Wednesday, June 22, 2011

भाजपची दिवाळी की दिवाळे?


 "वाजपेयींचा अपवाद वगळता भाजपचे सगळे नेतृत्व संघप्रकाशित राहिले आहे.काही प्रमाणात भाजपातील मागासवर्गीय नेते संघ प्रभावाशिवाय स्वत:च्या ताकदीवर जनाधार निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत.पण भाजप मधे जनाधारित नेतृत्व आणि संघाधारित नेतृत्व यांच्यात नेहमीच संघर्ष होत आला आहे.अगदी वाजपेयीच्या वेळी सुद्धा सुप्त स्वरूपात का होइना असा संघर्ष झाला आहे.आज गाजत असलेले मुंडे प्रकरण म्हणजे या संघर्षाचे उग्र रूप आहे.संघ संस्कृती आणि पक्ष म्हणून भाजपचे नेतृत्व  मागास वर्गीय व वर्णीय याना स्वत:सोबत घेण्यास ,स्वत:च्या बरोबरीचा दर्जा देण्यास पुरेसे तयार नसल्याचेच हां संघर्ष दर्शवितो."






                                                         भाजपची दिवाळी की  दिवाळे?

दिल्लीच्या रामलीला मैदानावर रामदेव बाबांचे आन्दोलन मोडून काढण्या साठी सरकारच्या आदेशावरून
पोलिसानी जे रानटी वर्तन केले त्याचा धिक्कार कॉंग्रेस पक्ष व् या पक्षाचे सरकार वगळता सामान्य
नागरिकापासून ते विशिष्टजना पर्यंत आणि डाव्या पक्षा पासून ते उजव्या पक्षा पर्यंत सर्वानीच केले.
भारतीय जनता पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याने त्याने सरकारचा धिक्कार करण्यात आघाडीवर
राहणे क्रमप्राप्तच होते.काही न करता सवरता केंद्र सरकारने बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचे श्रेय
भारतीय जनता पक्षाला दिल्याने तर या पक्षाचा विरोधाचा उत्साह द्विगुनीत झाला होता.या उत्साहातच
भाजपने राजघाटवर म.गांधीन्च्या समाधी जवळ रामलीला मैदानावरील पोलिसी अत्याचाराच्या
विरोधात उपोषण केले.पक्षाचे सारे केन्द्रीय नेतृत्व या उपोषनात सामील झाले होते.भ्रस्टाचाराची
मोठ मोठी प्रकरणे बाहेर आल्याने बदनाम झालेल्या केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत असतानाच
भ्रष्टाचार विरोधी आन्दोलन मोडून काढण्याचा आततायीपणा केंद्र सरकारने केल्याने त्याचा राजकीय लाभ आपल्याला मिळणार याची खात्री भाजपला झाल्याने पक्षाच्या विरोध आंदोलनात दांडगा उत्साह
असणे स्वाभाविकच होते.लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्या श्रीमती सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने
राजघाटवर नाच गाण्याचा जो कार्यक्रम रंगला आणि मैदानावरील दुःखद घटनेचा जो अवर्णनीय आनंद
प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्या वरून ओसंडून वाहात होता त्यामागे याच राजकीय लाभाचे गणित होते.आता सत्ता आपल्या पासून दूर नाही या कल्पनेनेच निवडनुका दूर असतानाही दिवाळी साजरी करण्याचा मोह भाजप नेतृत्वाला आवरता आला नाही हे राजघाटच्या घटनेवरून दिसून आले.पण खरेच भाजप ने दिवाळी साजरी करावी अशी परिस्थिती आहे का?
केंद्रात वाजपेयी सरकारच्या  ५ वर्षाच्या कारकिर्दी नंतर भाजपला असाच भ्रम झाला होता. इंडिया शायनिंगचा नारा देवून सत्ता हाती येणारच या भ्रमात वावरत हा पक्ष निवडनुकीला सामोरा जावून
तोंडघशी पडला होता.स्वतंत्र भारताच्या इतिहासात कॉंग्रेसेतर पक्षानी एकाच पंतप्रधानाच्या नेतृत्वा
खाली ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या अपूर्व घटने नंतरच्या त्या निवडनुका होत्या.कॉंग्रेसेतर
पक्षाना राज्य करता येत नाही ही दृढ़ झालेली समजूत पुसून टाकण्यात वाजपेयी यांचे सरकार
यशस्वी झाले होते.पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने सुरु केलेले उदारीकरनाचे धोरण वाजपेयी सरकारने
पुढे रेटण्यात यश मिळविले होते.गुजरात राज्यातील भीषण व् क्रूर जातीय दंगल व् त्या दंगलीतील
मोदी सरकारच्या  सह्भागाचा कलंक  वगळता  सर्वत्र आबादी आबाद असल्याचे चित्र उभे करून भाजप
निवडनुकीला सामोरा गेला होता.वाजपेयी सारखे सक्षम व् लोकप्रिय नेतृत्व होते.अशा सम्पूर्ण अनुकूल
असलेल्या वातावरणात प्रतिकूल निकालाला या पक्षाला सामोरे जावे लागले होते हे लक्षात घेण्या सारखे आहे.या पक्षा जवळ जनमानसावर प्रभाव असणारे एकमेव नेतृत्व वाजपेयींचे होते.अड़वाणी
यांचा प्रभाव कार्यकर्त्या पुरताच मर्यादित राहिला आहे.जनतेत प्रभाव असलेल नेतृत्व नसले की पक्ष
कसा तेजोहीन व् मरगळलेला बनतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे.याच कारणाने केंद्रातील सरकारने अनंत चुका व् अनंत अपराध करूनही सरकार विरुद्ध वातावरण निर्माण करण्यात ,आन्दोलन उभे करण्यात हा पक्ष सम्पूर्णपणे अपयशी ठरला आहे.तरीही बाबा आणि अण्णा
यानी आपल्या आन्दोलनातुन सरकार विरोधी निर्माण केलेले वातावरण किंवा ही आंदोलने हाताळताना  सरकारने केलेल्या चुका या भरवशावर भाजपचे सत्ताप्राप्तीचे स्वप्नरंजन सुरु आहे.राजघाटवर याच
स्वप्नरंजनातुन भाजप नेत्यानी दिवाळी साजरी करून आपल्या दिवाळखोरीचे प्रदर्शन तेवढे केले!

                                         भाजप मुळे पोकळी

भारतीय जनता पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षाच्या स्थानावर विराजमान आहे.विरोधी पक्षाला काम करण्या साठी ,जनतेत जावून त्याना संगठित करण्यासाठी ,जनसंघर्ष उभा करण्यासाठी सध्याचा काळ
हा सर्वाधिक अनुकूल काळ आहे.स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सर्वाधिक अक्षम,निष्क्रिय आणि भ्रष्ट म्हणता येइल असे सरकार केंद्रात आहे.पण अशा सरकार विरुद्ध आवाज बुलंद करण्यात भाजप
सपशेल अपयशी ठरला आहे.जे काम आधीच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपने करायला हवे होते
ते करू न शकल्याने बाबा - अण्णा यांचा उदय झाला. अन्ना आणि बाबा यांच्या आंदोलनाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाला विरोधी पक्षाची भूमिका निभावावी लागली होती,आणि आजही निभावावी लागत आहे.प्रमुख विरोधी पक्षाला सरकार वर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याने सरकार व न्याय संस्था एकमेकाच्या विरोधात उभ्या ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.असे चित्र लोकशाही साठी घातक आहे.  सक्षम सरकार व् सजग नि सक्रीय विरोधी पक्ष हे चांगल्या राजकीय व्यवस्थेसाठी आणि सुशासन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असतात.पण गेल्या दोन वर्षात प्रथमच अक्षम सरकार व् निष्क्रिय विरोधी पक्ष यांच्या जात्यात देशभरातील जनता
भरडली  जात आहे. यातून देशातील राजकीय व्यवस्था व् लोकशाही संस्था बाबत भले मोठे प्रश्नचिन्ह
उभे राहिले आहे.असे प्रश्नचिन्ह उभे करण्यात सरकार इतकाच विरोधी पक्ष म्हणून भाजप सुद्धा दोषी
आहे. सरकारच्या निष्क्रियतेचे   व् भाजपच्या अकर्मन्यतेचे  परिणाम आज देश भोगतो आहे.भाजपचे नेतृत्व परिस्थितीचा
उपयोग करून घेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.यातून नेतृत्वाचा खुजेपणा  स्पष्ट झाला आहे.                                                         संघाचे नेतृत्व

संघ व् भाजप यांचे सम्बन्ध जगजाहीर  आहेत.भाजपला या संबंधाचा अभिमान आहे आणि पक्षाचे नेते
तसे संधी मिळेल तेव्हा जाहीर करीत असतात.संघ मात्र हे सम्बन्ध कधीच खुलेपनाने मान्य करीत नाही. इतक्या वर्षात या पक्षाबाबत एकच गोष्ट संघाने आड़ पडदा न ठेवता केली.ती म्हणजे गडकरी याना अध्यक्ष म्हणून भाजपवर थोपविले!वास्तविक गडकरी हे भाजपच्या नेतृत्वाच्या रांगेत बरेच मागे होते.मंत्री म्हणून गडकरींची कार्यक्षमता व् प्रशासनावारील पकड़ सिद्ध झाली आहे.पण मंत्रालयात एखाद्या खात्याचा कारभार पाहणे आणि पक्ष चालविने यात महद अंतर आहे.पक्षासाठी प्रशासनावरील नाही तर लोकावरील  पकड़ महत्वाची असते.गडकरी यांची तशी पकड़ कधी महाराष्ट्रात नव्हती,तर देश पातळी वर असण्याचा प्रश्नच नव्हता.पण संघाने पुढे केलेला चेहरा असल्याने अध्यक्ष म्हणून त्याना विरोध करण्याची कोणाची हिम्मत नव्हती.कारण वाजपेयीचा अपवाद वगळता भाजपचे सगळे नेतृत्व संघप्रकाशित राहिले आहे.काही प्रमाणात भाजपातील मागासवर्गीय नेते संघ प्रभावाशिवाय स्वत:च्या ताकदीवर जनाधार निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत.पण भाजप मधे जनाधारित नेतृत्व आणि संघाधारित नेतृत्व यांच्यात नेहमीच संघर्ष होत आला आहे.अगदी वाजपेयीच्या वेळी सुद्धा सुप्त स्वरूपात का होइना असा संघर्ष झाला आहे.आज गाजत असलेले मुंडे प्रकरण म्हणजे या संघर्षाचे उग्र रूप आहे.संघ संस्कृती आणि पक्ष म्हणून भाजपचे नेतृत्व  मागास वर्गीय व वर्णीय याना स्वत:सोबत घेण्यास ,स्वत:च्या बरोबरीचा दर्जा देण्यास पुरेसे तयार नसल्याचेच हां संघर्ष दर्शवितो.परिस्थिती अनुकूल असतानाही भाजप सत्तेच्या जवळ येण्या ऐवजी दिवसेंदिवस सत्तेच्या दूर जाण्या मागे बऱ्याच अंशी हां संघर्ष कारणीभूत आहे.आज दिसत असलेला गडकरी - मुंडे संघर्ष हां जितका दोन व्यक्ती मधील आहे ,त्या पेक्षा जास्त संघाधारित नेतृत्व व जनाधारित नेतृत्व यांच्यातील तो संघर्ष आहे.यापुर्वीही शंकरलाल वाघेला , कल्याणसिंह आणि उमा भारती यांच्या बाबतीत असा संघर्ष झडला  आहे.या तिघानाही बाहेर पडावे लागले होते.हे तिघेही भाजपला आव्हान देण्यात असमर्थ ठरले असले तरी या संघर्षाने भाजप पक्ष कमजोर झाला हे सत्य आहे.या तीन मागास वर्गीय नेत्या पेक्षा मुन्ड़ेची स्थिती वेगळी असल्याने गडकरी - मुंडे संघर्ष भाजपच्या सत्ता प्राप्तीच्या उद्दीस्टातील मोठा अडथला ठरण्याची शक्यता अधिक आहे.बाहेर पडून भाजपत परतलेले कल्याणसिंह किंवा उमा भारती आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात एक महत्वाचा फरक आहे.कल्याणसिंह व उमा भारती यानी भाजपाला मागासवर्गीय चेहरा दिला ,पण गोपीनाथ मुंडे यानी असा चेहरा देण्या सोबतच पक्षाची बांधणी संघाधारित न ठेवता मागासवर्गीय आधारित केली .मागासवर्गियाचे नेतृत्व पक्षाला दिले.आता मुन्ड़ेना शह द्यायचा असेल तर तो संघाकडून देता येणारच नाही ,मुंडे नी उभे केलेले नेतृत्वच प्यादे म्हणून पुढे करावे लागणार आहे आणि महाराष्ट्रात नेमके असेच घडताना दिसत आहे.या खेळीने मुंडे बाहेर जातीलही पण नव्या मागासवर्गीय नेतृत्वा पासून सुटका करून घेण्यासाठी पुन्हा संघर्ष उभा राहिल.पक्ष म्हणून उभे रहायचे असेल व शक्तीशाली पर्याय म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरायचे असेल तर मागासवर्गीय नेतृत्वाला पक्षात मान आणि स्थान द्यावे लागेल.पण असे स्थान दिले की हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला पडतो .नेमके हेच संघाला नको आहे.एकीकडे भाजप नेतृत्वाची सत्ताकान्क्षा वाढते आहे तर दुसरीकडे सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण हिंदुत्वाचा मुद्दा सोडणे तर दुरच पण सौम्य देखील होता कामा नये हां संघाचा आग्रह आहे.भाजपची हीच दोलायमान अवस्था त्याला निष्क्रिय बनवून सत्तेपासून दूर नेत आहे.
  
                             संघापासून फारकत  गरजेची
जो पर्यंत संघ व भाजप यांची नाळ तुटत नाही तो पर्यंत भाजपचे समर्थ पर्यायी पक्ष बनण्याचे स्वप्न हे स्वप्नच
राहणार आहे.संघाधारित    नेतृत्व व मागासवर्गीय   नेतृत्व यांच्यातील संघर्ष सम्पविन्याचा  हा  मार्ग आहे. पण फ़क्त संघटन पातळी वर नाळ तुटून उपयोग नाही.  वाजपेयी सरकारने आपला पहिला कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून ही त्याना पराभव् पत्करावा लागला याची नीट कारणमीमांसा केली तर विचारांची  नाळ देखील तोड्न्याची गरज स्पष्ट होते.वाजपेयीना सर्व बाबी अनुकूल होत्या शिवाय गुजरात राज्यातील दंगलीतुन घडलेल्या नरसंहाराच्या.  मोदी सरकारचा यातील सहभाग हा संघाच्या वैचारिक वारशाचा परिणाम आहे. याबद्दल संघाला आणि भाजपतील संघीय नेतृत्वाला मोदींचा अभिमान वाटणे स्वाभाविक असले तरी याच कारणाने केंद्रातील सत्तेत परतन्याचा भाजपचा  मार्ग बंद झाला आहे हे लक्षात घेतले तर संघा पासून फरकत घेण्याची निकड लक्षात येइल.पण यासाठी संघाधारित नेतृत्वाकडून जनाधारित नेतृत्वाकड़े भाजपची सूत्रे आली पाहिजेत. संघ नियुक्त भाजप अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या राजिनाम्याने भाजपा अंतर्गत सत्तान्तराला प्रारंभ होवू शकतो . हीच भाजप साठी खरी दिवाळी असेल. असे  पक्षान्तर्गत  सत्तांतर झाल्या शिवाय देशाची सत्ता मिळविने हे स्वप्नरंजन ठरणार आहे.राजकीय पक्ष दीर्घ काळ सत्तेपासून दूर राहिला तर तो दिवाळखोर बनने अपरिहार्य असते.भाजप आज अशाच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
                                                        (समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाइल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि.यवतमाळ

2 comments:

  1. who will vote bjp ?
    yhis party has no face
    this party has no future
    sc ,st, muslim, vote only congress 30-40%
    ONLY 50% PEOPLE VOTE
    SO ONLY CONGRESS CAN WIN
    WHY WASTE UR VOTE TO BJP
    PL LEAVE HINDUISM FROM UR AGENDA
    ACCEPT ALL FRACTION OF SOCIETY
    HINDU INDIA IS IMPOSSIBLE
    LIVE IN HARMONY WITH ALL RELIGION
    ENJOY INDIAS 'SARVA DHARMA SAMBHAV'

    ReplyDelete
  2. The author of this article seems to be pure congress man. BJP is the only party which is a strong alternative to corrupt congress.
    The article language is highly confusing and direcionless. It is not clear as to what the author wants to say.

    ReplyDelete