय बालिकेवर शाळेतच झालेल्या अत्याचारामुळे निर्माण झालेला जनआक्रोश बघितला. लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या दरम्यान घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या शिवरायाच्या पुतळ्याचे कोसळणे. भ्रष्टाचार आणि बेजबाबदार निर्णय हे शिवरायाच्या अपमाना मागचे कारण असल्याचेही उघड झाले होते. महाराष्ट्र या प्रकरणी संतप्त झाल्याचे आपण पहिले. मराठा आरक्षणाचे प्रकरण सरकारला नीट हाताळता आले नाही हे देखील मात्दारासमोर होते. शेवटच्या २ महिन्यात रेवडी वाटपाचे निर्णय आणि त्याची झपाट्याने केलेली अंमलबजावणी हीच या सरकारची उपलब्धी होती. पण ही उपलब्धी लाट निर्माण करणारी आणि आधीचे अपयश झाकण्यासाठी पुरेशी नव्हती. लोकसभेपेक्षा थोडी जास्त मते झोळीत पडतील एवढीच ही उपलब्धी होती.

                                                          {पूर्वार्ध}
 
---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment